आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

आक्षी शिलालेखाचे होणार जतन व येथील परिसराचे होणार सौंदर्यीकरण : पर्यटकांसाठी उभारणार मराठी प्राचीन ग्रंथसंपदेचे विशेष दालन ; मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केली घोषणा

अलिबाग (जिमाका): जिल्ह्यातील आक्षी येथील शिलालेख हा मराठीतील आद्य शिलालेख म्हणून ओळखला जातो. सुमारे १ हजार ९ वर्षांपूर्वीच्या या ऐतिहासिक शिलालेखाचे शनिवारी (ता.२७) मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शिलालेखाचे जतन करण्याची, येथील परिसराच्या सौंदर्यीकरण करण्याची तसेच येथील जिल्हा परिषद शाळेत मराठी प्राचीन ग्रंथसंपदेचे एक दालन उभारण्याची घोषणा केली आहे. 

      या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी आज स्वतः शिलालेखाची पहाणी करीत तात्काळ पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला. मराठीतील हा अनमोल ठेवा जतन करण्याची कार्यवाही लवकरात लवकर सुरू करण्याविषयी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी तसे निर्देश दिले आहेत. रायगड जिल्हा तसेच अलिबाग हेदेखील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. आक्षी येथील समुद्र किनाऱ्यास पर्यटकांची मोठी पसंती असते. यादृष्टीने येथील मराठी प्राचीन शिलालेख व येथील परिसराचा विकास केल्यानंतर तसेच येथील जिल्हा परिषद शाळेत मराठी प्राचीन ग्रंथसंपदेचे दालन उभे केल्यास येथे येणारे पर्यटक देखील या स्थळास भेट देऊन स्वतःच्या ज्ञानात अधिक भर टाकू शकतील, असा विश्वास पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

     आजच्या मराठी भाषा संवर्धन दिनाच्या निमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते या शिलालेखास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, माजी जिल्हा परिषद सदस्य व्दारकानाथ नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी केदार चौलकर, अलिबाग पंचायत समिती विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर सालावकर, देवव्रत पाटील, आक्षी ग्रामपंचायत सरपंच नंदकुमार वाळंज, उपसरपंच आनंद बुरांडे, ग्रामसेवक श्रीहरी खरात, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक उपस्थित होते.

        कर्नाटक राज्यातील श्रवण बेळगोळ येथील बाहुबली गोमटेश्वरांच्या मूर्तीखाली लिहिलेला हा शिलालेख १ हजार ९ वर्ष जुना असून हा मराठीतील पहिला शिलालेख मानला जातो. हा शिलालेख इस १११६-१७च्या दरम्यान कोरला गेला असल्याचे दाखले मिळतात. गंग राजघराण्यातील चामुण्डाराय या मंत्र्याने या गोमटेश्वराची मूर्ती तत्कालीन राणीच्या आग्रहास्तव बनवून घेतली. या मूर्तीखाली एक शिलालेख कोरण्यात आला. त्यात कन्नड, तामिळ आणि मराठी भाषा कोरली गेली. "श्री चामुण्डाराये करवियले, गंगाराये सुत्ताले करवियले" अशा पंक्ती या शिलालेखावर आढळतात. मात्र, रायगड जिल्ह्यातील आक्षी येथे याहूनही जुना एक शिलालेख आढळून आला आहे. ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ.श.गो.तुळपुळे यांच्या संशोधनानुसार हा मराठीतील पहिला शिलालेख असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिलालेखाची निर्मिती शके ९३४ म्हणजे इ.स.१०१२ झाल्याचा स्पष्ट उल्लेख या शिलालेखावर आहे.

     आक्षी येथे खोदकाम करताना सापडलेल्या या शिलालेखावर देवनागरी लिपीत नऊ ओळी कोरण्यात आल्या आहेत. या लिपीवर संस्कृत भाषेचा प्रभाव आहे. पश्चिम समुद्रपती श्री कोकण चक्रवर्ती केसीदेवराययांच्या महाप्रधान भरजु सेणुई याने हा शिलालेख कोरून घेतला असून, महालक्ष्मीदेवीच्या बोडणासाठी दर शुक्रवारी नऊ कुवली धान्य देण्याचा उल्लेख इथे करण्यात आला आहे. शके ९३४ मधील प्रभव संवत्सर अधिक कृष्णपक्षातील शुक्रवारी हा निर्णय घेतल्याचा उल्लेख यावर आहे. तसेच शिलालेखाचे विद्रूपीकरण करणाऱ्याला शापही देण्यात आल्याचा उल्लेख यावर आढळून आला आहे.

     ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ.श.गो. तुळपुळे यांच्या संशोधनानुसार आक्षी येथील पुरातन शिलालेख मराठीमधील आद्य शिलालेख असल्याचे स्पष्ट होते. 

       पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या या शिलालेखाचे जतन होणे गरजेचे असून याबाबत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून चर्चा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाहीस लवकरच सुरुवात होईल. या शिलालेखावरील मजकूरामुळे मराठी भाषा एक हजार वर्षांहून अधिक काळ ‌बोलली जात असल्याचे सिद्ध झाले आहे.

      आजच्या मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्ताने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी समस्त रायगडकरांना शुभेच्छा दिल्या असून आक्षी येथील हा प्राचीन मराठी शिलालेख व या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यास आपण कटिबद्ध असून पर्यटक मोठ्या संख्येने या स्थळास निश्चित भेट देतील, असा विश्वास पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...