गडब (अवंतिका म्हात्रे) शासकीय आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. मात्र सुधागड तालुक्यात नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात आदिवासी महिलांकडून यासाठी २, ७०० रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.वाकण गाव आदिवासी वाडीतील महिला शुक्रवार दि.८ डिसेंबर रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली होती. डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे बाहेरून आलेल्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. त्यांच्यावर तीन दिवस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू होते. उपचारानंतर महिलेला घरी सोडताना आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी २,५०० रुपये शस्त्रक्रियेचे व टाक्याचे २०० रुपये असे एकूण २,७०० रुपये घेतल्याची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांनी दिली. प्राथमिक केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी गोरगरीब, आदिवासी, कष्टकरी बांधव अधिक येतात. ही शस्त्रक्रिया मोफत असतात नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत. अनेकांना इतकी रक्कम भरणे शक्य नसते, अशा वेळी त्यांना इतरांकडून उधारी घेऊन आरोग्य केंद्रात पैसे भरावे लागतात. याशिवाय रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.
सामाजिक कार्यकर्ते अॅड. काशिनाथ ठाकूर व सुधागड तालुक्यातील महेश पोंगडे महाराज यांनी याप्रकरणी सोमवारी (ता.११ डिसेंबर ) समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल केल्यावर ही बाब समोर आली.
[[ नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या आदिवासी महिलेकडून रक्कम घेतल्याबाबत नोटीस आली आहे. आरोग्य केंद्रात साहित्य उपलब्ध नसल्यास ते खरेदी करण्याचे अधिकार रुग्णालयातील अधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळे टाक्याचे पैसे रुग्णांकडून घेणे चुकीचे आहे. याबाबत जिल्हा आरोग्य विभागातील वरिष्ठांसमवेत घटनास्थळी जाऊन माहिती घेतली जाईल. तसेच जिल्हास्तरावर चौकशी करून पिडीतेकडून कोणत्या कर्मचाऱ्याने पैसे घेतले, याबाबतही विचारपूस केली जाईल. यापुढे असे प्रकार होऊ नये, म्हणून योग्य खबरदारी घेतली जाईल.]]
-डॉ. आदित्य शिरसाठ, वैद्यकीय अधिकारी, नागोठणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा