मुंबई दि. २० (अधिराज्य) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली पक्षाची जी पुनर्बांधणी झाली तेव्हापासून बाळासाहेबांच्या धगधगत्या विचारांची मशाल हातात घेऊन तन, मन, धन आंबेडकरी चळवळीकरता समर्पित करणारे झुंजार, निष्ठावंत व ध्येयवादी कार्यकर्ते, आंबेडकरी घराण्याचे एकनिष्ठ शिलेदार, भारिप बहुजन महासंघ माजी उपाध्यक्ष सुदाम भिकू साळवी मु. गाव कालवण, ता. माणगाव, जिल्हा रायगड या गावचे सुपुत्र यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी अल्पशा आजाराने केईएम रुग्णालयात नुकतेच दुःखद निधन झाले.
कालकथित सुदाम साळवी हे हसतमुख, सर्वसमावेशक, मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाचे होते, त्यांनी आपल संपूर्ण जीवन आंबेडकरी चळवळीकरता वाहून दिले होते, लहानपणापासून सामाजिक, राजकीय कामांची आवड असणारे सुदाम साळवी यांनी नायगाव विधानसभा क्षेत्रात माजी उपाध्यक्ष म्हणून काम करता करता माणगाव तालुका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केले, भारिप ते भारिप बहुजन महासंघ रायगड जिल्हा माजी उपाध्यक्ष म्हणूनही सामाजिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली, अनेक विलंबित प्रश्न मार्गी लावत कर्तव्यदक्ष राहून काम करणारे सुदाम साळवी नेहमीच नवीन कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी राहिले, ते व त्यांचे कुटुंब आजीवन आंबेडकरी घराण्याशी एकनिष्ठ राहून नेहमीच चळवळीसाठी तन, मन, धन अर्पण करीत, नोकरी सांभाळून प्रसंगी नोकरीची पर्वा न करता स्वतःला आंबेडकरी चळवळीत झोकून देत त्यांनी रायगड जिल्ह्यात चळवळ मजबूत करण्याचे महत्कार्य केले, वेळप्रसंगी काटकसर करीत, आतडीला पीळ देत कार्यकर्ते सांभाळण्यापासून ते कार्यकर्ते घडविण्यापर्यंत समर्पित कार्य त्यांनी केले, वृद्धापकाळाने शरीर साथ देत नसल्याने त्यांच्यानंतर त्यांचा समृद्ध वारसा त्यांचा सुपुत्र चालवत आहे.
त्यांचामागे एक सुपुत्र, सून, नातू, पाच मुली, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईतील अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती, बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर ही स्वतः जातीने हजर राहून त्यांनी ही पार्थिवाचे दर्शन घेतले तद्नंतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्यांचे मुळगाव कालवण येथे पाठविण्यात आले.
कालकथित सुदाम साळवी यांचा जलदानविधी, पुण्यानुमोदन व शोकसभेचा कार्यक्रम दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी मुक्काम गाव कालवण, ता. माणगाव, जिल्हा रायगड येथे भारतीय बौद्ध महासभा, शाखा क्र. १ च्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आली आहे तरी कालकथित सुदाम साळवी यांच्या सहवासात असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी, स्नेही, आप्तस्वकीय, मित्रपरिवार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आदर्शांस श्रद्धांजली अर्पण करावी असे आवाहन संघर्ष मित्र मंडळ मुंबई व ग्रामस्थ मंडळ कालवण यांच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा