आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

विज्ञान शिक्षण - काळाची गरज

 जागतिक विज्ञान दिन निमित्त लेख... 

महाराष्ट्रातील  बीड जिल्ह्यात    शुभम सपकाळचा करणी केल्याच्या संशयावरून खून असो वा  आंध्रप्रदेश चितूर येथील  उच्चविद्याविभूषित  आई वडिलांकडून स्वतःच्या दोन मुलींना   ठार  मारल्याची  घटना असो अशा रोज घडणाऱ्या विविध घटना  जेव्हा आपण वाचतो,  वा पाहतो तेव्हा मनाला  अतिशय वेदना होतात.खरचं आपण 21व्या शतकात आहोत का हा प्रश्न पडतो. माणूस इतका निर्दयी  कसा होतो? त्याला पुढील परिणामाची भीती कशी वाटतं नाही? तथ्यहीन गोष्टीवर कसा विश्वास ठेवतो? साधी पायाखाली आलेली मुंगी  ही आपण मुद्दामहून मारत नाही. येथे तर जिताजागता जीव मारायला  काहीच कसं वाटतं नाही?

    अशावेळी  आपली प्रगती,सारा झगमगाट, तंत्रज्ञान असून काय उपयोग असं  वाटतं. आपण एक लहानगा जीव वाचवू शकत नाही तर काय उपयोग या सगळ्याचा नरबळी, करनी,भोंदूगिरी,पुनर्जन्म ,नवस,भूतबाधा, पैशाचा पाऊस, भानामती असे एक ना अनेक  प्रकार आज ही राजरोसपणे सुरु आहेत. अशावेळी  एक जागरूक नागरिक म्हणून आपल्या सर्वांना  विज्ञानजागृतीच फार  मोठं कार्य करावे लागणार आहे. विज्ञान हे काळाची फार मोठी गरज बनले आहे.वैज्ञानिक दृष्टीकोन समाजात निर्माण व्हावा यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे,डॉ नरेंद्र दाभोळकर  म्हणतात आपण विज्ञानाची  सृष्टी घेतली पण  दृष्टी घेतली नाही.आपण विज्ञान तंत्रज्ञानाने उपलब्ध केलेल्या सर्व सुखसोई घेतल्या त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला  पण आपली मानसिकता,विचार करण्याची पद्धत बदलली  नाही.आधुनिक तंत्र अविष्कार म्हणून आपण घरी संगणक आणतो,विविध  उपकरणे आणतो  आणि कुणाची दृष्ट  लागू नये म्हणून दाराला  लिबू मिरची टांगतो  म्हणजेच आपले हे वागणे दुट्टपीपणाचे  आहे.भारतीय घटनेच्या भाग 4 अ मध्ये कलम 51 अ नुसार नागरिकांची 10 मूलभूत कर्तव्य दिली आहेत

त्यातील प्रत्येक भारतीय नागरिकाने  वैज्ञानिक दृष्टीकोन  जोपासणे  हे एक महत्वाचे मूलभूत कर्तव्य आहे. आपल्या येणाऱ्या पिढीला या बाबत आपण सजग केले पाहिजे.लहानपणापासून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन कसा जोपासता  येईल हा प्रयत्न केला पाहिजे. विज्ञान तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन हा फक्त पाठयपुस्तकाचा भाग न राहता तो आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. आपल्या प्रगतीचा राजमार्ग हा विज्ञानच आहे कारण विज्ञान हे प्रगतीशील आहे  नम्र आहे. त्याला  व्यक्ती, स्थळ,काळ  याचे बंधन नाही त्यामुळे आपणास प्रगतीच्या दिशेने जायचे असल्यास विज्ञानाचा  मार्ग हा उपयुक्त व लाभदायक  आहे.कोणत्याही अतार्किक , बुद्धीला न पटणाऱ्या सांगिवांगीच्या गोष्टीवर किती विश्वास ठेवायचा याचा विचार आपणास केला पाहिजे.ज्याचा पुरावा आहे ज्याचा  अनुभव सर्वांना घेता येतो अशाचा बाबीवर आपल्या

  बुद्धीला पटत असेल तरच विश्वास ठेवला पाहिजे.विनाकारण बुवाबाबाच्या नादी  लागून कर्मवादी बनण्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीवर मेहनतीवर ज्ञानवादी, विज्ञानवादी  बनूया.

श्रद्धां आणि अंधश्रद्धा यात एक पुसटसी   रेष असते  त्यामुळे कधी श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेत होईल हे कळत नाही त्यामुळे नेहमी सजग राहून सारासार विचार करून निर्णय घेतले पाहिजेत. समाजात , शालेय विद्यार्थी,महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यात  वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती,नेहरू विज्ञान केंद्र मुंबई, मराठी विज्ञान परिषद मुंबई, विज्ञान आश्रम पाबळ,अगस्त्य फौंडेशन मुंबई , कल्पना चावला विज्ञान केंद्र कराड या शासकीय वा बिगरशासकीय संस्था जोमाने कार्य करीत आहेत.चला तर आपण स्वतःता पासून सुरुवात करून विज्ञानाला आपला मित्र, मार्गदर्शक, बनवूया.

-प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे,नवी मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...