आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २५ एप्रिल, २०२०

लॉकडाऊनमध्‍ये वाढवा वाचन


सध्‍या देशभर लॉकडाऊन सुरु आहे. सर्व आस्‍थापना, व्‍यवसाय, उदयोग धंंदे, बाजार, पर्यटन, प्रवास सर्व काही बंद आहे. महिनाभर सर्वजण घरामध्‍येच अडकून पडले आहेत. अशा वेळी काहीजण आपले छंद जोपासण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत, काही टीव्‍ही, मोबाईलवर दिवस घालवत आहेत तर काहीजण नुसतेच आराम  करत दिवस काढत आहेत . वास्‍ताविक लॉकडाऊन ही एक संधी आहे असे मला वाटते. आपले आवडीचे छंंद जोपासण्‍याची, त्‍यांना वाव देण्‍याची. ज्‍या गोष्‍टी आपण दैनंदिन व्‍यस्‍त जिवनशैलीत एरव्‍ही करु शकत नाही त्‍या अनेक गोष्‍टी आपल्‍याला या लॉकडाऊनमध्‍ये करता येतील. त्‍यापैैकीच एक म्‍हणजे आपली वाचनसंपदा वृध्‍दींंगत करणे. दररोजच्‍या कामाच्‍या व्‍यापात आपल्‍याला वाचन करण्‍यासाठी वेळच नसतो. खरेतर ते एक निमित्‍त असते वाचन टाळण्‍यासाठी. वेळ नसतो या कारणाने वाचन न करणा-यांची संख्‍या मोठी आहे. त्‍यामुळे नियमित वाचन करणा-यांची संख्‍या दिवसेंदिवस रोडावत चाललेली आहे. आवडच नसेल तर सवड कुठुन मिळणार. अनेकजण मला दररोज नियमितपणे लिखाण करण्‍यासाठी वेळ कुठुन काढतोस असा प्रश्‍न नेहमीच विचारत असतात. मात्र वाचनाबरोबर लिखानाची लागलेली आवड आता माझा एक आवडीचा छंद बनुन गेली आहे. वाचनाचा छंद हा वाचता येणा-या प्रत्‍येक व्‍यक्‍तीला असायलाच हवा. लॉकडाऊनचा काळ हा सर्वांसाठी वाचनसंस्‍कृती वृध्‍दींंगत करण्‍यासाठी एक मोठी संधी असे वाटते. त्‍याचा वापर  प्रत्‍येकाने करायला हवा. ज्ञान हे दोन गोष्टीतून मिळते. एक अनुभव व दुसरे वाचन. अनुभव तर आपण पदोपदी घेत असतो त्यातून शिकण्यासारखे काय व किती हे प्रत्येकाच्या बुद्धिकौशल्यावर अवलंबून असते. अनुभवाने माणूस प्रगल्भ होतो पण हि प्रगल्भता जपण्यासाठी व ज्ञान आत्मसात करण्यासाठी वाचन हे अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे व्यक्तीची वैचारिक पातळी उंचावून ज्ञानात वाढ होते व मुख्य म्हणजे शब्दसंचयात भर पडते. धावत्या जगाबरोबर चालण्यासाठी, प्रत्येक घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त होण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही. "वाचाल तर वाचाल" हि नुसती उक्ती नसून यशस्वी जीवनाचा तो मूलमंत्र आहे. वाचन करत नसलेला माणूस एकतर अज्ञानी म्हणून ओळखला जातो अथवा आयुष्याबद्दल निरुत्साही. त्यामुळे वाचन हे यशस्वी व्यक्तीचे खरे उपासना यंत्र आहे. आजच्या पिढीने तर वाचनात सातत्य राखणे काळाची गरज आहे. परंतु नेमके याच्या उलट परिस्थिती आज पाहायला मिळते. संगणक, मोबाईल, लॅपटॉप या यंत्रामध्ये अडकलेला आधुनिक युवक आज वाचन पूर्णपणे विसरलेला आहे. फेसबुक, व्हाट्सअप, इंटरनेट या अभावी स्वतःला अपूर्णतेची जाणीव त्याला होते. एकतर वाचनासाठी वेळ मिळत नाही किंवा काढला जात नाही. यामुळे वर्तमानकाळाची माहिती होत नाहीच पण आपल्या इतिहासाबद्दल तरी माहिती कशी होणार? ज्या वेळी हि आधुनिक साधने अस्तित्वात नव्हती त्या वेळी ज्ञान आकलनासाठी वाचनाशिवाय दुसरे माध्यम नव्हते. यामुळे लेखनासाठी देखील अनेक विचारवंत पुढे येत. अनेक लेखक, विचारवंत, कवी यांना एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध होते. पण कालांतराने त्यांची संख्या रोडवण्याचे एक कारण म्हणजे वाचकांची खालावलेली संख्या. आज अनेक नामांकित लेखकांची नावे देखील आजच्या पिढीला ज्ञात नाहीत हि मोठी शोकांतिका आहे. ज्यांनी समाज प्रबोधनासाठी जीवन खर्ची घातले व उत्तमोत्तम लिखाण भावी पिढीच्या उन्नतीसाठी करून ठेवले आहे ते लिखाण पाहायला आजच्या पिढीला सवडच नाही. आज सर्व भाषांतील उत्कृष्ठ लेखकांना आपली पुस्तके विकण्यासाठी एकतर रस्त्यावरील विक्रेत्यांचा आधार घ्यावा लागतो किंवा मोठ्या सवलतींनी पुस्तक विक्रीची प्रदर्शने भरवावी लागतात ह्याची खंत वाटते. इलेक्ट्रॉनिक मीडिया मुळे आज वर्तमानपत्रांना देखील अस्तित्वासाठी झगडावे लागले तर अप्रूप वाटू नये. एके काळी जलद संदेशवहनासाठी उपयुक्त असणाऱ्या पोस्ट खात्याच्या तार या संकल्पनेने केव्हाच एगझिट घेतली आहे. हळूहळू प्रिंट मीडियाची देखील वाचकांअभावी फरफट झाल्यास नवल वाटणार नाही. परंतु वाचनसंस्कृतीचे काय? ती जर लोप पावली तर अधोगतिकडे जाण्यासाठी धोक्याची घंटा दुसरी कोणती नसेल. पुस्तकांच्या ऐवजी मुलांच्या हातात टॅब, लॅपटॉप, मोबाईल आले, लेखी परिक्षेवजी ऑन लाईन परीक्षा सुरु झाल्या, बिले भरणे, शॉपिंग पासून घरगुती वापरातील नित्याच्या गोष्टींपर्यंत सर्व काही ऑन लाईन मिळते. कुणाला कुठेही जायची गरज पडत नाही सर्व काही घरबसल्या. पण ज्ञान मिळवण्यासाठी मात्र तुम्हाला वाचवेच लागेल. वाचण्यास वेळ मिळत नाही अशी अनेकांची तक्रार असते. शहरी भागामधील नोकरदार व व्यावसायिक मंडळींची तर घड्याळाच्या काट्यावरील कसरत. त्यात वाचनासाठी वेळ काढणे म्हणजे अनावश्यक व ओढवून घेतलेला व्याप अशी अनेकांची धारणा.अर्थात त्यात गैर आहे असे मत नाही पण दिवसातला थोडा वेळ आपण वाचनासाठी काढलाच पाहिजे. लॉकडाऊनच्‍या काळात तर आपल्‍याकडे वेळच वेळ आहे. तर मग थोडा वेळ वाचनासाठी दिला तर काय फरक पडतो. लेखनसंस्कृती जगवायची असेल, ज्ञान मिळवायचे असेल तर वाचन विसरता कामा नये. वाचन मग ते कुठल्याही माध्यमातून करा, वर्तमानपत्र, साप्ताहिक, मासिक, कथा कादंबरी, लेख, कविता, ग्रंथ, नोव्हेल काहीही. वाचनाची आवड एकदा लागली कि त्यासारखा उत्तम, योग्य मार्गदर्शक दुसरा नाही. वाचनामुळे संवाद वाढविण्याची क्षमता येते, लिखाणासाठी देखील प्रवृत्त होता येते. यामुळे विचारांचे आदानप्रदान वाढण्यास मदत होते.




वाचनासाठी आज अनेक प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. एकाच विषयाचे अनेक साहित्यातून वाचन केले तर या प्रकारातील विसंगती आपल्या लक्षात येईल. एखाद्या विषयाबाबतीत आपण एका पुस्तकात वाचलेले लिखाण दुसऱ्या पुस्तकात वाचल्यास बरीच विसंगती आपणास दिसेल. कारण त्या दोन्ही पुस्तकांच्या लेखकांची आकलन व उद्बोधन शक्ती निराळी असते. त्यामुळे खरतर वाचकांच्या मनात संभ्रम निर्माण होवू शकतो. त्यामुळे एकाच आशयाचे लिखाण वाचणे हितकारक परंतु त्याच आधारे आपले मत बनवणेदेखील घातक ठरू शकते. यासाठी वाचनामध्ये प्रगल्भता येणे आवश्यक असते. एखाद्याचा वाचनाचा ओघ प्रचंड  असला तरी त्यातून सकारात्मक संदेश पोहोचने व वाचकांनी तो आत्मसात करणे गरजेचे आहे.
एकंदरीतपणे लॉकडाऊनमध्‍ये सर्वांनी आपल्‍यातला वाचक जोपासण्‍यासाठी प्रयत्‍न केला पाहिजे. वाचन संस्कृती जपलीच पाहिजे, लेखकांनादेखील प्रोत्साहित केले पाहिजे यासाठी मुलांनादेखील आवश्यक व उचित लिखाण उपलब्ध करून देणे आपली जबाबदारी आहे. त्यासाठी आवश्यक जनजागृती करणे हि प्रसारमाध्यमांची व प्रशासनिक जबाबदारी आहे. आजच्या संगणक युगामध्ये वाचन क्रिया टिकवून ठेवणे हि काळाची व आपल्या समाजचीदेखील गरज आहे हे विसरता कामा नये. यासाठी सर्व स्तरांवरून व्यापक- तसेच परिणामकारक प्रयत्न अपेक्षित आहेत.

-वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...