आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २९ एप्रिल, २०२०

चित्रपटसृष्टी वर अनोखा ठसा उमटवणारा अभिनेता


अगदी काही महिन्यांपूर्वी  सोशल मीडियावर अभिनेते इरफान खान यांचा एक फोटो पाहायला मिळाला. आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर रंगभूमी ते हॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या या सशक्त अभिनेत्याला कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने ग्रासले असल्याचा तो फोटो पाहून मनात मनात शंकेची पाल चुकचुकली. पण कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला हरवून हा अभिनेता पुन्हा रुपेरी पडदा गाजवू लागला तेंव्हा मात्र सर्व काही ठीक असल्याचे समाधान वाटले आणि अचानक इरफान खान यांचे निधन झाल्याची बातमी दूरचित्रवाणीच्या न्यूज चॅनलवर झळकली आणि मनातील शंका अखेर ठरली याचा रागही आला. इरफान खान हा केवळ बॉलिवूडचाच नव्हे तर हॉलिवूडमधलाही सक्षम अभिनेता मानला जातो. इरफान खान यांनी आपल्या सक्षम अभिनयाने रसिकांच्या मनावर मोहिनी घातली. इरफान खानकडे चित्रपटातील नायकांप्रमाणे गोरा गोमटा मुखडा नव्हता की बलदंड शरीरयष्टी नव्हती तरीही तो बॉलिवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला तो त्याच्या सशक्त अभिनय आणि अनोख्या संवाद फेकीने. अर्थात त्याचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. क्षमता आणि गुणवत्ता असूनही या टप्प्यापर्यंत पोहचण्यासाठी त्याला बरीच मेहनत घ्यावी लागली. इरफान खान यांचं पूर्ण नाव साहेबजादे इरफान अली खान असे होते. इरफान खान यांची घरची परिस्थिती बेताची, त्याच्या वडिलांचा टायरचा व्यवसाय होता. इरफान खान यांना लहानपणापासून अभिनयाचे वेड होते या वेडापायीच त्यांनी एनएसडी ( नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ) मध्ये प्रवेश घेतला.   त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने  एनएसडी कडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीवर त्यांनी तो कोर्स पूर्ण केला. नंतर रंगभूमीवर भूमिका करत त्यांनी टेलिव्हिजन वरील अनेक मालिकांमध्ये काम केले. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळवला. बॉलिवूडमध्ये त्यांनी एकाहून एक सरस सिनेमे केले. बॉलिवूड प्रमाणे हॉलिवूडपटातही त्यांनी  भूमिका केल्या. स्पायडरमॅन, ज्यूरासिक वर्ल्ड, इंम्फर्मो या सारख्या गाजलेल्या  हॉलिवूडपटात त्यांनी भूमिका केल्या. हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्स हे त्यांच्या अभिनयाचे प्रचंड चाहते. एका मुलाखतीत ते म्हणतात इरफान खान यांचे डोळेही अभिनय करतात. हिंदीतही त्यांनी अनेक चांगल्या भूमिका केल्या. पान सिंह तोमर या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर हासिल चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाच्या फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. २०११ साली भारत सरकारने त्यांना मानाचा पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या अभिनय कलेचा गौरव केला. आपल्या सशक्त अभिनयाने चित्रपटसृष्टीवर अनोखा ठसा उमटवणाऱ्या या अभिनेत्याच्या अकाली एक्झिटमुळे चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे. इरफान खान यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 

-श्याम बसप्पा ठाणेदार 
दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...