आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

सिंधुदुर्ग कुडाळ येथे श्री स्वामी बाळूमामा पादुका दर्शन सोहळा संपन्न !

कोकण: सिंधुदुर्ग कुडाळ पुण्यभूमी नगरी मध्ये आदमापूर  निवासी प पू श्री  संत  बाळूमामाच्या पादुकां   क्षेत्र   आदमापूर येथून आणून कुडाळ येथे ग्यानू प्रसाद कॉम्प्लेक्स कुडाळ बाजार पेठेत बाळूमामा भक्ता साठी दर्शनासाठी ठेवण्यात आल्या.

  भक्तांच्या हाकेला तत्पर धावत येणारा, भंडारा प्रसादाचे गोरगोरीब दीन दुबळ्यां जीवांना व्यधीमुक्त करून सन्मानाला लावणारा,शिवशंभू शंकराचा अवतार असणारा सिध्द योगी संत म्हणजे आदमापूर चा संत बाळूमामा !

    आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात संत बाळूमामा चे असंख्य भक्त आहेत. जे नित्य नियमाने आदमापूर वारीला जातात व पादुकांचे दर्शन घेतात. अश्या भक्तांना श्री बाळूमामा प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या वतीने एकत्रित करून जिल्ह्यात कुडाळ येथे परम भक्तीधाम करण्याचा संकल्प  करण्यात आला.

   कुडाळ पावशी येथे, सात एकर जागेत श्री बाळूमामा यांच्या अलौकिक भक्ती कार्याची ओळख करुन देणारे "श्री संत बाळूमामा अध्यातमिक केंद्र" उभारण्याचे काम हाती घेतले आहे.नुकतेच बाळूमामा यांच्या पादुका कुडाळ येथे भक्तांच्या दर्शना साठी ठेवण्यात आल्या.सर्व नागरसेवकाच्या उपस्थितीत कुडाळ नगरपंचायत  येथे प्रथम व विद्यमान नगराध्यक्ष  ओंकार  तेली यांच्या हस्ते पादुकांचे स्वागत झाले. त्यानिमित्त भजन धनगरी नृत्य, गजानृत्य,  कीर्तन, फुगडी, हरिपाठ, आदीचे आयोजन करण्यात आले होते.

  संस्थेचे अध्यक्ष-नकुल पंडित व सचिव रामदास तेंडोलकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलें होते. संजय पडते, राजेश महाडेश्वर, राजन बोभाटे, निलेश वरक व चंद्रकांत  वाटवे यांचे विशेष सहकार्य होते.


अधिवेशनापूर्वी कोरोना टेस्टिंग

 


मुंबई : उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे अधिवेशनामध्ये कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून पोलीस,मंत्रालयीन कर्मचारी , पत्रकार, यांचे कोरोना टेस्टिंग आजपासून सुरू करण्यात आली आहे.


आक्षी येथील शिलालेखाचे जतन करण्याबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पुरातत्त्व विभागास दिल्या सूचना

अलिबाग (जिमाका): जिल्ह्यातील अलिबागनजीकच्या आक्षी येथील शिलालेख हा मराठीतील आद्य शिलालेख म्हणून ओळखला जातो. सुमारे १ हजार ९ वर्षांपूर्वीच्या या शिलालेखाचे जतन करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील तसेच संचालक, पुरातत्व व संग्रहालय संचालनालय यांना आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्याबद्दल लेखी सूचना दिल्या.

      पुरातत्व संचालनालयातर्फे या शिलालेखाचे जतन करण्याच्या दृष्टीने पुढील उचित कार्यवाही होईपर्यंत हा शिलालेख आक्षी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात यावा, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांना सूचित केले.

       या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी स्वतः शिलालेख परिसरास भेट देत तात्काळ पुढील कार्यवाही सुरू करण्याच्या दृष्टीने पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतही संपर्क साधला. तसेच या शिलालेखास पुष्पहार अर्पण केला.

     आजच्या मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्ताने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनीही आक्षी येथील हा प्राचीन मराठी शिलालेख व या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यास आपण कटिबद्ध असून यादृष्टीने येथील मराठी प्राचीन शिलालेख व येथील परिसराचा विकास केल्यानंतर तसेच येथील जिल्हा परिषद शाळेत मराठी प्राचीन ग्रंथसंपदेचे दालन उभे केल्यास येथे येणारे पर्यटक देखील या स्थळास भेट देऊन स्वतःच्या ज्ञानात अधिक भर टाकू शकतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

आक्षी शिलालेखाचे होणार जतन व येथील परिसराचे होणार सौंदर्यीकरण : पर्यटकांसाठी उभारणार मराठी प्राचीन ग्रंथसंपदेचे विशेष दालन ; मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केली घोषणा

अलिबाग (जिमाका): जिल्ह्यातील आक्षी येथील शिलालेख हा मराठीतील आद्य शिलालेख म्हणून ओळखला जातो. सुमारे १ हजार ९ वर्षांपूर्वीच्या या ऐतिहासिक शिलालेखाचे शनिवारी (ता.२७) मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शिलालेखाचे जतन करण्याची, येथील परिसराच्या सौंदर्यीकरण करण्याची तसेच येथील जिल्हा परिषद शाळेत मराठी प्राचीन ग्रंथसंपदेचे एक दालन उभारण्याची घोषणा केली आहे. 

      या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी आज स्वतः शिलालेखाची पहाणी करीत तात्काळ पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला. मराठीतील हा अनमोल ठेवा जतन करण्याची कार्यवाही लवकरात लवकर सुरू करण्याविषयी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी तसे निर्देश दिले आहेत. रायगड जिल्हा तसेच अलिबाग हेदेखील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. आक्षी येथील समुद्र किनाऱ्यास पर्यटकांची मोठी पसंती असते. यादृष्टीने येथील मराठी प्राचीन शिलालेख व येथील परिसराचा विकास केल्यानंतर तसेच येथील जिल्हा परिषद शाळेत मराठी प्राचीन ग्रंथसंपदेचे दालन उभे केल्यास येथे येणारे पर्यटक देखील या स्थळास भेट देऊन स्वतःच्या ज्ञानात अधिक भर टाकू शकतील, असा विश्वास पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

     आजच्या मराठी भाषा संवर्धन दिनाच्या निमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते या शिलालेखास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, माजी जिल्हा परिषद सदस्य व्दारकानाथ नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी केदार चौलकर, अलिबाग पंचायत समिती विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर सालावकर, देवव्रत पाटील, आक्षी ग्रामपंचायत सरपंच नंदकुमार वाळंज, उपसरपंच आनंद बुरांडे, ग्रामसेवक श्रीहरी खरात, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक उपस्थित होते.

        कर्नाटक राज्यातील श्रवण बेळगोळ येथील बाहुबली गोमटेश्वरांच्या मूर्तीखाली लिहिलेला हा शिलालेख १ हजार ९ वर्ष जुना असून हा मराठीतील पहिला शिलालेख मानला जातो. हा शिलालेख इस १११६-१७च्या दरम्यान कोरला गेला असल्याचे दाखले मिळतात. गंग राजघराण्यातील चामुण्डाराय या मंत्र्याने या गोमटेश्वराची मूर्ती तत्कालीन राणीच्या आग्रहास्तव बनवून घेतली. या मूर्तीखाली एक शिलालेख कोरण्यात आला. त्यात कन्नड, तामिळ आणि मराठी भाषा कोरली गेली. "श्री चामुण्डाराये करवियले, गंगाराये सुत्ताले करवियले" अशा पंक्ती या शिलालेखावर आढळतात. मात्र, रायगड जिल्ह्यातील आक्षी येथे याहूनही जुना एक शिलालेख आढळून आला आहे. ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ.श.गो.तुळपुळे यांच्या संशोधनानुसार हा मराठीतील पहिला शिलालेख असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिलालेखाची निर्मिती शके ९३४ म्हणजे इ.स.१०१२ झाल्याचा स्पष्ट उल्लेख या शिलालेखावर आहे.

     आक्षी येथे खोदकाम करताना सापडलेल्या या शिलालेखावर देवनागरी लिपीत नऊ ओळी कोरण्यात आल्या आहेत. या लिपीवर संस्कृत भाषेचा प्रभाव आहे. पश्चिम समुद्रपती श्री कोकण चक्रवर्ती केसीदेवराययांच्या महाप्रधान भरजु सेणुई याने हा शिलालेख कोरून घेतला असून, महालक्ष्मीदेवीच्या बोडणासाठी दर शुक्रवारी नऊ कुवली धान्य देण्याचा उल्लेख इथे करण्यात आला आहे. शके ९३४ मधील प्रभव संवत्सर अधिक कृष्णपक्षातील शुक्रवारी हा निर्णय घेतल्याचा उल्लेख यावर आहे. तसेच शिलालेखाचे विद्रूपीकरण करणाऱ्याला शापही देण्यात आल्याचा उल्लेख यावर आढळून आला आहे.

     ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ.श.गो. तुळपुळे यांच्या संशोधनानुसार आक्षी येथील पुरातन शिलालेख मराठीमधील आद्य शिलालेख असल्याचे स्पष्ट होते. 

       पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या या शिलालेखाचे जतन होणे गरजेचे असून याबाबत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून चर्चा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाहीस लवकरच सुरुवात होईल. या शिलालेखावरील मजकूरामुळे मराठी भाषा एक हजार वर्षांहून अधिक काळ ‌बोलली जात असल्याचे सिद्ध झाले आहे.

      आजच्या मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्ताने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी समस्त रायगडकरांना शुभेच्छा दिल्या असून आक्षी येथील हा प्राचीन मराठी शिलालेख व या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यास आपण कटिबद्ध असून पर्यटक मोठ्या संख्येने या स्थळास निश्चित भेट देतील, असा विश्वास पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

नियमित रुग्ण नोंदणीसाठी व क्षयरोग निर्मूलनासाठी जनतेने शासनास सहकार्य करावे

अलिबाग (जिमाका) : खासगी क्षेत्राकडून वैद्यकीय सेवा घेणाऱ्या क्षयरुग्णांची आरोग्य विभागात नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे निर्देश राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाद्वारे देण्यात आले आहेत. प्रत्येक क्षयरुग्णाची नोंद होऊन त्याच्यावर उपचार करणे, क्षयरोगाचा प्रसार रोखणे, नियमित उपचाराला प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी उपायोजना करण्याच्या उद्देशाने खाजगी डॉक्टरकडे उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांनी आरोग्य विभागात नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

      दोन आठवडे व त्यापेक्षा जास्त काळ खोकला व ताप, सतत खोकला व रक्तमिश्रीत बेडका, सायंकाळी येणारा ताप, भूक मंदावणे, शरीराचे वजन कमी होणे, यापैकी कोणतेही एक लक्षण असल्यास अशी व्यक्ती संशयित क्षयरुग्ण समजली जाते.

क्षयरोग निदान व उपचार करणाऱ्या राज्यातील सर्व पॅथॉलॉजी, मायक्रोबॉयलॉजी, प्रयोगशाळा रिव्हर्स रेडिओलॉजी, विविध पॅथॉलॉजी रुग्णालये, डॉक्टर्स तसेच क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व औषध विक्रेते यांनी आरोग्य विभागाकडे त्यांच्याकडे येणाऱ्या क्षयरुणांची नोंदणी करावी किंवा रुग्णाला नोंदणी करण्यास सांगावे. जे रुग्ण नोंदणी करणार नाहीत, अशा सर्वांना क्षयरोग प्रसारासाठी जबाबदार धरण्यात येऊन भारतीय दंड संहितेच्या कलम 269,270 नुसार कारवाईसाठी पात्र समजले जाईल. दोषींना किमान 6 महिने ते 2 वर्षांपर्यत शिक्षा व दंडाची तरतूद आहे.  त्यामुळे दि.01 जानेवारी 2021 पासून सर्व रुग्णांची नोंदणी राज्य, जिल्हा, मनपा क्षयरोग कार्यालयाकडे करण्याची नोटीस देण्यात आली असून क्षयरुग्णांची माहिती दरमहा जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्याकडे पाठविण्यात यावी, तसेच नियमित रुग्ण नोंदणीसाठी व क्षयरोग निर्मूलनासाठी शासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग कार्यालयाकडून करण्यात आले आहे. 


फिरते लोक अदालत व कायदे विषयक शिबिराचे आयोजन- उद्घाटन

अलिबाग (जिमाका):- मा. उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांच्या निर्देशानुसार सोमवार, दि. 01 मार्च ते दि.26 मार्च 2021 या कालावधीत जिल्ह्यात फिरते लोक अदालत व कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या फिरते लोकअदालतीचा उद्घाटन समारंभ सोमवार, दि.01 मार्च 2021 रोजी सकाळी 10.30 वा. रायगड जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात रायगड-अलिबाग प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती विभा प्र.इंगळे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, सर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा सरकारी वकील भूषण साळवी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव संदिप वि.स्वामी यांनी कळविले आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा नियोजनच्या नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत प्रगती गारमेंट युनिट चे उद्घाटन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाले संपन्न



अलिबाग (जिमाका):- महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा रायगड अंतर्गत जिल्हा नियोजन समिती, नियोजन विभाग यांच्या साहाय्याने नाविन्यपूर्ण  योजनेंतर्गत कर्जत येथील प्रगती गारमेंट युनिटचे उद्घाटन राज्यमंत्री उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क ,विधी व न्याय तथा पालकमंत्री तसेच  महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा (राज्यमंत्री दर्जा) श्रीमती ज्योतीताई ठाकरे  यांच्या हस्ते  संपन्न झाले.

    यावेळी कर्जत- खालापूर चे आमदार श्री.महेंद्र शेठ थोरवे, कर्जतच्या नगराध्यक्षा श्रीमती सुवर्णाताई जोशी, कोकण विभागाचे उपजीविका विकास अधिकारी हेमंत पाटील, रायगड महिला आर्थिक विकास महामंडळच्या जिल्हा समन्वयक वर्षा पाटील आणि सीएमआरसी स्टाफ, जिल्हा स्टाफ, कार्यकारिणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

      या मान्यवरांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच या युनिटसाठी शासकीय जागा देण्याचे आश्वासनही दिले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक वर्षा पाटील यांनी केले तर सीएमआरसी मॅनेजर पद्मावती गायकवाड यांनी  उपस्थितांचे आभार मानले.

कुंचिकोरवे समाजाचा राष्ट्रीय ध्वज अनावरण व लोकार्पण सोहळा संपन्न...!

मुंबई : अखिल भारतीय कुंचिकोरवे समाज विकास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष परशुराम जाधव यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या कुंचिकोरवे समाजाचे राष्ट्रीय ध्वजारोहण व लोकार्पण तसेच विषेश माहितीपट, ॲाडिओ म्युझिकचे प्रकाशन राष्ट्रीय अध्यक्ष परशुराम जाधव नगरसेवक दिनेश कुबाल, विक्रम(भैया) जाधव(फलटण),कप्तान मलिक, सगुण नाईक, राजू भूतकर उपविभागप्रमुख बळीराम घाग, शाखाप्रमुख संदेश खडपे, गणेश(गजा)सावंत ,भगवा रक्षक गंगा देरबेर उपस्थिती डायरेक्टर व्यंकटेश कुंचिकोरवे, सोमा(डेविड)जाधव, राष्ट्रीय पदाधिकारी दुर्गेश सांगे,सोमा पवार, बाबू गं जाधव, भिमा ल पवार, रामचंद्र पवार, विजय पवार, बाबू ब. जाधव, सुरेश पवार, प्रकाश पवार, अनिल शं जाधव, राजाराम जाधव, शिवाजी जाधव, रवि जाधव, यल्लाप्पा उ. पवार, भिमराव पवार, सुरेश दु जाधव नागेश पवार, सटवा पवार, प्रविण गं जाधव, भिमा पवार विभागीय अध्यक्ष रमेश पवार(कुंचिकोरवे नगर), महेश जाधव(कालिना),दिपक कुंचिकोर (अंधेरी), राकेश सोनकुसरे(कुर्ला), राकेश पवार(विक्रोळी) महाराष्ट्रातील विभाग व मान्यवर हस्ते करण्यात आले.


राष्ट्रीय विज्ञान दिन

   संपूर्ण देशात आजचा दिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी नोबेल पारितोषिक विजेते भारतीय शास्त्रज्ञ  सर  सी व्ही रामन यांनी रामन इफेक्ट हा वैशिष्टयपूर्ण शोधनिबंध जगासमोर सादर केला होता. त्या दिवसाचे औचित्य साधून हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस उत्साहाने साजरा करतात. 

  भारतासाठी पहिले नोबेल पारितोषिक मिळवून देणारे जेष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न  सर सी व्ही रामन यांनी २८  फेब्रुवारी १९२८ या दिवशी भौतिक शास्त्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकाशाच्या विकीरणासंबंधी संशोधन करून त्याविषयीचा वैशिष्ट्यपूर्ण शोधनिबंध जागतिक पातळीवर सादर केला. त्यांच्या  या शोध निबंधाला १९३० साली मान्यता मिळाली आणि त्याच वर्षी या संशोधनासाठी त्यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला. सी व्ही रामन हे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले आशियाई शास्त्रज्ञ आहेत.  त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून म्हणजेच १९८७ पासून २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान म्हणून साजरा म्हणून साजरा केला जातो.  रामन यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ रोजी मद्रास येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर व्यंकट रामन असे होते. शालेय वयात रामन हे अत्यंत तल्लख बुद्धीचे होते. रामन यांनी ११ व्या वर्षीच शालेय शिक्षण पूर्ण केले. १५ व्या वर्षी ते इंग्रजी आणि विज्ञानामध्ये पदवीधर झाले तर १७ व्या वर्षी भौतिक शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण मद्रासमध्ये उच्च श्रेणीमध्ये पूर्ण केले. त्यांनतर ते कोलकाता येथे  डेप्युटी अकाउंटट जनरल पदावर रुजू झाले झाले पण या नोकरीत त्यांचे मन रमेना म्हणून  त्यांनी कोलकाता येथे कमी पगारात भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. प्राध्यापक म्हणून अध्यापन करीत असतानाही त्यांनी आपले संशोधन सुरूच ठेवले. १९२१ मध्ये कोलकाता विद्यापीठाने त्यांना उच्च शिक्षणासाठी ब्रिटनला पाठवले. तिथे त्यांनी लंडनच्या रॉयल सोसायटीमध्ये भारतीय तंतुवाद्ये हा शोधनिबंध सादर केला. पुढे १९३५ मध्ये भारतीय तंतुवाद्ये विशेष करून तबल्याचा  नादनिर्मिती, तबल्याची पुडी, शाई, तरंगलांबी इत्यादींवर संशोधन केले. युरोपातून समुद्रमार्गे भारतात येत असताना आकाशातील निळा रंग पाहून त्यांना या रंगाविषयी कुतूहल जागृत झाले. आकाश निळ्या रंगाचेच का दिसते असा प्रश्न त्यांना पडला. त्यांचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी पाणी, बर्फ यामधून प्रकाशाचे विकिरण यावर संशोधन सुरू केले. या संशोधनातून त्यांना आकाशाच्या निळ्या रंगाचे उत्तर मिळाले. रामन इफेक्ट म्हणजे प्रकाशाचे विकिरणच.  प्रकाशाचे विकिकरण हा एक दृश्य परिणाम आहे. अशा प्रकारचे किरण सरळ जेंव्हा आपल्या डोळ्यांत शिरतात, तेंव्हाच आपल्याला प्रकाशाच्या अस्तित्वाची जाणीव होते. रामन हे सुरवातीला स्फटिकांच्या अणू रचनेसंबंधी  आढळणाऱ्या रचना साधर्म्याशी अपवादात्मक असा अभ्यास करत होते. या दरम्यान १९२८ साली त्यांना असे आढळून आले की  विकिरीत प्रकाशामध्ये मूळ प्रकाशाइतक्या, तरंग लांबीच्या किरणांबरोबर इतरही प्रकाश किरणांचे अस्तित्व असते, ज्यांचा मागमूसही मूळ प्रकाश किरणांमध्ये नव्हता. या नवीन किरणांचा जास्त अचूक अभ्यास करण्यासाठी त्यांनी पाऱ्याच्या विद्युतदीपाघटापासून मिळणारी तरंग लांबी अभ्यासली आणि त्यातून त्यांच्या नवीन निष्कर्षाला, संशोधनाला बळकटी मिळाली. प्रकाशामध्ये कण स्वरूपाशी साधर्म्य सांगणारे काही गुणधर्म असतात, त्यांच्या प्रकाश कनिकांमधील ऊर्जा ही त्या प्रकाशाच्या कंपन संख्येच्या  समप्रमाणात असते. त्यांचा हाच शोधनिबंध रामन इफेक्ट म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यांच्या या अत्यंत मौलिक आणि आणि अनमोल अशा संशोधनामुळे पुढे अनेक शोध लागले. भौतिक शास्त्रात सध्या जे शोध लागत आहेत त्याचे मूळ याच रामन इफेक्ट मध्ये सामावलेले असते. रामन इफेक्टमुळे माहितीचे भांडार खुले झाले. त्यामुळेच देशातील देशातील १७ विद्यापीठांनी तसेच जगातील ८ विद्यापीठांनी त्यांना सन्मानीय डॉक्टरेट फेलोशिप बहाल केली. १९४३ मध्ये रामन यांनी बंगलोर येथे रामन संशोधन संस्थेची स्थापना केली. या संशोधन संस्थेत भौतिक शास्त्रातील संशोधनाला अग्रक्रम देण्यात आला. १९५४ साली भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. १९५७ साली आंतरराष्ट्रीय लेनिन पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली. आपण लावलेल्या शोधाचा उपयोग रचनात्मक कार्यासाठी व्हायला हवा विध्वंसक कार्यासाठी त्याचा उपयोग होऊ नये असे त्यांचे मत होते. १२ नोव्हेंबर १९७० रोजी त्यांचे निधन झाले.

-श्याम बसप्पा ठाणेदार,दौंड जिल्हा पुणे 


विज्ञान शिक्षण - काळाची गरज

 जागतिक विज्ञान दिन निमित्त लेख... 

महाराष्ट्रातील  बीड जिल्ह्यात    शुभम सपकाळचा करणी केल्याच्या संशयावरून खून असो वा  आंध्रप्रदेश चितूर येथील  उच्चविद्याविभूषित  आई वडिलांकडून स्वतःच्या दोन मुलींना   ठार  मारल्याची  घटना असो अशा रोज घडणाऱ्या विविध घटना  जेव्हा आपण वाचतो,  वा पाहतो तेव्हा मनाला  अतिशय वेदना होतात.खरचं आपण 21व्या शतकात आहोत का हा प्रश्न पडतो. माणूस इतका निर्दयी  कसा होतो? त्याला पुढील परिणामाची भीती कशी वाटतं नाही? तथ्यहीन गोष्टीवर कसा विश्वास ठेवतो? साधी पायाखाली आलेली मुंगी  ही आपण मुद्दामहून मारत नाही. येथे तर जिताजागता जीव मारायला  काहीच कसं वाटतं नाही?

    अशावेळी  आपली प्रगती,सारा झगमगाट, तंत्रज्ञान असून काय उपयोग असं  वाटतं. आपण एक लहानगा जीव वाचवू शकत नाही तर काय उपयोग या सगळ्याचा नरबळी, करनी,भोंदूगिरी,पुनर्जन्म ,नवस,भूतबाधा, पैशाचा पाऊस, भानामती असे एक ना अनेक  प्रकार आज ही राजरोसपणे सुरु आहेत. अशावेळी  एक जागरूक नागरिक म्हणून आपल्या सर्वांना  विज्ञानजागृतीच फार  मोठं कार्य करावे लागणार आहे. विज्ञान हे काळाची फार मोठी गरज बनले आहे.वैज्ञानिक दृष्टीकोन समाजात निर्माण व्हावा यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे,डॉ नरेंद्र दाभोळकर  म्हणतात आपण विज्ञानाची  सृष्टी घेतली पण  दृष्टी घेतली नाही.आपण विज्ञान तंत्रज्ञानाने उपलब्ध केलेल्या सर्व सुखसोई घेतल्या त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला  पण आपली मानसिकता,विचार करण्याची पद्धत बदलली  नाही.आधुनिक तंत्र अविष्कार म्हणून आपण घरी संगणक आणतो,विविध  उपकरणे आणतो  आणि कुणाची दृष्ट  लागू नये म्हणून दाराला  लिबू मिरची टांगतो  म्हणजेच आपले हे वागणे दुट्टपीपणाचे  आहे.भारतीय घटनेच्या भाग 4 अ मध्ये कलम 51 अ नुसार नागरिकांची 10 मूलभूत कर्तव्य दिली आहेत

त्यातील प्रत्येक भारतीय नागरिकाने  वैज्ञानिक दृष्टीकोन  जोपासणे  हे एक महत्वाचे मूलभूत कर्तव्य आहे. आपल्या येणाऱ्या पिढीला या बाबत आपण सजग केले पाहिजे.लहानपणापासून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन कसा जोपासता  येईल हा प्रयत्न केला पाहिजे. विज्ञान तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन हा फक्त पाठयपुस्तकाचा भाग न राहता तो आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. आपल्या प्रगतीचा राजमार्ग हा विज्ञानच आहे कारण विज्ञान हे प्रगतीशील आहे  नम्र आहे. त्याला  व्यक्ती, स्थळ,काळ  याचे बंधन नाही त्यामुळे आपणास प्रगतीच्या दिशेने जायचे असल्यास विज्ञानाचा  मार्ग हा उपयुक्त व लाभदायक  आहे.कोणत्याही अतार्किक , बुद्धीला न पटणाऱ्या सांगिवांगीच्या गोष्टीवर किती विश्वास ठेवायचा याचा विचार आपणास केला पाहिजे.ज्याचा पुरावा आहे ज्याचा  अनुभव सर्वांना घेता येतो अशाचा बाबीवर आपल्या

  बुद्धीला पटत असेल तरच विश्वास ठेवला पाहिजे.विनाकारण बुवाबाबाच्या नादी  लागून कर्मवादी बनण्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीवर मेहनतीवर ज्ञानवादी, विज्ञानवादी  बनूया.

श्रद्धां आणि अंधश्रद्धा यात एक पुसटसी   रेष असते  त्यामुळे कधी श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेत होईल हे कळत नाही त्यामुळे नेहमी सजग राहून सारासार विचार करून निर्णय घेतले पाहिजेत. समाजात , शालेय विद्यार्थी,महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यात  वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती,नेहरू विज्ञान केंद्र मुंबई, मराठी विज्ञान परिषद मुंबई, विज्ञान आश्रम पाबळ,अगस्त्य फौंडेशन मुंबई , कल्पना चावला विज्ञान केंद्र कराड या शासकीय वा बिगरशासकीय संस्था जोमाने कार्य करीत आहेत.चला तर आपण स्वतःता पासून सुरुवात करून विज्ञानाला आपला मित्र, मार्गदर्शक, बनवूया.

-प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे,नवी मुंबई

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

मराठी भाषा दिना निमित्त मनसेतर्फे स्वाक्षरी अभियान

उरण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाशी विभाग तर्फे  27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिनानिमित्त " मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी " कार्यक्रम वाशी सेक्टर 9 वाशी बस स्थानक येथे आयोजित करण्यात आला होता. मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी मराठीमध्ये स्वाक्षरी करून कार्यक्रमाची सुरवात केली. सदर कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई शहर सहसचिव अमोल इंगोले - देशमुख आणि वाशी विभाग अध्यक्ष अशोक भोसले यांनी केले होते. सदर प्रसंगी नवी मुंबई  शहर सचिव विलास घोणे, महिला सचिव यशोदा खेडस्कर, सहसचिव अरुणा राठोड, उपविभाग अध्यक्ष राजीव गावडे, शाखा अध्यक्ष अमोल बनसोडे, गणेश तेवर, उपशाखा अध्यक्ष रोहित किटो, दिपकचंद डिग्गीकर, तुर्भे शाखा अध्यक्ष कृष्णा कांबळे, महादेव सोळंखे, प्रदीप अडसूळ, महिला शाखा अध्यक्ष संगीता वंजारी ताई,  महाराष्ट्र सैनिक संजय शिर्के, तसेच रोजगार स्वयंरोजगार चे शहर संघटक सनप्रीत तुरमेकर, उपशहर संघटक अनिकेत पाटील तसेच महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मनसे आयोजित या उपक्रमाला जनतेचा, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे अशोक भोसले मनसे वाशी विभाग अध्यक्ष यांनी सांगितले.

उंच पठारावर लागवड केलेल्या वृक्षांना पाण्याची सलाईन

उरण (विठ्ठल ममताबादे )- उरण परीसरातील छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करणारी एकमेव संस्था छावा प्रतीष्ठान गेले सात वर्ष  चिरनेर मधील पठारावर वृक्षारोपण करुन त्यांचे संवर्धन करत आहेत.आत्तापर्यंत या पठारावर त्यांनी 200  कडूनिंबाची झाडेही जगवीली आहेत.तर गेले दोन वर्ष  त्यांनी करंज,वड, मोहाची झाड लावली आहेत.हि झाडे जगवीण्यासाठी छावा प्रतीष्ठानचे सदस्य  खूप मेहनत घेत आसून प्रत्येक झाडाला जगवीण्यासाठी पाण्याची सलाईन लावली आहे.

या पठारावर नुसते चढतानाही दम लागते. परंतू छावा प्रतीष्ठानचे सदस्य पठाराच्या पायथ्यापासून 300 मिटर उंचावर 20 लिटरचे पाण्याचे ड्रम घेवून डोंगरावर चढतात.व ते पाणी प्रत्येक झाडाजवळ काठीच्या आधाराने लावलेल्या पाण्याच्या बाॅटल मध्ये टाकतात.सध्या ही  90 झाडे जगवीण्यासाठी हे सदस्य तन मन धन खर्ची घालीत आहेत.लाॅकडाऊनच्या काळातही या सदस्यांनी झाडांचे संवर्धन केल आहे.त्यामूळे बोडका होत चाललेला हा डोंगर बहरु लागला आहे.

या झाडांना जगवीण्यासाठी प्रामूख्याने छावा प्रतीष्ठानचे किरण म्हात्रे सर, उपाध्यक्ष सुशिल म्हात्रे, सदस्य संकेत म्हात्रे,खजीनदार सचिन केणी ,सचिव धिरज केणी,यांनी पुढाकार घेतला आहे.

कशी काम करते पाण्याची सलाईन........


पिण्याच्या पाण्याची रिकामी बाॅटल  पाण्याने भरली जाते त्या बाॅटलच्या बुंध्याला दाभणाने हवा आत जाण्यासाठी होल पाडला जातो किंवा कापतात.नंतर त्या बाटलीचा झाकण अशा प्रकारे सेट केला जातो की बाॅटल उलटी केली की झाकणामधून थेंबथेंब पाणी पडेल.नंतर ती बाॅटल झाडाच्या बुंध्याजवळ उभी केलेल्या काठीला आडकवतात.ह्या बाॅटल मधील पाणी चार तास चालतो.त्यामूळे पाण्याची बचत होते व झाडालाही जास्त काळ पाणी पुरतो.

चिरनेर मध्ये उंचावर आसणारा पठार नावाने प्रसिद्ध आसा वनखात्याच्या मालकीचा डोंगर आहे.या पठाराची उंची एवढी आहे.कि तेथून संपूर्ण उरण दृष्ठीक्षेपात येतो .या डोंगरावर गेले पाच वर्ष छावा प्रतीष्ठानचे मावळे गेले पाच वर्ष सिड बाॅल व रोप लावून वृक्षसंवर्धन करत आहेत.त्याचा परीणाम आज या डोंगरावर दोनशेच्या वर कडूनींबाची झाडे जगली आहेत.यावर्षी छावा प्रतिष्ठानचे महीला,पुरूष,तरूण,तरुणी,लहान मुल,मुली आसे चाळीस मावळे मिळून नव्वद झाडांची लागवड केली.यात  उन्हाळ्यातही दाट व थंड सावली देणार्‍या करंजाची चाळीस झाड.तर जास्त आॅक्सीजन देणारी पन्नास वडाची झाड लावण्यात आली. त्यामूळे येत्या काही वर्षात या पठाराची ओळखच बदलून वड निंब करंजाचे पठार आसे होवून जाईल. या वृक्षारोपणासाठी येवढ्या उंचावर सत्तर वर्षांच्या गंगाबाई भोईर व पाच वर्षांचे आक्षर कडू,ओम भोईर,सानवी कडू, आनन्या म्हात्रे ही सहभागी झाल्यामूळे त्यांचे कौतूक करण्यात आले. तर सारडे विकास मंचचे नागेद्र म्हात्रे,विठ्ठल ममताबादे उपस्थीत होते. छावा प्रतीष्ठानचे उपाध्यक्ष सुशिल म्हात्रे,सचिव धिरज केणी, कार्याध्यक्ष संतोष भोईर, खजिनदार सचिन केणी, सहसचिव रमेश कडू ,आतीश पाटील, शरद चिर्लेकर,ओमकार म्हात्रे, शैलेश चिर्लेकर,आदिं छावा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते  मेहनत घेत आहेत.

मनसेतर्फे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध

उरण (विठ्ठल ममताबादे )- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  आणि शासनाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सल्ल्याने गुरुवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी  मनसेच्या वतीने जेष्ठ नागरिक सभागृह नवीन पनवेल येथे घेण्यात येणारा  नोकरी व व्यवसाय मेळावा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. सदर निरोप सर्व लोकांकडे न पोहचल्या कारणाने सुमारे 150  बेरोजगार तरुण तरुणी सोशल व फिजिकल डिस्टन्स पाळून ह्या ठिकाणी उपस्थित झाले होते.  ह्या  बेरोजगार जनतेला उत्तर देण्याकरिता व त्यांची माहिती घेण्या करिता, मनसे रोजगार विभागाचे अध्यक्ष महेंद्र बैसाणे,  मनसे रोजगार विभागाचे रायगड जिल्हा संघटक रामदासभाई पाटील आणि खालापूर तालुका संघटक संजय तन्ना उपस्थित होते.ह्यावरून असे कळते की जनतेला लोकडाऊन आणि कोरोनाची चिंता नसून स्वतःच्या रोजगाराची व पोटापाण्याची चिंता आहे.आणि ह्या चींतेपासून मुक्त होण्याकरिता ह्या बेरोजगार लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना  नक्कीच प्रयत्न करत आहे.

ह्या ठिकाणी रिलायन्स स्मार्ट ह्या समूहाने 50 तरुण तरुणींचे बायोडाटा निवडले आहे व त्यांना ह्या समूहाकडून त्वरित नोकरी देण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना  रोजगार विभाग रायगड जिल्हाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.बेरोजगारांना नोकरीं मिळाल्याने बेरोजगार युवकांनी मनसेचे आभार मानले.

महाराष्ट्रातच मराठी भाषेची उपेक्षा

   मराठी ही आपली मातृभाषा आहे तसेच ती महाराष्ट्राची राज्यभाषाही आहे. २७ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या शैलीदार लेखणीतून ज्यांनी मराठी भाषेला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले ते जेष्ठ साहित्यिक ज्ञानपीठ विजेते वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांचा  २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस. कुसुमाग्रजांना १९८७ साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. हा मराठी भाषेला मिळालेला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार होता. त्यामुळे त्यांचा जन्मदिवसच मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यास महाराष्ट्र शासनाने सुरवात केली. भारतातील २२ प्रमुख भाषांपैकी मराठी ही एक प्रमुख भाषा आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्याची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही पंधरावी तर देशातील तिसरी भाषा आहे. २००१ च्या लोकसंख्येनुसार मराठी बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या दहा कोटींच्या पुढे आहे. मराठी भाषा ९ व्या शतकापासून प्रचलित आहे. मराठी भाषेची निर्मिती संस्कृतपासून झालेल्या  महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. मराठी भाषेला गौरवपूर्ण इतिहास आहे. देशातीलच नव्हे तर जगातील प्रमुख भाषा म्हणून मराठीकडे पाहिले जाते. ज्ञानेश्वरांपासून कुसुमाग्रजांपर्यंत अनेकांनी मराठी भाषेला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. 

माझी मराठीची बोलू कौतुके
परी अमृतातही पैजा  जिंके
 ऐसी अक्षरे रसिके....मेळवीन 

अशा शब्दात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी मराठीचा गौरव केला आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...अशा शब्दात कविश्रेष्ठ सुरेश भटांनी मराठीचा गौरव केला आहे. एक हजार वर्ष जुनी, पाच हजार बोली भाषेपासून तयार झालेली, अमृतातही पैज जिंकणारी या माय मराठी भाषेच्या जपणुकीसाठी आपण काय करतो याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. आज हिंदी आणि इंग्रजी भाषांनी  मराठी भाषेवर आक्रमण केले आहे. इंग्रजी व हिंदी भाषेच्या आक्रमणाने महाराष्ट्रातूनच  मराठी भाषा हद्दपार होती की काय अशी शंका येऊ लागली  आहे. अर्थात याला सर्वस्वी मराठी माणसेच जबाबदार आहे. मराठी माणसांच्या मनातच मराठीला गौण स्थान आहे आणि इंग्रजी भाषेला प्रथम स्थान आहे. इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. इंग्रजीला ज्ञानभाषा म्हटले जाते म्हणून मराठीची उपेक्षा केली जात आहे. विशेषतः उच्चभ्रू मराठी कुटुंबात मराठीत बोलणे अप्रतिष्ठित समजले जाते तर इंग्रजी भाषेत बोलणे प्रतिष्ठेचे समजले जाते. मराठी ही मातृभाषा असूनही इंग्रजीतून  बोलण्याचा अट्टहास धरला जातो. मराठी माणसे एकमेकांशी बोलताना मराठीत बोलायला कचरतात. मराठीपेक्षा इंग्रजी आणि हिंदीतून बोलणे प्रतिष्ठेचे समजतात. मराठी माणसेच आपल्या पाल्यांना मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल करण्याऐवजी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत भरमसाठ फी भरुन दाखल करीत आहे. इंग्रजी भाषेचे अवास्तव स्तोम माजवल्याने मराठीमाध्यमांच्या शाळा बंद पडू लागल्या आहेत. मराठी साहित्य संमेलनाकडे मराठी माणसेच पाठ फिरवू लागल्याने मराठी पुस्तकांच्या विक्रीत घट होऊ लागली आहे. ग्रंथालयातील मराठी पुस्तके वर्षानुवर्षे जागेवरूनही हलतही  नाही. महाराष्ट्रातच मराठी भाषेची उपेक्षा होऊ लागली आहे. मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे काम मराठी, साहित्यिक व सरकारचे आहे असेच मराठी माणसाला वाटते. मराठी साहित्यिकांना, लेखकांना मराठी भाषेविषयी जन्मजात प्रेम आहेच. अभिमान आहे. मराठी भाषा गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि आकर्षक   होईल यासाठी ते आपल्या परीने प्रयत्न करीतही आहे. महाराष्ट्र सरकारही मराठी भाषा जिवंत रहावी यासाठी प्रयत्न करीत आहे. पण महाराष्ट्र सरकारचे हे प्रयत्न तोकडे आहेत असेच म्हणावे लागेल. मराठी भाषेवर इंग्रजी भाषेचे अतिक्रमण वाढत असताना ते रोखण्यासाठी सरकार  ठोस प्रयत्न करीत असल्याचे दिसत नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मागणी तसा पुरवठा या तत्वाने सरकार भराभर परवानगी देत आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सढळ हाताने परवानगी देणारे सरकार नवीन मराठी शाळांना परवानगी देत नाही तसेच आहे त्या शाळांना अनुदान देताना हात आखडता घेते. सरकारी कार्यालयात मराठीचा वापर अनिवार्य असताना तिथेही मराठीची गळचेपी होते. अनेक सरकारी कार्यालयात आज देखील मराठीचा वापर नावापुरताच केला जातो. केंद्र सरकारच्या  कार्यलयात तर मराठीचा वापर होतच नाही. सरकारी कार्यालयात मराठीचा वापर व्हावा असा आदेश असताना त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. मराठी भाषा जगवण्यासाठी, वाचवण्यासाठी राज्य सरकारने खंबीर धोरण आखायला हवे. केवळ परिपत्रक काढून उपयोग नाही तर त्याची प्रभावी अंमलबजावणी होते का याचाही शोध सरकारने घ्यावा. राज्य सरकारच्या व्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्यासंबंधीच्या धोरणाची अंमलबजावणी करणे, सरकारच्या दैनंदिन कामकाजात मराठीचा जास्तीतजास्त वापर करणे, मराठी शाळांना जी उतरती कळा लागली आहे त्यासंदर्भात ठोस निर्णय घेऊन मराठी भाषेला उर्जितावस्था मिळवून देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने करावा.  मराठी ही अभिजात भाषा आहे. अभिजात भाषेसाठी लागणारे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते असे असूनही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारने दबाव आणावा. सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरुन मराठीसाठी एकत्र येऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान, राष्ट्रपतींची भेट घ्यावी. साहित्यिक, लेखक यांनीही यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत. मराठी भाषा जगवण्यासाठी, वाचवण्यासाठी सरकारी तसेच सामाजिक पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत. मराठी भाषेला सुगीचे दिवस आणण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. सर्वसामान्य मराठी माणसांपासून सरकारपर्यंत सर्वांनीच मराठीच्या उत्कर्षासाठी आत्मचिंतन करायला हवे.

-श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे 

पत्रकार उत्कर्ष समितीची सभा संपन्न

पनवेल : पत्रकार उत्कर्ष समितीची सभा आज मोहपाडा येथे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा करत संपन्न झाली . या सभेमध्ये गेल्यावर्षी  कोरोना महापुरामुळे स्थगित झालेला पुरस्कार सोहळा कार्यक्रम 13 जून 2021 रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे घेण्याचे सर्वानुमते ठरले आहे . 

यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष राहुल जाधव  व अमोल सांगळे यांची कार्यक्रमाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली .या कार्यक्रमासाठी सदस्य चंद्रकांत मुंडे कोकण सचिव एकनाथ सांगळे यांनी सुयोग्य आयोजन केले होते.

  या प्रसंगी उपाध्यक्ष राकेश खराडे, कार्याध्यक्ष अविनाश म्हात्रे, सचिव डॉ. वैभव पाटील, खजिनदार शैलेश ठाकुर कोकण अध्यक्ष अलंकार भोईर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राम जाधव , पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कांबळे , सदस्य ज्ञानेश्वर कोळी,  सदस्य वर्गीस रायगड समन्वयक विश्वनाथ गायकवाड यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

भांडुपच्या स्वप्निल देवळेकरची मृत्यूशी झुंज अपयशी

पवई : नवी मुंबई येथे अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या स्वप्नील देवळेकरचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.फोर्टिस्ट रुग्णालयात त्याच्यावर सुरू असलेला महागडा उपचार न परवडल्याने त्याच्यावर मृत्यूला कवटाळल्या शिवाय पर्याय उरला नाही, आणि दुर्दैवी अंताला त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना सामोरे  जावे लागले.

भांडुप मध्ये राहणारा स्वप्निल देवळेकर याचा नवी मुंबई येथे १४ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ३ ते ४ च्या सुमारास नवी मुंबई येथील महापे येथे अपघात झाला होता. त्या अपघातात गंभीर रित्या जखमी झाला होता. 

स्वप्निल हा कामासाठी आपल्या भावासोबत नवी मुंबई येथे गेला असता एका टुरिस्ट गाडीला ब्रेक न लागल्याने त्याला मागून टक्कर देत त्यात मागे बसलेला भाऊ आणि तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्या अपघातात स्वप्निलच्या मेंदू, किडनी आणि आतड्यांना मार लागल्याने त्याचा मुलुंड येथील फेटींस्ट रूग्णालयात उपचार चालू होता.

त्याच्या घरची परिस्थिती अगदी हलाकीची असल्याने जनतेकडे मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यात जनतेने देखील उपचारासाठी मदत देखील केली परंतु २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २-३ च्या दरम्यान अखेर स्वप्निलची मृत्युशी झुंज संपली.

आदर्श वार्ताहर - काव्यांगण

 कुसुमाग्रज म्हणजे काय ?


आज मराठी भाषा गौरव दिनी मला 

एका मित्राचा संदेश आला, 

"एखादी आजच्या दिवसाला 

अप्रोप्रिएट अशी मराठीची 

पोस्ट मला सेंड कर ना ! प्लीज !"


मातृभाषेपासून दूर राहणाऱ्या 

पाप्याच्या पितरा.. (मनात) 

हो पाठवतो ना तुला लगेच 

ठेकाच घेतलाय मी भाषेचा, 

साहित्याचा, सर्जनाचा अन

रसिकतेचाही ! आणि महत्त्वाचे

मित्रप्रेमाचाही !


"पण ही पोस्ट जिला सेंड करशील 

तिला 'कुसुमाग्रज' माहिती कितपत ?"

माझा आपला भाबडा प्रश्न ! 


तो म्हणाला -

"जेमतेमच !" 

"पण तिला माहिती आहे 

नभातील एका ताऱ्याला 

त्यांचे नाव दिलंय !

आणि तिने तिचं हृदय 

मलाच दिलंय !" 


थोडक्यात त्याला हवे 

'लिमिटेड एडिशन'चे "कुसुमाग्रज !"


आता ऐक  -


मध्यमवर्गीय समाजापासून 

अलिप्त राहणाऱ्यांच्या 

वृत्तीवर टीका करणारे -

"कुसुमाग्रज !" 


दुर्बोधतेला नकार देणारे 

आणि सामाजिकतेला स्वीकारणारे  -

"कुसुमाग्रज !" 


लेखकांच्या अतिरेकी विश्लेषणाला 

विकृत आत्मनिष्ठेला

पढीक पांडित्याच्या कैदेत 

अडकण्याला विरोध करणारे -

"कुसुमाग्रज !" 


पारंपरिक अज्ञान, 

जातीभेद आणि दारिद्रयाच्या 

खाईत बेशुद्ध समाजाला 

मानवतेची संजीवनी देणारे -

"कुसुमाग्रज !" 


तिरसट, कडवट आणि 

सहानुभूतिशून्य लेखन हेच 

उत्स्फूर्त आणि प्रामाणिक 

असे काव्य मानणाऱ्यांना -

खरे काव्य म्हणजे काय ?

हे सांगणारे -

"कुसुमाग्रज !" 


साहित्यात अवतीर्ण होणार्‍या

नव्या पुरोहितशाहीवर 

कोरडे ओढणारे -

"कुसुमाग्रज !" 


'बांधिलकी' पेक्षा 'सामिलकी' 

ही दौलत मानणारे -

"कुसुमाग्रज !" 


"हे कळव तुझ्या डार्लिंगला 

आणि कर सेलिब्रेट 

'मराठी लैंग्वेज डे' तुझा 

'As per her wish'

अगदी विशेष असा !


- हेमंत सुधाकर सामंत

मराठीच बोलू कौतुके

   


     अमृताशी पैजा जिंकणारी तसेच ज्ञानेश्वर माऊलीने संपन्न व समृद्ध केलेली अशी ही महाराष्ट्राची बोली अर्थात आपली मायमराठी.  ज्ञानेश्वरांनी त्यांच्या साहित्यातून मराठी भाषेचा यथायोग्य गौरव केला आहे.  प्राचीन भाषा म्हणून मराठी भाषेची ख्याती आहे.  अखिल महाराष्ट्राची राज्यभाषा म्हणून मराठी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.  प्रत्येक भाषेचे स्वतःचे असे एक सौंदर्य  असते. स्वतःची एक वेगळी ओळख असते.  याला मराठी भाषाही अपवाद नाही. संतसाहित्य, ललित साहित्य, कथा, काव्य, नाटक इत्यादी विविधांगी साहित्य प्रकारांची महाराष्ट्रात म्हणजेच मराठी भाषेत मोठ्या प्रमाणात रेलचेल आहे. काळाच्या ओघात तावून सुलाखून निघालेले साहित्य व त्या अवीट साहित्याची निर्मिती करणारे शब्दांचे किमयागार तसेच भाषाप्रभू यांची थोर परंपरा आपल्या मराठी भाषेस लाभली आहे.   महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले तसेच शब्द  मौक्तिकांनी सजलेले हे सर्व प्रकारचे साहित्य मराठी भाषेतील कित्येक पिढ्यांना मौलिक मार्गदर्शन करणारे ठरेल याबद्दल शंका नाही.  या सर्व प्रकारच्या साहित्यात प्रकर्षाने तसेच ठळकपणे मनात भरते ते आपले हजारो वर्षांची परंपरा असणारे संतसाहित्य.  रसाळ मराठीचा परिसस्पर्श झालेले असे हे संत साहित्य मराठी भाषेच्या सागरात विहरणाऱ्या साहित्यिकांना दीपस्तंभासारखे मार्ग दाखविणारे आहे.  चपखल तसेच नेमका अर्थ उलगडून दाखविणाऱ्या अर्थवाही शब्दांनी संतसाहित्य उजळून निघाले आहे.  संतसाहित्यानंतर मराठीतील अनेक विचारवंतांनी मराठी अधिकाधिक समृद्ध केली.  त्यानंतर प्रथितयश लेखक-लेखिकांनी आपल्या कथा, कादंबऱ्या, लेख, कविता, प्रवासवर्णन इत्यादी सारख्या साहित्य प्रकरणी त्यात भरच टाकली.  आपल्या मराठी भाषेत इतके ग्रंथ आहेत की कोणत्याही क्षेत्रातील ज्ञान घेण्यासाठी मराठी भाषेतील ग्रंथ सहज उपलब्ध आहेत.  मराठी भाषेप्रमाणेच इतर भाषांतील वाचनीय तसेच अनुकरणनीय  साहित्य प्रथितयश साहित्यिकांनी मराठी भाषेत अनुवादित करून मराठी भाषा अधिकाधिक संपन्न करण्यास हातभार लावला आहे.   इतर भाषेतील साहित्याचा गर्भितार्थ तसाच ठेवून त्यास मराठी सकस भाषेचा मुलामा चढविला आहे असे म्हणणे जास्त उचित ठरेल असे वाटते.  भाषा शब्दप्रभूंनी इतर भाषेतील अजरामर साहित्यकृती अनुवादित करून आपली दर्जेदार व सकस साहित्य वाचनाची भूक वाढवली व वाढवीत आहेत.  अनुवादित  साहित्याबरोबरच  रूपांतरीत साहित्यानीही आपले असे वेगळे स्थान निर्माण केले आहे.  गर्भितार्थ तसाच ठेऊन अस्खलित मराठी भाषेचा साज त्या मूळ साहित्यकृतीवर चढविला. 

       या सर्व गोष्टींमुळे मराठी भाषेला आपला असा एक आगळा वेगळा चेहरा मोहरा प्राप्त झाला आहे.  प्रथितयश साहित्यिकांबरोबरच काही नवोदित साहित्यिकही आपल्या दर्जेदार साहित्याने एक वेगळा ठसा उमटवित आहेत. पिढीनुसार  विचारप्रवाह बदलत जातात.  काळाबरोबर माणसाची विचार करावयाची पद्धत बदलू शकते.  या नव्या वळणाच्या विचाराने प्रेरीत होऊन काही साहित्यिक नित्य नवीन विचारप्रवाह देऊन आपली विचार करण्याची प्रवृत्ती वाढवित आहेत तसेच जरा वेगळा विचार करण्याची मानसिकता निर्माण करीत आहेत.  प्रथितयश साहित्यिकांचे विचार व नवोदित साहित्यिकांचे विचार आपल्याला वाचावयास मिळाल्यामुळे वाचकांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत होऊन साधक बाधक विचार करण्याची प्रवृत्ती जास्त प्रगल्भ होऊ लागली आहे.  इतर भाषांप्रमाणेच मराठी भाषा आपण कशी बोलतो अथवा मराठीत आपण कसे लिखाण करतो यावर त्या भाषेचे  सौंदर्य  अवलंबून असते. लिहिताना किंवा बोलताना आपण जे शब्द वापरतो तसेच कसे उच्चारतो त्यावरून आपण करत असलेल्या विचारशक्तीचे तसेच आपण वाचलेल्या साहित्याचे आकलन होते. आपल्या बोलण्यातून अथवा लिखाणातून आपले शिक्षण आपले संस्कार अथवा आपला विचार करण्याचा आवाका किंवा वैचारिक क्षमता / श्रीमंती याचे प्रतिबिंब दिसत असते.  कठीण व बोजड तसेच कारण नसतांना अलंकारिक शब्द वापरून आपले विचार मांडले तर ते सर्वाना कळतीलच याची ग्वाही देता येणे शक्य नाही.  साध्या सोप्या शब्दांनी नटलेली भाषाच चांगल्या तऱ्हेने ऐकणाऱ्याला आकलन होऊ शकते अथवा असेही म्हणता येईल की सोप्या शब्दांतच मांडलेले आपल्या मनातील विचार समोरील व्यक्तीला चांगल्या तऱ्हेने आकलन होऊ शकतात.  तसे पाहावयास गेले तर लहान मुलांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याचे काम मातृभाषा करते.  मराठी मातृभाषा असणारी व्यक्ती मराठीत जेव्हढी सहजतेने व्यक्त होऊ शकते तेव्हढी दुसऱ्या भाषेत होऊ शकत नाही. 

    बोली भाषा ही नेहमीच सुलभपणे संवाद साधण्यासाठी असते.  साधे सोपे स्वच्छ व सरळ अर्थ निघणारे शब्द योजून केलेला संवाद हा चांगलाच परिणामकारक होऊ शकतो.  नेमका अर्थ ध्वनीत करणारे शब्द वापरून संवाद साधल्यास तो सुसंवादच होतो व त्या योगे आपल्या विचारांचे अवलोकन करण्यास समोरील व्यक्तीस प्रयास पडत नाही. मराठी भाषा बोलतांना / लिहितांना आजूबाजूच्या परिस्थितीचे भान ठेवावे लागते. मराठी भाषेवर इतर भाषांचा प्रभाव पडू लागला आहे इतर भाषांचे आक्रमण होऊ लागले आहे.  मराठी मातृभाषा असूनही मराठी भाषेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.  हे सांगण्याचे कारण एवढेच की आजूबाजूची परिस्थिती मराठी भाषा धार्जिणी असूनही मराठी जास्त बोलले जात नाही किंवा नाईलाजाने बोलले जाते. असेच एकदा मी मराठी पुस्तकांच्या पुस्तक जत्रेला गेलो होतो व सहाजिकच तेथे फक्त मराठी पुस्तकेच होती त्यामुळे साहजिकच सर्वजण मराठी भाषिकच असणार ही अटकळ मी मनात बांधली.   मी पुस्तके बघत असताना एक तरूण मला "एक्सक्युज मी अंकल"  म्हणाला व तरातरा तो माझ्या पुढे गेला.  हे ऐकल्यावर हताश होऊन मी त्याच्याकडे पाहिले पण तो पर्यंत तो पसार झालेला.  मग मी मनात म्हटले की मराठी भाषेवर इंग्रजी भाषेचे अतिक्रमण का होत आहे याचा विचार झाला पाहिजे.  या छोट्या घटनेवरून लक्षात येते की आपली मराठी भाषा आज का क्षीण होत चालली आहे. वास्तविक त्याने हे मराठीतून बोलावयास हवे होते,  पण त्याने इंग्रजीचा आधार घेतला.  इतर भाषा आणि प्रामुख्याने इंग्रजी भाषा बोलता येणे हे वाईट नाही किंबहुना इंग्रजीही लिहिता वाचता आलीच पाहिजे.  इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा असल्यामुळे ती  शिकणे गरजेचे आहे पण मातृभाषेकडे पाठ फिरवता कामा नये.  मराठी मातृभाषा असलेल्या मंडळींनी लक्षात ठेवले पाहिजे की घरात तरी मराठीत बोलून नव्या पिढीच्या मनात मराठी भाषेबद्दल आवड / आदर निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.   मराठी माध्यमांच्या शाळेत सर्व विषयांचे ज्ञान हे मराठीतून दिले जाते त्यामुळे साहजिकच मराठी भाषेचे ज्ञानभाषेत रूपांतर होते.  मोठ्या मोठ्या शिक्षणतज्ज्ञांचे असे मत आहे की कोणतेही ज्ञान मिळवायचे असेल तर ते मातृभाषेत घेतले तर ते ज्ञान घेण्यास अडचणी कमी येतात.  त्यांचे असे म्हणणे आहे की ज्ञान संपादन करण्यासाठी मातृभाषेइतके प्रभावी साधन दुसरे नाही.  

     आपल्या मायमराठीची आजकाल का पीछेहाट होत आहे याची कारणे शोधलीच पाहिजेत.  आम्हाला मराठी नीट येत नाही किंवा आम्हाला मराठी "सो सो च" येतं असे अभिमानाने बोलणारी महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेली व मराठी संस्कृतीत वाढलेली भरपूर माणसे मिळतील. अशी माणसे मराठी भाषेला क्षुल्लक समजतात एव्हढेच नाही तर मराठी भाषा बोलणाऱ्याला गावंढळ तसेच मागासलेल्या जमातीतील समजून त्या व्यक्तीकडे विचित्र नजरेने पहातात.  परदेशातील माणूस महाराष्ट्रात येऊन मराठी शिकतो एवढेच काय तर संस्कृतमध्ये प्राविण्य मिळवतो. यांच्या उलट काही मराठी भाषिक त्यांचे संस्कार, त्यांची जीवनशैली आणि त्यांची भाषा यांचे अंधानुकरण करून स्वतःला कोणीतरी वेगळे समजतो कारण का तर त्यांना मराठी बोलण्याची लाज वाटते.  पश्चिमेकडील काही देशात तिकडची मंडळी शनिवार-रविवार मजा करतात हे पाहून त्यांच्या त्या मजेचे अनुकरण केले जाते पण ते सोमवार ते शुक्रवार जी मेहनत करतात त्याकडे सोयीस्कररीत्या कानाडोळा केला जातो.  आजकाल अशी परिस्थिती आहे की कित्येक वेळा तसेच कित्येक ठिकाणी मराठी मातृभाषा असलेली माणसे एकमेकाला भेटली की ते मराठीत संवाद न साधता हिंदी भाषेत संवाद साधण्यास प्राधान्य देतात.  हे असे का घडते किंवा ते असा का संवाद साधतात किंवा त्यांना मराठीचा एवढा का तिटकारा आहे यावर विचार मंथन झाले पाहिजे.  प्रथम आपण आपली मराठी संस्कृती / भाषा जपली पाहिजे तरच पुढच्या पिढीवर त्याचे परिणाम होतील. हल्ली गुढीपाडव्याला किती जण गुढी उभी करतात किंवा दसऱ्याला किती जण प्रतिकात्मक सीमोल्लंघन करतात हा एक संशोधनाचा विषय होऊ शकेल. आपण आपला मराठी बाणा जपला नाही तर लहानपणी "आकाशात उडणारा काऊ" मोठेपणी "चार पायाचा काऊ"  होईल व गोंधळाला सुरुवात होऊन त्याची परिणीती मराठी भाषेबद्दल अनास्था निर्माण होण्यात होऊ शकत असेल.   मराठीची उपेक्षा करणारी अशी माणसे मराठीचा उपयोग पार्टीत किंवा डिनर घेताना तोंडी लावण्याचा पदार्थ म्हणून करतात व आपण मराठीतूनच बोलले पाहिजे हे इंग्रजीतून किंवा हिंदीतून ठणकवितात थोडक्यात म्हणजे मराठी इझ सच अ गोड लँगवेज, वुई शुड स्पिक इन मराठी.  हे जे तथाकथित मराठी भाषेचे भोक्ते असतात त्यांना आम्हाला मराठीच "सो सो च" येते असे ज्याला त्याला सांगण्यात मोठा अभिमान वाटतो.  अजूनही एका गोष्टीबद्दल विचार झाला पाहिजे की आपल्या मराठीच्या महाराष्ट्रात हिंदी चित्रपट जेव्हढा व्यवसाय करतात त्यापेक्षा कितीतरी कमी प्रमाणात मराठी चित्रपट व्यवसाय करतात.  या व्यवसाय दरीचा पण विचार झाला पाहिजे.  पूर्वी विनोदाने असे म्हटले जायचे की हिंदी चित्रपटाच्या छायाचित्रणाच्या वेळेस जेवणावळीवर जेव्हढा खर्च होतो तेव्हढ्या खर्चात आमचा मराठी चित्रपट तयार होतो.  पण आता परिस्थिती बदलली आहे कारण गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटांनी कात टाकली आहे.  आता मराठी चित्रपटातही भव्यता येऊ लागली आहे.   

     मातृभाषेचा आग्रह धरणे हे चुकीचे नाही असे वाटते.  एखाद्या मराठमोळ्या कार्यक्रमाचा आमंत्रित अमराठी असेल तर त्याने शक्यतो मराठीतूनच आपले विचार लोकांपुढे मांडावेत ही अपेक्षा रास्त आहे.  भले त्याचे मराठी चांगल्या प्रतीचे नसेल पण त्याने कमीतकमी मराठीतून बोलण्याचा प्रयत्न करावा.   इतर राज्यातील लोक त्यांच्या मातृभाषेला जास्त महत्व देतात व समभाषिक एकमेकांना भेटले की ते त्यांच्या मातृभाषेतच बोलतात व त्यांना त्याच्यात अभिमान वाटतो.  पण महाराष्ट्रात मराठीत संवाद साधण्यापेक्षा हिंदी, इंग्रजी भाषांत संवाद साधण्याकडे प्राधान्याने त्याच्याकडे लक्ष दिले जाते व प्रतिसाद दिला जातो पण इतर राज्यात मराठीला तेवढा मान मिळत नाही.  असे का घडते याचा विचार प्रत्येक मराठी भाषिकाने  केला पाहिजे.  माझ्या मराठी भाषेला महाराष्ट्राबाहेर मान का दिला जात नाही या मागची मानसिकता आपण शोधली पाहिजे.  माझ्या माहितीतील एक गृहस्थ दक्षिण भारतात लहानाचे मोठे झाले आहेत पण ते कटाक्षाने मराठी बोलतात.  काही सरकारी आस्थापनांमध्ये सभेचे परिपत्रक मराठीतून काढले जाते पण प्रत्यक्ष सभेत मराठी भाषेवर इंग्रजी व हिंदी भाषा कुरघोडी करतांना दिसतात.   गेल्या काही वर्षांपासून परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की मराठी माध्यमांच्या शाळांकडे तुच्छतेने पाहीले जाते.  घरात मराठी वातावरण असूनही बहुतांशी पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या  शाळेत घालतात.  याचे कारण ते असे देतात की मराठी माध्यमांच्या शाळेमध्ये शिकविले जात नाही, त्या शाळांचा दर्जा फारसा चांगला नसतो इत्यादी.  यात  सर्वात मोठा विनोद म्हणजे हेच पालक मराठीची पीछेहाट होत आहे असा टाहो सरकार दरबारी फोडतात. 

   शेवटी एव्हढेच सांगता येईल की मातृभाषेत बोलण्याची खुमारी ही फक्त मातृभाषेत संवाद साधणाऱ्यालाच कळू शकते. मराठी भाषा ही आपली मायबोली आहे आणि त्यामुळेच मराठी भाषेचा आपण आदर केला पाहिजे.  आपल्या दिनक्रमात याच मराठी भाषेला आपण मनापासून महत्त्व देणे गरजेचे आहे.  मराठी भाषिकच मराठी भाषेला मानाचे स्थान मिळवून देऊ शकतो.  महाराष्ट्रात राहून मराठी बोलणे जेवढे संयुक्तिक आहे तेवढेच मराठी बोलता न येणे हे लाजिरवाणे आहे.  मराठी जतन करणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच मराठी वाढवणेही निकडीचे आहे.  मराठी भाषा बोलणे ही एक कला आहे पण ती सहजसाध्य नाही.  त्यावर प्रेम केले तरच ती साध्य होते. अपरिचिताशी बोलताना हिंदी किंवा इंग्रजी वापरणे ठीक वाटते पण महाराष्ट्रात जन्मलेल्या मराठी माणसाने मराठीचा वापर कटाक्षाने आपल्या संवादात करणे अत्यंत गरजेचे आहे.  मी तर म्हणेन अपरिचितांशी सुद्धा बोलतांना मराठी भाषेतच सुरूवात करावी व तोडके मोडके का होईना त्यास मराठी बोलावयास भाग पडावे.  तसेच महाराष्ट्रात राहण्याऱ्या परप्रांतीयाने देखील  मराठी बोलीभाषा तरी आत्मसात केलीच पाहिजे. कोणतीही भाषा बोलताना चुका होणारच व ते स्वाभाविकच आहे.  मग मराठी भाषा बोलताना चूक झाली तर काहीही बिघडत नाही.  त्या चुकांमधूनच भाषा अवगत होण्यास मदत होते.  या चुकांमधूनच मराठी भाषा विकसित होत असते.  मराठी भाषा बोलताना होत असलेल्या चुका जाणीवपूर्वक तसेच मनापासून सुधारण्याचा प्रयत्न केल्यास फरक पडू शकतो व मराठी चांगले लिहिण्या, वाचण्यास व बोलण्यास येऊ शकते. अलंकारिक शब्दांने भाषेचा गोडवा वाढतो हे जरी खरे असले तरी रोजच्या संवादाच्या भाषेत अलंकारिक तसेच बोजड शब्द वापरावेतच असे काही नाही.   सोपे तसेच सहज आकलन होणारे बोली भाषेतील शब्द वापरूनही आपण आपल्या भाषेत आपले विचार मांडू शकतो व संवादाचा परिणाम साधू शकतो. महाराष्ट्रात स्थायिक असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस मराठी आलीच पाहिजे.  आपल्या मराठीची शान आपणच राखू शकतो व ते आपले प्रथम कर्तव्य आहे.  अशा वेळेस सुरेश भट यांचे शब्द आठवितात 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी'   संत ज्ञानेश्वर यांनी केलेल्या मराठी भाषेच्या कौतुकाशिवाय हा लेखनप्रपंच अपुरा वाटेल.  संत ज्ञानेश्वर म्हणतात - 

माझ्या मराठीची बोलू कौतुके 
परी अमृतातेही पैजा जिंके 
ऐसी अक्षरे रसिक मेळविन 


-मिलिंद कल्याणकर
नेरुळ,नवी मुंबई  

आदर्श वार्ताहर - काव्यांगण

 ।। का ओळख येथे नवी ।।


आम्हांला या मातृभाषेची का ओळख येथे नवी

या माझ्या महाराष्ट्रात  शोभते  भाषेचीच थोरवी


या मायभूमीत अभिमानाची भाषा मायमराठी  उजळे ज्योती 

प्रत्येकांच्या मना-मनात रुजून येती मायबोलीची नाती 


गावोगावी जन्म घेऊनी बीज अंकुरे ममतेचे मराठी 

हेच येती प्रत्येकांच्या बाळाचे बोल बोबडे ओठी


इतिहासाच्या पानावरती शिवबाची तलवार मराठी 

साहित्याच्या रणांगणावर एकनाथ तुकाराम ज्ञानेश्वरी   ग्रंथ हेच अनेकांचे कोठी


किती अंभग किती पोवाडे भारुड  साहित्यिकांच्या उजळती ज्योती 

असे अनेक थोर कवी साहित्यिक नामवंत मायमराठीत होती


माय मराठी महाराष्ट्र देशा-देशात मिरवी राजवैभवात

शासकीय कामकाजात मायमराठी हासते सा-यात


चमकती असे मायभूमीचे पुत्र अनेक  मराठी भाषेत

हीच मायमराठी आज नांदते घरा-घरात


महान ज्ञानी कुसुमाग्रज यांच्या जन्म दिनाची हीच महती

कांदबरी नाटक ललित निबंध  वाड्मयीन साहित्यात  

ज्ञानपीठ पद्मभूषण हीच यांची ख्याती


मराठी राजभाषा दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...

या महान पद्मभूषण  कुसुमाग्रज 

यांच्या प्रतिमेस विनम्र  अभिवादन..

 



-प्रिया मयेकर उल्हासनगर-ठाणे

समीर खाडिलकर यांनी "मराठी भाषा गौरव दिवसा" निमिताने जेष्ठ नागरिकांना दिला मदतीचा हात

मुंबई (शांत्ताराम गुडेकर)    कोविड-१९ या महामारी काळात प्रत्येकजण आपआपल्या परीने जी काही मदत करता येईल ती करत होता. बोरीवली येथील सामाजिक कार्यकर्ता समीर खाडिलकरही याला अपवाद नाहीत.त्यांनी आवश्यक तेथे जी-जी गरज होती तेथे तेथे गरजेनुसार मदतीचा हात दिला. आज दि.२७ फेब्रुवारी  २०२१ रोजी मराठी भाषा गौरव दिवसानिमिताने ईशान्य मुंबईतील घाटकोपर पश्चिम अमृत नगर सर्कल, बंबखाना  व पार्क साईट येथील जेष्ठ नागरिकांना अन्नधान्य किट देऊन मदतीचा हात देण्याची महत्वपुर्ण कामगिरी बजावली. यापुर्वीही माझी वसुंधरा मित्र, महाराष्ट्र हरित सेना वन विभाग महाराष्ट्र शासन सदस्य समाजसेवक समीर खाडिलकर यांनी

ठाणा जिल्ह्यातील दिवा परिसरातील दिवा गणेश नगर आणि बी.आर.आर नगर येथील  गरजूंना अन्नधान्य किट देऊन मदतीचा हात देण्याची महत्वपुर्ण कामगिरी बजावली आहे.तर ईशान्य  मुंबईतील ३० जेष्ठ नागरिकांसह जेष्ठ पत्रकार,मुक्त पत्रकार व श्रमिक पत्रकार यांना अन्नधान्य किटचे वाटप(वाटप करताना फोटो सुध्दा न घेता) केले. नव्या जुन्या पिढीतला बेबनाव अनेक घरातून दिसून येतो.आणि बऱ्याचदा ज्येष्ट नागरिकांच्या वाट्याला दुःख निराशा येते.आयुष्याच्या संध्याकाळी ते व्यथित होतात.ते सुखी कसे होतील हे पहाणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे मत समाजसेवक समीर खाडिलकर कायमस्वरुपी बोलताना व्यक्त करतात.

            यापुर्वीच त्याच्या सेवाभावी कार्याची दखल घेत खार पूर्व येथील "श्री स्वामी समर्थ " कृपासिंधू सामाजिक संस्था(नोंदणीकृत)अध्यक्ष सुनिल मांजरेकर,सल्लागार रविंद्र आंब्रे यांनी समीर खाडिलकर यांचा "कोविड योध्दा" सन्मानपत्र देऊन गौरव केलेला आहे.तसेच भा.म.सेना राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश सकुंडे(संपादक- शिववृत्त),महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अँड.आनंदजी गुगळे यांनी " कोविड योध्दा" या सन्मानपत्राने गौरविले.तसेच साप्ता.धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळप,पाक्षिक आदर्श वार्ताहर संपादक पंकजकुमार पाटील यांच्यासह विविध संस्था,संघटनाव वर्तमानपत्र यांनीही समीर खाडिलकर यांचा "कोविड योध्दा" सन्मानपत्रने गौरव केला आहे. समीर खाडिलकर यांना कोविड योध्दा सन्मानपत्र प्राप्त झाल्यानंतर अनेकांकडून अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.शिवाय आज मराठी भाषा गौरव दिवसानिमिताने ईशान्य मुंबईतील घाटकोपर,विक्रोळी येथे गरजवंत जेष्ठ नागरिकांना अन्नधान्य किटचे वाटप केल्याबद्दल अनेकांनी समीर खाडिलकर यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा व आशिर्वाद दिले.तर अमृत नगर,बंबखाना व पार्क साईट येथील जेष्ठ नागरिकांकडून समीर खाडिलकर यांचे आभार व्यक्त करत त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असे आशिर्वादही दिले.

आदर्श वार्ताहर - काव्यांगण

माझी गोड मराठी 


 कधी पेरूची, कधी आंब्याची फोड वाटते-२

बोलतांना, ऐकतांना माझी मराठी गोड वाटते...


केली भटकंती, हिंदी इंग्रजीची किती जरी-२

घरी परततांना माय मराठीची ओढ वाटते...

बोलतांना, ऐकतांना माझी मराठी गोड वाटते


व्यक्त होण्यासाठी मराठी, नको भाषा परकी-२

नाही माझ्या मराठीस कुणाची तोड वाटते...

बोलतांना, ऐकतांना माझी मराठी गोड वाटते


भाग्य आमुचे संत-शुरांच्या भूमीत जन्मलो हे-२

अशा महाराष्ट्रभूमीची मराठी अजोड वाटते

बोलतांना, ऐकतांना माझी मराठी गोड वाटते


लावावे रोप जिथे तिथे माझिया मराठीचे -२

फुटतील मग मराठीस नवे नवे मोड वाटते...

बोलतांना, ऐकतांना माझी मराठी गोड वाटते...


-प्रकाश पाटील, वसई

मराठी भाषेला " अभिजात दर्जा " कधी मिळणार ?

 २७ फेब्रुवारी " राजभाषा दिन " निमित्त लेख 

     
    
       

जी भाषा प्राचीन  आणि साहित्य श्रेष्ठ  असेल, भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्ष असेल,  भाषेला स्वतःचे  स्वयंभूपण असेल,  प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असेल तर अशा भाषांना केंद्र सरकारतर्फे " अभिजात भाषा " म्हणून मान्यता मिळते .
      हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रसरकार कडून त्या त्या राज्याला भरीव अनुदान मिळते . भारत सरकारने २००४ साली तामिळ , २००५ साली संस्कृत,  २००८ साली कन्नड आणी तेलगू ,  २०१३ ला मल्याळम आणी २०१४ ला उडिया या सहा भाषांना  अभिजात भाषेचा दर्जा दिला .

         मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा  मिळण्यासाठी जे निकष आवश्यक आहेत ते  सर्व निकष पूर्ण आहेत.   यासंदर्भात मराठी भाषा प्रेमींनी महाराष्ट्र शासनाला कल्पना दिली होती . महाराष्ट्र शासनाने २००४ पूर्वी केंद्र सरकारकडे याबाबत प्रस्ताव ठेवला असता तर कदाचित मराठी भाषेला " अभिजात भाषा " म्हणून सर्वप्रथम मान मिळाला असता . परंतु महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांनी १० जानेवारी २०१२ ला डॉ .रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली " अभिजात  मराठी भाषा समिती " स्थापन केली .यां समितीच्या सात बैठका, उप समितीच्या एकोणीस बैठका झाल्या .अनेक भाषा तज्ञांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर समितीने  मे  २०१३ मध्ये  ४३५ पानांचा अहवाल राज्यसरकारला दिला .त्यानंतर इंग्रजीत भाषांतरीत  करून हा अहवाल   राज्य सरकारने २०१३ ला केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे पाठवला . त्यांनी तो साहित्य अकादमीकडे पाठवला व त्यावर निर्णय मागवला.

           साहित्यअकादमीने या अहवालाचा सखोल अभ्यास करून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यावर शिक्कामोर्तब करून फेब्रुवारी २०१४ ला निर्णयासाठी केंद्राकडे परत पाठवला परंतु अद्याप याबाबत निर्णय लागला नाही .गेल्या सात वर्षात महाराष्ट्र शासनाने याबाबत कीती पाठपुरावा केला माहीत नाही परंतु साहित्यिक,  साहित्यप्रेमी यांनी विविध मार्गांनी केंद्र सरकारला विनंती केली परंतु केंद्राने अद्याप निर्णय दिला नाही . आता यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्व खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेउन  १ मे यां महाराष्ट्र दिना पर्यत मराठी भाषेला न्याय मिळवून द्यावा हीच अपेक्षा .


-दिलीप प्रभाकर गडकरी 
कर्जत जि .रायगड 

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

पाणी हेच जीवन..पाणी जपून वापरा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अलिबाग (जिमाका)- सध्या राज्य देश संपूर्ण जग करोना सारख्या भीषण संकटाशी मुकाबला करीत आहे त्याचबरोबर पाणी हीदेखील मोठी समस्या आहे पाणी हेच जीवन असून पाणी जपून वापरा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व जनतेला आज पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे केले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारीतील नावाशेवा टप्पा तीन पाणी पुरवठा योजना भूमिपूजन सोहळा पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु. आदिती सुनील तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, पनवेल महानगरपालिका महापौर डॉ. कविता चौतमोल, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे,  सर्वश्री आमदार बाळाराम पाटील अनिकेत तटकरे, भरत गोगावले महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, पंचायत समिती पनवेल सभापती देवकी कातकरी, ग्रामपंचायत खानावळे सरपंच जयश्री नाईक, ग्रामपंचायत बारवाई सरपंच नियती बाबरे, जेएनपीटी चे अध्यक्ष संजय सेठी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,सिडको डॉ.संजय मुखर्जी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलिस उपमहानिरीक्षक संजय मोहिते, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले पाटील हे उपस्थित होते.

     मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मी आयोजकांना धन्यवाद देतो. कालच मी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून प्रेमाने आणि हक्काने सूचना दिल्या होत्या. एकीकडे मी सांगतोय की,सार्वजनिक कार्यक्रम करू नका आणि आज आपण हा रायगड येथील कार्यक्रम करतोय, पण हा कार्यक्रम जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि मुख्य म्हणजे पाण्याशी संबंधित आहे. 

      मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सर्वप्रथम आरोग्याचे काटेकोर नियम पळून हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले व ते पुढे म्हणाले की,पाणी म्हणजे आयुष्य आहे. विकासाच्या अनेक गोष्टी आपण करतोय. मेट्रोचे कोचेस देशात बनवतो आहोत. उद्या आपल्या राज्यातही हे कोचेस बनतील. अनेक गोष्टी आपण उत्पादित करू शकतो मात्र पाणी आपण बनवू किंवा निर्माण करू शकत नाही हे सत्य आहे. एकदा हे स्वीकारल्यानंतर मग आपल्या हाती असते ते उपलब्ध पाणी कसे जपून वापरू     

       ते म्हणाले की, माणूस

तहान लागली की विहीर खणतो. पाण्याची पातळीही खूप खोल जात आहे. मी जव्हारला गेल्या आठवड्यात गेलो होतो, ते पूर्वी हिल स्टेशन होते आणि पुढेही आपण त्याला चांगले विकसित करणार आहोत. पण पाण्याचे दुर्भिक्ष्य काय असते, ती भीषण वस्तुस्थिती तिथे गेल्यावर पहायला मिळते. परवा नीती आयोगाच्या बैठकीत मी मांडले की, ज्या विकासाच्या मागे आपण लागलो आहोत ते करताना निसर्गाचा ऱ्हास होता कामा नये. कोकणात सुंदर निसर्ग संपदा आहे, दुसरीकडे समुद्र किनारे आहेत पण पर्यावरणाला धोका पोहोचवून केलेला विकास आपल्याला नकोय. प्रदूषणकारी राक्षस आपल्याला परवडणार नाही. हा जीवघेणा विकास आहे. काही विशिष्ट कारखान्यांची खूप आवश्यकताच असेल तिथे लोकसंख्येपासून दूरवर किंवा ओसाड ठिकाणी  त्यांना आवश्यक त्या सुविधा देऊन उभारावेत,  मात्र त्यासाठी

वनसंपदा नष्ट करता कामा नये.

करोनाच्या सुरुवातीच्या काळात सुविधा मिळत नव्हत्या, त्या काळात प्रदूषणाची पातळी खूप कमी झाली होती. आता परत काही दिवसांपासून हवेचे प्रदूषण वाढले आहे. प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार वाढू लागले आहेत, अशी चिंता व्यक्त करून मुख्यमंत्री श्री.ठाकरे पुढे म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील पण पिण्याचे पाणी गावागावात घेऊन जाऊ शकलो नसलो तर काही अर्थ नाही. मंगळावर पाणी सापडले आहे किंवा नाही हे उत्सुकतेने आपण तपासतो पण अगोदर  आपण आपल्याकडील मूलभूत सुविधा आहेत का ते पाहणे गरजेचे आहे. मुंबई  लगतच्या या रायगड जिल्ह्यात लोकसंख्या वाढत आहे, पिण्याच्या पाण्याची सोय आपण नाही केली तर  भविष्यात गंभीर समस्या निर्माण होतील. त्यामुळे हा प्रकल्प वेळेत नव्हे तर वेळेआधी पूर्ण करा, त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असे सांगून केवळ रायगडच नव्हे तर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा आहे, असा निर्धार त्यांनी शेवटी व्यक्त केला.

    उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या मनोगतात म्हणाले की, जगामध्ये यापुढील भांडणे पाण्या साठीच होतील,राज्याराज्यात,

जिल्ह्याजिल्ह्यात,गावागावत पाण्याकरिता वाद होऊ नयेत यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या उपाययोजना करणे, लोकांनी जलसाक्षर बनणे, ही काळाची गरज बनली आहे. करोनाने पुन्हा आपले डोके वर काढले आहे.त्यामुळे सर्वांनीच काटेकोरपणे आपली,आपल्या कुटुंबाची,समाजाची काळजी घ्या.

      जनतेने नियमांचे पालन केल्यास पुन्हा लॉकडाऊनची गरज भासणार नाही,याची काळजी घेण्याची वेळ आली आहे. अनिल देशमुख, जयंत पाटील, सतेज पाटील, छगन भुजबळ करोनाग्रस्त झाले. सध्याच्या परिस्थितीला लोकांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. लोकांमधील भीती करोना विषयीचे गांभीर्य निघून गेले आहे.त्यामुळे परिस्थिती अधिक बिकट बनण्याआधीच आपण सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारीतील न्हावाशेवा टप्पा-3 पाणीपुरवठा योजनेसंबंधी त्यांनी संबंधितांना कामाचा दर्जा उत्तम राखावा, काम वेळेत पूर्ण करावे आणि त्या कामात कुठलीही उणीव राहणार नाही, यासाठी सरकार दक्ष राहील, अशी ग्वाही दिली.

       नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ,महाराष्ट्र शासनाच्या अथक  प्रयत्नामुळे कोविड-19 रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मात्र आता ती पुन्हा वाढत आहे. त्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. केंद्राकडून 40 हजार कोटी येणे बाकी असले तरीसुद्धा जनतेच्या हिताचे आणि राज्याच्या विकासासाठी असलेले प्रकल्प चालूच आहेत. आर्थिक अडचण भासत असली तरी महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणारही नाही. हा प्रकल्प दिलेल्या कालावधीत पूर्ण व्हावा, हीच सर्वांची अपेक्षा आहे. प्रकल्प निर्मितीसाठी येणाऱ्या अडचणींवर मात करून प्रकल्प वेळेत पूर्ण होईल याची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काळजी घ्यावी. प्रकल्प निर्मितीसाठी नगर विकास विभागातून लागणारे सर्व प्रकारचे सहकार्य  केले जाईल. परंतु प्रकल्प वेळेत पूर्ण होईल याची काळजी घ्यावी ,अशी सूचनाही त्यांनी संबंधितांना केली.

    पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मोठमोठी धरणे महाराष्ट्रात उभी केली आहेत. मोरबे धरण हे सुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने उभे केले आहे. न्हावाशेवा टप्पा-3 पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होत असल्याने आनंद व्यक्त केला.

     सर्वप्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या योजनेचे भूमीपूजन संपन्न झाले. तद्नंतर पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे यांनी प्रास्ताविकात या योजनेविषयीची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री प्रधान यांनी केले तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी केले.

    या कार्यक्रमाच्या  यशस्वीततेसाठी सुभाष भुजबळ मुख्य अभियंता, ठाणे, चंद्रकांत गजभिये,अधीक्षक अभियंता पनवेल, दीपाली देशपांडे - सावडेकर,मुख्य प्रशासकीय अधिकारी,मुंबई, प्रशांत भामरे, अधीक्षक अभियंता,मुंबई, प्रल्हाद पांडे, अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) मुंबई, नामदेव जगताप, शाखा अभियंता, रमेश वायदंडे, शाखा अभियंता, पनवेल जी.ए.कुलकर्णी,शाखा अभियंता, पनवेल, डी.आर. अनुसे,शाखा अभियंता,पनवेल,भरत कुमार पवार,शाखा अभियंता, विजय सूर्यवंशी कार्यकारी अभियंता  पनवेल,अर्जुन गोळे, पनवेल, सुरेंद्र भोसले, उप अभियंता यांत्रिकी, के.बी.पाटील,शाखा अभियंता, स्वप्निल सुळे, शाखा अभियंता,श्री.बिर्ला,उपविभागीय अभियंता,माथेरान,सूर्यकांत वाडिले,शाखा अभियंता, पनवेल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, अंकुश खेडकर, संजय पाटील,  सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.पगार, श्री.फरताडे, श्रीमती बिडवे, श्री.हाश्मी, श्री.आकाश पवार या सर्वांनी परिश्रम घेतले.


बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१

मुंबईचा भूषण सहदेव तांबे विश्वस्तरीय वैचारिक लेखन स्पर्धेत तृतीय क्रमांकाने विजयी

 मुंबई (प्रतिनिधी): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि बळीराजा डॉट कॉम (अखिल भारतीय मराठी शेतकरी संघटना) आयोजित विश्वस्तरीय वैचारिक लेखन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या सर्वोच्च वैचारिक लेखन स्पर्धेत मुंबईचा कवी.भूषण सहदेव तांबे याला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आलेले आहे. सदर संस्थेने दिलेल्या त्यांच्या निवेदनानुसार पारितोषिक वितरण समारंभ हा पुढील महिन्यात यवतमाळ या ठिकाणी होईल असे जाहीर करण्यात आलेले आहे आणि सर्व पारितोषिक प्राप्त सारस्वतांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

   सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत संपूर्ण जगभरातून अनेक नवोदित तसेच ज्येष्ठ साहित्यिकांनी आपल्या प्रवेशिका स्पर्धेसाठी सादर केल्या होत्या आणि या मानाच्या  स्पर्धेचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्रातून ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रतिष्ठित मान्यवरांची या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आणि त्यांनी त्यांची जबाबदारी छान पार पाडली आणि अचूक निकाल सर्वांसमोर सादर केला.

    कवी.भूषण सहदेव तांबे याला २०२१ या वर्षीचे हे सलग तिसरे पारितोषिक जाहीर झालेले आहे. मराठी साहित्यिक क्षेत्रातील नावलौकिक असणारे नवोदित साहित्यिक म्हणून कवी.भूषण सहदेव तांबे याचे नाव नक्कीच आवर्जून घेतले जाते. कवी.भूषण सहदेव तांबे यांनी आजपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये स्पर्धेचे प्रतिनिधित्व करून त्यामध्ये प्रावीण्य मिळवून स्वतःच्या नावाची एकमेव ओळख निर्माण केलेली आहे.

  मराठी साहित्यिक क्षेत्रात तसेच सोशल मीडियावर देखील कवी.भूषण सहदेव तांबे याचे खूप कौतुक करण्यात येत आहे आणि पुढील कार्यासाठी त्यास शुभेच्छाही देण्यात येत आहे.

धारावी करोनामुक्त करणाऱ्या करोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार ; करोनाबाबत नियमांचे पालन करणे हीच समाजसेवा ठरेल : राज्यपाल ; खासदार राहुल शेवाळे, नगर सेवक वसंत नकाशे, नगर सेविका हर्षला मोरे यांसह ३० जणांचा सत्कार

मुंबई : करोना अद्याप गेला नाही, परंतु तरीही अनेक लोकांनी मास्क लावणे सोडून दिले आहे, हे बेजबाबदार सामाजिक वर्तन चिंतेचा विषय आहे, असे सांगताना, करोनाबाबत सतर्कता, जागरुकता व नियमांचे सर्वांनी पालन करणे हीच खरी समाजसेवा ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. 

  साप्ताहिक धगधगती मुंबईच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त धारावीला करोनामुक्त करणाऱ्या ३० करोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. 

    यावेळी राज्यपालांच्या हस्ते खासदार राहुल शेवाळे, नगरसेवक वसंत नकाशे, नगरसेविका हर्षला आशिष मोरे, मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, सहायक पोलीस आयुक्त रमेश नागरे, आरोग्य अधिकारी डॉ विरेंद्र मोहिते, इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचणेकर, लावणी कलावंत महासंघाचे अध्यक्ष संतोष लिंबोरे व धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळप यांसह ३० करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. 



    भारतात ज्याने जन्म घेतला – मग तो कोणत्याही जाती, पंथ, धर्माचा असो – तो आपला देशबांधव आहे व संकटसमयी त्याच्या मदतीला धावून जाणे हे आपले कर्तव्यच आहे, ही भावना येथील लोकांमध्ये आहे. सेवा हाच सच्चा धर्म आहे, हे या देशातील संस्कार आहेत. त्यामुळेच करोना काळात लोक प्रतिनिधी, पोलीस, पत्रकार, डॉक्टर्स, नर्सेस, स्वच्छता कर्मी यांसह सामान्यातील सामान्य माणसाने सेवा रूपाने समाजाला आपले योगदान दिले, असे राज्यपालांनी सांगितले.    

   सन १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले त्यावेळी आपण विद्यार्थी होतो. त्या कठीण काळात आपल्या गावातील गरीबातील गरीब महिलेने आपले सोन्याचे दागिने देशासाठी दिले होते, अशी आठवण राज्यपालांनी यावेळी सांगितली. देशाप्रती व समाजाप्रती सेवा व समर्पण भावनेमुळेच समाज जीवंत राहतो असे राज्यपालांनी सांगितले.

‘राज्यपालांच्या हाताने सन्मान होणे, हे भाग्य’ 

   धारावीत करोनाचा फैलाव झाल्यास त्याचा राज्याला व देशाला धोका आहे, हे जाणून धारावीतील लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणा, खाजगी डॉक्टर्स व जनसामान्यांनी कृती आराखडा तयार करून करोनावर मात केली. त्यानंतर सर्वात मोठे प्लाझ्मादान शिबीर देखील तेथे भरवले. धारावीतील यशाचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले असे सांगून धारावीतील यश हे सर्व धारावीकरांचे यश आहे, असे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले. धारावीतील करोना योद्ध्यांचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते होत आहे हे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

   सामाजिक कार्यकर्ता संदीप कदम, सहाय्यक परिचारिका श्रीमती मंजू वीर, मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी गंगा दरबेर, सामाजिक कार्यकर्ता राकेश गुप्ता, अन्न व धान्यपुरवठा विभागातील अंकित अन‍िल गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते परवेज शेख, उदय नांदे, सुनील कांबळे, महादेव नारायणे व प्रविण जैन, ग्लोकल कम्युनिकेशनचे संचालक भास्कर तरे, विश्वस्त निऑन हॉस्पीटल मिलिंद शिंदे, मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी सुरेश पालवे, समाजसेवक दिलीप कटके, समाजसेवक, शांताराम कांरडे,  सामाजिक कार्यकर्ता सुरेश रांजवण, विनायक पोळ, डॉ रुपेश सोनवणे यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

    यावेळी राज्यपालांच्या हस्ते धगधगती मुंबईच्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. संपादक भीमराव धुळप यांनी आभार प्रदर्शन केले तर संतोष लिंबोरे यांनी सूत्र संचलन केले.                                                             

कोंकण प्रतिष्ठान टिटवाळा कल्याण या संस्थेच्या वतीने कुणबी समाज विकास संघ, मुलुंड विभाग मुंबई या संस्थेला आदर्श सामाजिक संस्था म्हणून पुरस्कार प्रदान...!

ठाणे :  टिटवाळा तालुका कल्याण येथील एक प्रतिष्ठित सामाजिक संस्था राजे श्री शिवछत्रपती कोंकण प्रतिष्ठान या संस्थेचा तिसरा वर्धापन दिन,शिवजयंती उत्सवानिमित्त महारक्तदान शिबीर आयोजित करून दिवसभर अनेक कार्यक्रम व उपक्रम, शिव व्याख्यान, महिलांचे रंगबेरंगी खेळ व हळदीकुंकू तसेच विविध पुरस्कार,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी टिटवाळा कल्याण,मुंबई येथून अनेक विविध स्तरावरून मान्यवर  मंडळी यांनी उपस्थिती दर्शविली.यावेळी आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार हे कुणबी समाज विकास संघ,मुलुंड विभाग मुंबई या संस्थेचा गेली अनेक वर्षे चालू असलेले सामाजिक, लोकपयोगी कार्यक्रम-उपक्रम तसेच सामान्य तळागाळातील सामाजिक घटक यांच्यापर्यंत असलेले एक सामाजिक बांधिलकी व कर्तव्य लक्षात घेऊन, तसेच कोरोनाच्या महामारीत सुद्धा या सामाजिक संस्थेने प्रत्येक समाजघटक यांना मदती सारखे अन्य मोलाचे योगदान दिले आहे.अगदी प्रसिद्धी पासून दूर राहून नेहमीच प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करताना आज मुंबई सारख्या शहरात एक मजबूत संघटना म्हणून उभी आहे. तसेच त्यांनी कोरोनाच्या संकटकाळात सर्वच हॉस्पिटल,रक्तपेढी येथे रक्ताचा अपुरा साठा असल्याने त्यांनी याच पार्श्वभूमीवर एका वर्षात ४ वेळा रक्तदान शिबीर कार्यक्रम घेऊन एक सर्वच संस्थेसमोर आदर्श निर्माण केला आहे.याचाच एक भाग म्हणून त्यांना आदर्श सामाजिक संस्था म्हणून एक मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन राजे श्री शिवछत्रपती कोंकण प्रतिष्ठान टिटवाळा तालुका कल्याण या संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात आला.तसेच कोंकणरत्न साने गुरुजी पुरस्कार श्री प्रसाद फर्डे सर व अनेकांना कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले.

   कुणबी समाज विकास संघ मुलुंड विभाग,मुंबई या सामाजिक संस्थेला आदर्श पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वच स्तरावर अभिनंदनाचा वर्षाव चालू आहे. 

   यावेळी कुणबी समाज विकास संघ मुलुंड विभागाचे अध्यक्ष श्री.विनायक घाणेकर, महिला युवक मंडळाच्या सचिव सौ.प्राचीताई पाटील, दापोली तालुका कुणबी युवाध्यक्ष श्री. प्रमोद खेराडे, सरचिटणीस विजय गौरत, जय गौरत, पांडुरंग गावडे, अनंत कदम,अरविंद म्हादळेकर, शंकर बाईत, संतोष भोजने, महेंद्र उके, उर्मिला ताई पाटील, करुणा ताई गावडे, कृष्णा खोपटकर, विनायक मांडवकर, प्रसाद बाईत तसेच कोंकण प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रदिप घाणेकर, उपाध्यक्ष योगेश नाचरे, अशोक जाधव, सरचिटणीस मनीष लोंढे, निलेश जाधव, गणेश वागजे, सचिन झगडे, प्रदिप शिवगण, नरेश सकपाळ, राजेंद्र चव्हाण, महेश चव्हाण, गणेश निकम व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कुणबी समाज विकास संघ मुलुंड विभागाचे अध्यक्ष श्री.विनायक घाणेकर व महिला सचिव सौ.प्राचिताई पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता.

उरण (विठ्ठल ममताबादे ) : श्री परमपूज्य सद्गुरू गोपाळकाका महाराज ट्रस्ट -खोपटे बांधपाडा उरण यांच्या वतीने श्रीमत परमहंस जीवन्मुक्त स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीमत परमहंस जीवन्मुक्त स्वामी महाराज गोपाळकाका नगरी खोपटे, काकांचा पाडा, तालुका उरण, जिल्हा -रायगड येथे माघ शुद्ध षष्टी गुरवार दि 18/2/2021 ते माघ शुद्ध द्वादशी बुधवार दि 24/2/2021 या दरम्यान अखंड हरीनाम सप्ताह, गुरुदशमी सोहळा, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार मास्क व सॅनिटायझरचा वापर करून, सोशल व फिजिकल डिस्टन्स पाळून मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरा करण्यात आला. दि 24/2/2021 रोजी या सप्ताहाची सांगता करण्यात आली.

  उरण मधील प्रसिद्ध संत जीवन्मुक्त स्वामी यांचे शिष्य तथा  खोपटे गावातील सुपुत्र संत गोपाळकाका यांनी जीवन्मुक्त स्वामींकडून अनुग्रह घेतला होता. त्यांचे शिष्यत्व पत्कारले होते. तो अनुग्रहाचा दिवस त्यांचे शिष्य गुरुदशमी सोहळा म्हणून साजरे करतात. संत गोपाळकाका यांची समाधी खोपटे गावातच आहे. संत गोपाळकाका यांना मानणारा खूप मोठा शिष्यवर्ग उरण तालुक्यात असून संत गोपाळकाका यांचे शिष्य मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, रायगड जिल्ह्यात आदी विविध विभागात मोठ्या प्रमाणात आहेत.त्यांचे शिष्य गुरुदशमी सोहळा मोठ्या उत्साहाने साजरे करतात.गुरुदशमी निमित्त अनेक ठिकाणी अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन केले जाते. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी उरण तालुक्यातील खोपटे गावात अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सण 2020 साली संत गोपाळकाका यांची शताब्दी वर्ष साजरी करण्यात आली होती. यावर्षी यंदाचे हे 101 वे वर्ष आहे.

   आजच्या विज्ञान युगाच्या जोरावर भरारी मारणाऱ्या मानवाला हा भवसागर तरुण जाण्यासाठी तसेच अलभ्य नरदेहाचे उद्धार होण्यासाठी मनुष्याला अध्यात्माची जोड हवी आहे.व मनशांतीसाठी शुद्ध ज्ञानाची गरज आहे. अंतःकरण शुद्ध करण्याचा अध्यात्म हाच एकमेव मार्ग आहे. समाज सुधारण्यासाठी समाज प्रबोधन करणे, धर्माचे पालन करणे हे एकमेव उद्दीष्ट असून ते साध्य करण्यासाठी हरिनामाची प्रेरणा देणे हाच खरा सन्मार्ग आहे. या हरीनाम यज्ञाद्वारे समाज व्यसन मुक्त करणे सद्गुरू गोपाळकाका यांचे स्वप्न, उद्देश तथा उपदेश असून समाज सुसंस्कारक्षम करणे तसेच सदाचारी जीवनाची प्रेरणा देणे हाच अध्यात्मिक ज्ञानाचा खरा सुमार्ग आहे. याचे भान ठेवून येणारी पिढी संस्कारक्षम बनविण्यासाठी, समाजाला निर्व्यसनी, सदाचारी बनविण्यासाठी संत शिरोमणी गोपाळकाकांच्या खोपटे नगरीत अखंड हरीनाम यज्ञाचा, ज्ञानेश्वरी वाचन, कीर्तन, प्रवचन, भजन, हरिपाठ असे दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन सप्ताहा दरम्यान सोशल व फिजिकल डिस्टन्स पाळून आयोजित करण्यात आले होते असे संत गोपाळकाका यांचे नातू हरिभक्त परायण घनश्याम ठाकूर महाराज यांनी सांगितले.

   श्री परमपूज्य सद्गुरू गोपाळकाका महाराज ट्रस्ट -खोपटे बांधपाडा उरण यांच्या वतीने दरवर्षी खोपटे येथे हरीनाम सप्ताह साजरा होतो. विशेष म्हणजे विविध क्षेत्रातील दानशूर व्यक्ती स्वतःहून या सप्ताहास अन्नदान, वस्तू, सेवारूपी दान करतात. ग्रामस्थ मंडळ खोपटे,  ग्रामस्थ मंडळ बांधपाडा, ग्रुप ग्रामपंचायत खोपटे बांधपाडा,श्री ज्ञानेश्वरी सेवा मंडळ (पनवेल -उरण विभाग ), संत शिरोमणी गोपाळकाका सेवाधारी मंडळ खोपटे परिसर, खोपटे सातपाड्यातील क्रिकेट क्लब यांच्या सहकार्याने या वर्षीचा हरीनाम सप्ताह, गुरुदशमी सोहळा, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सोशल व फिजिकल डिस्टन्स पाळून मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

प्रसिद्ध अभिनेते, साहित्यिक, कवी आणि पत्रकार यांच्या उपस्थितीत आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार सोहळा संपन्न..!

मुंबई-दादर (प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर)  आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण सो...