आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

झुलवाकारांना भावपूर्ण आदरांजली..



समाजातील जळजळीत वास्तव, अनुभवांची दाहकता आयुष्यभर लेखणीवाटे साहित्यात उतरवणारे जेष्ठ साहित्यीक झुलवाकार उत्तम बंडू  तुपे यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. उत्तम बंडू तुपे यांचा जीवनप्रवास अत्यंत खडतर असा होता. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एका गावात त्यांचा जन्म झाला. दुष्काळ आणि गरिबी यामुळे त्यांचे कुटुंब पुण्यात स्थलांतरित झाले. तिथे त्यांना त्यांच्या बहिणीने आधार दिला. अवघे तिसरी पर्यंत शिकलेले बंडू तुपे हे अण्णाभाऊ साठेंचे खरेखुरे वारसदार. अण्णाभाऊ साठे हेच त्यांचे दैवत. बालवयातच  अण्णाभाऊ साठेंची सर्व  पुस्तके त्यांनी वाचून काढली. त्यामुळे त्यांच्यावर अण्णाभाऊंचा मोठा प्रभाव होता. या प्रभावातूनच त्यांचे लेखन फुलत गेले. अतिशय गरीब परिस्थिती असल्यामुळे मिळेल ती कामे करीत उत्तम बंडू तुपे यांनी विपुल लेखन केले. कादंबरी,कथा, लघुकथा, नाटक, आत्मकथन अशा साहित्यातील सर्व क्षेत्रात त्यांनी विपुल लेखन केले. उपेक्षित वंचित वर्गाच्या वेदना त्यांनी आपल्या साहित्यातून चित्रित केल्या. तब्बल सोळा कादंबऱ्या व असंख्य कथा लिहीणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांची झुलवा ही कादंबरी प्रचंड लोकप्रिय ठरली. त्यामुळे साहित्य वर्तुळात ते झुलवाकार म्हणूनच ओळखले जाऊ लागले. खुळी, कळा, कळाशी, नाक्षरी, भस्म, चिपाड, झंजाळ, जावळ या त्यांच्या कादंबऱ्या प्रचंड गाजल्या. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. आंदण या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा  पुरस्कार मिळाला. काट्यावरची पोटं या आत्मकथेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मिळाला तर झुलवा कादंबरीला राज्यसरकारचा पुरस्कार मिळाला. झुलवा कादंबरीवर नाटकही निघाले. समाजातील उपेक्षित, वंचित वर्गाचे चित्र आपल्या साहित्यातून रेखाटणारे, अण्णाभाऊ साठेंचे खरेखुरे वारसदार शोभणारे एक महान साहित्यिक आज काळाच्या पडद्याआड गेले आहे.अशा महान साहित्यिकास विनम्र अभिवादन! 

--श्याम बसप्पा ठाणेदार 
दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...