आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

सार्थकच्या तेराव्याला अनेकांनी घेतली अवयवदानाची शपथ !

मुंबई : काही निरोप असे असतात की ते डोळ्यांत पाणी आणतात; पण त्याच वेळी माणुसकीवरचा विश्वासही अधिक दृढ करून जातात. माझा भाचा, कै. सार्थक चुंबळकर या अवघ्या २१ वर्षांच्या तरुणाचा, तेरावा विधीही असाच एका वेगळ्या अर्थाने स्मरणात राहिला. सार्थक आज आपल्यात नाही; मात्र त्याच्या जाण्यानंतरही त्याचे अस्तित्व चार व्यक्तींच्या जगण्यात धडधडत आहे. त्याच्या अवयवदानामुळे चार जणांना नवजीवन मिळाले आहे. मृत्यूने हिरावून नेलेल्या आयुष्यानेच दुसऱ्यांच्या आयुष्यात पुन्हा पहाट आणावी, यापेक्षा माणुसकीचे मोठे रूप कोणते असू शकते?
    सार्थकच्या तेराव्या कार्यक्रमानिमित्त चिंचवड येथून अवयवदान आणि देहदान चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत आपटे काका आवर्जून उपस्थित राहिले. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना अवयवदानाच्या चळवळीचे महत्त्व अत्यंत भावपूर्ण शब्दांत मांडले. माणूस मृत्यूनंतरही कोणाच्या जगण्याचे कारण होऊ शकतो, कोणाच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलवू शकतो, कोणाच्या आयुष्यात आशेचा किरण बनू शकतो, हा विचार त्यांनी उपस्थितांच्या मनात रुजवला.
     ‘देह संपतो; पण माणुसकी संपत नाही,’ हा संदेश त्यांच्या संवादातून प्रकर्षाने जाणवला. अवयवदान हे केवळ एक सामाजिक कर्तव्य नसून मृत्यूनंतरही जीवनाला अर्थ देणारे पवित्र कार्य आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
     सार्थकचे पालक ममता आणि दीपक चुंबळकर यांनी आपल्या काळजाचा तुकडा गमावल्याच्या असह्य दुःखातही अवयवदानाचा धाडसी निर्णय घेतला. पालकांसाठी हा निर्णय किती कठीण असेल, याची कल्पनाही करवत नाही. मात्र आपल्या मुलाच्या जाण्याने निर्माण झालेल्या अंधारातून इतरांच्या आयुष्यात उजेड निर्माण करण्याचे मोठेपण त्यांनी दाखवले. म्हणूनच श्रीकांत आपटे यांनी त्यांच्या या निर्णयाचे मनापासून कौतुक केले.
      ‘सार्थक आज आमच्यात नाही, याचे दुःख कायम आहे; पण त्याच्या अवयवांमुळे चार व्यक्ती आज चांगले जीवन जगत आहेत, याचे समाधानही आहे,’ अशी भावना त्याच्या पालकांनी व्यक्त केली. या एका वाक्यात पालकांच्या दुःखाची खोली आणि त्यांच्या मनातील माणुसकीची उंची दोन्ही सामावलेली आहे.
      मुंबई, पुणे आणि विविध ठिकाणांहून सार्थकचे नातेवाईक या वेळी उपस्थित होते. आप्तेष्टांच्या डोळ्यांत सार्थकच्या आठवणी होत्या आणि मनात त्याच्या अकाली जाण्याची हुरहूर. याच वेळी श्रीकांत आपटे यांनी उपस्थित सर्वांना अवयवदानाची शपथ दिली. त्यामुळे सार्थकचा तेरावा केवळ एका तरुणाच्या स्मृतींचा दिवस न राहता, अनेकांनी मानवतेच्या कार्यासाठी घेतलेल्या संकल्पाचा दिवस ठरला.
       यावेळी मी चुंबळकर कुटुंबीयांच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानले तसेच उपस्थितांना ‘हसती दुनिया’ हे प्रेरणादायी आणि वाचनीय मासिक भेट दिले.
     ज्ञानप्रबोधिनी संस्था, पुणे येथील सनातन संस्कृती उपासक तसेच आध्यात्मिक आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या मार्गदर्शक जान्हवी ओक यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘मानवी जन्माचे सार्थक कशात आहे?’ या प्रश्नाभोवती त्यांनी विचारमंथन घडवून आणले. माणूस किती वर्षे जगला, यापेक्षा तो आपल्या जगण्यातून किती माणसांच्या आयुष्याला स्पर्श करून गेला, हे अधिक महत्त्वाचे असल्याचा विचार त्यांच्या मार्गदर्शनातून अधोरेखित झाला.
    नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शाखेचे सचिव सुभाष मुळे हेही समाजाच्या वतीने सार्थकला श्रद्धांजली वाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
       सार्थकचे आयुष्य लहान होते; पण त्याच्या जाण्याने उमटलेला माणुसकीचा अर्थ मोठा आहे. त्याचे हृदय, डोळे किंवा इतर अवयव आज कुणाच्या तरी शरीरात जीवनाची नवी लय निर्माण करत असतील. कुणाच्या घरात पुन्हा हसू उमलले असेल, कुणाच्या स्वप्नांना पुन्हा पंख फुटले असतील.
      म्हणूनच सार्थक संपलेला नाही. तो चार जणांच्या जगण्यात श्वास घेत आहे. त्याच्या स्मृती आता केवळ आठवणींत नाहीत, तर चार नव्या आयुष्यांच्या स्पंदनांत जिवंत आहेत.
   ' मृत्यूने सार्थकला आपल्यापासून दूर नेले; पण अवयवदानाने त्याला अनेकांच्या जगण्यात कायमचे ठेवले. '

गणेश हिरवे
जोगेश्वरी (पूर्व)मुंबई.
मो.9920581878

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गुणवंत कामगारांना एसटी प्रवास व टोलमाफीच्या सवलती द्या ;राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची शासनाकडे मागणी; पुरस्कारप्राप्त कामगारांवरील अन्याय दूर करण्याचे आवाहन

मुंबई : सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रातील संघटना व आस्थापनांसाठी तसेच समाजातील वंचित आणि अपेक्षित घटकांच्या ...