आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

पाणी हेच जीवन..पाणी जपून वापरा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अलिबाग (जिमाका)- सध्या राज्य देश संपूर्ण जग करोना सारख्या भीषण संकटाशी मुकाबला करीत आहे त्याचबरोबर पाणी हीदेखील मोठी समस्या आहे पाणी हेच जीवन असून पाणी जपून वापरा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व जनतेला आज पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे केले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारीतील नावाशेवा टप्पा तीन पाणी पुरवठा योजना भूमिपूजन सोहळा पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु. आदिती सुनील तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, पनवेल महानगरपालिका महापौर डॉ. कविता चौतमोल, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे,  सर्वश्री आमदार बाळाराम पाटील अनिकेत तटकरे, भरत गोगावले महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, पंचायत समिती पनवेल सभापती देवकी कातकरी, ग्रामपंचायत खानावळे सरपंच जयश्री नाईक, ग्रामपंचायत बारवाई सरपंच नियती बाबरे, जेएनपीटी चे अध्यक्ष संजय सेठी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,सिडको डॉ.संजय मुखर्जी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलिस उपमहानिरीक्षक संजय मोहिते, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले पाटील हे उपस्थित होते.

     मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मी आयोजकांना धन्यवाद देतो. कालच मी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून प्रेमाने आणि हक्काने सूचना दिल्या होत्या. एकीकडे मी सांगतोय की,सार्वजनिक कार्यक्रम करू नका आणि आज आपण हा रायगड येथील कार्यक्रम करतोय, पण हा कार्यक्रम जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि मुख्य म्हणजे पाण्याशी संबंधित आहे. 

      मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सर्वप्रथम आरोग्याचे काटेकोर नियम पळून हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले व ते पुढे म्हणाले की,पाणी म्हणजे आयुष्य आहे. विकासाच्या अनेक गोष्टी आपण करतोय. मेट्रोचे कोचेस देशात बनवतो आहोत. उद्या आपल्या राज्यातही हे कोचेस बनतील. अनेक गोष्टी आपण उत्पादित करू शकतो मात्र पाणी आपण बनवू किंवा निर्माण करू शकत नाही हे सत्य आहे. एकदा हे स्वीकारल्यानंतर मग आपल्या हाती असते ते उपलब्ध पाणी कसे जपून वापरू     

       ते म्हणाले की, माणूस

तहान लागली की विहीर खणतो. पाण्याची पातळीही खूप खोल जात आहे. मी जव्हारला गेल्या आठवड्यात गेलो होतो, ते पूर्वी हिल स्टेशन होते आणि पुढेही आपण त्याला चांगले विकसित करणार आहोत. पण पाण्याचे दुर्भिक्ष्य काय असते, ती भीषण वस्तुस्थिती तिथे गेल्यावर पहायला मिळते. परवा नीती आयोगाच्या बैठकीत मी मांडले की, ज्या विकासाच्या मागे आपण लागलो आहोत ते करताना निसर्गाचा ऱ्हास होता कामा नये. कोकणात सुंदर निसर्ग संपदा आहे, दुसरीकडे समुद्र किनारे आहेत पण पर्यावरणाला धोका पोहोचवून केलेला विकास आपल्याला नकोय. प्रदूषणकारी राक्षस आपल्याला परवडणार नाही. हा जीवघेणा विकास आहे. काही विशिष्ट कारखान्यांची खूप आवश्यकताच असेल तिथे लोकसंख्येपासून दूरवर किंवा ओसाड ठिकाणी  त्यांना आवश्यक त्या सुविधा देऊन उभारावेत,  मात्र त्यासाठी

वनसंपदा नष्ट करता कामा नये.

करोनाच्या सुरुवातीच्या काळात सुविधा मिळत नव्हत्या, त्या काळात प्रदूषणाची पातळी खूप कमी झाली होती. आता परत काही दिवसांपासून हवेचे प्रदूषण वाढले आहे. प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार वाढू लागले आहेत, अशी चिंता व्यक्त करून मुख्यमंत्री श्री.ठाकरे पुढे म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील पण पिण्याचे पाणी गावागावात घेऊन जाऊ शकलो नसलो तर काही अर्थ नाही. मंगळावर पाणी सापडले आहे किंवा नाही हे उत्सुकतेने आपण तपासतो पण अगोदर  आपण आपल्याकडील मूलभूत सुविधा आहेत का ते पाहणे गरजेचे आहे. मुंबई  लगतच्या या रायगड जिल्ह्यात लोकसंख्या वाढत आहे, पिण्याच्या पाण्याची सोय आपण नाही केली तर  भविष्यात गंभीर समस्या निर्माण होतील. त्यामुळे हा प्रकल्प वेळेत नव्हे तर वेळेआधी पूर्ण करा, त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असे सांगून केवळ रायगडच नव्हे तर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा आहे, असा निर्धार त्यांनी शेवटी व्यक्त केला.

    उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या मनोगतात म्हणाले की, जगामध्ये यापुढील भांडणे पाण्या साठीच होतील,राज्याराज्यात,

जिल्ह्याजिल्ह्यात,गावागावत पाण्याकरिता वाद होऊ नयेत यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या उपाययोजना करणे, लोकांनी जलसाक्षर बनणे, ही काळाची गरज बनली आहे. करोनाने पुन्हा आपले डोके वर काढले आहे.त्यामुळे सर्वांनीच काटेकोरपणे आपली,आपल्या कुटुंबाची,समाजाची काळजी घ्या.

      जनतेने नियमांचे पालन केल्यास पुन्हा लॉकडाऊनची गरज भासणार नाही,याची काळजी घेण्याची वेळ आली आहे. अनिल देशमुख, जयंत पाटील, सतेज पाटील, छगन भुजबळ करोनाग्रस्त झाले. सध्याच्या परिस्थितीला लोकांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. लोकांमधील भीती करोना विषयीचे गांभीर्य निघून गेले आहे.त्यामुळे परिस्थिती अधिक बिकट बनण्याआधीच आपण सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारीतील न्हावाशेवा टप्पा-3 पाणीपुरवठा योजनेसंबंधी त्यांनी संबंधितांना कामाचा दर्जा उत्तम राखावा, काम वेळेत पूर्ण करावे आणि त्या कामात कुठलीही उणीव राहणार नाही, यासाठी सरकार दक्ष राहील, अशी ग्वाही दिली.

       नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ,महाराष्ट्र शासनाच्या अथक  प्रयत्नामुळे कोविड-19 रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मात्र आता ती पुन्हा वाढत आहे. त्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. केंद्राकडून 40 हजार कोटी येणे बाकी असले तरीसुद्धा जनतेच्या हिताचे आणि राज्याच्या विकासासाठी असलेले प्रकल्प चालूच आहेत. आर्थिक अडचण भासत असली तरी महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणारही नाही. हा प्रकल्प दिलेल्या कालावधीत पूर्ण व्हावा, हीच सर्वांची अपेक्षा आहे. प्रकल्प निर्मितीसाठी येणाऱ्या अडचणींवर मात करून प्रकल्प वेळेत पूर्ण होईल याची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काळजी घ्यावी. प्रकल्प निर्मितीसाठी नगर विकास विभागातून लागणारे सर्व प्रकारचे सहकार्य  केले जाईल. परंतु प्रकल्प वेळेत पूर्ण होईल याची काळजी घ्यावी ,अशी सूचनाही त्यांनी संबंधितांना केली.

    पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मोठमोठी धरणे महाराष्ट्रात उभी केली आहेत. मोरबे धरण हे सुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने उभे केले आहे. न्हावाशेवा टप्पा-3 पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होत असल्याने आनंद व्यक्त केला.

     सर्वप्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या योजनेचे भूमीपूजन संपन्न झाले. तद्नंतर पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे यांनी प्रास्ताविकात या योजनेविषयीची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री प्रधान यांनी केले तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी केले.

    या कार्यक्रमाच्या  यशस्वीततेसाठी सुभाष भुजबळ मुख्य अभियंता, ठाणे, चंद्रकांत गजभिये,अधीक्षक अभियंता पनवेल, दीपाली देशपांडे - सावडेकर,मुख्य प्रशासकीय अधिकारी,मुंबई, प्रशांत भामरे, अधीक्षक अभियंता,मुंबई, प्रल्हाद पांडे, अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) मुंबई, नामदेव जगताप, शाखा अभियंता, रमेश वायदंडे, शाखा अभियंता, पनवेल जी.ए.कुलकर्णी,शाखा अभियंता, पनवेल, डी.आर. अनुसे,शाखा अभियंता,पनवेल,भरत कुमार पवार,शाखा अभियंता, विजय सूर्यवंशी कार्यकारी अभियंता  पनवेल,अर्जुन गोळे, पनवेल, सुरेंद्र भोसले, उप अभियंता यांत्रिकी, के.बी.पाटील,शाखा अभियंता, स्वप्निल सुळे, शाखा अभियंता,श्री.बिर्ला,उपविभागीय अभियंता,माथेरान,सूर्यकांत वाडिले,शाखा अभियंता, पनवेल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, अंकुश खेडकर, संजय पाटील,  सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.पगार, श्री.फरताडे, श्रीमती बिडवे, श्री.हाश्मी, श्री.आकाश पवार या सर्वांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...