आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २९ एप्रिल, २०२०

थोर संशोधक डॉ शंकर आबाजी भिसे




              स्वातंत्र्यपूर्व काळातील एक थोर संशोधक डॉ शंकर आबाजी भिसे यांचा जन्म  २९ एप्रिल १८६७ रोजी मुंबईत झाला. म्हणजे आज २९ एप्रिल २०२० रोजी त्यांचे १५३ वे  जयंतीवर्ष.  या जयंतीचा विसर पडणाऱ्यांचीच संख्या अधिक असेल. ज्या काळात भारतीय नागरिकांना कमी लेखले जात होते त्या काळात डॉ भिसे यांनी संशोधन क्षेत्रात अजोड कार्य केले. लहानपणापासून संशोधनाची आवड असनाऱ्या डॉ भिसे यांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी दगडी कोळश्यापासून गॅस शुद्ध करण्याचे पेटंट मिळवले. १८९७ मध्ये त्यांनी शास्त्रीय ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी सायंटिफिक क्लबची स्थापना केली. पुढील वर्षी त्यांनी याच क्लब तर्फे विविध कलासंग्रह नावाचे मासिक सुरू केले.त्यांनी तयार केलेल्या वजन मापन यंत्राच्या आराखड्याला इंग्लंडमध्ये पहिले बक्षीस मिळाले. विशेष म्हणजे या स्पर्धेत युरोप आणि अमेरिकेतील नामांकित संशोधक सहभागी झाले होते. सण १९०० मध्ये त्यांनी मुद्रणव्यवसायातील यंत्र सामग्रीचा अभ्यास केला व लायनो, मोनो इत्यादी यंत्राच्या रचना व कालमर्यादा यांचा अभ्यास करुन त्यांनी भिसे टाईप या यंत्राचा शोध लावला व त्याचे युरोपीय देश  व अमेरिकेमध्ये पेटंट प्राप्त केले. या यंत्राच्या उत्पादनासाठीत्यांनी  सर द टाटा- भिसे इन्व्हेन्शन सिंडिकेटची लंडन येथे स्थापना केली. इंग्लंडमध्ये गेल्यावर त्यांनी छपाईच्या क्षेत्रात अनेक शोध लावले. त्यांनी गुणिका मातृका नावाचे दर मिनिटास १ हजार २०० विविध प्रकारचे खिळे पडणारे यंत्र १९१४ मध्ये तयार केले, १९१६ मध्ये विक्रीसही काढले. त्याचवर्षी ते अमेरिकेत गेले व तिथे त्यांनी युनिव्हर्सल टाईप मशीन या कंपनीच्या विनंतीनुसार आयडियल टाईप कास्टर हे यंत्र शोधून काढले व त्यांचे पेटंटही मिळवले. १९२१ मध्ये त्यांनी हे यंत्र विक्रीस काढले. १९१७ मध्ये त्यांनी शेला नावाचे कपडे धुण्यासाठी वापरता येईल अशी डिटर्जंट पावडर तयार केली व त्याच्या निर्मितीचे हक्क एका ब्रिटिश कंपनीला दिले. त्यांनी शोध लावलेल्या ऑटोमेडियन या गुणकारी औषधामुळे पहिल्या महायुद्धात अनेक सैनिकांचे प्राण वाचले. डॉ भिसे यांच्या साठाव्या वाढदिवशी इंग्लंडमध्ये त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. या सुमारास त्यांची महान शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांच्याशी भेट झाली. एडिसन यांनीही त्यांच्या संशोधनकार्याचा गौरव केला. डॉ भिसे इंग्लंडमध्ये असताना इंग्लंडचे आफ्रिकेशी युद्ध सुरू झाले. यावेळी स्वयंचलित तोफ काढण्याची विनंती तेथील कारखानदारांनी भिसे यांना केली, पण आपले संशोधन हे विश्वाच्या कल्याणासाठी असून आपल्या संशोधनातून विश्वाचा संहार होऊ नये, अशी त्यांची भूमिका होती. म्हणूनच त्यांनी इंग्लंडमधील कारखानदारांनी ही मागणी नम्रतापूर्वक नाकारली. डॉ भिसे यांच्या मानवतावादी भूमिकेमुळे त्यावेळी अनेकांचे प्राण वाचले. डॉ भिसे यांनी सुमारे २०० शोध लावले. त्यांचे कार्य सर्वांसाठी कायम प्रेरणादायी आहे. अमेरिकेत न्यूयॉर्कयेथे ७ एप्रिल १९३५ रोजी या महान संशोधकांचे निधन झाले. संशोधन क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे.  शासनाने त्यांच्या या महान कार्याची दखल घेऊन त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा. 


-श्याम बसप्पा ठाणेदार दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५


चित्रपटसृष्टी वर अनोखा ठसा उमटवणारा अभिनेता


अगदी काही महिन्यांपूर्वी  सोशल मीडियावर अभिनेते इरफान खान यांचा एक फोटो पाहायला मिळाला. आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर रंगभूमी ते हॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या या सशक्त अभिनेत्याला कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने ग्रासले असल्याचा तो फोटो पाहून मनात मनात शंकेची पाल चुकचुकली. पण कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला हरवून हा अभिनेता पुन्हा रुपेरी पडदा गाजवू लागला तेंव्हा मात्र सर्व काही ठीक असल्याचे समाधान वाटले आणि अचानक इरफान खान यांचे निधन झाल्याची बातमी दूरचित्रवाणीच्या न्यूज चॅनलवर झळकली आणि मनातील शंका अखेर ठरली याचा रागही आला. इरफान खान हा केवळ बॉलिवूडचाच नव्हे तर हॉलिवूडमधलाही सक्षम अभिनेता मानला जातो. इरफान खान यांनी आपल्या सक्षम अभिनयाने रसिकांच्या मनावर मोहिनी घातली. इरफान खानकडे चित्रपटातील नायकांप्रमाणे गोरा गोमटा मुखडा नव्हता की बलदंड शरीरयष्टी नव्हती तरीही तो बॉलिवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला तो त्याच्या सशक्त अभिनय आणि अनोख्या संवाद फेकीने. अर्थात त्याचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. क्षमता आणि गुणवत्ता असूनही या टप्प्यापर्यंत पोहचण्यासाठी त्याला बरीच मेहनत घ्यावी लागली. इरफान खान यांचं पूर्ण नाव साहेबजादे इरफान अली खान असे होते. इरफान खान यांची घरची परिस्थिती बेताची, त्याच्या वडिलांचा टायरचा व्यवसाय होता. इरफान खान यांना लहानपणापासून अभिनयाचे वेड होते या वेडापायीच त्यांनी एनएसडी ( नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ) मध्ये प्रवेश घेतला.   त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने  एनएसडी कडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीवर त्यांनी तो कोर्स पूर्ण केला. नंतर रंगभूमीवर भूमिका करत त्यांनी टेलिव्हिजन वरील अनेक मालिकांमध्ये काम केले. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळवला. बॉलिवूडमध्ये त्यांनी एकाहून एक सरस सिनेमे केले. बॉलिवूड प्रमाणे हॉलिवूडपटातही त्यांनी  भूमिका केल्या. स्पायडरमॅन, ज्यूरासिक वर्ल्ड, इंम्फर्मो या सारख्या गाजलेल्या  हॉलिवूडपटात त्यांनी भूमिका केल्या. हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्स हे त्यांच्या अभिनयाचे प्रचंड चाहते. एका मुलाखतीत ते म्हणतात इरफान खान यांचे डोळेही अभिनय करतात. हिंदीतही त्यांनी अनेक चांगल्या भूमिका केल्या. पान सिंह तोमर या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर हासिल चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाच्या फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. २०११ साली भारत सरकारने त्यांना मानाचा पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या अभिनय कलेचा गौरव केला. आपल्या सशक्त अभिनयाने चित्रपटसृष्टीवर अनोखा ठसा उमटवणाऱ्या या अभिनेत्याच्या अकाली एक्झिटमुळे चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे. इरफान खान यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 

-श्याम बसप्पा ठाणेदार 
दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५

एका संवेदनशील अभिनेत्याची अनपेक्षित एक्झिट.....


     
          आपल्या कसदार व लाजवाब अदाकारीने भारतीय चित्रपटसृष्टी मध्ये स्वतः ची अशी वेगळी छाप निर्माण करणारा इरफान खान याची अनपेक्षित एक्झिट ...  त्याचा ' इंग्लिश मिडीयम ' हा शेवटचा चित्रपट. हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यावेळी तो म्हणाला, " मैं आज आपके साथ हुं भी और नहीं भी । मेरे शरीर के अंदर कुछ अनवॉन्टड मेहमान बैठे हैं । उनसे वार्तालाप चल रहा हैं । देखते हैं किस करवट ऊंट बैठता हैं । जैसा भी होगा आपको इत्तीला कर दी जाएगी । " आपल्या अंतर्मनाशी सहजतेने संवाद साधणारा एक कसदार व अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. ५३ व्या वर्षीच एक्झिट करणे मनाला चटका लावून जाते.  इरफान खानने ' मकबुल ' , ' लाइफ इन अ मेट्रो ', ' द लंच बॉक्स ', ' पीकू ' , आणि ' हिंदी मीडियम ' अशा दर्जेदार कलाकृतीतून आपला वेगळा ठसा उमटवला, आणि आपला एक वेगळा प्रेक्षक वर्ग निर्माण केला. ' पानसिंह तोमर ' या चित्रपटातील भूमिकेबद्दल राष्ट्रीय पारितोषिक देण्यात आले. तसेच भारत सरकारने  ' पद्मश्री ' 'किताब देवून त्याच्या कलेचा गौरव करण्यात आला. 

इरफान खान यांना भावपूर्ण श्रद्धांजली

-जयवंत पाटील, 
माजी कार्याध्यक्ष, शिक्षक भारती,
कार्याध्यक्ष, 
शिक्षक साहित्य संमेलन संस्था, व 
शिक्षक भारती परिवार 

मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

प्राथमिक आरोग्य केंद्रास PPE किटचे वाटप


पेण - सागर शिक्षण मंडळ वाशी -पेण या संस्थेचे अध्यक्ष व खारेपाट विकास संकल्प संघटनेचे सदस्य श्री. प्रसाद रमाकांत पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद वाशीला पाच PPE किट व एक तापमान  सेंन्सर मशीन भेट दिले आहे.
     या वेळी प्रा.आ. केंद्राच्या डॉ. मनिषा म्हात्रे यांनी श्री. प्रसाद पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले व अशाच प्रकारची खरोखर गरज असणाऱ्या वस्तूची मदत समाजातील दानशुर व्यक्तीनीं पुढे येवून करण्याची हिच योग्य वेळ असल्याचे यावेळी आपले मत व्यक्त करतांना त्यांनी  सांगितले.

महिला दिवस रोजच असावा



आठ मार्च रोजी जगात महिला दिन साजरा केला गेला. महिलांना सन्मान मिळावा या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात काही अर्थ आहे का ? महिला दिन रोजच साजरा करण्यासारखा आहे. कारण पुरुषांच्या जीवनातून महिला वजा केल्यावर जीवन काय उरते ? याची साधी कल्पना देखील करवत नाही. विचार करण्यासारखी बाब आहे, पण यावर कोणाताच पुरुष विचार करत नाही, हीच फार मोठी खेदाची बाब आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिलांना देखील वागणूक मिळायलाच हवे असे बोलणारे अनेक भेटतील पण बोलल्या प्रमाणे कृती करणारे फारच कमी बघायला मिळतात. महिलांना घरात मिळणारे दुय्यम स्थान हा विषय सर्वांसाठी चिंतन करणारा आहे. यासाठी सर्वात पहिल्यांदा पुरुषाला स्वतः मध्ये बदल करणे आवश्यक आहे तरच महिलांना काही करता येईल
घरात, समाजात कामाची झालेली विभागणी यावर चर्चा व्हायला पाहिजे. आपल्याकडे कामाची अशी विभागणी झालेली आहे की, अमुक काम पुरुषांनी आणि तमुक काम स्त्रियांनीच केली पाहिजे. याठिकाणी कसलीही तडजोड स्वीकारायला आपले मन तयार होत नाही. याची शिकवण अर्थात लहानपणापासून मिळते ज्यामुळे एकामेकांची कामे वाटून घेतली आहे. म्हणून महिलांच्या या कामामध्ये पुरुषांनी स्वतःहुन सहभागी झाल्यास काही बदल होऊ शकेल. प्रत्येक पुरुषांनी घरातील महिलांच्या कामात थोडीशी मदत करायला हवी. आपली जराशी मदत देखील महिलांना खुप काही बळ देऊन जाईल. प्रत्येक घरातील महिला सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत भरपूर काम करत असते. त्या सर्व कामातील काही काम पुरुषांनी केले तर तेथे खरी समानता सुरू होईल. ज्या घरात पुरुष आपल्या पत्नीला किंवा आईला मदत करतो त्या घरात असणारे मुलं देखील भविष्यात तसे वर्तन करतील. म्हणजे नकळत आपण आपल्या मुलांवर असे संस्कार करत असतो हे महत्वाचे आहे. आज रोजची वर्तमानपत्रे किंवा टीव्ही चालू केले की महिलांवर होत असलेल्या अनेक अन्यायकारक बातम्या वाचायला व पाहायला मिळतात. अनैतिकता खूप वाढली आहे असे चिंताजनक वाक्य आपल्या तोंडून बाहेर पडते पण ही अनैतिकता का निर्माण झाली असेल यावर चिंतन करत नाहीत. पूर्वी महिलांना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती आज त्यांना घराबाहेर पडण्याची परवानगी मिळून देखील ते निर्भयपणे फिरू शकत नाहीत. म्हणजे ते आज ही आपल्या घरातच कैद असल्यासारखे आहेत. एखादी महिला रात्रीच्या वेळी सुमसान रस्त्यावर असेल तर तिच्या जीवाला धोका ठरलेला आहे. दिल्ली, मुंबई सारखी महानगरे रात्रीला झोपत नाहीत असे म्हणतात पण त्याच न झोपणाऱ्या शहरात लोकांची झोप उडून जाईल अश्या घटना घडत आहेत. महिलांच्या मनातील भीती काढण्यासाठी प्रत्येकांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. प्रत्येक महिलेला सन्मानाने जगता येण्यासाठी सुरुवात आपल्या घरापासून करायला हवे. घरातली आपली वागणूक आपल्या लहान मुलांवर संस्कार करीत असते. म्हणून घरातील प्रत्येक कर्त्या पुरुषाने काळजीपूर्वक वागले पाहिजे. मुलगा मुलगी समान ची वागणूक घरातून झाली पाहिजे. याच ठिकाणी आपण दुजाभाव करतो आणि असमानता चालू होते. घरातल्या महिलांना मग ती आई असेल, बहीण असेल किंवा बायको असेल त्यांना थोडी मदत ही पुरुषांनी करायलाच पाहिजे. ते आपले कर्तव्य आहे. 
दरवर्षी नुसते असे महिला दिन साजरे करून काही निष्पन्न होणार नाही. म्हणून महिला दिन एक दिवस नाही तर 365 दिवस ही साजरे व्हायला पाहिजे असे वाटते.

- नासा येवतीकर
9423625769

टाळेबंदीत अत्यावश्यक उद्योग सुरू व्हावेत


संपूर्ण जगाला वेढीस धरणारा कोरोना अजुन माघारी जाण्याचा विचार करत नाही. स्पर्श म्हणजे कोरोना. ही भीती काही काळ टिकून राहणार आहे. जीवनावश्यक वस्तू जोपर्यंत मिळताहेत तोपर्यंत टाळेबंदीचा परिणाम जाणवत नाही. परंतु टाळेबंदीत वस्तू मिळेनाशा झाल्यावर खर वास्तव कळेल. ताळेबंदी नंतर दुकाने उघडतील आणि मुबलक वस्तू मिळतील हा भ्रम आहे. यासाठी अंशत: ताळेबंदी उठविणे अर्थ व्यवस्थेला धरून आहे. लहान लहान उद्योग सुरू करावेत. उत्पादन बाजारात येईल. कामगार वर्ग तातडीने कामावर रुजू होईल अशी आशा अजिबात नाही. म्हणून सध्याच्या टाळेबंदी काळात अत्यावश्यक उत्पादन वाढीस सरकारने लक्ष दिले पाहिजे. पवसापूर्वी खोळंबलेली कामे सुरू झाली पाहिजेत. ताळेबंदी नंतर विविध सामग्री आदी सामानाची मागणी वाढणार आहे. परंतु त्यांच्या उत्पादनाला वेळीच संधी न दिल्यास पुरवठा शक्य नाही. आपला परिसर, आपले राज्य कोरोना मुक्ता झाला म्हणजे लढाई संपली असे नाही. जगण्याची लढाई सुरू होणार आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने वेळीच अभ्यासपूर्वक भविष्याकडे पाहण्याची गरज आहे.


-श्री. कृष्णा काजरोळकर
२४४/९५७०, कन्नमवार नगर १,
विक्रोळी पूर्व, मुंबई ४०००८३.
Mob. ९९६९२६०२६७.

झुलवाकारांना भावपूर्ण आदरांजली..



समाजातील जळजळीत वास्तव, अनुभवांची दाहकता आयुष्यभर लेखणीवाटे साहित्यात उतरवणारे जेष्ठ साहित्यीक झुलवाकार उत्तम बंडू  तुपे यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. उत्तम बंडू तुपे यांचा जीवनप्रवास अत्यंत खडतर असा होता. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एका गावात त्यांचा जन्म झाला. दुष्काळ आणि गरिबी यामुळे त्यांचे कुटुंब पुण्यात स्थलांतरित झाले. तिथे त्यांना त्यांच्या बहिणीने आधार दिला. अवघे तिसरी पर्यंत शिकलेले बंडू तुपे हे अण्णाभाऊ साठेंचे खरेखुरे वारसदार. अण्णाभाऊ साठे हेच त्यांचे दैवत. बालवयातच  अण्णाभाऊ साठेंची सर्व  पुस्तके त्यांनी वाचून काढली. त्यामुळे त्यांच्यावर अण्णाभाऊंचा मोठा प्रभाव होता. या प्रभावातूनच त्यांचे लेखन फुलत गेले. अतिशय गरीब परिस्थिती असल्यामुळे मिळेल ती कामे करीत उत्तम बंडू तुपे यांनी विपुल लेखन केले. कादंबरी,कथा, लघुकथा, नाटक, आत्मकथन अशा साहित्यातील सर्व क्षेत्रात त्यांनी विपुल लेखन केले. उपेक्षित वंचित वर्गाच्या वेदना त्यांनी आपल्या साहित्यातून चित्रित केल्या. तब्बल सोळा कादंबऱ्या व असंख्य कथा लिहीणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांची झुलवा ही कादंबरी प्रचंड लोकप्रिय ठरली. त्यामुळे साहित्य वर्तुळात ते झुलवाकार म्हणूनच ओळखले जाऊ लागले. खुळी, कळा, कळाशी, नाक्षरी, भस्म, चिपाड, झंजाळ, जावळ या त्यांच्या कादंबऱ्या प्रचंड गाजल्या. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. आंदण या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा  पुरस्कार मिळाला. काट्यावरची पोटं या आत्मकथेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मिळाला तर झुलवा कादंबरीला राज्यसरकारचा पुरस्कार मिळाला. झुलवा कादंबरीवर नाटकही निघाले. समाजातील उपेक्षित, वंचित वर्गाचे चित्र आपल्या साहित्यातून रेखाटणारे, अण्णाभाऊ साठेंचे खरेखुरे वारसदार शोभणारे एक महान साहित्यिक आज काळाच्या पडद्याआड गेले आहे.अशा महान साहित्यिकास विनम्र अभिवादन! 

--श्याम बसप्पा ठाणेदार 
दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५

कोरोनाग्रस्त अतिरेकी नव्हेत !



जगभरातील मानवी वस्त्यांवर विषाणूचा हल्ला सुरू आहे. एखाद्या युद्धातील नरसंहाराप्रमाणे मानवी देहांचा खच जिकडे तिकडे पडत आहे. त्यामानाने भारत आणि भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई कोरोनामुळे खचली गेली असली तरी तिने अजून मान टाकलेली नाही. मुंबई, पुणे, कल्याण, भिवंडी, पनवेल, औरंगाबाद, नागपूर, नाशिक अशी महत्वाची शहरे कोरोनातून सावरत आहेत. त्यांचा नक्कीच हिरोशिमा, नागासाकी होणार नाही. परंतु, प्रचंड आत्मविश्वासाने विषाणूचा मुकाबला करताना इथली काही माणसं खचली आहेत. त्यांच्यातील मानवता नष्ट होताना दिसते. विषाणूबद्दल राग, रोष, द्वेष कमी आणि ज्याला त्या कोरोनाची लागण झाली आहे, त्या रुग्णांबद्दल प्रचंड चीड दिसते.
का, कुणास ठाऊक? पण कोरोना रुग्णांविषयी इतकी घृणा माणसाकडे कशी आली हा एक संशोधनाचा आणि तितकाच चिकित्सकतेचा भाग आहे. स्वतःला विज्ञानवादी समजणारी माणसं एखाद्या आजाराकडे अशी संकुचित वृत्तीने एकाएकी का पाहू लागली? पूर्वी कुष्ठरोग झाला की त्या माणसाला अस्पृश्य समजले जायचे. ती अस्पृश्यता आता कोरोनाने पुन्हा मानवी मनात पेरली आहे. कोरोनाग्रस्त व्यक्ती निष्पन्न झाली की, त्याच्यासह कुटुंबांकडे पाहण्याचा दृष्टिकोन क्षणात बदलतो. आता सकाळी त्याच्यासोबत चहा घेतला, दुपारी मनसोक्त गप्पा मारल्या, संध्याकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर यांच्या मनात भीतीचे आभाळ निर्माण होते आणि तो शेजारी असेल, नातेवाईक असेल, एका इमारतीमध्ये कित्येक वर्षांपासूनचा दोस्त असेल, परिचित असेल तर तो कोरोनाबाधित आहे हे कळल्यावर त्याला, त्याच्या कुटुंबाला मानसिक आधार देण्याऐवजी त्या सगळ्यांकडे अतिरेकी असल्यासारखे पाहिले जाते. त्यात सुशिक्षित, अतिसुशिक्षितसुद्धा आहेत.
त्या व्यक्तीला सोसायटीतून रुग्णवाहिकेमधून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना त्याचे मोबाईलवर फोटो काढून ते व्हायलर केले जातात. 'आमच्याकडे एक सापडला', 'अमुक गावात अजून एक निघाला', कोरोना झाला हे माहीत असतानाही तो लपून कसा राहिला? असा त्याच्याच सोसायटीतमध्ये प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. हा आजार आहे. तो बरा होता. त्यातून सामजिकस्थिती बिघडलेली आहे. त्या सामाजिकतेला गंभीर आजार झालेला आहे. काहींचे मानसिक संतुलन बिघडू लागले आहे. ते माणसामाणसांत विषवल्ली पेरताना दिसत आहेत. रिकामे डोकं सैतानाचे घर असल्याचे ते दाखवून देत आहेत.
मुंबई आणि महाराष्ट्राने अनेक आंदोलने पाहिली, दंगे पाहिले. प्लेगसारखी साथ अनुभवली. बॉम्बस्फोट अंगावर घेतले. 26/11 चा दहशतवादी हल्ला सहज परतवून लावताना त्यांच्यातील स्पिरिट कधी मरून पडले नव्हते. आज महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त कमी आणि मनाला त्याची वाळवी लागलेले मानसिक रुग्ण जास्त आहेत. त्यातून कोरोनाग्रस्तांबाबत घृणा बाळगणारे आणि पसरवणारे ' सो कॉल्ड' जास्त आहेत. इतकेच नाही तर पुढे त्या कोरोनाग्रस्तांना हाक मरतानासुद्धा ' हाय कोरोना', ' बाय कोरोना ', अशी त्यांची खिल्ली उडवली जाईल आणि सामाजिक परिस्थिती गंभीर होईल. हा नवा विषाणू मानवी मनाला घेरून राहिला आहे, तो पहिल्यांदा मनामनांतून ठेचून काढला पाहिजे.
कोरोनाची साथ आटोक्यात यायला किमान जुलै, ऑगस्ट जाईल, असे दिसते. त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत. मानवी मनाची कला कितीही विकसित झाली तरी त्यातील संकुचितपणा, द्वेष, मत्सर, असूया, निंदा ही वृत्ती नाहीशी होत नाही, तोपर्यंत कोरोनाचे भुत थैमान घालत राहील आणि माणूस कितीही शिकला, सावरलेला, ज्ञानी, पंडित असेल तरी तो माणूस म्हणून वागताना दिसणार नाही.
कोरोनावर लस निघाली नाही. संशोधन सुरू आहे. त्याची प्रतीक्षा करण्याची मुळीच गरज नाही. कोरोनावर एकच जालीम औषध आहे ते म्हणजे मानसिक आणि सामजिक आधाराचे!
माणसाने माणसाशी माणसासम वागावे... ही लस, हे औषध कुठल्याही कारखान्यात तयार होत नाही तर जिथे तयार होते ते मानवी मन आपुलकीने समृद्ध केल्याशिवाय आणि कोरोनाग्रस्तांना कौटुंबिक प्रेम दिल्याशिवाय हे युद्ध आपण जिंकूच शकत नाही.
नव्वदच्या दशकात काश्मीर, पंजाब पेटले होते. तिकडे हिंसाचार माजला होता. रक्ताचे सडे पडत होते. भारतीय सैनिक शहीद होत होते. नक्षलवाद नष्ट करताना अनेकांना ते कंठस्नान घालत होते. त्याच काळात मुंबईत मटका जुगार जोरात होता. दोन्हीकडील आकड्यांचा लोकं अगदी मनापासून आनंद लुटत होते. कुणाला कशाचा आनंद होईल हे काही सांगता येत नाही. दुसऱ्यांदिवशी मुंबईतील मटक्याचा आकडा आणि काश्मीर, पंजाबमधील चकमकीचा आकडा वर्तमानपत्रांतून लोकं ज्या चवीने वाचायला उतावीळ असायचे, त्याच वृत्तीने आज कोरोना रुग्ण मोजत मनातील सैतानाला खतपाणी घालत आहेत. तो सैतान पोसून सामाजिक हानी पोहचवण्याचा उपद्व्याप काही जण घरी बसून करीत आहेत. त्यापेक्षा कोरोनाबाधित कुटुंबाचा आधार बनता आला तर वसुधैव कुटुंबकम ही संज्ञा तरी मनात रूजेल आणि मानवी जीवनाचे सार्थक होईल.


- कांतीलाल कडू

सोमवार, २७ एप्रिल, २०२०

परप्रांतियांसाठी ट्रेन सुरु करा!

     

कोरोना विषाणूचा वाढता प्रसार व त्यामुळे सुरु असणारे देशव्यापी लाॅकडाउन लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांनी परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेली मागणी योग्यच आहे. कारण लाॅकडाउन असल्यामुळे रोजगारही उपलब्ध नाही, त्यामुळे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीबरोबरच इतर सदस्यांचे अत्यंत हाल होत आहेत. परंतु, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत दुमत दर्शविले आहे. मुंबईसह अन्य शहरात अडकलेले परप्रांतीय मजूर त्यांच्या गावाकडे गेले तर काय खाणार? अशी चिंता गडकरीना भेडसावत आहे. गडकरी यांची चिंता अयोग्य आहे असे मला वाटते. कारण स्वतःच्या राज्यात जाऊन थोडीफार मोलमजुरी करून हे नागरिक उपजीविका करु  शकतात. महाराष्ट्र राज्य सरकारने आजपर्यंत काही कमी पडू दिले नाही. आता त्यांना त्यांच्या राज्यात जाऊ द्या. त्यांच्या माय-बाप सरकारलादेखील त्यांच्या नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली पाहिजे. जेणेकरून, तेवढेच पुण्य त्यांच्या सरकारच्या पदरी पडेल.

           - सुधीर कनगुटकर
           १/९, संतोष भगत चाळ,
           बी आर नगर,
           दिवा (पूर्व), ४०० ६१२.

व्होकाँर्ड फाऊंडेशनतर्फे २०० कुटूंबीयांना जीवनावश्यक अन्नधान्य वाटप


मुंबई:(शांत्ताराम गुडेकर )

      व्होकाँर्ड  फाऊंडेशनतर्फे चेंबुर येथील श्री गणेश मंदिर सभागृह, वाशी येथे वाशी गावातील २०० घरांमध्ये अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले.त्याबद्दल WOCKARDT  FOUNDATION चे वाशी ग्राम सेवा मंडळ तर्फे हार्दिक आभार व्यक्त करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता माणिक पाटील,प्रकाश पाटील,प्रदीप गावंड,सेक्रेटरी धनंजय ठाकुर, प्रियांका पाटील, बाळकृष्ण पाटील,रमेश वामन पाटील,रवींद्र पाटील,Michael पिल्लई,राकेश गावंड,मयुर गावंड,हितेश पाटील,रोहित पाटील,अजय गावंड,देवेंद्र पाटील,हेमंत जगन्नाथ, विशाल गावंड,सुहास जगन्नाथ व गावातील इतर मान्यवरांकडून विशेष मेहनत घेण्यात आली. मोहन बाबू पाटील व करण मोहन पाटील त्यांचा घरून चहा व दुपारी जेवणाची व्यवस्था केल्याबद्दल त्यांचेही वाशी ग्राम सेवा मंडळतर्फे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

पवई पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण



पवई : (अविनाश हजारे)करोना विषाणूच्या पकडीपासून कोणीही वाचू शकलेले नसून, आता पवई पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पोलीस ठाणे हद्दीत आपले कर्तव्य बजावत असताना दोघांना लागण झाल्याचे समोर येत आहे. दोघानांही त्वरित नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यासोबतच पोलीस ठाण्याच्या ४ कर्मचाऱ्यांना खाजगी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

जगभर कोरोनाने थैमान घातले असून, देशातही कोरोना आपले हातपाय पसरत आहे. यात महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या परिस्थितीला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका दोघेही प्रयत्न करत आहेत. यासाठी घोषित केलेल्या लॉकडाऊनमध्ये मुंबईत कायदा सुव्यवस्था राखण्याचे महत्वाचे काम हे मुंबई पोलीस करत आहेत. मात्र या महाभयावह शत्रूशी लढताना त्याची लागण झाल्याने काही पोलीस कर्मचारी जायबंदी सुद्धा होत आहेत.

“पवई पोलीस ठाण्यातील एका २९ वर्षीय पोलीस शिपायाला कोरोना लागण झाल्याचे २३ एप्रिलला त्याच्या तपासणीतून उघड झाले आहे. त्याच्यावर सध्या पवईतील हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याचवेळी पाठीमागील काही दिवसापासून बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयात उपचार घेणारे पवई पोलीस ठाण्यातील हवालदारचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना मरोळ येथील सेव्हनहिल रुग्णालयात हलवण्यात आले आहे” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले “दोघांनाही सर्दी, ताप, खोकला असे लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्यांच्या चाचण्या करण्यात आल्यामुळे त्यांना बाधा झाल्याचे लक्षात आले. दोघांवरही योग्य उपचार सुरु असून, दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.”

या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेले ४ कर्मचारी यांना पवई पोलिसांच्या माध्यमातून साकीनाका येथील एक हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून, अहवाल येणे बाकी आहे.

पालिकेचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ ? पालिका नाशवंत अन्न पुरवत असल्याचा भांडुपच्या नगरसेविकेचा आरोप


भांडुप: (अविनाश हजारे)लॉकडाऊन च्या काळात गरीब- गरजूंना मुंबई महानगर पालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या अन्नाच्या दर्जावर भांडुपच्या एका नगरसेविकेने प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे अन्न नाशवंत आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला आहे.
भांडुपच्या प्रभाग ११६ च्या नगरसेविका जागृती पाटील यांनी पालिकेला पत्र लिहून  या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
याबाबतचा सविस्तर प्रकार असा की, लॉकडाऊन जाहीर होऊन महिना उलटला असून, लोकांच्या हाताला काम नाही. त्यातल्या त्यात या काळामध्ये गरीब- कष्टकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने गरजूंना आधार म्हणून खिचडी बनवून ती वाटण्यासाठी एका कंत्राटदाराची रीतसर नेमणूक केली आहे. 
परंतु, गरजूंना देण्यात येणारी खिचडी सुमार दर्जाची असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर देखरेख करण्यासाठी पालिकेचा संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आपल्या कर्तव्यात कसूर करत आहे. असे नगरसेविका पाटील यांचे म्हणणे आहे. त्यांनी तसे पत्र पालिका आयुक्तांना दिले असून, याची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. 
  याबाबत अधिक माहिती देताना नगरसेविका जागृती पाटील म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून आपल्या प्रभागात येणारी खिचडी निकृष्ट दर्जाची असून, या खिचडी वाटपाच्या वेळेत नियोजन नसल्याने ती नाशवंत होते. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणून  आपण एस विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्या दालनात  पाहणी करण्यासाठी गेले असता यावेळी एस आणि टी विभागाच्या समाजविकास अधिकारी ( नियोजन) वेदिका पाटील यांनी सदरची अन्नाची पाकिटे नाशवंत झाल्याचे कबूल केले. 
आपण या गंभीर प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करत, नागरिकांच्या आरोग्यासाठी पालिकेने याचे योग्य ते नियोजन करण्याची मागणीही नगरसेविका जागृती पाटील यांनी केली आहे.

रविवार, २६ एप्रिल, २०२०

कांजुरमार्ग पूर्वेस गरजूंना पावभाजी आणि राईस वाटप



मुंबई --मा. खासदार श्री संजय दिना पाटील व आमदार मा श्री सुनिलभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाने कांजूरमार्ग (पूर्व) वार्ड क्रमांक 117 मधील  पंचशील नगर, कर्वे नगर, इंदिरा नगर तसेच नेहरू नगर याठिकाणी मंचेकर कुटुंबियांकडून रविवार दि. 26 एप्रिल रोजी  स्व:खर्चाने  व शासनाच्या नियमांचे पालन करून जवळपास  600 गरजू  लोकांना पावभाजी आणि राईसचे वाटप करण्यात आले.  लॉकडॉऊन असेपर्यत  दररोज विविध प्रकारच्या  जेवण वाटपाचे सामाजिक कार्य चालू राहणार असल्याचे तसेच  याचा विभागातील  गरजू लोकांनी लाभ घ्यावा असे यावेळी मंचेकर कुटुंबाकडून सांगण्यात आले.

अधिक माहितीसाठी संपर्क - मो.9821875733.

@आदर्श वार्ताहर वृत्तसेवा
                         



निवडणुक कालावधी करीता लॉक डाऊन चे दिवस वगळावेत


महाविकास आघाडी तर्फे मुख्यमंत्री म्हणुन मा उद्धव ठाकरे यांची २८ नोव्हेंबर २०१९ रोजी निवड करण्यात आली आहे. त्यावेळी ते कोणत्याही विधी मंडळाचे सभासद/ आमदार न्हवते. (त्यामुळे १६४/४ घटनेप्रमाणे) पुढील ६ महिन्यात त्यांना आमदार होणे अनिवार्य आहे. परंतु करोना लॉकडाऊन  मुळे विधान परिषदेच्या होऊ घातलेल्या ९ रिक्त जागेवरील २० एप्रिल २०२० मध्ये होणार्‍या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी पुढे ढकल्यामुळे मा. उद्धव ठाकरे कोणत्याही विधी मंडळाचे आमदार होऊ शकलेले नाहीत. अशा परिस्थितीत राज्य मंत्री मंडळाने ९ एप्रिल २०२० रोजी राज्यपाल नियुक्त आमदार म्हणुन  अशी शिफारस मा राज्यपालांकडे केली आहे. परंतु राज्यपालांनी अजून ही शिफारस मान्य केलेली नाही. तत्पूर्वी जर शिफारस मान्य करून ही ह्या जागेचा कालावधी ६ जून २०२० पर्यंत आहे. म्हणजे एक ते दीड महिना शिल्लक आहे. त्यामुळे लॉक डाऊन वाढन्याचा शक्यतेच्या कालावधी मध्ये विधान परिषदेच्या निवडणुका होणे अशक्य आहे. त्यामुळे मा ठाकरे यांना कोणतेही पर्याय शिल्लक राहण्याची शक्यता धूसर आहे. अशा परिस्थितीत त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावयास लागून मंत्रिमंडळ बरखास्त होऊ शकते. अशा घटनात्मक परिस्थिती मध्ये राज्यपाल राष्ट्रपती तर्फे राष्ट्रपती राजवट जाहीर करू शकतात. तरी करोना विषाणूने जग भरात थैमान घातले आहे गेल्या १०० वर्षात जागतिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य मध्ये राजकीय पेच प्रसंग निर्माण होऊन राष्ट्रपती राजवटीमुळे, राज्यपाल प्रशासन मध्ये कितपत राज्यकारभार करुन करोना महामारीचा मुकाबला करु शकणार आहेत का? ह्याचा राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री यांनी विचार करावयास हवा. तत्पूर्वी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे, त्यांचे सहकारी मंत्रिमंडळ आणि प्रशासन खंबीरपणे, संयमाने करोना चा मुकाबला करीत आहेत. त्यामुळे जगामध्ये कौतुक होत आहे. मुख्यमंत्री ठाकरे, पंतप्रधान मा नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री, मंत्रिमंडळ संबंधित प्रशासन जनतेशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधत आहेत. तरी करोना  कालावधीत राज्य शासन सुरळीत चालावे म्हणुन पंतप्रधान यांनी म्हटल्याप्रमाणे माणसांचा जीव महत्त्वाचा. देशाचा नागरीक जिवंत राहिले तर देश जिवंत राहील. अशी पंतप्रधानांची भूमिका आहे. त्याकरिता महाराष्ट्र राज्य प्रशासन करोना काळात सुरळीत चालण्याकरीता यावर अपवादात्मक म्हणुन एकच मार्ग निर्णय म्हणजे केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी लॉक डाऊन चे दिवस वगळुन सन २०२०/२०२२ विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर कराव्यात. आणि तो पर्यंत ठाकरे मुख्यमंत्री राहू शकतील. त्याकरिता राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, निवडणूक आयुक्त यांनी अपवादात्मक म्हणुन सकारात्मक निर्णय घ्यावा.

  -विजय ना कदम
    लोअर परळ

प्राणिमात्रांना कोरोना -नवे संकट



जगभर कोरोनाचा प्रसार वाढतच चालला आहे आतापर्यंत आतापर्यंत माणसांनाच हा रोग होत असल्याचा भ्रम आपल्या मनात होता पण आता प्राण्यांनाही कोरोनाची बाधा होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. न्यूयॉर्क मधील एका प्राणिसंग्रहालयातील वाघिणीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अमेरिकेमध्येच काही मांजरीना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आल्याने देशाच्या  चिंतेत भर पडली आहे कारण प्राणी संग्रहलायतील प्राण्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी प्राणिसंग्रहालयाला निर्जंतुक करता येऊ शकेल पण गावात मोकाट फिरणाऱ्या प्राण्यांवर कसे लक्ष ठेवणार हा प्रश्न आहे. गावात मोकाट फिरणाऱ्या प्राण्यांची संख्या खूप असते शिवाय पशुपालन करणाऱ्यांची संख्याही देशात लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे जर या प्राण्यांना कोरोनाची बाधा होऊ लागली तर देशात नवेच संकट उभे राहिल त्यामुळे प्राणीमात्रांना कोरोनाची बाधा होणार नाही त्यांच्यापर्यंत हा संसर्ग पोहचणार नाही याची दक्षता मनुष्यप्राण्याला घ्यावी लागेल. आधीच कोरोनामुळे मनुष्यप्राणी हतबल झाला आहे त्यात जर प्राणिमात्रांची भर पडली तर पृथ्वीवरील जीवसृष्टीच धोक्यात येईल.  

-श्याम बसप्पा ठाणेदार, 
दौंड जिल्हा पुणे 

कांतीलाल कडू यांच्या आमरण उपोषणाच्या इशाऱ्याने परिचारिका, सुरक्षा रक्षकांना पगार ; 29 लाखांचे अनुदान झटक्यात केले वर्ग : प्रामाणिक हेतू- प्रयत्नाची सर्वत्र चर्चा


पनवेल: कोरोनाच्या सैतानी विषाणूविरोधात लढणाऱ्या अधिपरिचारिका, कुशल अकुशल कामगार आणि सुरक्षा रक्षकांना 24 तासाच्या आत पगार न दिल्यास घरात कोंडून घेऊन त्यांना पगार मिळेपर्यंत आमरण उपोषण करेन, असे निर्वाणीचे पत्र पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी काल, शुक्रवारी (25 एप्रिल) दिले होते. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य खात्याने तातडीने 29 लाख रुपये काही तासात उपजिल्हा रूग्णालयाच्या खात्यावर वळते केले आहेत.
पनवेल उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या कुशल, अकुशल अधिपरिचारिकांचा तीन महिन्यांचा पगार थकीत होता. तर सुरक्षा रक्षकांना सहा महिने पगारापासून वंचित ठेवले होते. त्यातच हे रूग्णालय कोविड रुग्णांसाठी दिले आहे. लॉकडाऊनमध्ये कामगारांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली होती. या पार्श्वभूमीवर पनवेल संघर्ष समितीने 16 एप्रिलला राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, आरोग्य खात्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त अनुप कुमार यादव, अतिरिक्त आयुक्त रमेश पतंगे यांना पत्र ई मेल करून कोविड रुग्णालयातील कामगारांचा प्रलंबित पगार मिळावा, अशी विनंती केली होती.
त्यानंतर आरोग्य मंत्री टोपे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन जाधव, अतिरिक्त आयुक्त रमेश पतंगे, उपसंचालिका गौरी राठोड यांच्याशी सतत फोन वरून पाठपुरावा कडू यांनी केला.
ठोस आश्वासन न मिळाल्याने कांतीलाल कडू यांनी काल पुन्हा खरमरीत पत्र लिहून जो पर्यंत उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका, सुरक्षा रक्षकांना पगार मिळत नाही तोपर्यंत अन्न पाणी ग्रहण करणार नाही, असे ठणकावत कडू यांनी घरात कोंडून घेऊन आमरण उपोषण करण्याचे पत्र काल डॉ. व्यास यांना दिले होते.
त्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, नवी मुंबई पोलिस आयुक्त संजय कुमार यांनाही प्रती पाठविल्या होत्या.
पोलिस आयुक्त कार्यालयातून तातडीने याबाबत कडू यांना विचारणा करण्यात आली होती. सोमवारपासून आपण उपोषण करू असे पनवेल गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कराड यांना कडू यांनी माहिती दिली.
दरम्यान, आरोग्य खात्याचे प्रधान सचिव डॉ. व्यास यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे 29 लाखांचे अनुदान तातडीने काल संध्याकाळी पनवेल उपजिल्हा रुग्णालयाकडे वर्ग केल्याची माहिती डॉ. गौरी राठोड आणि डॉ. नागनाथ येमपल्ले यांनी कांतीलाल कडू यांना दिली. त्यामुळे उपोषण स्थगित करण्यात येत आहे असे कडू यांनी कळविले आहे.

@आदर्श वार्ताहर वृत्तसेवा 

कविता

1)निधी ..

आपदाग्रस्तां  करिता
जमवू  लागले  निधी
कोणता कोष  सच्चा
नवीन लागली व्याधी

तपासून  पहावे  नीट
निधी पाठवण्याआधी
करूनि  घेतात  चांदी
अट्टल  चोर अपराधी

दानशूर आहांत  जरी
पारखून घ्यावी  यादी
संधीसाधू जागोजागी
उगाचं  लावती  नादी

कुणाचा  कोष  उत्तम
रंगू लागली वादा वादी
समस्या पडे  एकीकडे
चाले तिकडे  गुद्दा गद्दी

- हेमंत मुसरीफ पुणे 
  
-----------------------------

2)ऊस तोड...

मजूर मी आलो दूर
करायला ऊस तोड
पोट असे  हातावरी
मेहनतीले नसे तोड

कोरोना आला द्वाड
बंद झालं गाडीघोडं
पहारे ही  सक्त सारे
कसे जावे गावाकडं

लाचारीची सवय ना
मागताना  वाटे जड
मदतीला धाऊनिया
आलेलोक धडाधड

जपती असे आम्हां
तळ  हातावर फोड
ओळखीचे ना कुणी
मानवता हीचं  ओढं

ऊसापरीस म-हाठी
माणूसचं अति गोड
निघताना  गावाकडं
पाय होई आता जड

- हेमंत मुसरीफ पुणे. 
  9730306996


कविता - " ती सध्या काय करते "



  ती सध्या काय करते
  ती सध्या कारशेडमध्ये
  दिवस रात्र राहते
  रोज आराम करते

 ती सध्या काय करते
  प्रवाशांना ऑनलाईन विचारते
  कसे आहात ?
  मजेत ना !

  ती सध्या काय करते 
  लाॅकडाऊन मुळे
  प्रवाशांना घरीच रहा
  अशी विनंती करते

 ती सध्या काय करते
 हात जोडून सांगते
 काळजी घ्या !
 सुरक्षित रहा !

ती सध्या काय करते
कोरोना पार्श्वभूमीवर   
लाॅकडाऊन संपला की
पुन्हा सेवेत येईन म्हणते

मी पुन्हा सेवेत येईन
मी पुन्हा सेवेत येईन
सदैव प्रवाशांची आवडती
 लाडकी लोकल ........!
 
लक्ष्मण राजे
मीरा रोड पूर्व

शनिवार, २५ एप्रिल, २०२०

लॉकडाऊनमध्‍ये वाढवा वाचन


सध्‍या देशभर लॉकडाऊन सुरु आहे. सर्व आस्‍थापना, व्‍यवसाय, उदयोग धंंदे, बाजार, पर्यटन, प्रवास सर्व काही बंद आहे. महिनाभर सर्वजण घरामध्‍येच अडकून पडले आहेत. अशा वेळी काहीजण आपले छंद जोपासण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत, काही टीव्‍ही, मोबाईलवर दिवस घालवत आहेत तर काहीजण नुसतेच आराम  करत दिवस काढत आहेत . वास्‍ताविक लॉकडाऊन ही एक संधी आहे असे मला वाटते. आपले आवडीचे छंंद जोपासण्‍याची, त्‍यांना वाव देण्‍याची. ज्‍या गोष्‍टी आपण दैनंदिन व्‍यस्‍त जिवनशैलीत एरव्‍ही करु शकत नाही त्‍या अनेक गोष्‍टी आपल्‍याला या लॉकडाऊनमध्‍ये करता येतील. त्‍यापैैकीच एक म्‍हणजे आपली वाचनसंपदा वृध्‍दींंगत करणे. दररोजच्‍या कामाच्‍या व्‍यापात आपल्‍याला वाचन करण्‍यासाठी वेळच नसतो. खरेतर ते एक निमित्‍त असते वाचन टाळण्‍यासाठी. वेळ नसतो या कारणाने वाचन न करणा-यांची संख्‍या मोठी आहे. त्‍यामुळे नियमित वाचन करणा-यांची संख्‍या दिवसेंदिवस रोडावत चाललेली आहे. आवडच नसेल तर सवड कुठुन मिळणार. अनेकजण मला दररोज नियमितपणे लिखाण करण्‍यासाठी वेळ कुठुन काढतोस असा प्रश्‍न नेहमीच विचारत असतात. मात्र वाचनाबरोबर लिखानाची लागलेली आवड आता माझा एक आवडीचा छंद बनुन गेली आहे. वाचनाचा छंद हा वाचता येणा-या प्रत्‍येक व्‍यक्‍तीला असायलाच हवा. लॉकडाऊनचा काळ हा सर्वांसाठी वाचनसंस्‍कृती वृध्‍दींंगत करण्‍यासाठी एक मोठी संधी असे वाटते. त्‍याचा वापर  प्रत्‍येकाने करायला हवा. ज्ञान हे दोन गोष्टीतून मिळते. एक अनुभव व दुसरे वाचन. अनुभव तर आपण पदोपदी घेत असतो त्यातून शिकण्यासारखे काय व किती हे प्रत्येकाच्या बुद्धिकौशल्यावर अवलंबून असते. अनुभवाने माणूस प्रगल्भ होतो पण हि प्रगल्भता जपण्यासाठी व ज्ञान आत्मसात करण्यासाठी वाचन हे अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे व्यक्तीची वैचारिक पातळी उंचावून ज्ञानात वाढ होते व मुख्य म्हणजे शब्दसंचयात भर पडते. धावत्या जगाबरोबर चालण्यासाठी, प्रत्येक घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त होण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही. "वाचाल तर वाचाल" हि नुसती उक्ती नसून यशस्वी जीवनाचा तो मूलमंत्र आहे. वाचन करत नसलेला माणूस एकतर अज्ञानी म्हणून ओळखला जातो अथवा आयुष्याबद्दल निरुत्साही. त्यामुळे वाचन हे यशस्वी व्यक्तीचे खरे उपासना यंत्र आहे. आजच्या पिढीने तर वाचनात सातत्य राखणे काळाची गरज आहे. परंतु नेमके याच्या उलट परिस्थिती आज पाहायला मिळते. संगणक, मोबाईल, लॅपटॉप या यंत्रामध्ये अडकलेला आधुनिक युवक आज वाचन पूर्णपणे विसरलेला आहे. फेसबुक, व्हाट्सअप, इंटरनेट या अभावी स्वतःला अपूर्णतेची जाणीव त्याला होते. एकतर वाचनासाठी वेळ मिळत नाही किंवा काढला जात नाही. यामुळे वर्तमानकाळाची माहिती होत नाहीच पण आपल्या इतिहासाबद्दल तरी माहिती कशी होणार? ज्या वेळी हि आधुनिक साधने अस्तित्वात नव्हती त्या वेळी ज्ञान आकलनासाठी वाचनाशिवाय दुसरे माध्यम नव्हते. यामुळे लेखनासाठी देखील अनेक विचारवंत पुढे येत. अनेक लेखक, विचारवंत, कवी यांना एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध होते. पण कालांतराने त्यांची संख्या रोडवण्याचे एक कारण म्हणजे वाचकांची खालावलेली संख्या. आज अनेक नामांकित लेखकांची नावे देखील आजच्या पिढीला ज्ञात नाहीत हि मोठी शोकांतिका आहे. ज्यांनी समाज प्रबोधनासाठी जीवन खर्ची घातले व उत्तमोत्तम लिखाण भावी पिढीच्या उन्नतीसाठी करून ठेवले आहे ते लिखाण पाहायला आजच्या पिढीला सवडच नाही. आज सर्व भाषांतील उत्कृष्ठ लेखकांना आपली पुस्तके विकण्यासाठी एकतर रस्त्यावरील विक्रेत्यांचा आधार घ्यावा लागतो किंवा मोठ्या सवलतींनी पुस्तक विक्रीची प्रदर्शने भरवावी लागतात ह्याची खंत वाटते. इलेक्ट्रॉनिक मीडिया मुळे आज वर्तमानपत्रांना देखील अस्तित्वासाठी झगडावे लागले तर अप्रूप वाटू नये. एके काळी जलद संदेशवहनासाठी उपयुक्त असणाऱ्या पोस्ट खात्याच्या तार या संकल्पनेने केव्हाच एगझिट घेतली आहे. हळूहळू प्रिंट मीडियाची देखील वाचकांअभावी फरफट झाल्यास नवल वाटणार नाही. परंतु वाचनसंस्कृतीचे काय? ती जर लोप पावली तर अधोगतिकडे जाण्यासाठी धोक्याची घंटा दुसरी कोणती नसेल. पुस्तकांच्या ऐवजी मुलांच्या हातात टॅब, लॅपटॉप, मोबाईल आले, लेखी परिक्षेवजी ऑन लाईन परीक्षा सुरु झाल्या, बिले भरणे, शॉपिंग पासून घरगुती वापरातील नित्याच्या गोष्टींपर्यंत सर्व काही ऑन लाईन मिळते. कुणाला कुठेही जायची गरज पडत नाही सर्व काही घरबसल्या. पण ज्ञान मिळवण्यासाठी मात्र तुम्हाला वाचवेच लागेल. वाचण्यास वेळ मिळत नाही अशी अनेकांची तक्रार असते. शहरी भागामधील नोकरदार व व्यावसायिक मंडळींची तर घड्याळाच्या काट्यावरील कसरत. त्यात वाचनासाठी वेळ काढणे म्हणजे अनावश्यक व ओढवून घेतलेला व्याप अशी अनेकांची धारणा.अर्थात त्यात गैर आहे असे मत नाही पण दिवसातला थोडा वेळ आपण वाचनासाठी काढलाच पाहिजे. लॉकडाऊनच्‍या काळात तर आपल्‍याकडे वेळच वेळ आहे. तर मग थोडा वेळ वाचनासाठी दिला तर काय फरक पडतो. लेखनसंस्कृती जगवायची असेल, ज्ञान मिळवायचे असेल तर वाचन विसरता कामा नये. वाचन मग ते कुठल्याही माध्यमातून करा, वर्तमानपत्र, साप्ताहिक, मासिक, कथा कादंबरी, लेख, कविता, ग्रंथ, नोव्हेल काहीही. वाचनाची आवड एकदा लागली कि त्यासारखा उत्तम, योग्य मार्गदर्शक दुसरा नाही. वाचनामुळे संवाद वाढविण्याची क्षमता येते, लिखाणासाठी देखील प्रवृत्त होता येते. यामुळे विचारांचे आदानप्रदान वाढण्यास मदत होते.




वाचनासाठी आज अनेक प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. एकाच विषयाचे अनेक साहित्यातून वाचन केले तर या प्रकारातील विसंगती आपल्या लक्षात येईल. एखाद्या विषयाबाबतीत आपण एका पुस्तकात वाचलेले लिखाण दुसऱ्या पुस्तकात वाचल्यास बरीच विसंगती आपणास दिसेल. कारण त्या दोन्ही पुस्तकांच्या लेखकांची आकलन व उद्बोधन शक्ती निराळी असते. त्यामुळे खरतर वाचकांच्या मनात संभ्रम निर्माण होवू शकतो. त्यामुळे एकाच आशयाचे लिखाण वाचणे हितकारक परंतु त्याच आधारे आपले मत बनवणेदेखील घातक ठरू शकते. यासाठी वाचनामध्ये प्रगल्भता येणे आवश्यक असते. एखाद्याचा वाचनाचा ओघ प्रचंड  असला तरी त्यातून सकारात्मक संदेश पोहोचने व वाचकांनी तो आत्मसात करणे गरजेचे आहे.
एकंदरीतपणे लॉकडाऊनमध्‍ये सर्वांनी आपल्‍यातला वाचक जोपासण्‍यासाठी प्रयत्‍न केला पाहिजे. वाचन संस्कृती जपलीच पाहिजे, लेखकांनादेखील प्रोत्साहित केले पाहिजे यासाठी मुलांनादेखील आवश्यक व उचित लिखाण उपलब्ध करून देणे आपली जबाबदारी आहे. त्यासाठी आवश्यक जनजागृती करणे हि प्रसारमाध्यमांची व प्रशासनिक जबाबदारी आहे. आजच्या संगणक युगामध्ये वाचन क्रिया टिकवून ठेवणे हि काळाची व आपल्या समाजचीदेखील गरज आहे हे विसरता कामा नये. यासाठी सर्व स्तरांवरून व्यापक- तसेच परिणामकारक प्रयत्न अपेक्षित आहेत.

-वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

महागाई आटोक्यात आणण्याची संधी


कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगच बंदिशाळा बनले आहे. अनेक देशांत लॉक डाऊन असल्याने इंधनाच्या मागणीत मोठी घट झाली आहे. जल मार्ग,  रस्ते मार्ग, आणि हवाई मार्ग  बंद असल्याने प्रवासी वाहतूक ठप्प  आहे. कोरोनामुळे सर्व देशांतील  उद्योगधंदे बंद आहेत. उद्योगातील कामकाज बंद असल्याने पेट्रोल डिझेलसारख्या इंधनाचा साठा मागणी अभावी साचून राहत आहे. याचा मोठा फटका अमेरिकी कच्च्या तेलाला ( डब्ल्यूटीआय क्रूड ऑइल ) बसला आहे. मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन बिघडल्याने प्रति बॅरल शून्य डॉलरच्याही खाली गेल्याने क्रूड ऑईलच्या दरात ऐतिहासिक घसरण झाली आहे.कच्च्या तेलाची घसरण ही जगातील ऐतिहासिक घटना आहे कारण कच्च्या तेलाचा दर उणे भाव  होण्याची ही पहिलीच व अभूतपूर्व अशी घटना आहे. कच्च्या तेलाच्या दराच्या या अभूतपूर्व  घसरणीचा भारताला मात्र फायदा होऊ शकतो कारण भारत हा कच्च्या तेलाचा प्रमुख आयातदार देश आहे. भारत ८० टक्के तेल हे ओपेक देशांकडून खरेदी करतो. कच्च्या तेलाचे भाव घसरल्याने देशाची परकीय चलन वाचू शकेल आणि त्यामुळे आयत बिल कमी होईल. याद्वारे चालू खात्यावरील तूट भरुन काढण्याची संधी भारताला मिळाली आहे. घसरलेल्या कच्च्या तेलाचा अधिकाधिक साठा भारताला करता येऊ शकेल जर भारताने या संधीचा लाभ घेत कच्च्या तेलाचा अधिकाधिक साठा केला तर भविष्यात भारतात पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी होऊ शकेल. जर पेट्रोल, डिझेलचे भाव कमी झाले तर साहजिकच देशातील महागाईही आटोक्यात येऊ शकते, एकूणच कच्च्या तेलाची घसरण भारताच्या पथ्यावर पडू शकते.

- श्याम बसप्पा ठाणेदार 
दौंड- जिल्हा पुणे 

कोरोना फायटरना अल्पोपहार व खाऊचे वाटप



बदलापूर - (सुरेश पाटील) शिवपार्क संकुल, गावदेवी रोड बदलापूर ( पूर्व ) या संकुलातील रहिवासी आणि सभासद यांच्या वतीने, कोरोना लॉकडाऊन काळात, सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून बदलापूर शहारातील  पोलीस स्टेशन ( बदलापूर पूर्व, पश्चिम ), बंदोबस्ताला चौका चौकात दिवसरात्र उभे असलेले सर्व पोलिस बांधव, बदलापूर रेल्वे कर्मचारी तसेच रेल्वे पोलिस बांधव, दुबे हॉस्पिटल आणि ग्रामीण रुग्णालय ( कात्रप ) प्राथमिक आरोग्य केंद्र (बदलापूर गाव ) येथील डॉक्टर, परिचारिका, वार्ड बॉय तसेच सफाई कर्मचारी, वॉटर सप्लाय कर्मचारी, महाराष्ट्र विद्युत मंडळाचे  कर्मचारी, परिवहन मंडळाच्या एस. टी. तसेच बेस्ट कर्मचारी, कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे सफाई कामगार यांना अल्पोहार म्हणून ( केळी, अमूल मसाला दूध व बिस्कीट पुडा) याचे वाटप  करण्यात आले. कारण हे सर्व आपल्या साठी अहोरात्र स्वतःच्या कुटुंबाला विसरून आपली काळजी घेत आहेत. तरी ह्या सर्वांच्या कार्याला एक मानाचा सलाम.
त्याच बरोबर बदलापूर ( पश्चिम ) येथील सत्कर्म बाल आश्रम, प्रगती अंध विद्यालय, पशुसंवर्धन विभाग, शहरातील गरीब, गरजू  कामगार बांधव, एरंजाड रस्त्यालगत असलेल्या आदिवासी पाड्यावरील मुलांनाही अल्पोहरचे वाटप करण्यात आले.

सदर सामाजिक उपक्रमाबद्दल समाजातील सर्व स्तरांतून शिवपार्क संकुलातील रहीवाशांचे कौतुक होत आहे.

@आदर्श वार्ताहर वृत्तसेवा





आधार एक हात मदतीचा संस्थेचा गरजूंना हात


मुंबई- (गणेश हिरवे)
   
जोगेश्वरी पूर्व येथील आधार-एक हात मदतीचा
या संस्थेच्या वतीने नुकतंच सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनच्या कालावधीत आरे कॉलोनी येथील केलटी आदिवासी पाडा व जोगेश्वरीतील गरीब व गरजू अशा एकूण 140 कुटुंबाना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.संस्थेचे संस्थापक महेश बागवे हे मागील आठ वर्षेपासून आपला मुलगा स्वरूप याचा वाढदिवस हा विविध ठिकाणच्या आश्रमशाळा,वृद्धाश्रम तसेच समाजातील गरजू-वंचित लोकांना सहकार्य करून साजरा करतात व याच अनुषंगाने त्यांनी दोन वर्षांपूर्वी आधार-एक हात मदतीचा ही संस्था स्थापन केली व आता ते या संस्थेच्या माध्यमातुन सामाजिक कार्य करत असून या वर्षी आपल्या मुलाचा वाढदिवस त्यांनी या गरजू कुटुंबाना जीवनावश्यक समान (तांदूळ,डाळ,पीठ,साखर,साबण) देऊन साजरा केल्याचं सांगितले व यासाठी सर्वतोपरी मनोज सक्रे,संतोष जंगम,बंदिश दोडिया,प्रभाकर पडयाल,मिथुन जाधव, विनायक खाडे,श्याम बागवे,प्रकाश पाटील,सचिन बांबरकर,संतोष डेलेकर,जुलेश भोजनी,राकेश जाधव,अरुण पांडे,निलेश मांजरेकर,ज्ञानशेखर नायकर आदी मित्रपरिवार यांचे देखील सहकार्य लाभले.

@आदर्श वार्ताहर वृत्तसेवा




कोविड उपजिल्हा रूग्णालयातील बंधपत्रित डॉक्टरांचे मानधन 7 व्या वेतन आयोगाप्रमाणेच काढावे ! मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना पनवेल संघर्ष समितीचे पत्र


 पनवेल/प्रतिनिधी
 राज्य शासनाने 20 एप्रिल रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, राज्यातील सर्वच बंधपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांचे 29 जानेवारी 2020 अन्वये कंत्राटी सेवातंर्गत मानधन निश्‍चित केल्याने त्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून केली जाणार आहे. त्याचा आर्थिक फटका पनवेल उपजिल्हा कोविड-19 रूग्णालयातील बंधपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांसह महाराष्ट्रातील किमान हजारो डॉक्टरांना बसणार आहे. वास्तवित हे बंधपत्रिक डॉक्टरसुद्धा राजपत्रित अधिकारी क्षेणीत समाविष्ट आहेत. आज ते सुद्धा कोविड युद्धात मोठ्या जिकरीने सहभागी आहेत. त्यामुळे त्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने अध्यादेशाचा फेरविचार करावा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केली.
 पुणे, वाशिम, औरंगाबाद येथे बंधपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार मानधन दिले जाते. मात्र, पनवेल उपजिल्हा रूग्णालयातील बंधपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांना सहाव्या वेतनाप्रमाणे मिळणार्‍या मानधनातही नव्या अध्यादेशाप्रमाणे कपात होणार असून त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. ही तफावत दूर करून महाराष्ट्रातील तमाम बंधपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांना सरसकट 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे मानधन मिळण्यासाठी फेरविचार होणे गरजेचे असल्याचे कडू यांनी अध्यादेशासह पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
 आधीच सरकार, डॉक्टरांना तुटपुंज्या पगारात राबवत असल्याने बंधपत्रित डॉक्टर किंवा इतर ज्येष्ठही वाढत्या महागाईमुळे सरकारी नोकरी सोडून खासगी हॉस्पीटलमध्ये जात आहेत. त्यामुळे सरकारी हॉस्पीटल ओस पडत चालले आहेत. ही वस्तूस्थिती असताना सरकारने असा तुघलकी निर्णय घेणे उचित ठरणार नाही, त्याचा फेरविचार करून महाराष्ट्रातील बंधपत्रित डॉक्टरांना न्याय देणे गरजेचे असल्याचे कडू यांनी अर्जातून पटवून दिले आहे.
 या पत्राच्या प्रती कडू यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य खात्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, व्यवस्थापकीय संचालक तथा आयुक्त अनुपकुमार यादव यांना पाठविल्या आहेत.

@आदर्श वार्ताहर वृत्तसेवा

पत्रकार विजय मोकल यांना मातृवियोग



पेण (विनायक पाटील) :- मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव,  दैनिक सागर पेणचे कार्यालय प्रमुख, स्वराज्य माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष, रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष, विजय विष्णू मोकल यांच्या मातोश्री कै. सौ. कमलाबाई विष्णू मोकल ( मूळगाव बोरी-पेण, सध्या मुंबई-चुनाभट्टी) यांचे आज शुक्रवार दिनांक २४/४/२०२० रोजी सकाळी पहाटे साधारणत: 4 .45 वाजण्याच्या सुमारास सायन हाॅस्पिटल मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पाश्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाऊनच्या परिस्थिती आहे. त्यामुळे शासना व प्रशासनाला सहकार्य करण्याच्या दृष्टीने मोकल बंधूनी अत्यंत मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विजय मोकल यांनी त्यांच्या पत्नी व मुलांना अंत्यविधीला नेले नाही. तसेच नातेवाईक यांनाही विनंती करून त्यांच्या आईचे अंत्यदर्शन ऑनलाइन करून दिले.

   त्यांच्या मागे, त्यांचे पती, चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
कमलाबाई यांनी पती विष्णू मोकल यांची नोकरी अचानक गेल्यानंतर अत्यंdत हलाखीच्या परिस्थितीत मुंबई येथे माथाडी कामगार (पालेवाली) म्हणून काम करून कुटुंबाची गुजराण केली. त्यांचे दशक्रिया विधी रविवार दिनांक 3 मे रोजी चुनाभट्टी व उत्तरकार्य मंगळवार दिनांक 5 मे रोजी चुनाभट्टी येथे होणार आहे.

@आदर्श वार्ताहर वृत्तसेवा

सफाई कर्मचाऱ्यांप्रति सद्भावना ! कर्मचाऱ्यांचा केला सन्मान



पेण दि. २४  (अरविंद गुरव ) कोरोनावर मात करण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना देशातील प्रत्येक नगरपालिका प्रशासन करत आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करीत आहे. नर्स, सफाई कामगार आणि डॉक्टरांचा यामध्ये समावेश आहे. समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून हे सर्व जण काम करीत असल्याने तेच खरे देवदूत ठरले आहे.

रायगड जिल्ह्यात पनवेल, उरण, कर्जत, श्रीवर्धन आणि पोलादपुर हे तालुके सोडले तर इतरत्र कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही आणि हे शक्य झाले ते कार्यरत असलेल्या देवदुतांमुळेच. पेण नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचाही कोरोना विरोधातील लढाईत सिहाचा वाटा आहे. त्यांच्याप्रति असलेल्या सद्भावनेतून आज पेण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ४ मधील रहिवासी कमलाकर गुरव आणि परिवारा तर्फे गुरव आळी येथे सफाई काम करणाऱ्या दोन महिलांचा आज गुलाबाचे फूल,  साडी आणि थोडे मानधन देऊन त्यांचे औक्षण करुन त्यांचा सन्मान करण्यात आला. इतर नागरिकांनीही अशाच प्रकार आपापल्या परिसरातील सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करावा त्यामुळे या कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असे कमलाकर गुरव यांनी सांगितले.

@आदर्श वार्ताहर वृत्तसेवा


गुरुवार, २३ एप्रिल, २०२०

लढाई कोरोना विरुध्द कोरोना विषाणू चाचणी



मुंबई(शांत्ताराम गुडेकर )

     आमदार  रमेशभाई कोरगावकर तसेच नगरसेवक विभागप्रमुख व  उमेशभाई माने स्थानिक नगरसेवक बाजार उद्यान समिती अध्यक्ष यांच्या सौजन्याने आणि मुंबई महानगरपालिका सायन हॉस्पिटल यांच्या माध्यमातून प्रभाग  क्र.११५ मधील बुद्ध नगर येथील बुद्ध विहारामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.स्थानिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून लाभ घेतला.

नगरसेविका सौ.प्रमिला श्रीकर चौधरी यांजकडून जीवनावश्यक वस्तुंचे वाटप


प्रतिनिधी
ठाकुर्लि--कोरोनाच्या या महामारीत गरीब व हातावर पोट असणा-या गरजु लोकांचे बरेच हाल होत आहेत. लाॅकडाऊन होऊन एक महीना उलटुन गेला,उपासमारीची झळ पोहचु लागलेली आहे, याची दखल घेत ठाकुर्लि येथील नगरसेविका सौ.प्रमिला श्रीकर चौधरी यांनी आपल्या प्रभागातील गरीब व गरजु व्यक्तींना नुकताच जीवनावश्यक वस्तुंचे वाटप वाटप केले. ठाकुर्लि प्रभाग व चोळेगांव परिसर येथील गरीब वस्तीत या जीवनावश्यक वस्तुंचे ५००जणांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक श्रीकर चौधरी यांचे बहुमोल सहकार्य लाभले. तसेच प्रभागातील महिला व पुरुष पदाधिकारी व इतर सहका-यांन मार्फत प्रत्येक घरात हे वाटप करण्यात आले.त्याबद्दल परिसरात समाधान व्यक्त होत आहे.




तेली समाजाकडून मुख्यमंत्री निधीला मदत


मुंबई(शांताराम गुडेकर / प्राजक्ता अरुण चव्हाण)


        कोरोनाच्या महाभयंकर संकटाला हरवण्यासाठी तसेच सरकारला आपला थोडाफार हात लाभावा. म्हणून प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संस्था आपापल्या परीने मुख्यमंत्री निधीला मदत करत असल्याचे दिसत आहे. यातच सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघटनेच्या वतीने २५ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आलेला आहे.समाजाच्या वतीने अध्यक्ष सुभाष हाडके व पदाधिकारी यांनी निर्णय घेऊन २५ हजार रुपयांचा धनादेश सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवला.यावेळी समस्त तिळवण तेली समाज संघटनेचे उपाध्यक्ष मनोज विभुते आणि संघटक प्रवीण राऊत, रवींद्र किर्वे आणि चेतन दळवी उपस्थित होते.


ऑनलाइन व्हिडिओ गायन स्पर्धेत शाहिर राजेश निकम ( खेड ) प्रथम क्रमांकाचे मानकरी




मुंबई : (शांताराम गुडेकर/दिपक कारकर )


  कोकणदीप काव्यप्रेमी ( कोकण विभाग ) संकल्पित कवी नितेश चीवलेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपरोक्त संस्थेतर्फे व्हिडिओ गीत गायन ऑनलाइन स्पर्धा नियोजित करण्यात आली होती.आपल्याला आवडलेलं कोणतेही मराठी/हिंदी गीत सहभागी कवीने/गायकाने स्वरबद्ध करून स्वःआवाजाने व्हिडिओ रेकॉर्ड करून व सहभागी कवींची वैयक्तिक माहिती कोकणदीप काव्यप्रेमी यू-ट्यूब चैनल वरती पाठवण्यास आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले होते.यातून सहभागी गायक/कवींच्या त्या गाण्याला आयोजकांनी दिलेल्या काळावधित सर्वाधिक लाईक्स व कमेंट्स मिळतील अशा प्रथम पाच विजयी स्पर्धकांना "वाचन काळाची गरज" हा नवा संदेश देत एक पुस्तक प्रत सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार होते.या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक कवी/गायक यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता.नुकताच या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला.या स्पर्धेत सहभागी झालेल्या कोकण सुपुत्र खेड तालुक्यातील कोकणातील लोकप्रिय जाखडी नृत्य ( शक्ती-तुरा ) कलेतील आवाजाचा बादशाह म्हणून अल्पावधीत लोकप्रिय असणारे शाहिर राजेश निकम ( खेड )यांना प्रथम क्रमांक मिळाला.शाहिर राजेश निकम यांनी स्वःरचित सुमधुर आवाजात स्वरबद्ध केलेल्या अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छ.शिवाजी महाराजांचा महिमा गाणारे "माझ्या राजा रं ....माझ्या शिवबा रं" या गीताला अनेक काव्यप्रेमींनी लाईक्स/कमेंट्स देत विजयी केलं.तब्बल २२९० लाईक्स/कमेंट्स यांची भर त्यांनी गायन केलेल्या गीताला मिळाल्या.त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरी बद्दल त्यांचे श्री पाणबुडी देवी कलामंच, कोकणातील कवी/शाहीर वर्ग  व विविध स्तरातून  अभिनंदनासह कौतुक होत आहे.



बुधवार, २२ एप्रिल, २०२०

लॉक डाऊन काळात जनतेने घरात सुरक्षित राहून सहकार्य करावे- मनीषा म्हात्रे


 पेण (प्रतिनिधी ) :- " करोनाचे संकट महाभयंकर आहे. या आपत्तीच्या काळात जनतेने घरात सुरक्षित राहून सहकार्य करावे. करोना हा संसर्गजन्य रोग असून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला अश्या तऱ्हेने त्याचा प्रादुर्भाव होतो. त्याचा सामना करण्यासाठी सर्वांनी घरात थांबून त्याला रोखले पाहीजे. या संकटातून आपण सुरक्षित बाहेर पडू." असा विश्वास वाशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. मनीषा म्हात्रे यांनी व्यक्त केला.

मराठी पत्रकार परिषद, दैनिक सागर,  विठाई प्रतिष्ठान, रायगड प्रेस क्लब, महाराष्ट्र 24 live न्युज व पेण प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पेण येथील वृत्तपत्र वितरक,  ड्युटी वर असणारे पोलीस, प्राथमिक आरोग्य केन्द्र- वाशी, पत्रकार यांना  सॅनिटाइझर, मास्क व  फळ वाटप करण्यात आले.
यावेळी विजय विष्णू मोकल- मराठी पत्रकार परिषद, कोकण विभागीय सचिव तथा दैनिक सागर पेण कार्यालय प्रमुख, प्रदीप मोकल - लोकमत पत्रकार, संतोष पाटील- पुण्यनगरी, प्रमोद मोकल- पुढारी, धनाजी घरत- मुंबई लक्षद्वीप, प्रकाश माळी- कृषिवल, विनायक पाटील-महाराष्ट्र 24 live न्युज, साज मराठी व दैनिक सागर आदींसह पत्रकार उपस्थित होते.
मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, दैनिक सागरने संस्थापक कै. नानासाहेब जोशी यांच्या प्रेरणेने पत्रकारिते बरोबरच सामाजिक समस्या सोडविण्याची प्रेरणा मिळाली आहे. आज करोना चा मुकाबला करण्यासाठी  पोलीस व आरोग्य कर्मचारी जीवाचे रान करीत आहेत. त्यांची थोडी सेवा करण्यासठी हा खारीचा वाटा उचलला असल्याचे विजय मोकल यांनी सांगितले

आदर्श वार्ताहर वृत्तसेवा







ठणठणीत रुग्‍ण ही नाण्‍याची दुसरी बाजू



महाराष्‍ट्रातील कोराना बाधितांची संख्‍या पाच हजारांच्‍या उंबरठयावर आहे. मात्र या आजारातुन बरे होऊन घरी परतणा-यांची संख्‍यादेखील लक्षणीय आहे हे दुर्लक्षित करुन चालणार नाही. जवळपास ६०० जण या आजारातुन पूर्णपणे बरे होऊन घरी परतलेले आहेत. खरेतर हे चित्र आशादायक व लोकांना दिलासा देणारे आहे. मात्र दररोज वृत्‍त वाहीन्‍यांवर दाखविण्‍यात येणा-या कोरोनाच्‍या दाहकतेमुळे लोक प्रचंड तणावाखाली आहेत. या आजारापासुन स्‍वतःचा बचाव करण्‍यासाठी आवश्‍यक काळजी ही घेतलीच पाहिजे मात्र उगाचच त्‍याला घाबरुन त्‍याचे दडपण घेतले तर मानसिक ताण व गैरसमजांमुळे होणा-या रुग्‍णसंख्‍येतदेखील मोठी भर पडेल एव्‍हढे लक्षात घेतले पाहीजे. त्‍यामुळे लोकांच्‍या मनातील या आजाराविषयी असलेले दडपण आता दुर करण्‍याची आवश्‍यकता आहे. कोरोनासारख्‍या गंभीर आजारातुन बरे होता येते हे ठणठणीत बरे झालेल्‍या जवळपास ६०० जणानी दाखवून दिले आहे. त्‍यामुळे कोरोनाची उगाच धास्‍ती बाळगण्‍याची गरज नाही मात्र प्रत्‍येकाने प्रतिबंधात्‍मक काळजी ही घेतलीच पाहिजे. महत्‍वाचे म्‍हणजे प्रसारमाध्‍यमांनी आजाराची सकारात्‍मकता लोकांसमोर प्रभावीपणे आणायला हवी. ज्‍या वेगाने हया आजाराचे रुग्‍ण वाढताहेत त्‍याच पध्‍दतीने रुग्‍ण बरे देखील होत आहेत हा संदेश लोकांमध्‍ये जायला हवा. जेणेकरुन लोकांमधील भीतीचे वातावरण काही अंशी कमी होईल. असाध्‍य आजार अशी ओळख निर्माण झालेल्‍या कोरोनावर मात करत गरोदर स्त्रीया, लहान मुले, वयोवृध्‍द मंडळी ठणठणीत बरे होऊन घरी परतताना दिसत आहेत ही सर्वांच्‍या दृष्‍टीने समाधानाची बाब असुन सामाजिक स्‍वास्‍थ्‍य प्रस्‍थापित करणारीदेखील ठरु शकते. यासाठी दुरचित्रवाहिन्‍यांनी आता आपल्‍या बातम्‍यांमध्‍ये बरे होणा-या कोरानाबाधित रुग्‍णांची संख्‍या ठळकपणे प्रदर्शित करावी व लोकांना हया आजारावर शासन करत असलेल्‍या उपचारांबाबत आश्‍वासित करावे. तसेच कोरोना रुग्‍णांवरील उपचारांमधील चित्र जरी आशादायक असले तरी लोकांनी एकदम निश्चिंत होऊन भ्रमंती करावी असे वातावरण तयार होणार नाही याचीदेखील दक्षता घेणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. कारण संसर्गाचा धोका अजुन टळलेला नाही. जोवर या आजाराचा एकही रुग्‍ण महाराष्‍ट्रात आढळणार नाही तोवर बिनधास्‍त राहून चालणार नाही. यासाठी सकारात्‍मक बातम्‍यांची आजाराच्‍या परिणामकारकतेशी सांगड घालणेदेखील तितकेच महत्‍वाचे आहे. त्‍यामुळेच लोकांमध्‍ये सध्‍या पसरलेले भितीचे वातावरण दूर करुन आशादायक मानसिकता तयार करण्‍याचे काम प्रसिध्‍दी माध्‍यमे चांगल्‍या प्रकारे करु शकतात. कोरोना प्रतिबंधासाठी सध्‍या सुरु असलेले सोशल डिस्‍टंसिंग, व्‍यक्‍तीगत सुरक्षा वगैरे या प्रतिबंधात्‍मक उपायांसोबतच या आजारातुन बरे होणा-या रुग्‍णांबाबत व्‍यापक प्रसिध्‍दी होणे गरजेचे आहे. कारण ठणठणीत बरे होणारे रुग्‍ण हे नाण्‍याची दुसरी बाजू आहेत.

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई     

मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

नगरसेविका जागृती पाटील यांच्या वतीने " एस' विभागाच्या प्रवेशद्वारावर निर्जंतुकीकरण फवारा मशीन कक्ष सुरू




प्रतिनिधी

भांडुप -- एस'  विभागातील सर्व कर्मचारी , अधिकारी व  नागरिकांना कोरुणाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने, प्रभाग क्रमांक 116 च्या भाजपा नगरसेविका  सौ.जागृती प्रतीक पाटील यांच्या उपस्थितीत मनपा "एस" विभागाच्या मुख्य प्रवेशद्वारावर निर्जंतुकीकरण फवारा मशीन कक्ष सुरू करण्यात आले आहे. जागृती पाटील यांच्या या उपक्रमा बद्दल अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी अहोरात्र  जनतेची करत आहेत.हि सेवा लक्षात घेता. कोरोना पॉझिटिव्ह पेशंटला हॉस्पिटलमध्ये दाखल करणे, आजूबाजूच्या नागरिकांना त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातून इतरांचा कोरोना व्हायरस पासून त्यांचा बचाव व्हावा, यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'एस' विभागात निर्जंतुकीकरण फवारा मशीन कक्ष सुरू (जंतुनाशक) करण्यात आली आहे.








भांडुप पोलीस ठाणे आणि भांडुप मधील maternity home (प्रसूतीगृह) महिलांच्या सुरक्षेसाठी  जंतुनाशक फवारा मशिन बसविण्यासाठी परवानग्या प्राप्त झाल्यानंतर लवकरात लवकर प्रयत्न केले जातील  अशी ग्वाही नगरसेविका जागृती पाटील यांनी दिली.भाजपा युवा नेतृत्व,कौशिक कमलाकर पाटील यांच्या उपस्थितीत निर्जंतुकीकरण फवारा मशीन कक्ष सुरू करण्यात आले.

आदर्श वार्ताहर वृत्तसेवा

पंचरत्न मित्र मंडळतर्फे चेंबुर येथे सलग नऊ दिवस अन्न व जीवनावश्यक साहित्याचे वाटप



मुंबई(शांत्ताराम गुडेकर)

         सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था. या संस्थांची संघटना एका विशिष्ट हेतूने व उद्दिष्टासाठी केलेली असते आणि त्यांत काम करणारे स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात. या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींत सापडलेल्यांना साहाय्य करतात; प्रसंगोपात्त आर्थिक मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळतर्फे गेली अनेक वर्षे केले जात आहे.नोकरी,व्यवसायाच्या निमित्ताने कोकण सोडून मुंबईत आलेल्या मात्र कोकणाचे म्हणजेच आपल्या जन्मभूमी ऋण फेडण्यासाठी सामाजिक,शैक्षणिक ,वैद्यकीय ,पर्यावरण क्षेत्रात सातत्याने गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष-अशोक भोईर ,सचिव प्रदिप गावंड,खजिनदार सचिन साळुंखे  यांच्या प्रयत्नाने  अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. मंडळाची स्थापना २००५ मध्ये करण्यात आली असून आजपर्यंत मंडळाच्यावतीने  मुंबईसह उपनगरात व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अनाथश्रम,वृध्दाश्रम व खेडेगावातील तसेच आदिवासी  भागातीलशाळांमध्ये शालेय साहित्य वाटप व आरोग्य शिबिर आणि वृक्षारोपण तसेच विविध स्पर्धांचेही आयोजन केलेले आहे.नुकतेच जागतिक महिला दिनानिमित पंचरत्न मित्र मंडळ व स्वामिनी,भवानी,शिवानी महिला बचत गट यांच्या संयुक्त  विद्यमाने श्री गणेश मंदिर सभागृह,वाशीगांव,चेंबुर येथे आर.सी.एफ वित्त संचालक उमेश डोंगरे,महाव्यवस्थापक सुहास शेलार,गजानन  पाटील, डाँ.विनित गायकवाड,मा.नगरसेवक माणिक पाटील,  धनंजय  ठाकूर, रमेश पाटील,सतिश कुंभार,अभिनेत्री सोनल पवार,डाँ,जुईली ठाकुर ,मंडळ अध्यक्ष अशोक भोईर,सचिव प्रदिप गावंड,सहसचिव स्नेहा नानिवडेकर,खजिनदार सचिन साळुंखे सदस्या निलम गावंड व वैभव घरत,एम.जी.डिसोजा,डि.एम.मिश्रा,पिंकू चव्हाण यांच्यासह मंडळ अन्य पदाधिकारी,सदस्य  यांच्या उपस्थितीत महिला सक्षमीकरण व ग्राहक संरक्षण विषयक मार्गदर्शन तसेच विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमासह उल्लेखनीय कार्य करणा-या महिलांचा गौरव सोहळा पार पडला.यानिमिताने डाँ.जुईली ठाकूर यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता.तर  अभिनेत्री सोनल पवार यांना भारताच्या स्री शिक्षणाची गंगोत्री,समाजसुधारक  "सावित्रीबाई  फुले पुरस्कार-२०२०"मान्यवरांच्याहस्ते  देऊन सन्मानित करण्यात आले होते. सध्या संपूर्ण जगात 'कोरोना' महामारीने ग्रासले असून व सरकारने संचारबंदी लागू केल्यामुळे हातावर पोट असणारी कुटुंबे उपासमारीचे जीवन जगत आहेत. कुठे कमी तिथे आम्ही या उक्तीप्रमाणे पंचरत्न मित्र मंडळ सदैव तत्पर असते.माणूसकिची जाणीव म्हणून सदर मंडळाने प्रबुध्दनगर,आर.सी एफ्.पोलीस ठाणे, चेंबूर येथील गरीब वसाहतीत जाऊन  शंभर गरजू लोकांना पुलाव पॅक वाटप केले.तर याच पंचरत्न मित्र मंडळाच्या वतीने चेंबुर विभागातील अझिझबाग व आझादनगर येथे  अन्नधान्य (गहू, तांदूळ,डाळ, मसाला,मीठ,तेल इ.) तसेच पुलाव पॅक यांचे गरजूंना वाटप केले.तर पंचरत्न मित्र मंडळाच्या वतीने आझादनगर व वाशी नाका परिसरातील गरजूंना तयार जेवणाचे पॅक वाटण्यात आले.याशिवाय वाशी गांव व वाशीनाका परिसरातील काही भागात पुलाव पँक व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.यासाठी पंचरत्न मित्र मंड अध्यक्ष अशोक भोईर,सचिव प्रदिप गावंड,खजिनदार सचिन साळुंखे व सर्व पदाधिकारी,सदस्य व सभासद,हिंतचिंतक  यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

विद्यापीठ परीक्षा रद्द कराव्यात


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द केला तसेच पहिली ते नववी व आकारावीचीही वार्षिक परीक्षा रद्द केली. सरकारच्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागतच केले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने ज्या तत्परतेने घेतला त्या तत्परतेने महाविद्यालयीन परिक्षांबाबत राज्य सरकार घेत नसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षांसाठी ऑनलाइन परीक्षा, एक तासाची ऑफ लाईन परीक्षा, स्काईप द्वारे परीक्षा आणि प्रकल्प सादरीकरण अशा विविध पर्यायांचा विचार करीत आहे पण कोणताही ठोस निर्णय होत नाही. राज्य सरकारनेही याबाबत एक समिती स्थापन केली आहे तरीही कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांना संभ्रमावस्थेत ठेवून त्यांची धाकधूक वाढवण्यापेक्षा शालेय विद्यार्थ्यांप्रमाणेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या म्हणजेच विद्यापीठाच्या परीक्षाही रद्द करुन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. ३ मे नंतर लॉक डाऊन संपले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईलच याची शाश्वती नाही. पुण्यामुंबई सारख्या मोठया शहरांत तर कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. पुण्यामुंबई सारख्या महानगरात कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे त्यामुळे ३ मे नंतरही विद्यापीठाच्या ऑफलाईन लेखी परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणे होय. विद्यार्थ्यांच्या जीव धोक्यात घालण्यापेक्षा सद्य स्थितीत या परीक्षा रद्द करणेच योग्य आहे. पुणे व मुंबईत उच्च शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थ्यांमध्ये बाहेर गावांतील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. लॉक डाऊन असल्यामुळे पुण्यामुंबई बाहेरील  विद्यार्थी आपल्या गावी गेले आहेत. लॉक डाऊन संपल्यानंतर लगेच ते येतील याचीही शक्यता कमी आहे. जरी ते आले तरी ३ मी नंतर लगेच परीक्षा घेणे शक्य नाही. ऑनलाइन किंवा स्काईपद्वारे परीक्षा घेण्याचा निर्णय झाला तरी असा त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे कठीण आहे. विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात इंटरनेटची उभारणी करणे शक्य होईल का? ही सुविधा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मिळणार का? दुर्गम भागात आजही इंटरनेटची पुरेशी सुविधा नाही काही भागात  इंटरनेटची  सुविधा आहे पण इंटरनेटचा स्पीड कमी आहे. त्यामुळे ऑनलाइन किंवा स्काईपद्वारे परीक्षा घेणे कितपत संयुक्तिक आहे? एका तासाची ऑफलाईन परीक्षा घ्यायची झाल्यास सोशल डिस्टन्स कसे पाळणार? जर संपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असेल तर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत कसे आणणार? एटीकेटीच्या विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठ काय नियोजन करणार? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.केवळ विद्यार्थ्यांचे पेपर झाले म्हणजेच परीक्षेची पूर्ण प्रक्रिया झाली असे नाही. परीक्षा झाली तरी प्रश्नपत्रिकांचे मूल्यांकन, निकाल घोषित करणे, पुढील वर्षासाठी प्रवेश याही महत्वाच्या बाबी आहेत.यासर्व बाबींचा विचार केला तर राज्य सरकारने विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करणेच योग्य आहे. विनाकारण विद्यार्थ्यांच्या जीव टांगणीला लावून त्यांच्या भावनांशी खेळणे योग्य नाही. कोरोनाचे गडद होणारे संकट पाहता विद्यार्थ्यांच्या जीवाशी न खेळता राज्य सरकारने या परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. 

--श्याम बसप्पा ठाणेदार 
दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५

खरी श्रीमंती !!




मनुष्यप्राण्याच्या जीवनात येणारे बरे-वाईट प्रसंग त्या मनुष्याच्या गुण-अवगुणांची किंमत ठरवत असतात. आपल्यावर एखाद्याने कळत-नकळत उपकार केले असल्यास त्या उपकारकर्त्याचे स्मरण ठेवणे मनुष्यप्राण्याचे आद्य कर्तव्य ठरते. अशीच एक सत्य घटना आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे घडल्याचे वृत्त आहे. येथील श्री साईबाबा मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी भीक मागून उदरनिर्वाह करणारे ७८ वर्षीय रेड्डी नामक गृहस्थ आहेत. हे गृहस्थ मुळात आळशी, कामचुकार अथवा गैरव्यसनी नसून अंगमेहनत करुन उदरनिर्वाह चालवणारे सद्वर्तनी वृत्तीचे आहेत. परंतु, वयोमानानुसार अंगमेहनत होत नसल्यामुळे त्यांना भीक मागण्याचा मार्ग पत्करावा लागला. भीक मागून सात दशकात मिळालेल्या अर्थलाभातून आठ लाख रुपये त्यांनी संबंधित श्री साईबाबा मंदिरामध्ये दान स्वरुपात अर्पण केले आहेत. रेड्डी यांनी परिस्थितीला शरण जाऊन भीक मागण्याचा मार्ग अवलंबला. त्यामुळे परिसरातील नागरिक आजपर्यंत त्यांच्याकडे भिकारी या नजरेने पाहत होते. परंतु, निर्व्यसनी असलेल्या रेड्डी यांनी भिकेतून मिळविलेले धन कोणत्याही वाम मार्गाने खर्च न करता दानधर्मासाठी खर्च केले. थोडक्यात, रेड्डी यांच्या सत्कर्मातूनच ते खरे श्रीमंत असल्याचे दिसून येते.

                 - सुधीर कनगुटकर
                 १/९, संतोष भगत चाळ,
                 बी. आर. नगर,
                 दिवा (पूर्व), ४०० ६१२.

कोरोना संकटात गैरफायदा नको




देशभरात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच १४ एप्रिलपर्यंत(२१ दिवसाचा )जाहीर केलेला लॉक डाऊन  ३ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे .यावेळी त्यांनी सांगितलेल्या सप्तपदीचे पालन सर्व जनतेला करावे लागणार आहे.परंतु हे सर्व सांगताना सर्व क्षेत्रात कोरोनामुळे झालेली व होत असलेली हानी सरकारला भरून काढावी लागेल वा त्यादृष्टीने उपाय योजावे लागतील. 
सध्या केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांशी समन्वय साधत "कोरोनाला" रोखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. डॉक्टर ,नर्सेस ,पोलीस यंत्रणा ,सफाई कामगार ,बस कर्मचारी तसेच अन्य कर्मचारीवर्ग कोरोनाला न घाबरता,घरा- दाराचा विचार न करता  आपले कर्तव्य पार पाडत आहेत.वास्तविक आपल्याकडे मानवसेवा हीच ईश्वर सेवा असे म्हटले जाते.मात्र कोरोनाने केलेल्या आक्रमण काळात सेवा बजावणाऱ्या वरील  सर्व मंडळीना ईश्वरस्वरूपचं मानावे लागेल.तरी देखील त्यांची सेवा लक्षात न घेता  त्यांच्यावर हल्ले होणे हि गोष्ट शरमेची बाब असून ती नक्कीच माणुसकीला धरून नाही.
आज या कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य अपेक्षित आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या सायबर शाखेने सोशल मीडियाच्या वापरासाठी नियमावली प्रसिद्ध केली आहे. अशावेळी समाजातील उपद्रवशील -माथेफिरू मंडळींनी सोशल मीडियावर व्यक्त होताना तारतम्य बाळगायची गरज आहे .दुसरीकडे या भीषण परिस्थितीत संधी साधून घेताना काही विक्रेते खाण्या-पिण्याच्या व अन्य  वस्तू दामदुपटीने विकताना दिसतात .त्यांच्यावरही  कारवाई व्हायला हवी.या २१ दिवसाच्या लॉक डाऊन मध्ये अनेकांनी संचार बंदीचे उल्लंघन केले असतानाच १४ एप्रिल रोजी मुंबईत धक्कादायक घटना घडली .बांद्रा येथे हजारो मजूर लोक गावी जाण्यासाठी जमले होते .मुख्य म्हणजे सगळीकडे जमावबंदी ,पोलीस बंदोबस्त असताना हि गर्दी जमली होती. हि गर्दी प्रशासनावरचा ताण वाढवणारी -राज्य सरकारला अडचणीत आणणारी ठरली .मात्र त्यामागे कुणाचा हात होता किंवा कुणी राजकारण केले काय हे चौकशीतून पुढे यायला हवे.आता परराज्यातील या बेरोजगार -चिंताग्रस्त मजुरांची योग्य काळजी घेऊन  सरकारला त्यांना एक विश्वास द्यावा लागेल.राहिला प्रश्न वाढीव लॉक डाऊनचा.सध्या राज्यात कोरोना रुग्णांच्या आकडेवारी नुसार रेड ,ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी केली आहे.त्यामुळे दिलासादायक बाब म्हणजे  २० एप्रिल पासून राज्यातील निर्बंध शिथिल होणार आहेत. औषधे,वैद्यकीय उपकरणे, रुग्णवाहिका  निर्मितीस मुभा मिळणार आहे. लहान सहान उद्योग धंदे ,महामार्गावरील छोटी हॉटेल ,धाबे ,गॅरेज ,टपाल -कुरिअर तसेच मालवाहू ट्रक ,आयटी सेवा ,डिजिटल व्यवहार सुरु होणार आहे .शेतीशी संबंधित साहित्य पुरवठा ,मत्स्य व्यवसाय ,ग्रामीण भागातील उद्योग ,रस्ते काम ,बांधकामे ,इलेक्ट्रिशियन  ,रिपेअर कामे सुद्धा सुरु केली जातील.टप्प्याटप्प्याने अशा सर्व गोष्टी सुरु झाल्यावर अनेकांची  रोजगाराची चिंता मिटून थांबलेला  आर्थिक गाडा रुळावर होण्यास मदत होणार आहे. 
  तेव्हा सरकारी  नियमांचे पालन करून ,स्वयं शिस्तीने सर्व व्यवहार करून  कोरोनारूपी संकटावर  लवकरात लवकर मात  करण्याची गरज आहे. 

प्रसिद्ध अभिनेते, साहित्यिक, कवी आणि पत्रकार यांच्या उपस्थितीत आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार सोहळा संपन्न..!

मुंबई-दादर (प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर)  आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण सो...