श्री.वसंत बुटके तपोवन यांच्या लेखणींतून मनोगत,देशसेवा व समाजसेवा यासाठी आयुष्य झिजविणारे डॉ. शिवाजीराव ऊर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांनी अफाट इच्छाशक्तीने, असामान्य त्यागाने अत्यंत महत्त्वाचे कार्य करून दाखविले. कर्नाटकात जन्म घेऊन अमरावती कर्मभूमी करणार्या या महापुरुषाने आपल्या सर्वस्वाचा होमकुंड पेटवून मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी देह झिजवला.
डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांचा जन्म २८ डिसेंबर १८९२ रोजी कर्नाटकातील जामखिंडी या संस्थानातील ‘आसंगी’ या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मध्यम स्वरूपाची होती. लहानपणीच आईचे निधन झाल्यामुळे त्यांची उणीव मोठ्या बहिणीने भरून काढली. डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांचे प्राथमिक शिक्षण गावात झाले तर मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पुणे येथे झाले. मॅट्रिक पास झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी कलकत्ता गाठले. त्या ठिकाणी त्यांनी होमियोपॅथीत वैद्यकीय पदवी प्राप्त केली. लहानपणापासूनच दुसर्यांसाठी काहीतरी करावे असा विचार त्यांच्या मनात होता. पुढे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या शिक्षणाचा उपयोग गोरगरीब लोकांसाठी झाला पाहिजे या भूमिकेतून त्यांनी कार्यास सुरूवात केली. १९१७ ला डॉ. शिवाजीराव पटवर्धन अमरावती येथे आले. १९१८ मध्ये अमरावती शहरात प्लेगची साथ आली आणि माणसे पटापट मरू लागली. तेव्हा डॉ. शिवाजीराव पटवर्धनांनी जिवाची पर्वा न करता प्लेग ग्रस्त सर्वसामान्य लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्यावर योग्य उपचार केले. यातून बरीच माणसे रोगमुक्त झाली. हे कार्य करीत असताना त्यांनी लोकांकडून कुठल्याही प्रकारचा मोबदला घेतला नाही. तेव्हापासून समाजातील सर्व लोक त्यांच्याकडे आदराने पाहू लागले. लोक त्यांना देवदूत समजू लागले. तरूणांनी निरोगी, धडधाकट राहावे असे त्यांना वाटत असे. त्यामुळे त्यांनी तरूणांना आरोग्यविषयक धडे दिले.
१९२६ ला डॉ. शिवाजीराव पटवर्धन हे नगर परिषदेच्या निवडणुकीला उभे राहिले व प्रचंड बहुमताने निवडून आले. २८ ऑगस्ट १९२७ रोजी डॉ. शिवाजीराव पटवर्धन, श्री. दादासाहेब खापर्डे, डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अंबादेवीच्या देवळात दलितांना व हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी चळवळ सुरू केली, त्यात त्यांना यश मिळाले. १५ मे १९२८ रोजी श्रीमद् शंकराचार्य यांनी ‘समाज बलरक्षक’ अशी पदवी देऊन डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या कार्याचा गौरव केला. १९३८ साली सुभाषचंद्र बोस अमरावतीस आले असता डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी एका तासाचे भावोत्कट आभार प्रदर्शनपर भाषण केले होते. तेव्हापासून या दोन महापुरूषांमध्ये मैत्री निर्माण झाली. विदर्भ युवक परिषदेचे पहिले अधिवेशन डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी अमरावतीला घडवून आणले. त्यामुळे त्यांची वर्हाड प्रांतातील काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली.
डॉ. शिवाजीराव पटवर्धन हे जगप्रसिध्द श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. १९२६ साली श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने बांधलेल्या नवीन इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हस्ते झाले. महात्मा गांधी यांच्या भेटीतून स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा शिवाजीरावांना मिळाली व पुढे ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. डॉ. शिवाजीराव पटवर्धन व त्यांच्या पत्नी पार्वतीबाई पटवर्धन या दोघांनीही स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन मोलाची कामगिरी केली. स्वातंत्र्यपूर्व काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निकटचे स्नेही म्हणून डॉ. पटवर्धनांनी स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना अनेक वेळा तुरूंगवास भोगावा लागला. महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत व मिठाच्या सत्याग्रहात त्यांचा सक्रिय सहभाग होता. ९ ऑगस्ट १९४२ चे मुंबई काँग्रेसचे अधिवेशन आटोपून अमरावतीला परत येत असताना त्यांना मलकापूर रेलवे स्टेशनवर अटक करण्यात आली. तीन वर्षाच्या कारावासानंतर १९४५ मध्ये त्यांची तुरूंगातून सुटका झाली. त्यावेळी अमरावतीकरांनी त्यांची भव्य मिरवणूक काढून त्यांचा गौरव केला.
१९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी आपले लक्ष समाजसेवेवर केंद्रित केले. महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने नंतरच्या काळात कुष्ठरोग्यांच्या सेवेकडे वळले. त्यावेळी समाजात या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. आणि या लोकांकडे समाजातील लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय अमानवी होता. तेव्हा कुष्ठरोग्यांना रोगमुक्त करण्याचा त्यांनी निर्धार केला आणि कार्याची सुरूवात केली. श्री जुगलकिशोर जयस्वाल यांची अमरावती शहरापासून ५ किलोमिटर अंतरावर असलेली जमीन दान म्हणून त्यांनी या कार्यासाठी मिळवली. २६ सप्टेंबर १९४६ ला घटस्थापनेच्या दिवशी परमपूज्य विनोबा भावे यांच्या हस्ते कुदळ मारून ‘तपोवनाचा’ शुभारंभ केला. पुढे अनेक कुष्ठरोगी तेथे दाखल झाले.
कुष्ठरोग्यांना वेळेवर औषध पाणी मिळावे म्हणून ‘महर्षी दधिची शल्यभवनाची’ त्यांनी उभारणी केली. कुष्ठरोग्यांच्या मन:शांतीसाठी संतांच्या अभंगावर आधारलेले कीर्तनाचे, भजनाचे कार्यक्रम करण्यात येऊ लागले. निराशेच्या गर्तेतून अशाप्रकारे डॉ. पटवर्धनांनी कुष्ठरोग्यांना बाहेर काढले. ‘श्रमप्रतिष्ठा’ नावाचा औद्योगिक विभाग सुरू करून या औद्योगिक विभागातून विणकाम, सुतारकाम, मुद्रणालय, यंत्रमाग, चर्मोद्योग अशी अनेक कामे करून कुष्ठरोग्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ दिले. एवढेच नव्हे तर त्यांनी तयार केलेला माल खरेदी करण्यासाठी शासनाला भाग पाडले. त्याच बरोबर कुष्ठरोग्यांच्या मुलांसाठी ‘शिशुविहार’ उभारला. मुलांना दूध मिळावे म्हणून ‘गोशाळा’ सुरू करण्यात आली. तसेच मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ‘महामना मालवीय विद्यालय’, स्वतंत्र परीक्षा केंद्र आणि वाचनासाठी ‘सरस्वती वाचनालय’ सुरू केले.
पुढे ‘तपोवन’च्या निधीच्या संदर्भात शासनाशी बेबनाव झाल्यामुळे संतप्त झालेल्या डॉ. शिवाजीराव पटवर्धनांनी तपोवन संस्थेची स्थावर मालमत्ता एकूण ५ कोटी रूपये व अनेक एकर जमीन १० नोव्हेंबर १९८४ रोजी तडकाफडकी शासनाच्या स्वाधीन केली व ‘तपोवन’ कायमचे सोडले. डॉ. शिवाजीराव पटवर्धन हे स्वत: प्रसिध्दी पराङमुख होते. त्यामुळेच त्यांच्या कार्याचा उदो उदो झाला नाही. त्यांची मूलभूत जडणघडण, त्यांचे जीवनविषयक चिंतन सर्वसामान्यांपर्यंत पोहचले नाही. लोकमान्य टिळक पुरस्कार, अमरावती विद्यापीठाने दान केलेली प्रथम मानद डी.लिट. पदवी त्यांनी नम्रतेने नाकारली पद्मश्री हा पुरस्कार केवळ भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या स्नेहाखातर स्वीकारला. ते नेहमी म्हणत - ‘स्वत:च्या कामाचे मोजमाप स्वत: करू नका, ते दुसर्याच्या लक्षात आल्यावर आपोआपच त्याची किंमत केली जाईल, तुम्ही स्वत: जर प्रामाणिकपणे व जिद्दीने आपआपले कार्य करीत राहिला तर समाजाचे लक्ष तुमच्याकडे जायला वेळ लागणार नाही.’ अशा निस्पृह, सेवाभावी थोर पुरूषाचे निधन ७ मे १९८६ रोजी चांदुर रेलवे येथील त्यांचे जुने मित्र श्री. चांदुरकर यांच्या घरी झाले.
व्रतस्थवृत्ती उपेक्षित कुष्ठरोग्यांच्या जीवनात नंदनवन फुलविणाऱ्या या समाजसेवकाचे चरित्र आजच्या उच्चशिक्षित चंगळवादी समाजाला प्रेरणा व योग्य दिशा देणारे आहे.
- ✍ अविनाश म्हात्रे,अंबरनाथ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा