रविवार, ४ जून, २०२३
सोसायटीचे देवमाणूस हरपले !!
शनिवार, २५ जून, २०२२
माणसातील देवमाणूस...डॉ महादेव वळंजू
डॉ वळंजू रहायला जरी पूर्वीपासून बोरीवलीला असले तरी त्यांची कर्मभूमी जोगेश्वरी राहिली आहे...कारण त्यांचा दवाखाना जोगेश्वरीतील बांद्रेकरवाडीत आहे व जवळपास ५० वर्षेहून अधिक काळ त्यांनी जोगेश्वरी वासीयांची व त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंटची निःस्वार्थ सेवा केलीय.आज डॉक्टरांचे वय ८८ वर्ष आहे व आता त्यांचा दवाखाना त्यांच्या पुतणी डॉ पारधिये मॅडम सभाळतात. वयोमानानुसार डॉ साहेबांना आता जोगेश्वरीला यायला तितकंस जमत नाही, तरीही अधूनमधून ते अध्यक्ष असलेल्या श्री समर्थ विद्यालयात येत असतात.त्याकाळी दर गुरुवारी डॉ केवळ नाममात्र एक रुपया घेऊन पेशंटची सेवा करायचे तसेच एखाद्याकडे पैसे नसतील तरी त्यांनी उपचार न करता कोणालाही परत पाठविल्याचे आठवत नाही, एवढया निःस्वार्थ भावनेने त्यांनी सेवा केलीय.रुग्णांशी आपुलकीने वागणे, त्याची विचसरपुस करणे, ख्याली खुशाली विचारात विचारता पटकन इंजेक्शन देणे,एवढ्या सुलभतेने की पेशंटला कळत सुद्धा नव्हते इंजेक्शन देऊन झालय ते.
आजही त्यांच्या श्री समर्थ शाळेत येणारे बहुतांश विद्यार्थी हे आरे कॉलनीतील आदिवासी पाड्यातून येतात व त्यांनी खास त्यांच्यासाठी स्वतः पदारमोड करून बसची व्यवस्था केलीय.या मुलांना दैनंदिन जीवनात काय हवं काय नको याकडे त्यांचे बारीक लक्ष असते व ते त्यांना काही कमी पडणार नाही याची पुरेपुर दक्षता घेतान दिसतात.जोगेश्वरीतील एक आदर्शवत, आदरणीय व लोकप्रिय अशी जनमानसात त्यांची प्रतिमा आहे.त्यांच्याकडे पाहिलं की काही माणसं ही भूतलावर ईश्वराने केवळ समाजाची सेवा करण्यासाठीच पाठविली आहेत असं वाटतं. अनेकजण जेव्हा त्यांना भेटतात तेव्हा त्यांना चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतात एवढा आदर व विश्वास त्यांनी आपल्या कार्याने जनमानसात निर्माण केलाय.त्यांच्या निःस्वार्थ कार्याची दखल घेत मुंबईतील जॉय सामाजिक संस्थेच्या वतीने येत्या ५ जून २०२२ रोजी त्यांना दादर येथे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉक्टर साहेबांचे नातेवाईक व असंख्य जवळची मंडळी उपस्थित होती.डॉ साहेबांनी आपल्या वयाची शंभरी पूर्ण करावी व त्यांना आरोग्यदायी आयुष्य लाभावे हीच प्रार्थना या देवमाणसाठी मी मनोभावे करतो व आपल्या माध्यमातून त्यांना थँक्स म्हणतो.🙏
-गणेश हिरवे,जोगेश्वरी पूर्व
संस्थापक - जॉय संस्था
बुधवार, २६ जानेवारी, २०२२
बहुआयामी आदर्श व्यक्तिमत्त्व गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व (मुंबई) येथील सामाजिक कार्यकर्ते,आदर्श शिक्षक व वृत्तपत्र लेखक,पत्रकार गणेश हिरवे यांचा आज वाढदिवस. गणेश हिरवे सरांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा ! हिरवे सर आणि माझा परिचय होऊन आज सात वर्ष उलटून गेली असतील. मी पुण्यात राहातो तर सर मुंबईत (जोगेश्वरीत). त्यामुळे प्रत्यक्ष भेट तशी खूप कमी होती. मुंबईत जर वृत्तपत्र लेखकांचा मेळावा किंवा पारितोषिक समारंभ असेल तरच भेट होते, मात्र म्हणतात ना खऱ्या मित्राशी रोजच भेट व्हावी असे काही नाही , त्याच्याशी रोजच बोलावे असेही नाही. दोन व्यक्तींचे स्वभाव आवडीनिवडी जुळल्या की मैत्रीचे रोपटे आपोआप बहरते. आमचेही तसेच आहे आम्ही जरी नेहमी भेटत नसलो तरी आमची मैत्री टिकून आहे याला कारणीभूत आहे सरांचा स्वभाव. मी वृत्तपत्र लेखक आणि सरही वृत्तपत्र लेखक. लेखनाच्या माध्यमातून आमची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाली. जसजशी मैत्री वाढत गेली तसतसा सरांबद्दल माझ्या मनात असलेला आदर वाढत गेला. हिरवे सर गेली वीस-बावीस वर्ष जोगेश्वरी आणि मुंबईत सामाजिक कार्यात भाग घेत आहेत. लॉक डाऊन काळात त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन समाजातील गोरगरीब, वंचित, आदिवासी विद्यार्थी, अनाथालय, वृद्धाश्रम, रोजंदारीवर काम करणारे मजूर, घनकचरा व्यवस्थापन कामगार अशा हजारो कुटुंबांना किराणा किट, आरोग्य किट, शैक्षणिक साहित्य वैयक्तिक तसेच आपल्या जॉय ऑफ गिविंग या संस्थेच्या माध्यमातून वितरित केलेले असून आजही अनलॉक सुरू झाला तरी त्यांचे कार्य थांबलेले नाही. गणेश हिरवे यांनी आतापर्यंत एकूण ३३ वेळा रक्तदान करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. त्यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे केलेली आहेत. कोरोना काळात त्यांनी स्वतः चार वेळा रक्तदान केले आहे. सरांना वाचनाचे प्रचंड वेड आहे. तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी. समाजात वाचन संस्कृती रुजवी यासाठी त्यांनी स्वखर्चाने आतापर्यंत बारा हजारांहून अधिक पुस्तके नागरिकांना व ग्रंथालयांना भेट म्हणून दिली आहे. हिरवे सर माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणूनही परिचित आहे. माहिती अधिकाराचा वापर करून त्यांनी अनेक नागरी समस्या सरकार दरबारी सोडवून घेतल्या आहेत. एक गुणी व मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून हिरवे यांना महाराष्ट्रात ओळखतात. सरांच्या सामाजिक कार्याची दखल राज्यातील अनेक संस्थांनी घेतली असून आजवर त्यांना ११४ पुरस्कार व ७७ करोना योद्धा सन्मानपत्र प्राप्त झाली आहेत. सामाजिक कार्य करतानाच आपल्या मूळच्या शिक्षकी पेशाकडे मात्र ते जराही दुर्लक्ष होऊ देत नाही. एक आदर्श, विद्यार्थिप्रिय,उपक्रमशील शिक्षक म्हणून ते जोगेश्वरीमध्ये व मुंबईत नावाजलेले आहेत. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळाला आहे. एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या पुनश्च एकदा शुभेच्छा. त्यांना आरोग्यदायी निरोगी आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
गुरुवार, २० जानेवारी, २०२२
समाजासाठी झटणारी महिला सामाजिक कार्यकर्त्या प्रियांका गुरव
समाजाचे कल्याण व्हावे, समाजातील वेगवेगळ्या समस्या सुटाव्यात, प्रत्येकाचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीकोणातून समाजाच्या कल्याणासाठी समाजात आज अनेक व्यक्ती आहेत. त्यापैकीच एक व्यक्ती म्हणजे महिला सामाजिक कार्यकर्त्या प्रियांका विश्वास गुरव.
शब्दांकन -पत्रकार विठ्ठल ममताबादे, उरण
मंगळवार, २८ डिसेंबर, २०२१
व्रतस्थवृत्तीचे उपेक्षित कुष्ठरोग्यांच्या जीवनात नंदनवन फुलविणाऱ्या समाजसेवक डॉ. शिवाजीराव ऊर्फ दाजीसाहेब पटवर्धन
श्री.वसंत बुटके तपोवन यांच्या लेखणींतून मनोगत,देशसेवा व समाजसेवा यासाठी आयुष्य झिजविणारे डॉ. शिवाजीराव ऊर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांनी अफाट इच्छाशक्तीने, असामान्य त्यागाने अत्यंत महत्त्वाचे कार्य करून दाखविले. कर्नाटकात जन्म घेऊन अमरावती कर्मभूमी करणार्या या महापुरुषाने आपल्या सर्वस्वाचा होमकुंड पेटवून मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी देह झिजवला.
शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१
तरुण पत्रलेखकांसाठी आदर्श - ज्येष्ठ व विक्रमी वृत्तपत्र लेखक विश्वनाथ पंडित
-गणेश हिरवे,जोगेश्वरी पूर्व
रविवार, २९ ऑगस्ट, २०२१
अविनाश शां. लाड - राजकारणातील समाजसेवक
श्री. लाड कुणबी सहकारी बँकेचे सल्लागार समिती सदस्य आहेत. गेली ५ वर्षे मुंबईतील संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतपेटीचे अध्यक्ष असून त्यांच्याच कारकीर्दीत संगमेश्वर आणि देवरूख येथे नवीन शाखा सुरू करण्यात आल्या. देवरूख येथे सुरू असलेल्या मामासाहेब भुवड कॉलेज ऑफ कॉमर्स अँड हाँटेल मॅनेजमेंट सुरू करण्यात सहभाग होता. दापोलीतील रामराजे कॉलेज आणि कुणबी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे कॉलेज सुरू व्हावे यासाठी ज्या प्रमुख व्यक्तींनी पुढाकार घेतला त्यापैकी एक लाड आहेत.श्री.अविनाश लाड तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. एक वेळा केवळ नऊ मतांनी पराभव झाला. त्याच त्यांच्या पत्नी निवडून आल्या. गेली २१ वर्षे त्यांच्या घरी नगरसेवकपद आहे.मुंबईत वास्तव्य करून ते कोकणात गावी जाऊन सार्वजनिक जीवनात काम करीत असतात. सन २०१६ साली कोकणातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब उर्फ शामराव पेजे यांच्या जन्मशताब्दी वर्षात कोकणातील अनेक ठिकाणी शेती, सहकार व शिक्षण विषयक मेळावे आयोजित करण्यात आले. शामराव पेजे स्मृती न्यास रत्नागिरी यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्यात श्री. लाड अग्रेसर होते. नवी मुंबई आणि मुंबईतील षण्मुखानंद येथे त्यांनी भव्य सभा आयोजित करून कोकणातील कुणबी व तत्सम बहुजन समाजातील अनेक नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणले होते.श्री. लाड यांनी राजापूर लांजा मतदार संघातून विधान सभा निवडणूक लढविली. थोड्या मतनी अपयश आले परंतु मतदारांशी संपर्क कायम ठेवला. कोरोना महामारीत ते सर्वप्रथम मदतीसाठी धावून गेले. गावोगावी फिरून वैद्यकीय साधने आणि धान्य वितरण केले.शहरी भागात राहूनही ते ग्रामीण भागात जास्त रमले. शेती आणि सहकार यातूनच कोकणात प्रगती होईल अशी त्यांची धारणा आहे. त्यासाठी त्यांनी अनेक कृषी तज्ञांच्या सोबत शेती मेळावे आयोजित केले.श्री.अविनाश लाड यांच्या सेवाभावी कार्याची पक्ष श्रेष्ठींनी दखल घेतली आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चिटणीस म्हणून नियुक्ती केली आहे. श्री. लाड यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि कामाची ही पावती आहे.त्यांना हार्दिक शुभेच्छा.
- पी. डी. ठोंबरे , संचालक,कुणबी सहकारी बँक, मुंबई
रविवार, १८ जुलै, २०२१
मुंबई पोलीस खात्यातील एक आगळे व्यक्तिमत्त्व !!
गुन्हेगारांवर जबरदस्त दरारा असणाऱ्या मुंबई पोलीस खात्याच्या परंपरेत महत्त्वाचे स्थान असलेले दहिसर डिव्हिजन सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास महादेवराव पाटील ३१ जुलै २०२१ रोजी पोलीस सेवेतून निवृत्त होत आहेत त्यानिमित्त त्यांची यशोगाथा.
दोन वर्षांपूर्वी ०१\०८\२०१९ रोजी बृहन्मुंबई शहरातून पश्चिम उपनगरातील उत्तर मुंबई झोन १२, दहिसर डिव्हिजन सहाय्यक पोलीस आयुक्त पदी सुहास महादेवराव पाटील हे बढतीवर विराजमान झाले. त्यांची प्रत्यक्ष भेट सुखद होती. त्याच महिन्यात भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभ दिवशी मित्रवर्य शेखर लाड यांच्या विनंतीवरून शिवम हाऊसिंग सोसायटीत ध्वजारोहण-ध्वजवंदनाला जवळून भेट झाली. शिस्तबद्ध, मनमिळाऊ व्यक्तीमत्व, परिसरात संस्थासंघटनात उपस्थितीत असताना बहुमुल्य मार्गदर्शन लाभले. त्याच वर्षात छत्रपती शिवाजीमहाराज संकुलातील "छत्रपती शिवाजी महाराज काॅम्प्लेक्स रेसीडेन्ट असोसिएशनच्या कुमार विद्यालयीन, नवतरुण महाविद्यालयीन आणि विभागातील नृत्यकला, चित्रकला, तसेच अभिनय कलागुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रीय भावनेतून आपले विचार मांडले. युवामहोत्सवात सुहास महादेवराव पाटील यांनी उपस्थित राहून श्रोतृवर्ग रसिकांसमोर आदर्श ठेवला. त्यांचे व्यक्तीमत्व गौरवास्पद ठरले. त्यांना दहिसरकरांच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
खाकी वर्दीतील देवमाणूस अशी त्यांची जनमानसात प्रतिमा झाली. माझे वास्तव्य बृहन्मुंबई महानगरातील कामगार विभागात गेल्यामुळे दादर, माटुंगा माहीम परिसरात लहानाचे मोठे झालेले पोलीस निरीक्षक सुहास महादेवराव पाटील आणि त्यांची टायकल वाडीतील ख्याती, सकारात्मक व्यक्तीमत्व ऐकून होतो. तर बावीस वर्षे उपनगरातील वास्तव्य असले तरी मुक्त पत्रकार या नात्याने धारावी शाहूनगर बीट चौकीसमोर रेल्वे इन्स्टिटय़ूट हाॅलमध्ये शेखर लाड यांना भेटायला, आणि विविध कार्यक्रमात सुहास महादेवराव पाटील नेहमी दिसायचे पण संवाद नव्हता.योगायोग दहिसर विभागातील ते सर्वांचेच चागंलेच स्नेही, आवडती व्यक्ती झाली. त्यांचा आणि माझा जन्मदिवस एकाच दिवशी म्हणजेच १५जुलै चा. त्यांच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव मोठ्याप्रमाणात झाला. शिस्तबद्धपणे अनेकांना ठराविक अंतरावर भेटून पुष्पगुच्छ, शुभेच्छा स्विकारत असतानाच मला मुलाखतीसाठी वेळे देण्याची विनंती मान्य करून मध्यातंराच्या जेवणाच्या सुट्टीत गप्पा मारल्या. ओघात कोविड 19 - कोरोना संसर्गजन्य महारोगराईच्या काळात आजही शासकीय सूचनांनुसार वरिष्ठांकडून मार्गदर्शन, गोरगरीब जनतेला कोणताही त्रास होणार नाही, त्यांना सर्वोतोपरी मदत कार्य, तमाम जनतेच्या मनातील कोरोनाविषयीची भिती कायम नष्ट करून जनजागृतीपर कार्य करण्यासाठी आम्ही सर्व पोलीस कार्यरत आहेत असे ते म्हणाले. आमच्यातील काहींना या आजाराने त्रस्त केले. त्यातून थोडीफार सुटका झाली. संचारबंदी, टाळेबंदीत कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. शहरातील अनेक श्रमिक आपापल्या गावाकडे जाण्याची वाट धरू लागले. दहिसर-मिरा रोड चेकनाक्यापासून ते एक्स्प्रेस हायवेवर तुफान गर्दीतून त्या सर्वांनाच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसगाड्या, तर बोरिवली, कुर्ला रेल्वेस्थानकातून चौवीस गाड्या सोडण्यात आल्या. प्रवाशांना विनामूल्य चहापान, नास्ता, जेवण, शुध्द मुबलक पिण्याचे पाणी विविध संस्थामार्फत उपलब्ध केले.
"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या आमच्या बोधवाक्यास नजरेसमोर ठेवून चागंले, शिस्तप्रिय नागरिकांचे सदैव रक्षणार्थ कार्यरत असून गुन्हेगारांवर जबरदस्त अकुंश ठेवून वेळीच त्यांच्यावर कठोर कारवाई करून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे.
सुहास महादेवराव पाटील यांना मी एक प्रश्न विचारला की आपण पोलीस खात्यात कसे वळालात? कोणत्या साली रूजू झालात?
मुंबई शहरात बालपणापासून राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून पोलीस अथवा सैन्य दलात जाण्याचा विचार होता. महाविद्यालयीन संपूर्ण उच्च शिक्षण पूर्ण करून मुंबई विद्यापीठात व्दिपदवीधर होऊन वडिलांच्या विनंती वरून भारत सरकार अर्थ आस्थापना निमशासकीय युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया अधिकारी म्हणून रूजू झालो. पण तेथे मन रमले नाही पोलीस उपनिरीक्षक स्पर्धापरिक्षेत उतीर्ण झालो. नाशिक पोलीस प्रशिक्षणार्थ सकाळी पहाटेपासून कसरत करून आपले नैपुण्य दाखवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन सन १९८८ जून महिन्यात PTC या पोलीस सेवेतून नोकरीचा श्रीगणेशा आरंभ केला.
बृहन्मुंबई महानगरात अनेक पोलीस ठाण्यात तर पायधुनी विजय वल्लभ चौकीत बंदोबस्त सन १९९३~१९९४ पायधुनी, नळबाजार, गोलदेऊळ या त्यावेळच्या अतिसंवेदनशील विभागात जीवावर उदार राहून दगंल आटोक्यात आणण्यासाठी आम्ही सर्व पोलीस, राष्ट्रीय सुरक्षादल रक्षक रात्रंदिवस ड्युटीवर कार्यरत होतो. माहीम कापडबाजाराच्या संपूर्ण परिसरात जनतेमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजविली.
मुंबई शहर पोलीस दलाच्या आकर्षणामुळे पोलीस दलातील विविध विभागाचा अभ्यास करत गुन्हेगारीवर थोडेफार ज्ञान अवगत करून गुन्हेगारीचे बदलते तंत्र आणि वाढती लोकसंख्येचा विचार करून दहिसर डिव्हिजन संपूर्ण विभागातील दुकानाबाहेर, इमारतीबाहेर जागोजागी सीसीटीव्ही फूटेज कॅमेरे विविध गृहनिर्माण, गृहसहकारी सोसायटीतील पदाधिकाऱ्यांकडून रस्त्यावरील कव्हरेज कॅमेराची व्यवस्था केली.
त्यांच्या समोर दहिसर रावळपाडा घटनेचे काय?
तेथे गुन्हेगारांनी ज्वेलर्स दुकानात दरोडा टाकून खून केला.अश्यावेळी आम्ही सर्व पोलीसांकडून सक्षम, सतर्क पथक तपास कार्यात मुंबई, ठाणे,गुजरात, मध्य प्रदेश येथून चौवीस तासात मुद्देमालासह सर्व गुन्हेगारांवर जबरदस्त कडक कारवाई करण्यात आली आहे. बृहन्मुंबई पोलीस आयुक्त महोदयाकडून आणि वरिष्ठांकडून आमचा अविस्मरणीय गुणगौरव झालेला आहे.दहिसर पोलीस डिव्हिजन सहाय्यक आयुक्त सुहास पाटील म्हणाले की त्यांना पोलीस वर्दीने खूप मोठा सम्मान दिला आहे. माझी ओळख, नाव ही मुंबई पोलीस सेवेतून मिळाले आहे.
आपला जन्म कुठे झाला? आपले गाव कुठे आहे?
त्यांचा जन्म मुंबई दादर शिवाजीपार्क दिनांक १५ जुलै१९६३ रोजी झाला. बालवयापासून ते सन २००१ पर्यंत माहीम-माटुंगा रोड पाटील वाडीत वास्तव्य होते. टायकल वाडीत जिवलग मित्रमंडळींबरोबर कट्ट्यावरील आठवणीत ते रमून जातात. सन २००१ पश्चिम उपनगरातील बोरिवली पूर्व कायम स्वरूपी वास्तव्य. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाडवल गावचे ते सुपुत्र होय. सुहास महादेवराव पाटील यांनी आयुष्यभर शिस्तबद्ध नितीनियमाने आपली जबाबदारी निष्कलंक, निस्वार्थपणे यशस्वीपणे शेवटपर्यंत इमान इतबारे पार पाडली आहे. त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त पदाबरोबर नोडेल उच्च अधिकारी, विशेष दंडाधिकारी पदावरून न्यायाधीश महोदयांकडून गुन्हेगारांना कडक शासन, तर किरकोळ कारणावरून वाट चुकलेल्या काही संशयी आरोपीना समज देऊन चागंल्या माणसात आणून नागरिकांमध्ये सहभागी केले आहे. दहिसर, बोरिवली या पूर्वेकडील विभागातील जनमनात आदरणीय सर्वोच्च स्थान मिळवले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास महादेवराव पाटील यांच्यावर आजही सदिच्छा,शुभेच्छा प्रेमाचा वर्षाव मोठ्या प्रमाणात होत आहे.
-लेखक / मुलाखतकार : दत्ताराम पुंजाजी घुगे
दहिसर - मुंबई
मोबाईल -9821793708
Email ghuge.dattaram@gmail.com
बुधवार, ७ जुलै, २०२१
अभिनयातील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड
ट्रॅजीडी किंग म्हणून ओळखले जाणारे हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे बुधवारी सकाळी वृद्धपकाळाने वयाच्या ९८ व्या वर्षी दुःखद निधन झाले. दिलीपकुमार यंच्या निधनाने चित्रपट सृष्टीतच नव्हे तर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. दिलीपकुमार यांच्या निधनाने अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठच हरपले आहे. दिलीपकुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी पेशावर येथे झाला. त्यांचे मूळ नाव मोहम्मद युसूफ खान असे होते. पेशावरहून त्यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी मुंबईत आले. दिलीपकुमार यांच्यासह बारा भावंडे होते. त्यांच्या कुटुंबात पाहुण्यांचाही राबता होता त्यामुळे आपणही काही तरी काम करून घर खर्चास मदत करावी असा विचार करून दिलीपकुमार पुण्याला आले. तिथे त्यांनी लष्करी कँटीनमध्ये मॅनेजरचा सहाय्यक म्हणून काम केले. दुसऱ्या महायुद्धात लष्करी कँटीनचे व्यवस्थापन बदलले आणि दिलीपकुमार जमा केलेले पाच हजार रुपये घेऊन घरी परत आले. मुंबईला आल्यावर त्यांना पुन्हा नोकरी शोधावी लागली. दिलीपकुमार हे नोकरीच्या शोधात आहे हे त्यांचे परिचित डॉ मसानी यांना समजले तेंव्हा डॉ मसानी यांनी त्यांना माहीम येथील बॉम्बे टॉकीजच्या स्टुडिओमध्ये देविका राणी यांच्याकडे घेऊन गेले. देविका राणी यांनी दिलीपकुमार यांचे राजबिंडे व्यक्तिमत्त्व आणि उर्दूवरील पकड पाहून त्यांना महिना बाराशे रुपये पगारावर अभिनय करण्याची ऑफर दिली. वास्तविक हा प्रस्ताव दिलीपकुमार यांना मान्य नव्हता कारण चित्रपटात अभिनय करावा असा विचार त्यांनी कधीही केला नव्हता पण महिना बाराशे रुपये मिळतात ही रक्कम त्याकाळी खूप मोठी होती त्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला आणि देशाला एक महान अभिनय सम्राट मिळाला. देविका राणी यांनीच त्यांना दिलीपकुमार हे नाव दिले. १९४४ साली आलेल्या ज्वार भाटा या चित्रपटाद्वारे दिलीपकुमार यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरवात केली. १९४४ ते १९९८ पर्यंत म्हणजे सहा दशकापेक्षा अधिक काळ दिलीपकुमार यांनी आपल्या अभिनयाने गाजवून सोडला. या दरम्यान त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले. यात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. अंदाज, राम और श्याम, आन, देवदास, आझाद, मुगल - ए - आझम, गंगा जमुना, नया दौर हे त्यांचे चित्रपट तर सुपरहिट झाले. या चित्रपटांनी तरुणाईला वेड लावले. १९५७ साली आलेल्या गंगा जमुना या चित्रपटातील मांग के साथ तुम्हारा...मैने मांग लिया संसार....या गाण्याने तरुणाईला वेड लावले होते. या चित्रपटात वैजयंती माला या त्यांच्या नायिका होत्या. चित्रपट रसिक त्यांच्या अभिनयाने इतके भारावले होते की त्याकाळच्या तरुणांचे ते आयडॉल बनले. देवदास या चित्रपटातील त्यांची भूमिका ही तर त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली. त्यांच्या या चित्रपटातील भूमिकेचे नंतर अनेक अभिनेत्यांनी अनुकरण केले पण कोणालाही त्यांच्या अभिनयाच्या जवळपास पोहचता आले नाही. १९७६ साली आलेला बैराग हा चित्रपट त्यांचा नायक म्हणून शेवटचा चित्रपट ठरला या चित्रपटात त्यांनी तिहेरी भुमीका साकारली. त्यानंतर काहीकाळ ब्रेक घेऊन त्यांनी मनोज कुमार यांच्या क्रांती या चित्रपटापासून चरित्र अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. शक्ती, विधाता, मजदूर, दुनिया, मशाल, कर्मा या चित्रपटात त्यांनी चरित्र भूमिका केल्या. सुभाष घई यांच्या सौदागर या चित्रपटात राजकुमार यांच्यासोबत त्यांची जुगलबंदी चांगलीच गाजली. १९९८ साली आलेला किला हा त्यांनी अभिनय केलेला शेवटचा चित्रपट ठरला. या दरम्यान त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी दिलीपकुमार यांना आठ पुरस्कार मिळाले. त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरविण्यात आले. भारत सरकारनेही त्यांच्या अभिनय कारकिर्दीची योग्य दखल घेऊन पद्मभूषण, पद्मविभूषण या मानाच्या पुरस्काराने त्यांना गौरवले. हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले. पाकिस्ताननेही त्यांना निशान - ए - इम्तियाज या त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवले आहे. दिलीपकुमार यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीचेच नाही तर देशाचे मोठे नुकसान झाले आहे. दिलीपकुमार यांच्या निधनाने अभिनयातील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांचा सारखा अभिनेता पुन्हा होणार नाही. अभिनय सम्राट दिलीपकुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
सोमवार, २८ जून, २०२१
लोकशाहिर तुकाराम मानकर अनंतात विलीन ; कोकणच्या जाखडी नृत्याची श्रीमंत कलाकृती अजरामर ठेवणारा महाराष्ट्राचा मानकरी हरपला !
त्या काळच्या अतिशय खडतर जीवन प्रवासात अत्यंत गरीब परिस्थितीत आई-वडिलांनी लोकशाहिर तुकाराम मानकर यांना शिकवले.आई-वडिलांच्या संस्कार व प्रेम-मायेनं त्यांना मोठं केले.सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म असल्याने वडिलांची स्वतःची शेती नाही.म्हणून दुसऱ्याकडे खपून-खपून किती खपायचे या मोठ्या प्रश्नावर विचार करत-करत वडील समवेत लोकशाहीर तुकाराम मानकर मायापंढरी मुंबईत आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आले.वडिल घरेलू कामगार म्हणून काम करत असत.आपल्या सोबत घेऊन आलेल्या वडिलांनी तुकाराम मानकरांना एका हॉटेल ला कामावर रुजू केले.काम करत असताना रेडिओवर गाणी ऐकणे, तमाशा नाच,कलगीतुरा पाहणे, त्यावर अभिनय करणे या गोष्टींची आवड असणाऱ्या मानकरांनी या कलेच्या गुणांवर प्रेम करायला सुरुवात केली.मग गावच्या ठिकाणी सादर होणाऱ्या गण, गवळण,फार्स,पोवाडा या कलेची आवड निर्माण होताच बारीक-सारीक भूमिका करणं, लिहणे, गायन करणे अशी ओढ लोकशाहीर मानकर यांना लागली व या कलेत त्यांचे मन रमले.
कोकणच्या पारंपारिक जाखडी नृत्याच्या डबलबारीच्या सामन्यांची ढोलकीच्या तालावर धुंद-बेधुंद होऊन निनादू लागतात.आजवर मुंबईची नाट्यगृहे, पौराणिक ग्रंथ, पुराणाच्या आधारे शास्त्राचा आधार घेऊन कालपरत्वे चालत असलेल्या या कलगीतुरा जाखडी- नृत्याचा रंग मात्र आजच्या आधुनिक युगातही कोकणातील युवा कलाकारांनी, अजूनही कायम ठेवलेला नाही तर त्याला आधुनिक पध्दतीची धार देण्याचे कार्य सुरू ठेवले आहे.अशा या क्षेत्रामध्ये गेली ५० वर्षे प्रचंड जिद्द,चिकाटी आणि अथक परिश्रम या भगीरथ प्रयत्नांतून रंगभूमीशी एकजीव होण्यास आदरणीय लोकशाहिर तुकाराम मानकर हे शक्ती-तुरा जोपासणारे कमालीचे खरे मानकरी ठरले आहेत.
अशा या महान विभूतीला दि.२६ ऑगस्ट २००४ रोजी अखिल भारतीय शाहिर परिषद मुंबईतर्फे मा.अध्यक्ष पद्मश्री शाहिर साबळे यांच्या शुभहस्ते "महाराष्ट्र शाहिर गौरव भुषण" हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले."रायगड भूषण पुरस्कार","कोकण रत्न पुरस्कार","कुणबी समाज गौरव पुरस्कार","जीवन गौरव पुरस्कार","महाराष्ट्र लोकगौरव पुरस्कार","आदर्श शाहिर पुरस्कार",भजन सम्राट गणपतराव बुवा जीवन गौरव पुरस्कार अशा अजून अनेक विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या वयाच्या १४ व्या वर्षापासून लोककलेला नवी पालवी देत वयाच्या साठी पर्यंत लोककलेला वृक्ष करताना आणि जोपासताना खडतर प्रसंगांना परिश्रमाने,जिद्दीने सामना करत लोकशाहिर तुकाराम मानकर यांनी मोलाची कामगिरी केली आहे.
काळाचा महिमा काळच जाणे...!!
कठिण तुमचे हे अचानक जाणे...!!
आजही घुमतो पहाडी आवाज तुमचा कानी...!!
वाहतांना श्रद्धांजली नयनी येते पाणी...!!
अशा उत्तुंग कलावंताचे नुकतेच रविवार दि.२७ जून २०२१ रोजी त्यांच्या मुंबईतील मालाड ( पूर्व ) येथील राहत्या घरी सकाळी ०९ :०० वाजण्याच्या सुमारास निधन झाले.गेले काही महिने मानकर बुवा आजारी होते.त्यांच्या निधनाच्या बातमीने कोकणची सारीच कलावंत मंडळी सुन्न झाली.त्यांच्यावर बाणडोंगरी,तानाजी नगर,कुरार व्हिलेज मालाड ( पूर्व ) येथे अंतिम संस्कार करण्यात आले.त्यांच्या पाठोपाठ सोमवार दि.२८ जून २०२१ रोजी त्यांच्या पत्नी गुलाबबाई मानकर यांना देखील हृदय विकाराचा तीव्र झटका आला त्यात त्यांची देखील प्राणज्योत मावळली.दुःखाचा मोठा डोंगरच मानकर कुटुंबीय वरती कोसळला आहे. मानकर बुवांच्या अंतिम दर्शनाला त्यांची सर्व शिष्यगण मंडळी,कोकणातील शाहिर वर्ग,मित्र-परिवार मोठया संख्येने उपस्थित होता.त्यांना कोकणातील अनेक नमन मंडळे, कलगी-तुरा उन्नती मंडळ,( मुंबई ), सर्व शक्तीवाले-तुरेवाले शाहिर,श्री पाणबुडी देवी कलामंच,तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
-शब्दांकन : कु दिपक धोंडू कारकर
मु.पो.मुर्तवडे कातळवाडी ता.चिपळूण,जि.रत्नागिरी
मोबा.९९३०५८५१५३
बुधवार, १६ जून, २०२१
कोकणच्या जाखडी नृत्य कलेतील लोकप्रिय कवी/गायक/ शाहिर सचिन कदम !
वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष...!
आज यातीलच एका कलाप्रेमी,कलातपस्वी शाहिराचा जन्मदिवस होय.खेड तालुक्यातील मु.पो.चाटव या गावी जन्मलेले रत्न,लहानपणीच गायनाची आवड असणारे,फार कमी वयात कोकणच्या शक्ती-तुरा कलेत पदार्पण करून,रसिक प्रेक्षकांनी गौरविलेलं एक शाहिरी व्यक्तिमत्त्व,सुमधुर आवाजाची बुलंद म्हणजे कवी/गायक/शाहिर सचिन कदम होय.आजवर कोकणची जाखडी नृत्य लोककला जतन करून या कलेतील अनेक बलाढ्य तुरेवाले शाहिर यांना प्रतिस्पर्धी म्हणून आपल्या दमदार वक्तृत्वाने व गोड आवाजाने मेटाकुटीला आणणारे हे व्यक्तिमत्त्व आहे.उत्तम काव्य रचना व सुंदर आवाजाने आजवर त्यांनी गायलेली अनेक गाणी युट्युब,व कॅसेटला विशेष प्रिय ठरली आहेत.सचिन कदम हे एक नाव या कलेत सर्वश्रुत होताना त्यांच्या कलागुणांचे आज विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत असते.अशा कलाप्रेमी शाहिराला वाढदिवसाच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा!
( मुर्तवडे,कातळवाडी - चिपळूण )
शनिवार, ५ जून, २०२१
यशस्वी सेवानिवृत्ती : फौजदार सहदेव म्हसकर
शुक्रवार, २८ मे, २०२१
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून काम करणारे वनिता फांऊंडेशनचे खजिनदार मिलिंद निकाळे काळाच्या पडदयाआड.....!
मंगळवार, २५ मे, २०२१
असा मित्र होणे नाही..
काळजी घ्या, सुरक्षित राहा, तब्येतीला जपा..
सोमवार, २४ मे, २०२१
समाजसेवेचे व्रत घेतलेले अंबरनाथ मधील दानशूर समाजसेवक सदाशिव पाटील
रविवार, १६ मे, २०२१
सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता
रविवार, ४ एप्रिल, २०२१
नामदेव समाजोन्नती परिषद संस्थापक : रामचंद्र बाळकृष्ण तथा भाऊसाहेब बोधे
संस्थापक रामचंद्र बाळकृष्ण तथा भाऊसाहेब बोधे यांच्या कार्यकतृत्वाचा आढावा•••
नामदेव शिंपी समाज बहुजन समाजात मोडत असून विसाव्या शतकाच्या आरंभी त्यांची स्थिती सर्वसाधारण बहुजन समाज याप्रमाणेच शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या होती. शैक्षणिक मागासलेपण आणि आर्थिक स्थिती खालावलेल्या एकमेकांशी संपर्क खूपच कमी. समाज एक प्रकारे भरडून निघत असताना एक तरुण शिक्षक रामचंद्र बाळकृष्ण तथा भाऊसाहेब बोधे मनातून अस्वस्थ झाले. त्यांनी समाजात शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा निर्धार केला.
सन १९०० साली सतराव्या वर्षी भाऊसाहेब मराठी सहावीची (थर्ड ग्रेड पब्लिक सर्व्हीस) ची परीक्षा उत्तीर्ण झाले. इंग्रजी शिक्षणाची आवड असून देखील प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना इंग्रजी शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे खाजगी रीत्या दोन इयत्ताचा अभ्यास करून सांगली येथे हायस्कूलमध्ये तिसऱ्या (इंग्रजी) इयत्तेत दाखला घेतला. परंतु चरितार्थासाठी हेही शिक्षण अर्धवट सोडून सातारा जिल्ह्यातील पारे नावाच्या खेड्यात "असिस्टंट मास्तर" म्हणून नोकरीस सुरुवात केली. या दरम्यान त्यांच्या असे लक्षात आले की, समाजातील होतकरू आणि कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात मागे राहतात. भाऊसाहेब ज्या शाळेत शिक्षक होते त्या शाळेतील प्रत्येक जातीच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या समाजातील सार्वजनिक शिक्षण फंडातून पैसा मिळत असे. त्यामुळे त्या समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक गरजा भागत असत. याच धर्तीवर नामदेव शिंपी समाजासाठी एखाद्या संस्थेचे गंठण करावे ही बाब भाऊसाहेबांना प्रकल्पाने जाणवू लागली.
त्यासाठी समाजात ठिकठिकाणी जे कोणी प्रमुख कार्यकर्ते असतील त्यांच्याबरोबर विचारविनिमय सुरू केला. पारे या छोट्या व दूरच्या खेड्यात राहून हे उद्दिष्ट पार पाडणे शक्य नाही हे लक्षात आल्यामुळे त्यांनी नोकरी सोडून आष्टा जिल्हा सांगली येथे पारंपरिक शिवणकामाचा व्यवसाय सुरू केला. तेथे सार्वजनिक कामासाठी भरपूर वेळ आणि समाजकार्यासाठी नवे क्षितिज प्राप्त झाले. लवकरच आष्टा येथे "नामदेव समाज हितचिंतक मंडळ" ही संस्था स्थापन केली.
समाजाच्या मुख्य आवडीचा विषय म्हणजे भजन. या निमित्ताने समाजातील बहुतेक मंडळी एकत्र जमत असत. नेमकं हेच हेरून भाऊसाहेब बोधे यांनी समाजाच्या तत्कालीन स्थितीविषयीचे वास्तव्य समजावून सांगण्यास सुरुवात केली. दर महिन्यास ज्ञाती सभा भरवून त्यात सामाजिक विषयाचा ऊहापोव केला जाई. शैक्षणिक साह्यासाठी शिक्षण फंडाची सुरुवात केली. त्याचप्रमाणे धार्मिक आचार विचार यावरही प्रवचन देण्याचा उपक्रम सुरू केला. जोडीला व्यापार विषयक माहिती मिळवण्याच्या उद्देशाने ए. बी. लठ्ठे आणि बळवंतराव धावते या जैन मित्राच्या सहाय्याने ए. बी. आणि कंपनी या पेढीची स्थापना मुंबई येथे केली. तेथील व्यापारी शिक्षणासाठी काही काळ मुंबई येथे वास्तव्य केले.
मुंबई येथे आल्यावर त्यांना अभिप्रेत असलेल्या समाज व त्यांच्या शैक्षणिक सुधारण्याचा हेतू साध्य होण्याच्या आशा बळ धरू लागली. येथे काकडे, अकोलकर, रोकडे, वनारसे, बारटक्के या प्रमुख कार्यकर्त्याचा परिचय झाला. त्यांच्याशी चर्चेतून विविध गटा तटातील मतभेदांमुळे समाजात एकसंघपना नाही हे भाऊसाहेबांच्या नजरेतून सुटले नाही. समाज हितासाठी वैयक्तिक पातळीवरचे मतभेद दूर सारून सर्वांनी एकत्र कार्य करण्याचे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. त्यानुसार आष्टे येथील नामदेव समाज हितचिंतक मंडळ या संस्थेच्या साहाय्याने हे कार्य सिद्धीस नेण्याचे आश्वासन सर्वांनी भाऊसाहेबांना दिले.
याच दरम्यान एका कटू प्रसंगामुळे वातावरण गढूळ झाले. याचे पडसाद पुणे, सातारा, वाई, कराड, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी तीव्रतेने उमटले. यावेळी भाऊसाहेब बोधे यांची स्थिती अनुकंपनीय झाली. त्यांना हाती घेतलेल्या कार्यास तडा जातोय की काय ? या भीतीने ग्रासून टाकले. समेटासाठी खूप प्रयत्न केले आणि गटातटाच्या मतभेदांना बगल देऊन, समाजाच्या सार्वजनिक हितासाठी जवळच्या कार्यकर्त्यांना अनेक वेगवेगळ्या गावांना पाठवून पुणे येथे एकत्र येण्याचे आवाहन केले.
त्यानुसार पुणे येथील नामदेव कमिटीचे सचिव दामुअण्णा खुर्द यांनी २३ मार्च १९०७ मध्ये कमिटीची सर्वसाधारण सभा बोलवली. या सभेत विविध ठिकाणाहून आलेल्या प्रमुख मंडळी समोर भाऊसाहेब बोधे यांनी समाज बांधणीचा आणि शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीचा हेतू विशद करून सांगितला. भाऊसाहेबांच्या ओजस्वी वाणीने आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाने कळकळीने सर्व उपस्थितांनी त्यांच्या कार्यात सक्रिय पाठिंबा देण्याचे जाहीर केले. त्यानुसार सभेतच पुढील कार्यक्रमाचे आमंत्रण सर्वांना दिले गेले. निमंत्रण पत्रिका वाटून गावोगावी आमंत्रणे पाठवली. आष्टे येथे आल्यावर सभेच्या पूर्वतयारीसाठी भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली स्थानिक कार्यकर्ते जोमाने कामाला लागले. आणि ३ एप्रिल १९०७, वार बुधवार या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता गोरज मुहूर्तावर आष्टा या गावी नामदेव समाजोन्नती परिषदेची स्थापना झाली. संस्थेच्या अधिवेशनास प्रारंभ झाला.
परिषदेचे पहिले कार्यकारी मंडळ निवडणे, संस्थेचे हित ठरविणे, नियमावली तयार करणे, तसेच ग्रामीण भागातून शहरात शिक्षण घेणा -या गरीब व होतकरू मुलांना साहाय्य करणे. त्यांच्यासाठी वसतिगृह चालवणे या सर्व बाबतीत साधकबाधक चर्चा होऊन पहिले अधिवेशन संपले. त्याप्रमाणे पुढे वर्षानुवर्षे स्वतःच्या पुंजीसोबत समाजातील धनिकाकडून शैक्षणिक फंड गोळा करून हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविले. त्यानंतर आर्थिक स्थैर्यासाठी सोलापूर येथे नामदेव एजन्सी स्थापना केली. तेथेच कापड गिरण्यातील कापड स्वस्त दरात ज्ञातीबांधवांना उद्योगधंद्यासाठी पुरवले जात असे.
सामाजिक कार्याच्या विस्तारामुळे त्यांनी सांगली येथे स्थलांतर करावे लागले. नंतर त्यांनी समाजकार्यासाठी पुणे येथे स्थलांतर केले. १९५७ ते १९६० या काळात ते समाजाचे अध्यक्ष होते. सांगली येथील वास्तव्यात ते सांगली नगरपरिषदेचे अध्यक्ष आणि स्टॅडींग कमिटीचे चेअरमन होते. अत्यंत धार्मिक व सुस्वभावी भाऊसाहेब या दरम्यान वार्धक्याने थकले होते. दिनांक ६ डिसेंबर १९६१ या ज्ञानेश्वर पुण्यतिथी दिवशी त्यांची प्राणज्योत आनंतात विलीन झाली.
३ एप्रिल २०२१, नामदेव सामाजिक परिषद ११४ वा वर्धापन दिनानिमित्ताने सर्व नाती बांधवांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा हीच या निमित्ताने भाऊसाहेब त्यांना खरी आदरांजली ठरेल.
-गणेश हिरवे,जोगेश्वरी पूर्व
शनिवार, ३ एप्रिल, २०२१
शांततेच प्रतिक चंदरशेठ अर्थातच चंद्रकांत लक्ष्मण कदम
१९४० च्या दशकात वडघर या गावी अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आलेले चंदरशेठ जन्मताच एक दोन वर्षाच्या कालावधीतच वडिलांच निधन झाल्याने आई रुखमीणीबाई यांच्या कुशीत गोर गोरगरिबांचा चंदरशेठ वाढत होता घरातील आर्थिक स्थिती प्रतिकूल नसल्याने,चंदरशेठ (चंद्रकांत लक्ष्मण कदम ) नावाचा हा पोलादी पुरुष आई रुखमीणीबाई यांच्या सुसंस्कृत संस्कारा मध्ये हळूहळू मोठा होत होता.जेमतेम वयात आल्यानंतर आईच्या डोक्यावरच संसार रुपी वज्याला चंदरशेठ हातभार लावू लागले
आपल्या आईला मदत करत असतानाच त्यांच्या अंतर मनातल्या भावना काही शांत बसू देईनात कुठलीच कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांच्या स्वःकर्तुत्वावर १९६० किंवा १९६५ च्या दरम्यान ते आचनक राजकारणात ओढले गेले आणि १९६६ च्या दशकामध्ये नुकतीच महाराष्ट्रा मध्ये हिंदुत्व आणि मराठीची आग ओखनार्या आताच्या शिवसेनेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यानी जन्म दिला होता,
स्वभावाने शांत असणारे चंदरशेठ शिवसेने कडे आकर्षित झाले व पक्षात सहक्रीय होत गेले, त्यांच्या त्या काळच्या सहकार्याान सोबत या कामथी विभागामध्ये शिवसेनेचा विस्तार करत राहिले;
आणि म्हणतात ना ..!
संयम व शांतता ठेवली की राजकारणात कुठलीही गोष्ट अशक्य नसते अगदी तसच झाल प्रदीर्घ काळ पक्षात काम केल्या नंतर १९९५ च्या बोरघर ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाहीर झाली आणि पहिल्यांदाच शिवसेनेने निवडणूक लढविण्याचे ठरवले,गोरगरिबांचे शासकीय/निमशासकीय आर्थिक अशा अनेक अडचणी सोडविणरे चंदरशेठ शिवसेने कडून ग्रामपंचायत निवडणूकच्या रिंगणात उत्तरले, ग्रामपंचायतीच्या स्थापने पासून एक हाथी सत्ता असणारी कॉंग्रेस थोडी बिथरली..!
आणि एक जुटिच्या जोरावर स्वर्गीय चंदरशेठ (चंद्रकांत लक्ष्मण कदम)यांच्या सहित शिवसेनेचे पॅनल मोठ्या फरकाने निवडून आले,मग सन्माननीय माझी केंद्रीय मंत्री अनंतजी गिते,स्वर्गीय प्रभाकरभाऊ मोरे (खर तर प्रभाकरभाऊ मोरे राज्यात गृहराज्यमंत्री असताना भाऊ स्वर्गीय चंदरशेठ याना आवडीने हाक मारून म्हणायचे चंदरशेठ आपली कृष्णा सूदाम्याची जोडी आहे तूम्ही माझे सुदामा आहात) अशा अनेक आठवणींच्या व शिवसेनेच्या बड्या नेत्यान सोबत काम केल्याने आणि प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर स्वर्गीय चंदरशेठ यांच्या गळ्यात कामथी विभागातला शिवसेनेचा पहिला सरपंच बनण्याचा बहुमान मिळविला,तदनंतर माननीय आमदार श्री भरतशेठ गोगावले यांच्याशी मधुर आणि स्नेहाचे कौटुंबिक समंध असल्याने विभागातील आनेक विकास कामांना गती देत आपल्या सरपंच पदाला न्याय दिला, असे गतिशील आणि प्रगतीशील चंदरशेठ आपल्यातून या जगाचा निरोप घेऊन स्वर्गलोकी गेले....! !
आज चंदरशेठ यांच्या पाश्च्यात पत्नी ३ मूळ १ मुलगी त्यांचा मोठा मुलगा कृष्णादादा कदम (K.K.) हे शिवसेनेच्या पोलादपूर तालुका सहसंपर्क प्रमूक पदावर कार्यरत आहेत.आपल्या वडिलांचा राजकीय /समाजिक वारसा जपत आहेत .देव करो या दुःखत प्रसंगातून या कुटुंबाला सावरण्याची शक्ती मिळो ..पुन्हा जाता जाता चंदरशेठ आपणास अखेरचा जय महाराष्ट्र..! ! ! भावपूर्ण श्रध्दांजली !!
-संकलन : शैलेश सणस
शब्दांकन : संभाजी विठ्ठल पार्टे
मंगळवार, २३ मार्च, २०२१
व्यसनमुक्तीचा दूत : रमेश सांगळे
रमेश सांगळे ..... रस्त्यावरचा एक दारुडा ते लोकांना व्यसनमुक्तीकडे घेऊन जाणारा निस्वार्थी कार्यकर्ता अशी त्याची वाटचाल. या कार्याला २४ मार्च रोजी २९ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याला व्यसनापासून परावृत्त करणारी त्याच्या पत्नीचे सहा महिन्यापूर्वी अकस्मात दुःखद निधन झाले. मानसिक आणि शारीरिकदृष्टयाही कायमचे अपंगत्व येऊन बेडवर खिळलेल्या ३५ वर्षीय मुलाची परागची आणि समाजातील व्यसनाधीन व्यक्तींची पालकत्वाची जबाबदारी पत्करून त्याचा निस्वार्थी समाजसेवेचे काम चालू आहे. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे चालूच राहणार आहे असे त्यांनी मनाशी ठरवले आहे.
त्यांच्या या कार्याची माहिती देणारा लेख .....
एका मांजरीला ९ वेळा जन्म मिळतो. असे म्हटले जाते. हे खरे आहे की नाही हे मला माहित नाही. पण माझ्या एका मित्राच्या बाबतीत त्याच्या २९ वर्षांपूर्वीच्या आयुष्याचा पट ऐकल्यानंतर हे खरे आहे की, त्याला २ वेळेस जन्म मिळाला. पहिल्यांदा नैसर्गिक आयुष्य मिळाले. म्हणजे जेंव्हा त्यांच्या आईने जन्म दिला. आणि दुसरा जन्म बायकोमुळे 'क्रिपा व्यसनमुक्ती' केंद्र येथे मिळाला. जेथे त्यांचे चांगल्या निर्व्यसनी मनुष्यामध्ये रुपांतर झाले. फक्त बोलण्यापुरते नाही तर त्याच्या वागण्यात आणि एकंदर व्यक्तीमत्वामध्ये त्यानंतर खुप फरक पडला. याच केंद्रामध्ये तो परत परत चांगला विचार करायला व वागायला शिकला. आणि समाजातला उपयुक्त असा नागरिक बनला.
रमेश भिकाजी सांगळे हा युवक शालांत परीक्षा पास होऊन, लार्सन अँड टुब्रो लिमिटेड पवई येथे १५ सप्टेंबर १९७७ साली शिकाऊ कामगार म्हणून रुजू झाला. आणि प्रशिक्षण पूर्ण करून १३ डिसेंबर १९८१ साली कामगार म्हणून कायम झाला. कंपनीच्या सहलीच्या निमित्ताने पहिल्यांदा बिअरचा ग्लास उचलून त्याने स्वताच्या ओठाशी लावला. जिभेवर रेंगाळलेल्या याच पहिल्या घोटाने पुढे त्याचे जीवन आणि कुटुंब उद्ध्वस्त झाले. अतिशय सावकाश, मजेसाठी दारूने त्याच्या जीवनात प्रवेश केला. आणि मग दारू म्हणजे मजा, आनंद, जल्लोष असा ठसा त्याच्या मनावर उमटला. प्रचंड मजा येऊ लागली. त्याला दारू खुप मोठी-मोठी स्वप्ने दाखवू लागली. सुरुवातीला त्याला वाटले इतरांप्रमाणे मी सर्वसामान्यपणे दारु पिऊ शकेल. पण अचानकच यात बदल झाला. त्याला त्याचे व्यसन जडले. आणि त्याचा त्याच्यावर ताबाच उरला नाही. त्यामुळे त्याचा परिणाम कंपनीतील कामावर होऊ लागला, कामावरची गैरहजेरी वाढली. त्यामुळे चार्जशीट, नोटिसा मिळाल्या. दारू ही त्याच्या जीवनाची समस्या झाली. या अविवेकी दारूपायी वारंवार पैशाची चणचण त्यामुळे बायकोशी रोजची भांडणे व मारहाण यामुळे संसार रोज मोडू लागला. असे का झाले ? का होत आहे ? व मला दारू एवढी का प्यावी लागत आहे ? हे त्याला कळेनासे झाले. आता तर दारू पिण्यासाठी घरात चोऱ्या, खोटं बोलणे सुरू झाले. पैसे अपुरे पडू लागल्यामुळे दारूचा दर्जा घसरला. घरातील सर्वजण हरले होते. प्रतिष्ठित कंपनीतील एक कामगार रस्त्यावरील दारुड्याचे जीवन जगायला लागला. शेवटी एका प्रसंगात तर बायकोला जाळण्याचा असफल प्रयत्न करीत, स्वतः देखील रेल्वेखाली आत्महत्या करण्यास गेला होता. एका चांगल्या मुलाचा दारूने राक्षस केला होता. त्या दारूच्या नशेत बायकोच्या चारित्र्यावर संशय घेवू लागला. बायकोवर नाही-नाही ते आरोप करू लागला. नराधमासारखा वागू लागला. वेड लागल्यासारखा बडबडू लागला. मग मात्र बायको घाबरली, घरचे हादरले व त्याची दारू सोडविण्याचे प्रयोग सुरू झाले. मद्यपाश हा एक आजार आहे. आणि आपण या आजारला बळी पडलो आहोत हे त्याला समजले पण उमजत नव्हते. जेव्हा हे प्रमाण वाढले तेव्हा त्याचे मित्र , कामावरील वरिष्ठ अधिकारी यांनी त्याला दारु सोडण्याचा सल्ला दिला. परिणामी त्याने त्यांच्याशी मैत्री कमी केली. निरनिराळ्या जागा बदलून मित्र बदलून त्याचे पिणे चालूच होते. परंतु जेंव्हा डॉक्टरांनी सल्ला दिला की, याचे अजुन दारु पिणे धोक्याचे आहे. तेंव्हा त्याचा त्यावर विश्वास बसला नाही. नंतरही दारू सोडण्याचे खूप प्रयत्नही केले गेले. आणाभाका घेतल्या, परंतु नाही जमले. पुन्हा पहीले पाढे पंच्चावन. नातेवाईक आणि मित्रांनी पुन्हा पुन्हा खूप समजाविण्याचा प्रयत्न केला. पण एक दारूडया दुसऱ्यांचे सहसा ऐकत नाही. कारण आडवा येतो त्यांचा अहंकार व तो याबाबत दुस-यांनाच दोषी धरतो. त्याने दारूचे व्यसन सोडावे म्हणून बायकोने गंडे, दोरे, अंगारे, धुपारे, बाबा, बुवा इत्यादी सर्व प्रयोग त्याच्यावर करून पहिले. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तिच्या पदरी निराशाच आली. नंतर तिच्याच प्रयत्नाने एल अँड टी मधील त्याचे विभागीय व्यवस्थापक पी.एल.चावला, कामगार कल्याण विभागाच्या लीला करकरीया यांच्या सांगण्यानुसार त्याला बांद्रे येथील फादर जो परेरा यांच्या क्रिपा व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले. तो दिवस होता मंगळवार दि. २४ मार्च १९९२. तशी त्याची पण इच्छा होतीच दारू सोडण्याची. परंतु त्याला आपण व्यसनमुक्त होण्याची शाश्वती नव्हती. इथे आल्यावर त्याला इथले वेगळेच चित्र दिसले. प्रत्येक चेहरा वेगळा होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळा भाव होता. कोणी बळजबरीने ऍडमिट केल्यामुळे रागात होता, कोणी आत्मविश्वासाने ओथंबत होता, कोणी व्यसनमुक्ती होईल की नाही यामुळे साशंक होता. त्यात स्वत:च्या अनुभवातून शिकत चांगल्या बदलासाठी प्रयत्नशील असणारे पेशंट पण होते. त्यांना विश्वास होता की प्रयत्न केला तर माणूस बदलू शकतो. व्यसनाधीनता या मानसिक आजारातून बाहेर पडण्यासाठी व्यक्तीने प्रथम अपयशाची जबाबदारी स्वत:ची स्वत: घ्यायला हवी. माणूस अपयशाची जबाबदारी इतरांवर टाकायला लागतो. त्यामुळे व्यसनाधीन व्यक्ती व्यसनामध्ये अधिकाअधिक गुरफटत जाते. मुद्दा असा आहे की, आपण व्यसनात गुरफटलो हा एक उत्तम प्रतीचा मूर्खपणा केला हे ठणठणीत पणे मान्य करायला खूप मोठ मन लागतं, आणि हा स्वतःचा अपराध रमेशने मनापासून तेथे स्वीकारला होता. त्याने त्याच्यासाठी घेतलेला हा एक योग्य निर्णय होता. सुरुवातीच्या दिवसांत त्याला बरेच काही उमगू लागले. खरे तर त्याला तेथे मिळालेला सुविचार ‘one day at a time’ चा अर्थ इथे कळला. आणि समुपदेशातून बरेच काही म्हणजेच आपला ‘प्रत्येक दिवस हा आजचाच दिवस’ असतो. कालची रात्र पडद्याआड गेली. उघाच्या दिवसाची सावली सुध्दा नाही आली, सत्य आहे आजचा दिवस, आत्ताचा तास, आणि हातातला आत्ताचा क्षण! डिप्रेशन आणि ऍडिक्शन या दोन्हीमधून बाहेर पडण्यासाठी आहे त्या वास्तवाचा स्वीकार करायला हवा. तिथेच व्यसनमुक्तीचा मार्ग सुरू होतो. दारू सोडणं ही प्रवासाची सुरूवात आहे. अंतिम बिंदू नव्हे. व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल घडविण्याचे प्रयत्न हा उपचाराचा भाग आहे. व्यसन करण्याची कृती थांबविणे म्हणजे वरवर दिसणाऱ्या लक्षणावरचा उपाय... "treatment of symptoms" या शब्दाचा अर्थ आहे "treatment of diseases within" आणि व्यक्ती आहे तोवर व्यक्तिमत्त्व आहे. आणि त्याबद्दलचे गुणदोषही आहेत. त्यामुळे उपचाराची प्रतिक्रिया सतत चालूच राहणार. अगदी अखेरच्या क्षणापर्यत ! स्वत:ला स्वत:च्या मनाशीच बऱ्याच लढाया लढाव्या लागणार हे त्याच्या काही दिवसातच लक्षात आले. काळानुसार अनुभवांची समृध्दी आली. तरी त्या लढाया संपत नाहीत. बऱ्याच वेळा त्यांचे स्वरूप बदलेल. हा निश्चयसुद्धा मनाशी कोरून ठेवला. ‘सोचो तुम क्या चाहते हो, जो चाहते हो वही मिलेगा, जो सोचते हो वही देखो, जो देखते हो वही मॉँगो, ओर जो मॉँगेगा वही मिलेगा ! रमेशने जेव्हा व्यसनमुक्ती केंद्रातील शिबिर पूर्ण करून आत्मविश्वासाने बाहेर नव्याने पाऊल ठेवले. तेव्हा प्रत्येक संधीचा उपयोग करायचा व यश मिळेपर्यत सातत्याने प्रयत्न सुरू ठेवायचे याची खूणगाठ त्याने मनाशी बांधली.
या केंद्रात दाखल होऊन एकूण १६१ दिवसांचा कार्यक्रम कालावधी त्याने पूर्ण केला. तेथे सर्वोत्कृष्ट समुपदेशक लाभले होते, त्यांनी त्याला एका भावाप्रमाणे व्यसनातुन बाहेर येण्याकरता सल्ला दिला. आणि मदत केली. या केंद्रामधील वास्तव्यामुळे त्याच्यामध्ये खुप बदल घडुन आला. हा बदल फक्त व्यसनमुक्त होणे हा नव्हता. तर योगासनांमुळे तो शारिरीक द्रुष्ट्या चांगला झाला. तसेच रागावर नियंत्रण कसे मिळवावे हे शिकला. तसेच शिस्त काय असते, तसेच कठीण प्रसंगाना कसे सामोरे जावे हे देखील शिकला. केंद्रातील उपचारने त्याला दारुला नाही म्हणायला शिकवले. आणि सुरुवातीला जेंव्हा कधी दारु पिण्याचा विचार त्याच्या मनात येत असे तेंव्हा तो केंद्रामधले वास्तव्य आठवत असे. जो त्याला योग्य असा विचार करायला आणि निर्णय घ्यायला शिकवत असे.
आई, पत्नीआणि मुलाबाळांना, जवळच्यांना व्यसनामुळे दिलेला त्रास फार भयंकर होता. हे उमजू लागले. 'दारुडा' म्हणून समाजाकडून मिळविलेली पदवी त्याने तेथेच टाकून देऊन, मनाशी संकल्प केला. यापुढे व्यसनाधीन व्यक्तींचे जीवन आणि त्याचे कुटुंब उद्धवस्त होऊन द्यायचे नाही. देवाने दिलेले बोनसरुपी पुनर्जीवन व्यसनमुक्तीच्या कार्यास अर्पण करायचे त्यांने ठरवले. कंपनीतील शिफ्ट ड्युटी, कामाचा ताण संभाळून बाहेर व्यसनमुक्ती कार्यास सुरुवात केली. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य आणि मिरॅकल फौंडेशन मुंबई या संस्थेची व्यासपीठे त्याला या कामाला बळ देण्यासाठी मिळाली. या व्यासपीठावरून व्यसनविरोधी प्रचार, प्रसार, प्रबोधन सुरु झाले. निर्व्यसनी तरुण पिढी घडविण्यासाठी शाळा, महाविद्यालय विद्यार्थी, महिला, युवक, कामगार, मजूर, आदिवासी बांधव यांचे मेळावे भरवून स्वानुभव कथन करू लागला. व्यसनाधीन व्यक्तींसह त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन चालू केले. स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून निस्वार्थी भावनेने करीत असलेल्या या सर्व कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने २ ऑक्टोबर २०१३ रोजी नागपूर येथील व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात 'राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देऊन रमेशला सन्मानित केले गेले. या पुरस्काराची मिळालेली रक्कम रूपये १५,०००/- यात पदरचे रूपये १०,०००/- मिळवून स्वतःच्या गावच्या विकासासाठी हा निधी दिला. २०१२ साली लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनीमधून स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ व्यसनमुक्तीचे कार्य मुंबईसह महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात करण्यास सुरुवात केली. व्यसनमुक्ती केंद्रात मिळालेल्या 'आजचा दिवस फक्त ' या मंत्रावर रमेश २४ मार्च २०२१ रोजी त्यांच्या व्यसनमुक्त जीवनाची २९ वर्षे म्हणजेच १०५८८ दिवस पूर्ण करीत आहे. याचे सारे श्रेय ते त्यांची पत्नी कै. नंदा रमेश सांगळे यांना देतात. कारण तिने सावित्रीचा वसा घेतला. आपला पती व्यसनमुक्त व्हावा. यासाठी जिद्दीने प्रयत्न केले नसते तर रमेशरावांचा भिंतीवर हार घातलेला फोटोच २९ वर्षांपासून बघायला मिळाला असता.
आपल्याकडे व्यसन हा एक आजार आहे याची माहीती नसते. इथुन सर्व समस्या सुरु होते. आजार आहे हे जरी लक्षात आलं तरी त्यावर कुठलेही औषध उपलब्ध नाही. याची कल्पना नसते. कल्पना असली तरी ती स्विकारली जात नाही. आजाराचा चिवटपणा लक्षात घेतला जात नाही. त्यातुन निरनिराळे प्रयोग माणसे करु लागतात आणि व्यसनाच्या जाळ्यात पुन्हापुन्हा गुरफटत जातात. बरीच माणसे आणि त्यांचे नातेवाईक आपापले अनुभव सांगताना हे मान्य करतात की दारुचे व्यसन हा एक आजार आहे. हे आम्हाला माहीतच नव्हतं. हे माहीत होणं गरजेचं असतं. कारणं फार मोठ्या अपराधी भावनेतुन त्यामुळे माणसाची सुटका होते. त्याच्या कुटूंबियांचीही सुटका होते. कारण आपल्या नशीबी हे काय दुर्दैव आलं? या भावनेने ती मंडळी होरपळुन निघत असतात. त्यामुळे व्यसन हा आजार आहे. तो आपल्याला झाला आहे. आणि त्यावर कायम स्वरुपाचे औषध नाही. या गोष्टीचा स्विकार ही व्यसनाच्या विळख्यातुन निघण्याची पहिली पायरी असते. पण ही पहिली पायरी चढणं बहुतेकांना जड जातं. व्यसनाधीनांना आता दारु कायमची सोडावी लागणार. हा विचारही सहन होत नाही. व्यसनाच्या काळात व्यसन कमी करण्याचा प्रयत्न बहुतेकांनी केलेला असतो. त्यात यश येत नाही हेही त्यांना माहित असतं. काही जण अनेक महिने दारु बंद करुन पाहतात आणि त्यानंतर पुन्हा व्यसन सुरु होऊन ही मंडळी व्यसनाचा तळ गाठतात.
व्यसनी माणसाच्या मनात हे विचार तर घरच्यांच्या मनात आणखी काही वेगळेच असते. व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होताना माणसे हतबल झालेली असतात. याला बरा करा आम्ही त्याला बसुन खायला घालु म्हणणारी माणसे आपला माणुस केंद्रामधून परत आल्याबरोबर त्याने काम शोधावे म्हणुन मागे भुणभुण लावतात. याचा अर्थ त्याने आयुष्यभर बसुन खायचे असा नसतो. पण व्यसनातुन बाहेर पडलेल्या माणसाची परिस्थिती नाजुक असते. त्याला स्वतःला सावरायला थोडासा वेळ हवा असतो. अनेक वर्षे वाया गेलेली असतात. अनेक हिशेब पुन्हा बसुन नव्याने करायचे असतात. साऱ्या आयुष्याची घडी पुन्हा बसवायची असते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यसनापासुन दुर राहायचे असते. अशावेळी थोडासा ताणतणाव हा व्यसनाकडे वळवायला कारणीभुत होऊ शकतो. घरच्यांना त्रास दिलेला असतो त्यामुळे संबंधांमध्ये कडवटपणा आलेला असु शकतो. अशावेळी दोन्हीकडुन समजुतदारपणाची आवश्यकता असते. काहींच्या हे लक्षात येत नाही. त्यामुळे संशय घेणे सुरु होते. बाहेरुन आल्यावर निरखुन पाहणे, तोंडाचा वास घेणे हे प्रकार सुरु होतात. काही जणांना हे सहन होत नाही आणि आपण इतका स्वतःवर संयम ठेऊनही ही माणसे आपल्यावर संशय घेतात यामुळे त्यांना नैराश्य येते. आणि ते पुन्हा दारुकडे वळतात. व्यसनामुळे समाजापासुन दुरावलेली व्यक्ती ही डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. आपल्याला कुणी बोलावत नाही, सर्वजण टाळतात, घरातल्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आपला सल्ला कुणी विचारत नाही, सणासमारंभाला आपल्याला आमंत्रण नसतं. हे माणसाला जाणवत असतं. ही जाणीव अतिशय खचवणारी असते. समाज आणि व्यक्ती यातल्या सामंजस्याचे संतुलन साधणे हा व्यसनमुक्तीतला महत्त्वाचा टप्पा आहे असे त्यांना वाटते.
आपणच बदलायला हवं, समाज बदलणार नाही किंवा तो बदलणं आपल्या आवाक्याबाहेरचं आहे. हे समजवुन द्यायला एक उदाहरण हमखास दिलं जातं. आपण पाऊस थांबवु शकत नाही. आपण त्यापासुन बचाव करण्यासाठी छ्त्री घेऊ शकतो. मुळात पाऊस आणि माणसात नेमका फरक आहे तो हाच. पाऊस विचार करीत नाही. निसर्ग नियमाप्रमाणे पडतो. माणसं विचार करतात.
आपल्या नातेवाइकांमध्ये, मित्रांमध्ये, ओळखीच्या लोकांमध्ये व्यसनाच्या आहारी गेलेले अनेक लोक असतात. मात्र योग्य वेळी डोळे उघडून व्यसनाधीनतेच्या दु:खदायक चक्रातून बाहेर उडी मारून पुन्हा नव्याने आयुष्याची घडी बसवणे खरोखरी धैर्याचे काम आहे. दरम्यानच्या काळामध्ये रमेश सांगळे यांनी बऱ्याच चांगल्या सवयी लावून घेतल्या आहेत. मुख्य म्हणजे वाचन, वाचकांच्या सदरातून पत्रलेखन सुरू केले. रोज किमान तासभर वाचन चालूच ठेवले. विषयाचे बंधन न ठेवता चांगली चांगली पुस्तके वाचून काढली. पुस्तकांचा छोटासा संग्रह केला. चित्रपट, नाटक बघणे गाणी ऐकण्याचा छंद जोपासला. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, मिरॅकल व्यसनमुक्ती केंद्र या संस्थांच्या कार्याशी जोडून घेतले आहे. त्यांनी एक ठरवले आहे की रिकामे बसायचे नाही. मोकळ्या वेळात काही ना काही चांगले काम करत राहायचे. जिथून जे शिकायला मिळेल ते शिकत राहायचे. आपल्याला पुढे कामी येईल की नाही हा विचार न करता शिकत जायचे. व्यसनमुक्तीची २९ वर्षे पूर्ण होताना रमेश सांगळेना गत आयुष्याबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले, खरे सांगायचे म्हणजे माझ्या व्यसनाधीनतेबद्दल मला वाईटही वाटत नाही आणि पश्चात्तापदेखील होत नाही. व्यसन हा एक आजार आहे, हे जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील मान्य केले आहे. तो मला झाला आणि वेळेवर मिळालेल्या योग्य उपचारांमुळे मी त्यातून बाहेर पडू शकलो. व्यसन एक स्वभावदोष आहे, जो अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनानुसार नियंत्रित करता येतो. आपण लहानपणापासून काही गोष्टी वाचतो, ऐकतो आणि त्या आपल्या मनावर कोरल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे, मी अमुक एक चूक केली आणि बरबाद झालो किंवा मी अमुक निर्णय योग्य घेतला आणि माझे आयुष्य सुधारले, क्रमाने केलेल्या चुका व क्रमाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांची मालिका व्यसनाधीन होण्यास कारणीभूत ठरतात. सुधारणा हीसुद्धा एक प्रक्रिया आहे. क्रमाने घेतलेल्या योग्य निर्णयांची मालिका सुधारणा घडवून आणते. म्हणून अनुभवी लोकांचे मार्गदर्शन खूप आवश्यक असते. याबरोबरच उच्चशक्तीवरचा विश्वास महत्त्वाची भूमिका बजावतो. माझ्यावर परमेश्वराची कृपा आहे, आणि माझ्या पत्नीने घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे मला वेळेवर मदत मिळाली. मी सुदैवी आहे की, आयुष्याच्या सुरुवातीलाच ऐन उमेदीत मला हा धडा मिळाला. आज संपूर्ण आयुष्यभर बेडवर काढावे लागणाऱ्या, शरीराने विकलांग असलेल्या माझ्या एकुलत्या एक ३५ वर्षीय मुलाची सर्व जबाबदारी माझ्याकडे देऊन, माझी पत्नी नंदा हिचे ६ महिन्यापूर्वी दुःखद निधन झाले आहे. आता यापुढे घरात मुलाचा आणि समाजातील व्यसनाधितांचा पालक म्हणून निवृत्तीनंतरही हिमतीने आणि निस्वार्थीपणे आयुष्याच्या साठीनंतरही उमेदीने जगणार आहे. हे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले.
(रमेश सांगळे ९८२१५७४८९१ )
--- रवींद्र मालुसरे
(अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई) ९३२३११७७०४
ईबीडी बुद्धिबळ स्पर्धेत धनश्री बुद्धिबळ अकादमीच्या स्मित, शुभम आणि विवानचे निर्भेळ यश
मुंबई: (प्रेम पंडित )- धोरणात्मक कौशल्य आणि तरुण बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत ईबीडी बुद्धिबळ स्पर्धा (EBD Chess Tournamen...
-
प्रतिनिधी : पेण तालुक्यातील वाशी-शिर्की खारेपाट परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून सामाजिक कार्यकर्ते अमर बळीराम म्ह...
-
दापोली : (विशाल मोरे ) तालुक्यातील ग्रामपंचायत दमामे- तामोंड या गावातील सुतारवाडी, बुद्धवाडी गुरववाडी, मधलीवाडी, वडाचीवाडी, हनुमान वाडी येथ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...














