आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १६ मे, २०२३

पडलेगावातील लग्नकार्यामध्ये नवनाथ ठाकुर लिखीत "धवलारीन...एक आगरी पुरोहित! "या पुस्तकाच्या १०० प्रतींचे वाटप


ठाणे :
शनिवार दि.१३ मे  रोजी पडलेगांव मधील श्री व सौ सुगंधा पंढरीनाथ ठाकुर यांचे सुपुत्र चि.निखिलच्या लग्नकार्यातील तांदूळ दळण्याच्या विधीमध्ये  नवनाथ एकनाथ ठाकुर लिखीत "धवलारीन...एक आगरी पुरोहित! " या पुस्तकाच्या १०० प्रती वाटण्यात आल्या.   

      आगरी समाजातील विवाह सोहळ्याला शोभा येते ती धवलगीत गाणाऱ्या धवलारीन आईमुळे! अशा धवलारीन आईचे लग्नकार्यात किती महत्त्व आहे.याबद्दल 'धवलारीन...एक आगरी पुरोहित!' या पुस्तकात लेखक श्री.नवनाथ ठाकुर यांनी अल्पसा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.

   आपण लाखो रूपये लग्नात खर्च करतो. धवलारीन आईला बोलावून धवलगीतेही गायली जातात.धवलगीते ही तर लग्नातील शोभा आहे. परंतु विविध विधींसाठी धवलारीन जी धवलगीते गाते त्याचा अर्थ किती जणांना माहिती आहे? आपल्या लग्न कार्यातील धवलगीते किती अर्थपूर्ण असतात.याबद्दलची शास्त्रशुद्ध माहिती 'धवलारीन...एक आगरी पुरोहित!' या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल. कमीत कमी आगरी समाजातील लग्न कार्यातील धवलारीन व धवलगीते याबद्दल माहिती व्हावी यासाठी पडलेगांव मधील प्रतिष्ठित गृहस्थ श्री व सौ सुगंधा पंढरीनाथ ठाकुर यांनी त्यांचे सुपुत्र चि.निखिल याच्या तांदूळ दळण्याच्या विधीमध्ये श्री.प्रल्हाद ठाकुर यांनी लग्नकार्यातील धवलारीनचे महत्त्व समजावून उपस्थित सर्वांना लेखक श्री.नवनाथ एकनाथ ठाकुर लिखीत 'धवलारीन...एक आगरी पुरोहित!' या पुस्तकांचे वाटप केले.पुस्तक घेण्यासाठी उपस्थित सर्वांचे हात पुढे सरसावले. आगरी समाजातील ही घटना गौरवपूर्ण आहे. सध्या लग्न कार्यांमध्ये बहुतांस संस्कृतीवर धूळ चढत आहे.अशा वातावरणात श्री व सौ सुगंधा पंढरीनाथ ठाकुर यांनी आपल्या मुलाच्या लग्नात आपली आगरी समाजातील लग्न संस्कृतीची जपवणूक व्हावी म्हणून 'धवलारीन...एक आगरी पुरोहित!' या पुस्तकांचे वाटप करून आगरी समाजाला एक संदेश दिलेला आहे. सदर कार्यक्रमात लेखक श्री.नवनाथ ठाकुर हे स्वतः उपस्थित होते. श्री.नवनाथ ठाकुर यांनी चि.निखिल व त्याच्या आई-वडिलांचे आभार मानले व लेखक श्री.नवनाथ ठाकुर म्हणाले कि,"धवलारीन...एक आगरी पुरोहित! या पुस्तकांचे वाटप केले ही कृती म्हणजे मी 'पुस्तकांचा नव्हे तर माझ्या धवलारीन आईचाच' हा गौरव समजतो. पुस्तक वाटप केल्यामुळे परिसरामध्ये श्री व सौ सुगंधा पंढरीनाथ ठाकुर या दांपत्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: