आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २८ जून, २०२१

लोकशाहिर तुकाराम मानकर अनंतात विलीन ; कोकणच्या जाखडी नृत्याची श्रीमंत कलाकृती अजरामर ठेवणारा महाराष्ट्राचा मानकरी हरपला !

 महाराष्ट्राची लोककला शाहिरी परंपरा,कोकणची अस्मिता,कोकणची मायबोलीचा आदर राखून जाखडी नृत्याची श्रीमंत कलाकृती अजरामर ठेवणारे एक कलातपस्वी नेतृत्व म्हणजे शाहिरी कलेचा अनमोल मोती आणि "शक्ती-तुरा" कलेतील निष्ठावंत सेवक महाराष्ट्राचे मानकरी लोकशाहिर तुकाराम मानकर होय.कलेचा वारसा लाभलेल्या आणि कलेचं "माहेरघर" म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पवित्र कोकण भुमीत आज अनेक शाहिरी रत्न जन्माला आली.कोकणच्या तांबड्या मातीतील विविध कला आजही जोपासून ती टिकवून ठेवण्याचे काम अनेक शाहिर आणि कलावंत मंडळी करत आहे.माणगाव तालुक्यातील अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात  बसलेले पेण गाव हे खेडेगाव असले तरी या गावामध्ये अनेक कलावंत, शाहिर जन्माला आले.संत,कलावंत,शाहिरांच्या भूमीत नाच,तमाशा,भजन भारूड या लोककलेनं नटलेल्या भूमीत पेण-भोपळी या गावात अत्यंत गरीब कुटुंबात वडील पांडुरंग श्रीपाद मानकर व आई बबीबाई पांडुरंग मानकर या माऊलींच्या पोटी ४ जुलै १९५६ रोजी  एका गोंडस बाळाचा जन्म झाला ते म्हणजे "लोकशाहीर तुकाराम मानकर" होय.

      त्या काळच्या अतिशय खडतर जीवन प्रवासात अत्यंत गरीब परिस्थितीत आई-वडिलांनी  लोकशाहिर तुकाराम मानकर यांना शिकवले.आई-वडिलांच्या संस्कार व प्रेम-मायेनं त्यांना मोठं केले.सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म असल्याने वडिलांची स्वतःची शेती नाही.म्हणून दुसऱ्याकडे खपून-खपून किती खपायचे या मोठ्या प्रश्नावर विचार करत-करत वडील समवेत लोकशाहीर तुकाराम मानकर मायापंढरी मुंबईत आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आले.वडिल घरेलू कामगार म्हणून काम करत असत.आपल्या सोबत घेऊन आलेल्या वडिलांनी तुकाराम मानकरांना एका हॉटेल ला कामावर रुजू केले.काम करत असताना रेडिओवर गाणी ऐकणे, तमाशा नाच,कलगीतुरा पाहणे, त्यावर अभिनय करणे या गोष्टींची आवड असणाऱ्या मानकरांनी या कलेच्या गुणांवर प्रेम करायला सुरुवात केली.मग गावच्या ठिकाणी सादर होणाऱ्या गण, गवळण,फार्स,पोवाडा या कलेची आवड निर्माण होताच बारीक-सारीक भूमिका करणं, लिहणे, गायन करणे अशी ओढ लोकशाहीर मानकर यांना लागली व या कलेत त्यांचे मन रमले.

    कोकणच्या पारंपारिक जाखडी नृत्याच्या डबलबारीच्या सामन्यांची ढोलकीच्या तालावर धुंद-बेधुंद होऊन निनादू लागतात.आजवर मुंबईची नाट्यगृहे, पौराणिक ग्रंथ, पुराणाच्या आधारे शास्त्राचा आधार घेऊन कालपरत्वे चालत असलेल्या या कलगीतुरा जाखडी- नृत्याचा रंग मात्र आजच्या आधुनिक युगातही कोकणातील युवा कलाकारांनी, अजूनही कायम ठेवलेला नाही तर त्याला आधुनिक पध्दतीची धार देण्याचे कार्य सुरू ठेवले आहे.अशा या क्षेत्रामध्ये गेली ५० वर्षे प्रचंड जिद्द,चिकाटी आणि अथक परिश्रम या भगीरथ प्रयत्नांतून रंगभूमीशी एकजीव होण्यास आदरणीय लोकशाहिर तुकाराम मानकर हे शक्ती-तुरा  जोपासणारे कमालीचे खरे मानकरी ठरले आहेत.

         अशा या महान विभूतीला दि.२६ ऑगस्ट २००४ रोजी अखिल भारतीय शाहिर परिषद मुंबईतर्फे मा.अध्यक्ष पद्मश्री शाहिर साबळे यांच्या शुभहस्ते "महाराष्ट्र शाहिर गौरव भुषण" हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले."रायगड भूषण पुरस्कार","कोकण रत्न पुरस्कार","कुणबी समाज गौरव पुरस्कार","जीवन गौरव पुरस्कार","महाराष्ट्र लोकगौरव पुरस्कार","आदर्श शाहिर पुरस्कार",भजन सम्राट गणपतराव बुवा जीवन गौरव पुरस्कार अशा अजून अनेक विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या वयाच्या १४ व्या वर्षापासून लोककलेला नवी पालवी देत वयाच्या साठी पर्यंत लोककलेला वृक्ष करताना आणि जोपासताना खडतर प्रसंगांना परिश्रमाने,जिद्दीने सामना करत लोकशाहिर तुकाराम मानकर यांनी मोलाची कामगिरी केली आहे.

काळाचा महिमा काळच जाणे...!!

कठिण तुमचे हे अचानक जाणे...!!

आजही घुमतो पहाडी आवाज तुमचा कानी...!!

वाहतांना श्रद्धांजली नयनी येते पाणी...!!

    अशा उत्तुंग कलावंताचे नुकतेच रविवार दि.२७ जून २०२१ रोजी त्यांच्या मुंबईतील मालाड ( पूर्व ) येथील राहत्या घरी सकाळी ०९ :०० वाजण्याच्या सुमारास निधन झाले.गेले काही महिने मानकर बुवा आजारी होते.त्यांच्या निधनाच्या बातमीने कोकणची सारीच कलावंत मंडळी सुन्न झाली.त्यांच्यावर बाणडोंगरी,तानाजी नगर,कुरार व्हिलेज मालाड ( पूर्व ) येथे अंतिम संस्कार करण्यात आले.त्यांच्या पाठोपाठ सोमवार दि.२८ जून २०२१ रोजी त्यांच्या पत्नी गुलाबबाई मानकर यांना देखील हृदय विकाराचा तीव्र झटका आला त्यात त्यांची देखील प्राणज्योत मावळली.दुःखाचा मोठा डोंगरच मानकर कुटुंबीय वरती कोसळला आहे. मानकर बुवांच्या अंतिम दर्शनाला त्यांची सर्व शिष्यगण मंडळी,कोकणातील शाहिर वर्ग,मित्र-परिवार मोठया संख्येने उपस्थित होता.त्यांना कोकणातील अनेक नमन मंडळे, कलगी-तुरा उन्नती मंडळ,( मुंबई ), सर्व शक्तीवाले-तुरेवाले शाहिर,श्री पाणबुडी देवी कलामंच,तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


-शब्दांकन : कु दिपक धोंडू कारकर

मु.पो.मुर्तवडे कातळवाडी ता.चिपळूण,जि.रत्नागिरी

मोबा.९९३०५८५१५३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...