आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ४ एप्रिल, २०२१

नामदेव समाजोन्नती परिषद संस्थापक : रामचंद्र बाळकृष्ण तथा भाऊसाहेब बोधे

 

3 एप्रिल नामदेव समाजोन्नती परिषद 114 व्या वर्धापन दिनानिमित्त...

संस्थापक रामचंद्र बाळकृष्ण  तथा भाऊसाहेब बोधे यांच्या कार्यकतृत्वाचा आढावा••• 

  नामदेव शिंपी समाज बहुजन समाजात मोडत असून विसाव्या शतकाच्या आरंभी त्यांची स्थिती सर्वसाधारण बहुजन समाज याप्रमाणेच शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या होती. शैक्षणिक मागासलेपण आणि आर्थिक स्थिती खालावलेल्या एकमेकांशी संपर्क खूपच कमी. समाज एक प्रकारे भरडून निघत असताना एक तरुण शिक्षक रामचंद्र बाळकृष्ण तथा भाऊसाहेब बोधे मनातून अस्वस्थ झाले. त्यांनी समाजात शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा निर्धार केला.

    सन १९०० साली सतराव्या वर्षी भाऊसाहेब मराठी सहावीची (थर्ड ग्रेड पब्लिक सर्व्हीस) ची परीक्षा उत्तीर्ण झाले. इंग्रजी शिक्षणाची आवड असून देखील प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना इंग्रजी शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे खाजगी रीत्या दोन इयत्ताचा अभ्यास करून सांगली येथे हायस्कूलमध्ये तिसऱ्या (इंग्रजी) इयत्तेत दाखला घेतला. परंतु चरितार्थासाठी हेही शिक्षण अर्धवट सोडून सातारा जिल्ह्यातील पारे नावाच्या खेड्यात "असिस्टंट मास्तर" म्हणून नोकरीस सुरुवात केली. या दरम्यान त्यांच्या असे लक्षात आले की, समाजातील होतकरू आणि कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात मागे राहतात. भाऊसाहेब ज्या शाळेत शिक्षक होते त्या शाळेतील प्रत्येक जातीच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या समाजातील सार्वजनिक शिक्षण फंडातून पैसा मिळत असे. त्यामुळे त्या समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक गरजा भागत असत. याच धर्तीवर नामदेव शिंपी समाजासाठी एखाद्या संस्थेचे गंठण करावे ही बाब भाऊसाहेबांना प्रकल्पाने जाणवू लागली.

   त्यासाठी समाजात ठिकठिकाणी जे कोणी प्रमुख कार्यकर्ते असतील त्यांच्याबरोबर विचारविनिमय सुरू केला. पारे या छोट्या व दूरच्या खेड्यात राहून हे उद्दिष्ट पार पाडणे शक्य नाही हे लक्षात आल्यामुळे त्यांनी नोकरी सोडून आष्टा जिल्हा सांगली येथे पारंपरिक शिवणकामाचा व्यवसाय सुरू केला. तेथे सार्वजनिक कामासाठी भरपूर वेळ आणि समाजकार्यासाठी नवे क्षितिज प्राप्त झाले. लवकरच आष्टा येथे "नामदेव समाज हितचिंतक मंडळ" ही संस्था स्थापन केली.

   समाजाच्या मुख्य आवडीचा विषय म्हणजे भजन. या निमित्ताने समाजातील बहुतेक मंडळी एकत्र जमत असत. नेमकं हेच हेरून भाऊसाहेब बोधे यांनी समाजाच्या तत्कालीन स्थितीविषयीचे वास्तव्य समजावून सांगण्यास सुरुवात केली. दर महिन्यास ज्ञाती सभा भरवून त्यात सामाजिक विषयाचा ऊहापोव केला जाई. शैक्षणिक साह्यासाठी शिक्षण फंडाची सुरुवात केली. त्याचप्रमाणे धार्मिक आचार विचार यावरही प्रवचन देण्याचा उपक्रम सुरू केला. जोडीला व्यापार विषयक माहिती मिळवण्याच्या उद्देशाने ए. बी. लठ्ठे आणि बळवंतराव धावते या जैन मित्राच्या सहाय्याने ए. बी. आणि कंपनी या पेढीची स्थापना मुंबई येथे केली. तेथील व्यापारी शिक्षणासाठी काही काळ मुंबई येथे वास्तव्य केले. 

 मुंबई येथे आल्यावर त्यांना अभिप्रेत असलेल्या समाज व त्यांच्या शैक्षणिक सुधारण्याचा हेतू साध्य होण्याच्या आशा बळ धरू लागली. येथे काकडे, अकोलकर, रोकडे, वनारसे, बारटक्के या प्रमुख कार्यकर्त्याचा परिचय झाला. त्यांच्याशी चर्चेतून विविध गटा तटातील मतभेदांमुळे समाजात एकसंघपना नाही हे भाऊसाहेबांच्या नजरेतून सुटले नाही. समाज हितासाठी वैयक्तिक पातळीवरचे मतभेद दूर सारून सर्वांनी एकत्र कार्य करण्याचे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. त्यानुसार आष्टे येथील नामदेव समाज हितचिंतक मंडळ या संस्थेच्या साहाय्याने हे कार्य सिद्धीस नेण्याचे आश्वासन सर्वांनी भाऊसाहेबांना दिले.

    याच दरम्यान एका कटू प्रसंगामुळे वातावरण गढूळ झाले. याचे पडसाद पुणे, सातारा, वाई, कराड, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी तीव्रतेने उमटले. यावेळी भाऊसाहेब बोधे यांची स्थिती अनुकंपनीय झाली. त्यांना हाती घेतलेल्या कार्यास तडा जातोय की काय ? या भीतीने ग्रासून टाकले. समेटासाठी खूप प्रयत्न केले आणि गटातटाच्या मतभेदांना बगल देऊन, समाजाच्या सार्वजनिक हितासाठी जवळच्या कार्यकर्त्यांना अनेक वेगवेगळ्या गावांना पाठवून पुणे येथे एकत्र येण्याचे आवाहन केले.

   त्यानुसार पुणे येथील नामदेव कमिटीचे सचिव दामुअण्णा खुर्द यांनी २३ मार्च १९०७ मध्ये कमिटीची सर्वसाधारण सभा बोलवली. या सभेत विविध ठिकाणाहून आलेल्या प्रमुख मंडळी समोर भाऊसाहेब बोधे यांनी समाज बांधणीचा आणि शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीचा हेतू विशद करून सांगितला. भाऊसाहेबांच्या ओजस्वी वाणीने आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाने कळकळीने सर्व उपस्थितांनी त्यांच्या कार्यात सक्रिय पाठिंबा देण्याचे जाहीर केले. त्यानुसार सभेतच पुढील कार्यक्रमाचे आमंत्रण सर्वांना दिले गेले. निमंत्रण पत्रिका वाटून गावोगावी आमंत्रणे पाठवली. आष्टे येथे आल्यावर सभेच्या पूर्वतयारीसाठी भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली स्थानिक कार्यकर्ते जोमाने कामाला लागले. आणि ३ एप्रिल १९०७,  वार बुधवार या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता गोरज मुहूर्तावर आष्टा या गावी नामदेव समाजोन्नती  परिषदेची स्थापना झाली.  संस्थेच्या अधिवेशनास प्रारंभ झाला.

   परिषदेचे पहिले कार्यकारी मंडळ निवडणे, संस्थेचे हित ठरविणे, नियमावली तयार करणे, तसेच ग्रामीण भागातून शहरात शिक्षण घेणा -या गरीब व होतकरू मुलांना साहाय्य करणे. त्यांच्यासाठी वसतिगृह चालवणे या सर्व बाबतीत साधकबाधक चर्चा होऊन पहिले अधिवेशन संपले. त्याप्रमाणे पुढे वर्षानुवर्षे स्वतःच्या पुंजीसोबत समाजातील धनिकाकडून शैक्षणिक फंड गोळा करून हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविले. त्यानंतर आर्थिक स्थैर्यासाठी सोलापूर येथे नामदेव एजन्सी स्थापना केली.  तेथेच कापड गिरण्यातील कापड स्वस्त दरात ज्ञातीबांधवांना उद्योगधंद्यासाठी पुरवले जात असे.

   सामाजिक कार्याच्या विस्तारामुळे त्यांनी सांगली येथे स्थलांतर करावे लागले. नंतर त्यांनी समाजकार्यासाठी पुणे येथे स्थलांतर केले. १९५७ ते १९६० या काळात ते समाजाचे अध्यक्ष होते. सांगली येथील वास्तव्यात ते सांगली नगरपरिषदेचे अध्यक्ष आणि स्टॅडींग कमिटीचे चेअरमन होते. अत्यंत धार्मिक व सुस्वभावी भाऊसाहेब या दरम्यान वार्धक्याने थकले होते. दिनांक ६ डिसेंबर १९६१ या ज्ञानेश्वर पुण्यतिथी दिवशी त्यांची प्राणज्योत आनंतात विलीन झाली. 

    ३ एप्रिल २०२१, नामदेव सामाजिक परिषद ११४ वा वर्धापन दिनानिमित्ताने सर्व नाती बांधवांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा हीच या निमित्ताने भाऊसाहेब त्यांना खरी आदरांजली ठरेल.

-गणेश हिरवे,जोगेश्वरी पूर्व

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ईबीडी बुद्धिबळ स्पर्धेत धनश्री बुद्धिबळ अकादमीच्या स्मित, शुभम आणि विवानचे निर्भेळ यश

मुंबई: (प्रेम पंडित )- धोरणात्मक कौशल्य आणि तरुण बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत ईबीडी बुद्धिबळ स्पर्धा (EBD Chess Tournamen...