आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १४ मे, २०२६

खारेपाटाच्या पाणीप्रश्न सुटावा यासाठी अमर म्हात्रे यांचे सलग सहाव्या दिवशीही उपोषण सुरू !!

प्रतिनिधी : पेण तालुक्यातील वाशी-शिर्की खारेपाट परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून सामाजिक कार्यकर्ते अमर बळीराम म्हात्रे यांच्या आमरण उपोषणाचा काल सहावा दिवस पूर्ण झाला. मात्र प्रशासन, पाणीपुरवठा विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधीं कडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या अनेक महिन्यां पासून विविध बैठका, आश्वासने आणि तांत्रिक उपायांच्या घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात खारेपाटातील अनेक गावांना तीन ते पाच दिवस आड अपुऱ्या दाबाने पाणी मिळत असल्याची स्थिती आहे. कधी हेटवणे धरणावर अधिक क्षमतेचे पंप बसवण्याची घोषणा केली जाते, तर कधी CIDCO वॉशआऊट वरून जोडणी करण्याचा प्रस्ताव पुढे येतो, कधी बुस्टरपंप बसवण्याचा निर्णय होतो. त्यामुळे नेमकी अधिकृत आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य योजना कोणती, असा प्रश्न नागरिक आता विचारू लागले आहेत.
       दरम्यान, पाणीटंचाईचे खरे कारण “पाणी अपुरे असणे” नसून “दाबाने पाणी सोडल्यास पाईपलाईन फुटणे” हे असल्याचा गंभीर दावा स्थानिक नागरिकां कडून केला जात आहे. वाशीनाका ते वाशी बौद्धवाडा दरम्यान नव्याने टाकण्यात आलेली ३५५ मि.मी. HDPE पाईपलाईन तब्बल ५५ ते ६० वेळा फुटल्याचे बोलले जात असून, हे संभाव्य निकृष्ट काम, चुकीचे डिझाईन किंवा दर्जाहीन साहित्य वापराचे लक्षण असल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यामुळे आज संपूर्ण खारेपाटासाठी कमी दाबाने पाणी सोडले जात असल्याने शेवटच्या गावांपर्यंत पुरेसा पुरवठा पोहोचत नसल्याची चर्चा आहे. “पाणी उपलब्ध असूनही योग्य दाबाने देता येत नाही” हेच खरे दुखणे असल्याचे आता अधिक स्पष्टपणे समोर येत आहे.
      मागील बैठकींमध्ये अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याचे निर्णय झाल्याचे सांगण्यात आले होते, मात्र त्यावर अद्याप प्रभावी कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी केवळ आश्वासनां पुरते मर्यादित राहिले आहेत का?, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. रणरणत्या उन्हात एक सर्वसामान्य नागरिक जीवाची पर्वा न करता आमरण उपोषण करत असताना प्रशासन अजूनही बैठका आणि चर्चां या मध्येच अडकलेले दिसत असल्याची भावना व्यक्त होत आहे. आता केवळ नवीन योजना जाहीर करण्या ऐवजी मूळ तांत्रिक दोष शोधून कायम स्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे.

[[ वाशी-शिर्की खारेपाटासाठी टाकण्यात आलेल्या ३५५ मि.मी. HDPE पाईपलाईनचे वारंवार फुटणे ही गंभीर बाब असून संपूर्ण लाईनचे स्वतंत्र तांत्रिक ऑडिट, Hydraulic Pressure Test आणि Material Quality Verification करण्यात यावे. तपासणी अहवाल सार्वजनिक करून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी व आवश्यक असल्यास संपूर्ण नित्कृष्ट पाईपलाईन नव्याने बदलण्यात यावी.

 - राजेंद्र झेमसे, सामाजिक कार्यकर्ता]]
वाशी, ता. पेण, जि. रायगड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

खारेपाटाच्या पाणीप्रश्न सुटावा यासाठी अमर म्हात्रे यांचे सलग सहाव्या दिवशीही उपोषण सुरू !!

प्रतिनिधी : पेण तालुक्यातील वाशी-शिर्की खारेपाट परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून सामाजिक कार्यकर्ते अमर बळीराम म्ह...