आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

कोरोनाग्रस्त अतिरेकी नव्हेत !



जगभरातील मानवी वस्त्यांवर विषाणूचा हल्ला सुरू आहे. एखाद्या युद्धातील नरसंहाराप्रमाणे मानवी देहांचा खच जिकडे तिकडे पडत आहे. त्यामानाने भारत आणि भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई कोरोनामुळे खचली गेली असली तरी तिने अजून मान टाकलेली नाही. मुंबई, पुणे, कल्याण, भिवंडी, पनवेल, औरंगाबाद, नागपूर, नाशिक अशी महत्वाची शहरे कोरोनातून सावरत आहेत. त्यांचा नक्कीच हिरोशिमा, नागासाकी होणार नाही. परंतु, प्रचंड आत्मविश्वासाने विषाणूचा मुकाबला करताना इथली काही माणसं खचली आहेत. त्यांच्यातील मानवता नष्ट होताना दिसते. विषाणूबद्दल राग, रोष, द्वेष कमी आणि ज्याला त्या कोरोनाची लागण झाली आहे, त्या रुग्णांबद्दल प्रचंड चीड दिसते.
का, कुणास ठाऊक? पण कोरोना रुग्णांविषयी इतकी घृणा माणसाकडे कशी आली हा एक संशोधनाचा आणि तितकाच चिकित्सकतेचा भाग आहे. स्वतःला विज्ञानवादी समजणारी माणसं एखाद्या आजाराकडे अशी संकुचित वृत्तीने एकाएकी का पाहू लागली? पूर्वी कुष्ठरोग झाला की त्या माणसाला अस्पृश्य समजले जायचे. ती अस्पृश्यता आता कोरोनाने पुन्हा मानवी मनात पेरली आहे. कोरोनाग्रस्त व्यक्ती निष्पन्न झाली की, त्याच्यासह कुटुंबांकडे पाहण्याचा दृष्टिकोन क्षणात बदलतो. आता सकाळी त्याच्यासोबत चहा घेतला, दुपारी मनसोक्त गप्पा मारल्या, संध्याकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर यांच्या मनात भीतीचे आभाळ निर्माण होते आणि तो शेजारी असेल, नातेवाईक असेल, एका इमारतीमध्ये कित्येक वर्षांपासूनचा दोस्त असेल, परिचित असेल तर तो कोरोनाबाधित आहे हे कळल्यावर त्याला, त्याच्या कुटुंबाला मानसिक आधार देण्याऐवजी त्या सगळ्यांकडे अतिरेकी असल्यासारखे पाहिले जाते. त्यात सुशिक्षित, अतिसुशिक्षितसुद्धा आहेत.
त्या व्यक्तीला सोसायटीतून रुग्णवाहिकेमधून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना त्याचे मोबाईलवर फोटो काढून ते व्हायलर केले जातात. 'आमच्याकडे एक सापडला', 'अमुक गावात अजून एक निघाला', कोरोना झाला हे माहीत असतानाही तो लपून कसा राहिला? असा त्याच्याच सोसायटीतमध्ये प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. हा आजार आहे. तो बरा होता. त्यातून सामजिकस्थिती बिघडलेली आहे. त्या सामाजिकतेला गंभीर आजार झालेला आहे. काहींचे मानसिक संतुलन बिघडू लागले आहे. ते माणसामाणसांत विषवल्ली पेरताना दिसत आहेत. रिकामे डोकं सैतानाचे घर असल्याचे ते दाखवून देत आहेत.
मुंबई आणि महाराष्ट्राने अनेक आंदोलने पाहिली, दंगे पाहिले. प्लेगसारखी साथ अनुभवली. बॉम्बस्फोट अंगावर घेतले. 26/11 चा दहशतवादी हल्ला सहज परतवून लावताना त्यांच्यातील स्पिरिट कधी मरून पडले नव्हते. आज महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त कमी आणि मनाला त्याची वाळवी लागलेले मानसिक रुग्ण जास्त आहेत. त्यातून कोरोनाग्रस्तांबाबत घृणा बाळगणारे आणि पसरवणारे ' सो कॉल्ड' जास्त आहेत. इतकेच नाही तर पुढे त्या कोरोनाग्रस्तांना हाक मरतानासुद्धा ' हाय कोरोना', ' बाय कोरोना ', अशी त्यांची खिल्ली उडवली जाईल आणि सामाजिक परिस्थिती गंभीर होईल. हा नवा विषाणू मानवी मनाला घेरून राहिला आहे, तो पहिल्यांदा मनामनांतून ठेचून काढला पाहिजे.
कोरोनाची साथ आटोक्यात यायला किमान जुलै, ऑगस्ट जाईल, असे दिसते. त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत. मानवी मनाची कला कितीही विकसित झाली तरी त्यातील संकुचितपणा, द्वेष, मत्सर, असूया, निंदा ही वृत्ती नाहीशी होत नाही, तोपर्यंत कोरोनाचे भुत थैमान घालत राहील आणि माणूस कितीही शिकला, सावरलेला, ज्ञानी, पंडित असेल तरी तो माणूस म्हणून वागताना दिसणार नाही.
कोरोनावर लस निघाली नाही. संशोधन सुरू आहे. त्याची प्रतीक्षा करण्याची मुळीच गरज नाही. कोरोनावर एकच जालीम औषध आहे ते म्हणजे मानसिक आणि सामजिक आधाराचे!
माणसाने माणसाशी माणसासम वागावे... ही लस, हे औषध कुठल्याही कारखान्यात तयार होत नाही तर जिथे तयार होते ते मानवी मन आपुलकीने समृद्ध केल्याशिवाय आणि कोरोनाग्रस्तांना कौटुंबिक प्रेम दिल्याशिवाय हे युद्ध आपण जिंकूच शकत नाही.
नव्वदच्या दशकात काश्मीर, पंजाब पेटले होते. तिकडे हिंसाचार माजला होता. रक्ताचे सडे पडत होते. भारतीय सैनिक शहीद होत होते. नक्षलवाद नष्ट करताना अनेकांना ते कंठस्नान घालत होते. त्याच काळात मुंबईत मटका जुगार जोरात होता. दोन्हीकडील आकड्यांचा लोकं अगदी मनापासून आनंद लुटत होते. कुणाला कशाचा आनंद होईल हे काही सांगता येत नाही. दुसऱ्यांदिवशी मुंबईतील मटक्याचा आकडा आणि काश्मीर, पंजाबमधील चकमकीचा आकडा वर्तमानपत्रांतून लोकं ज्या चवीने वाचायला उतावीळ असायचे, त्याच वृत्तीने आज कोरोना रुग्ण मोजत मनातील सैतानाला खतपाणी घालत आहेत. तो सैतान पोसून सामाजिक हानी पोहचवण्याचा उपद्व्याप काही जण घरी बसून करीत आहेत. त्यापेक्षा कोरोनाबाधित कुटुंबाचा आधार बनता आला तर वसुधैव कुटुंबकम ही संज्ञा तरी मनात रूजेल आणि मानवी जीवनाचे सार्थक होईल.


- कांतीलाल कडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...