कोल्हापूर: संघराज फाउंडेशन, सावर्डे (ता. हातकणंगले) यांच्या वतीने कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार ,लेखक/कवी, युवा उद्योजक मा. सतीश दिनकर आडूरकर यांना 'महाराष्ट्र राज्यभूषण पुरस्कार २०२६' देऊन सन्मानित करण्यात आले. औद्योगिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय, अविसमरणीय आणि कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. या प्रसंगी "राज्यभूषण" या गौरवग्रंथाचे शानदार प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
जोगवा मागणाऱ्या पित्याचा मुलगा बनला 'राज्यभूषण'
सतीश आडूरकर यांचा हा सन्मान म्हणजे शून्यातून उभे केलेले एक प्रेरणादायी विश्व आहे. १ जून १९८३ रोजी करवीर तालुक्यातील आडूर गावी एका अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या सतीश सरांचे बालपण मोठ्या वेदनेत गेले. लहानपणीच आईचे छत्र हरवल्याने त्यांचे प्राथमिक शिक्षण आजोळी सावर्डे येथे झाले. त्यांचे वडील देवदासी (जोगती) असल्याने हातात चौंडक आणि डोक्यावर देव घेऊन जोगवा मागायचे. अशा अत्यंत हलाखीच्या आणि गरिबीच्या परिस्थितीत खचून न जाता त्यांनी शिक्षण सुरू ठेवले. पुढे कोल्हापुरात वसतिगृहात शिकत असताना महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. तेथूनच त्यांच्या सामाजिक चळवळीची सुरुवात झाली.
पत्रकारिता, चळवळ आणि मुंबईतील संघर्ष
शिवाजी विद्यापीठातून एम.ए. आणि पत्रकारितेची (D.J.C.J.) पदवी घेतल्यानंतर त्यांनी 'दैनिक पुढारी' आणि 'दैनिक कोल्हापूर न्यूज'मध्ये काम केले, तसेच स्वतःचे साप्ताहिकही चालवले. पुढे आर.पी.आय. (तानसेन ननावरे गट) कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांनी वंचित समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी लढा दिला. वयाच्या २२ व्या वर्षी लग्न झाल्यानंतर संसाराचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. तेथे १०-१० तास कॉल सेंटर आणि मॉलमध्ये नोकरी करत भाड्याच्या खोलीत राहून त्यांनी तीव्र संघर्ष केला. तरीही आपल्या स्वाभिमानाशी व चळवळीशी कधी तडजोड केली नाही. २०१४ मध्ये त्यांनी भारिप बहुजन महासंघात प्रवक्ता म्हणून प्रवेश केला.
दिग्गजांची उपस्थिती
शनिवार, ११ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्याचे उद्घाटन आर.पी.आय. महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सचिव प्रा. शहाजी कांबळे सर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.पी.आय. कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष मा. उत्तम कांबळे (दादा) होते. प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर म.न.पा. परिवहन समिती सदस्य मा. नामदेव सि. नागटिके आणि उद्योगपती मा. विक्रम पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा. डॉ. अर्जुन पन्हाळे, शासकीय अधिकारी शिवाजी देसाई, जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अशोक हातकांगलेकर, ज्येष्ठ साहित्यिक विजय द. बेटम, जंगली महाराज मठाचे सद्गुरु म्हेराजी महाराज, शशिकांत माने, वैणुताई माने, लोकनेते हरिभाऊ कांबळे, दयानंद शिवनातक, अशोक पाटील, सिने अभिनेत्री गीतांजली डोंबे व सरिता साराणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यशस्वी संयोजन
संघराज फाउंडेशन, सावर्डेचे संस्थापक अध्यक्ष व 'राज्यभूषण'चे संपादक प्रा. सुशांत प्रजापती यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे नेटके संयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. डॉ. आनंद हबळे यांनी केले, तर प्रा. स्वाती जंगम, सौ. स्नेहा पेंढे-जकाते आणि प्रा. शीतल कांबळे यांनी सोहळ्याच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. अत्यंत खडतर परिस्थितीतून येऊन समाजात मानाचे स्थान निर्माण करणाऱ्या सतीश आडूरकर यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा