कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगच बंदिशाळा बनले आहे. अनेक देशांत लॉक डाऊन असल्याने इंधनाच्या मागणीत मोठी घट झाली आहे. जल मार्ग, रस्ते मार्ग, आणि हवाई मार्ग बंद असल्याने प्रवासी वाहतूक ठप्प आहे. कोरोनामुळे सर्व देशांतील उद्योगधंदे बंद आहेत. उद्योगातील कामकाज बंद असल्याने पेट्रोल डिझेलसारख्या इंधनाचा साठा मागणी अभावी साचून राहत आहे. याचा मोठा फटका अमेरिकी कच्च्या तेलाला ( डब्ल्यूटीआय क्रूड ऑइल ) बसला आहे. मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन बिघडल्याने प्रति बॅरल शून्य डॉलरच्याही खाली गेल्याने क्रूड ऑईलच्या दरात ऐतिहासिक घसरण झाली आहे.कच्च्या तेलाची घसरण ही जगातील ऐतिहासिक घटना आहे कारण कच्च्या तेलाचा दर उणे भाव होण्याची ही पहिलीच व अभूतपूर्व अशी घटना आहे. कच्च्या तेलाच्या दराच्या या अभूतपूर्व घसरणीचा भारताला मात्र फायदा होऊ शकतो कारण भारत हा कच्च्या तेलाचा प्रमुख आयातदार देश आहे. भारत ८० टक्के तेल हे ओपेक देशांकडून खरेदी करतो. कच्च्या तेलाचे भाव घसरल्याने देशाची परकीय चलन वाचू शकेल आणि त्यामुळे आयत बिल कमी होईल. याद्वारे चालू खात्यावरील तूट भरुन काढण्याची संधी भारताला मिळाली आहे. घसरलेल्या कच्च्या तेलाचा अधिकाधिक साठा भारताला करता येऊ शकेल जर भारताने या संधीचा लाभ घेत कच्च्या तेलाचा अधिकाधिक साठा केला तर भविष्यात भारतात पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी होऊ शकेल. जर पेट्रोल, डिझेलचे भाव कमी झाले तर साहजिकच देशातील महागाईही आटोक्यात येऊ शकते, एकूणच कच्च्या तेलाची घसरण भारताच्या पथ्यावर पडू शकते.
- श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड- जिल्हा पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा