आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१

धारावी करोनामुक्त करणाऱ्या करोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार ; करोनाबाबत नियमांचे पालन करणे हीच समाजसेवा ठरेल : राज्यपाल ; खासदार राहुल शेवाळे, नगर सेवक वसंत नकाशे, नगर सेविका हर्षला मोरे यांसह ३० जणांचा सत्कार

मुंबई : करोना अद्याप गेला नाही, परंतु तरीही अनेक लोकांनी मास्क लावणे सोडून दिले आहे, हे बेजबाबदार सामाजिक वर्तन चिंतेचा विषय आहे, असे सांगताना, करोनाबाबत सतर्कता, जागरुकता व नियमांचे सर्वांनी पालन करणे हीच खरी समाजसेवा ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. 

  साप्ताहिक धगधगती मुंबईच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त धारावीला करोनामुक्त करणाऱ्या ३० करोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. 

    यावेळी राज्यपालांच्या हस्ते खासदार राहुल शेवाळे, नगरसेवक वसंत नकाशे, नगरसेविका हर्षला आशिष मोरे, मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, सहायक पोलीस आयुक्त रमेश नागरे, आरोग्य अधिकारी डॉ विरेंद्र मोहिते, इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचणेकर, लावणी कलावंत महासंघाचे अध्यक्ष संतोष लिंबोरे व धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळप यांसह ३० करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. 



    भारतात ज्याने जन्म घेतला – मग तो कोणत्याही जाती, पंथ, धर्माचा असो – तो आपला देशबांधव आहे व संकटसमयी त्याच्या मदतीला धावून जाणे हे आपले कर्तव्यच आहे, ही भावना येथील लोकांमध्ये आहे. सेवा हाच सच्चा धर्म आहे, हे या देशातील संस्कार आहेत. त्यामुळेच करोना काळात लोक प्रतिनिधी, पोलीस, पत्रकार, डॉक्टर्स, नर्सेस, स्वच्छता कर्मी यांसह सामान्यातील सामान्य माणसाने सेवा रूपाने समाजाला आपले योगदान दिले, असे राज्यपालांनी सांगितले.    

   सन १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले त्यावेळी आपण विद्यार्थी होतो. त्या कठीण काळात आपल्या गावातील गरीबातील गरीब महिलेने आपले सोन्याचे दागिने देशासाठी दिले होते, अशी आठवण राज्यपालांनी यावेळी सांगितली. देशाप्रती व समाजाप्रती सेवा व समर्पण भावनेमुळेच समाज जीवंत राहतो असे राज्यपालांनी सांगितले.

‘राज्यपालांच्या हाताने सन्मान होणे, हे भाग्य’ 

   धारावीत करोनाचा फैलाव झाल्यास त्याचा राज्याला व देशाला धोका आहे, हे जाणून धारावीतील लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणा, खाजगी डॉक्टर्स व जनसामान्यांनी कृती आराखडा तयार करून करोनावर मात केली. त्यानंतर सर्वात मोठे प्लाझ्मादान शिबीर देखील तेथे भरवले. धारावीतील यशाचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले असे सांगून धारावीतील यश हे सर्व धारावीकरांचे यश आहे, असे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले. धारावीतील करोना योद्ध्यांचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते होत आहे हे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

   सामाजिक कार्यकर्ता संदीप कदम, सहाय्यक परिचारिका श्रीमती मंजू वीर, मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी गंगा दरबेर, सामाजिक कार्यकर्ता राकेश गुप्ता, अन्न व धान्यपुरवठा विभागातील अंकित अन‍िल गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते परवेज शेख, उदय नांदे, सुनील कांबळे, महादेव नारायणे व प्रविण जैन, ग्लोकल कम्युनिकेशनचे संचालक भास्कर तरे, विश्वस्त निऑन हॉस्पीटल मिलिंद शिंदे, मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी सुरेश पालवे, समाजसेवक दिलीप कटके, समाजसेवक, शांताराम कांरडे,  सामाजिक कार्यकर्ता सुरेश रांजवण, विनायक पोळ, डॉ रुपेश सोनवणे यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

    यावेळी राज्यपालांच्या हस्ते धगधगती मुंबईच्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. संपादक भीमराव धुळप यांनी आभार प्रदर्शन केले तर संतोष लिंबोरे यांनी सूत्र संचलन केले.                                                             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...