मुंबई : सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रातील संघटना व आस्थापनांसाठी तसेच समाजातील वंचित आणि अपेक्षित घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या कामगारांचा महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत “गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार” देऊन गौरव केला जातो. मात्र पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर या गुणवंत कामगारांना शासनाच्या माध्यमातून कोणत्याही विशेष सोयी-सुविधा किंवा सवलती मिळत नसल्याने हा पुरस्कारप्राप्त कामगारांवर अन्याय असल्याची भावना व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील प्रमुख गुणवंत कामगार एकत्र येऊन “राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र” या सेवाभावी संस्थेची धर्मादाय कार्यालयाकडे अधिकृत नोंदणी केली आहे. गुणवंत कामगारांच्या विविध मागण्या शासन दरबारी मांडणे, त्यांच्या हक्कांसाठी संघटितपणे पाठपुरावा करणे आणि पुरस्कारप्राप्त कामगारांना योग्य सन्मान व सुविधा मिळवून देणे, हा संस्थेचा प्रमुख उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या विविध महामंडळे व विभागांच्या माध्यमातून राज्यस्तरीय पुरस्कार मिळविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना संबंधित विभागाकडून विविध सोयी-सुविधा व सवलती उपलब्ध करून दिल्या जातात. त्याच धर्तीवर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने “गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार” प्राप्त करणाऱ्या कामगारांनाही विशेष सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनने केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा