आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

मराठीच बोलू कौतुके

   


     अमृताशी पैजा जिंकणारी तसेच ज्ञानेश्वर माऊलीने संपन्न व समृद्ध केलेली अशी ही महाराष्ट्राची बोली अर्थात आपली मायमराठी.  ज्ञानेश्वरांनी त्यांच्या साहित्यातून मराठी भाषेचा यथायोग्य गौरव केला आहे.  प्राचीन भाषा म्हणून मराठी भाषेची ख्याती आहे.  अखिल महाराष्ट्राची राज्यभाषा म्हणून मराठी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.  प्रत्येक भाषेचे स्वतःचे असे एक सौंदर्य  असते. स्वतःची एक वेगळी ओळख असते.  याला मराठी भाषाही अपवाद नाही. संतसाहित्य, ललित साहित्य, कथा, काव्य, नाटक इत्यादी विविधांगी साहित्य प्रकारांची महाराष्ट्रात म्हणजेच मराठी भाषेत मोठ्या प्रमाणात रेलचेल आहे. काळाच्या ओघात तावून सुलाखून निघालेले साहित्य व त्या अवीट साहित्याची निर्मिती करणारे शब्दांचे किमयागार तसेच भाषाप्रभू यांची थोर परंपरा आपल्या मराठी भाषेस लाभली आहे.   महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले तसेच शब्द  मौक्तिकांनी सजलेले हे सर्व प्रकारचे साहित्य मराठी भाषेतील कित्येक पिढ्यांना मौलिक मार्गदर्शन करणारे ठरेल याबद्दल शंका नाही.  या सर्व प्रकारच्या साहित्यात प्रकर्षाने तसेच ठळकपणे मनात भरते ते आपले हजारो वर्षांची परंपरा असणारे संतसाहित्य.  रसाळ मराठीचा परिसस्पर्श झालेले असे हे संत साहित्य मराठी भाषेच्या सागरात विहरणाऱ्या साहित्यिकांना दीपस्तंभासारखे मार्ग दाखविणारे आहे.  चपखल तसेच नेमका अर्थ उलगडून दाखविणाऱ्या अर्थवाही शब्दांनी संतसाहित्य उजळून निघाले आहे.  संतसाहित्यानंतर मराठीतील अनेक विचारवंतांनी मराठी अधिकाधिक समृद्ध केली.  त्यानंतर प्रथितयश लेखक-लेखिकांनी आपल्या कथा, कादंबऱ्या, लेख, कविता, प्रवासवर्णन इत्यादी सारख्या साहित्य प्रकरणी त्यात भरच टाकली.  आपल्या मराठी भाषेत इतके ग्रंथ आहेत की कोणत्याही क्षेत्रातील ज्ञान घेण्यासाठी मराठी भाषेतील ग्रंथ सहज उपलब्ध आहेत.  मराठी भाषेप्रमाणेच इतर भाषांतील वाचनीय तसेच अनुकरणनीय  साहित्य प्रथितयश साहित्यिकांनी मराठी भाषेत अनुवादित करून मराठी भाषा अधिकाधिक संपन्न करण्यास हातभार लावला आहे.   इतर भाषेतील साहित्याचा गर्भितार्थ तसाच ठेवून त्यास मराठी सकस भाषेचा मुलामा चढविला आहे असे म्हणणे जास्त उचित ठरेल असे वाटते.  भाषा शब्दप्रभूंनी इतर भाषेतील अजरामर साहित्यकृती अनुवादित करून आपली दर्जेदार व सकस साहित्य वाचनाची भूक वाढवली व वाढवीत आहेत.  अनुवादित  साहित्याबरोबरच  रूपांतरीत साहित्यानीही आपले असे वेगळे स्थान निर्माण केले आहे.  गर्भितार्थ तसाच ठेऊन अस्खलित मराठी भाषेचा साज त्या मूळ साहित्यकृतीवर चढविला. 

       या सर्व गोष्टींमुळे मराठी भाषेला आपला असा एक आगळा वेगळा चेहरा मोहरा प्राप्त झाला आहे.  प्रथितयश साहित्यिकांबरोबरच काही नवोदित साहित्यिकही आपल्या दर्जेदार साहित्याने एक वेगळा ठसा उमटवित आहेत. पिढीनुसार  विचारप्रवाह बदलत जातात.  काळाबरोबर माणसाची विचार करावयाची पद्धत बदलू शकते.  या नव्या वळणाच्या विचाराने प्रेरीत होऊन काही साहित्यिक नित्य नवीन विचारप्रवाह देऊन आपली विचार करण्याची प्रवृत्ती वाढवित आहेत तसेच जरा वेगळा विचार करण्याची मानसिकता निर्माण करीत आहेत.  प्रथितयश साहित्यिकांचे विचार व नवोदित साहित्यिकांचे विचार आपल्याला वाचावयास मिळाल्यामुळे वाचकांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत होऊन साधक बाधक विचार करण्याची प्रवृत्ती जास्त प्रगल्भ होऊ लागली आहे.  इतर भाषांप्रमाणेच मराठी भाषा आपण कशी बोलतो अथवा मराठीत आपण कसे लिखाण करतो यावर त्या भाषेचे  सौंदर्य  अवलंबून असते. लिहिताना किंवा बोलताना आपण जे शब्द वापरतो तसेच कसे उच्चारतो त्यावरून आपण करत असलेल्या विचारशक्तीचे तसेच आपण वाचलेल्या साहित्याचे आकलन होते. आपल्या बोलण्यातून अथवा लिखाणातून आपले शिक्षण आपले संस्कार अथवा आपला विचार करण्याचा आवाका किंवा वैचारिक क्षमता / श्रीमंती याचे प्रतिबिंब दिसत असते.  कठीण व बोजड तसेच कारण नसतांना अलंकारिक शब्द वापरून आपले विचार मांडले तर ते सर्वाना कळतीलच याची ग्वाही देता येणे शक्य नाही.  साध्या सोप्या शब्दांनी नटलेली भाषाच चांगल्या तऱ्हेने ऐकणाऱ्याला आकलन होऊ शकते अथवा असेही म्हणता येईल की सोप्या शब्दांतच मांडलेले आपल्या मनातील विचार समोरील व्यक्तीला चांगल्या तऱ्हेने आकलन होऊ शकतात.  तसे पाहावयास गेले तर लहान मुलांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याचे काम मातृभाषा करते.  मराठी मातृभाषा असणारी व्यक्ती मराठीत जेव्हढी सहजतेने व्यक्त होऊ शकते तेव्हढी दुसऱ्या भाषेत होऊ शकत नाही. 

    बोली भाषा ही नेहमीच सुलभपणे संवाद साधण्यासाठी असते.  साधे सोपे स्वच्छ व सरळ अर्थ निघणारे शब्द योजून केलेला संवाद हा चांगलाच परिणामकारक होऊ शकतो.  नेमका अर्थ ध्वनीत करणारे शब्द वापरून संवाद साधल्यास तो सुसंवादच होतो व त्या योगे आपल्या विचारांचे अवलोकन करण्यास समोरील व्यक्तीस प्रयास पडत नाही. मराठी भाषा बोलतांना / लिहितांना आजूबाजूच्या परिस्थितीचे भान ठेवावे लागते. मराठी भाषेवर इतर भाषांचा प्रभाव पडू लागला आहे इतर भाषांचे आक्रमण होऊ लागले आहे.  मराठी मातृभाषा असूनही मराठी भाषेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.  हे सांगण्याचे कारण एवढेच की आजूबाजूची परिस्थिती मराठी भाषा धार्जिणी असूनही मराठी जास्त बोलले जात नाही किंवा नाईलाजाने बोलले जाते. असेच एकदा मी मराठी पुस्तकांच्या पुस्तक जत्रेला गेलो होतो व सहाजिकच तेथे फक्त मराठी पुस्तकेच होती त्यामुळे साहजिकच सर्वजण मराठी भाषिकच असणार ही अटकळ मी मनात बांधली.   मी पुस्तके बघत असताना एक तरूण मला "एक्सक्युज मी अंकल"  म्हणाला व तरातरा तो माझ्या पुढे गेला.  हे ऐकल्यावर हताश होऊन मी त्याच्याकडे पाहिले पण तो पर्यंत तो पसार झालेला.  मग मी मनात म्हटले की मराठी भाषेवर इंग्रजी भाषेचे अतिक्रमण का होत आहे याचा विचार झाला पाहिजे.  या छोट्या घटनेवरून लक्षात येते की आपली मराठी भाषा आज का क्षीण होत चालली आहे. वास्तविक त्याने हे मराठीतून बोलावयास हवे होते,  पण त्याने इंग्रजीचा आधार घेतला.  इतर भाषा आणि प्रामुख्याने इंग्रजी भाषा बोलता येणे हे वाईट नाही किंबहुना इंग्रजीही लिहिता वाचता आलीच पाहिजे.  इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा असल्यामुळे ती  शिकणे गरजेचे आहे पण मातृभाषेकडे पाठ फिरवता कामा नये.  मराठी मातृभाषा असलेल्या मंडळींनी लक्षात ठेवले पाहिजे की घरात तरी मराठीत बोलून नव्या पिढीच्या मनात मराठी भाषेबद्दल आवड / आदर निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.   मराठी माध्यमांच्या शाळेत सर्व विषयांचे ज्ञान हे मराठीतून दिले जाते त्यामुळे साहजिकच मराठी भाषेचे ज्ञानभाषेत रूपांतर होते.  मोठ्या मोठ्या शिक्षणतज्ज्ञांचे असे मत आहे की कोणतेही ज्ञान मिळवायचे असेल तर ते मातृभाषेत घेतले तर ते ज्ञान घेण्यास अडचणी कमी येतात.  त्यांचे असे म्हणणे आहे की ज्ञान संपादन करण्यासाठी मातृभाषेइतके प्रभावी साधन दुसरे नाही.  

     आपल्या मायमराठीची आजकाल का पीछेहाट होत आहे याची कारणे शोधलीच पाहिजेत.  आम्हाला मराठी नीट येत नाही किंवा आम्हाला मराठी "सो सो च" येतं असे अभिमानाने बोलणारी महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेली व मराठी संस्कृतीत वाढलेली भरपूर माणसे मिळतील. अशी माणसे मराठी भाषेला क्षुल्लक समजतात एव्हढेच नाही तर मराठी भाषा बोलणाऱ्याला गावंढळ तसेच मागासलेल्या जमातीतील समजून त्या व्यक्तीकडे विचित्र नजरेने पहातात.  परदेशातील माणूस महाराष्ट्रात येऊन मराठी शिकतो एवढेच काय तर संस्कृतमध्ये प्राविण्य मिळवतो. यांच्या उलट काही मराठी भाषिक त्यांचे संस्कार, त्यांची जीवनशैली आणि त्यांची भाषा यांचे अंधानुकरण करून स्वतःला कोणीतरी वेगळे समजतो कारण का तर त्यांना मराठी बोलण्याची लाज वाटते.  पश्चिमेकडील काही देशात तिकडची मंडळी शनिवार-रविवार मजा करतात हे पाहून त्यांच्या त्या मजेचे अनुकरण केले जाते पण ते सोमवार ते शुक्रवार जी मेहनत करतात त्याकडे सोयीस्कररीत्या कानाडोळा केला जातो.  आजकाल अशी परिस्थिती आहे की कित्येक वेळा तसेच कित्येक ठिकाणी मराठी मातृभाषा असलेली माणसे एकमेकाला भेटली की ते मराठीत संवाद न साधता हिंदी भाषेत संवाद साधण्यास प्राधान्य देतात.  हे असे का घडते किंवा ते असा का संवाद साधतात किंवा त्यांना मराठीचा एवढा का तिटकारा आहे यावर विचार मंथन झाले पाहिजे.  प्रथम आपण आपली मराठी संस्कृती / भाषा जपली पाहिजे तरच पुढच्या पिढीवर त्याचे परिणाम होतील. हल्ली गुढीपाडव्याला किती जण गुढी उभी करतात किंवा दसऱ्याला किती जण प्रतिकात्मक सीमोल्लंघन करतात हा एक संशोधनाचा विषय होऊ शकेल. आपण आपला मराठी बाणा जपला नाही तर लहानपणी "आकाशात उडणारा काऊ" मोठेपणी "चार पायाचा काऊ"  होईल व गोंधळाला सुरुवात होऊन त्याची परिणीती मराठी भाषेबद्दल अनास्था निर्माण होण्यात होऊ शकत असेल.   मराठीची उपेक्षा करणारी अशी माणसे मराठीचा उपयोग पार्टीत किंवा डिनर घेताना तोंडी लावण्याचा पदार्थ म्हणून करतात व आपण मराठीतूनच बोलले पाहिजे हे इंग्रजीतून किंवा हिंदीतून ठणकवितात थोडक्यात म्हणजे मराठी इझ सच अ गोड लँगवेज, वुई शुड स्पिक इन मराठी.  हे जे तथाकथित मराठी भाषेचे भोक्ते असतात त्यांना आम्हाला मराठीच "सो सो च" येते असे ज्याला त्याला सांगण्यात मोठा अभिमान वाटतो.  अजूनही एका गोष्टीबद्दल विचार झाला पाहिजे की आपल्या मराठीच्या महाराष्ट्रात हिंदी चित्रपट जेव्हढा व्यवसाय करतात त्यापेक्षा कितीतरी कमी प्रमाणात मराठी चित्रपट व्यवसाय करतात.  या व्यवसाय दरीचा पण विचार झाला पाहिजे.  पूर्वी विनोदाने असे म्हटले जायचे की हिंदी चित्रपटाच्या छायाचित्रणाच्या वेळेस जेवणावळीवर जेव्हढा खर्च होतो तेव्हढ्या खर्चात आमचा मराठी चित्रपट तयार होतो.  पण आता परिस्थिती बदलली आहे कारण गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटांनी कात टाकली आहे.  आता मराठी चित्रपटातही भव्यता येऊ लागली आहे.   

     मातृभाषेचा आग्रह धरणे हे चुकीचे नाही असे वाटते.  एखाद्या मराठमोळ्या कार्यक्रमाचा आमंत्रित अमराठी असेल तर त्याने शक्यतो मराठीतूनच आपले विचार लोकांपुढे मांडावेत ही अपेक्षा रास्त आहे.  भले त्याचे मराठी चांगल्या प्रतीचे नसेल पण त्याने कमीतकमी मराठीतून बोलण्याचा प्रयत्न करावा.   इतर राज्यातील लोक त्यांच्या मातृभाषेला जास्त महत्व देतात व समभाषिक एकमेकांना भेटले की ते त्यांच्या मातृभाषेतच बोलतात व त्यांना त्याच्यात अभिमान वाटतो.  पण महाराष्ट्रात मराठीत संवाद साधण्यापेक्षा हिंदी, इंग्रजी भाषांत संवाद साधण्याकडे प्राधान्याने त्याच्याकडे लक्ष दिले जाते व प्रतिसाद दिला जातो पण इतर राज्यात मराठीला तेवढा मान मिळत नाही.  असे का घडते याचा विचार प्रत्येक मराठी भाषिकाने  केला पाहिजे.  माझ्या मराठी भाषेला महाराष्ट्राबाहेर मान का दिला जात नाही या मागची मानसिकता आपण शोधली पाहिजे.  माझ्या माहितीतील एक गृहस्थ दक्षिण भारतात लहानाचे मोठे झाले आहेत पण ते कटाक्षाने मराठी बोलतात.  काही सरकारी आस्थापनांमध्ये सभेचे परिपत्रक मराठीतून काढले जाते पण प्रत्यक्ष सभेत मराठी भाषेवर इंग्रजी व हिंदी भाषा कुरघोडी करतांना दिसतात.   गेल्या काही वर्षांपासून परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की मराठी माध्यमांच्या शाळांकडे तुच्छतेने पाहीले जाते.  घरात मराठी वातावरण असूनही बहुतांशी पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या  शाळेत घालतात.  याचे कारण ते असे देतात की मराठी माध्यमांच्या शाळेमध्ये शिकविले जात नाही, त्या शाळांचा दर्जा फारसा चांगला नसतो इत्यादी.  यात  सर्वात मोठा विनोद म्हणजे हेच पालक मराठीची पीछेहाट होत आहे असा टाहो सरकार दरबारी फोडतात. 

   शेवटी एव्हढेच सांगता येईल की मातृभाषेत बोलण्याची खुमारी ही फक्त मातृभाषेत संवाद साधणाऱ्यालाच कळू शकते. मराठी भाषा ही आपली मायबोली आहे आणि त्यामुळेच मराठी भाषेचा आपण आदर केला पाहिजे.  आपल्या दिनक्रमात याच मराठी भाषेला आपण मनापासून महत्त्व देणे गरजेचे आहे.  मराठी भाषिकच मराठी भाषेला मानाचे स्थान मिळवून देऊ शकतो.  महाराष्ट्रात राहून मराठी बोलणे जेवढे संयुक्तिक आहे तेवढेच मराठी बोलता न येणे हे लाजिरवाणे आहे.  मराठी जतन करणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच मराठी वाढवणेही निकडीचे आहे.  मराठी भाषा बोलणे ही एक कला आहे पण ती सहजसाध्य नाही.  त्यावर प्रेम केले तरच ती साध्य होते. अपरिचिताशी बोलताना हिंदी किंवा इंग्रजी वापरणे ठीक वाटते पण महाराष्ट्रात जन्मलेल्या मराठी माणसाने मराठीचा वापर कटाक्षाने आपल्या संवादात करणे अत्यंत गरजेचे आहे.  मी तर म्हणेन अपरिचितांशी सुद्धा बोलतांना मराठी भाषेतच सुरूवात करावी व तोडके मोडके का होईना त्यास मराठी बोलावयास भाग पडावे.  तसेच महाराष्ट्रात राहण्याऱ्या परप्रांतीयाने देखील  मराठी बोलीभाषा तरी आत्मसात केलीच पाहिजे. कोणतीही भाषा बोलताना चुका होणारच व ते स्वाभाविकच आहे.  मग मराठी भाषा बोलताना चूक झाली तर काहीही बिघडत नाही.  त्या चुकांमधूनच भाषा अवगत होण्यास मदत होते.  या चुकांमधूनच मराठी भाषा विकसित होत असते.  मराठी भाषा बोलताना होत असलेल्या चुका जाणीवपूर्वक तसेच मनापासून सुधारण्याचा प्रयत्न केल्यास फरक पडू शकतो व मराठी चांगले लिहिण्या, वाचण्यास व बोलण्यास येऊ शकते. अलंकारिक शब्दांने भाषेचा गोडवा वाढतो हे जरी खरे असले तरी रोजच्या संवादाच्या भाषेत अलंकारिक तसेच बोजड शब्द वापरावेतच असे काही नाही.   सोपे तसेच सहज आकलन होणारे बोली भाषेतील शब्द वापरूनही आपण आपल्या भाषेत आपले विचार मांडू शकतो व संवादाचा परिणाम साधू शकतो. महाराष्ट्रात स्थायिक असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस मराठी आलीच पाहिजे.  आपल्या मराठीची शान आपणच राखू शकतो व ते आपले प्रथम कर्तव्य आहे.  अशा वेळेस सुरेश भट यांचे शब्द आठवितात 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी'   संत ज्ञानेश्वर यांनी केलेल्या मराठी भाषेच्या कौतुकाशिवाय हा लेखनप्रपंच अपुरा वाटेल.  संत ज्ञानेश्वर म्हणतात - 

माझ्या मराठीची बोलू कौतुके 
परी अमृतातेही पैजा जिंके 
ऐसी अक्षरे रसिक मेळविन 


-मिलिंद कल्याणकर
नेरुळ,नवी मुंबई  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...