नवी मुंबई: लेखक पत्रकार राजेंद्र घरत यांच्या ब्रेल लिपीतील "जे आवडे लोकांना" या ३३ व्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतील उद्योजक निलेश हांडे यांच्या हस्ते घराडी, मंडणगड येथील स्नेहज्योती निवासी अंध विद्यालयात १९ जुलै रोजी पार पडले. यावेळी विचारमंचावर गायक शरद ननावरे, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता, सामाजिक कार्यकर्त्या मिनल कर्णिक उपस्थित होते.
जे लोकांना आवडते, वरवर सुंदर दिसते तिकडेच सर्वांचा ओढा असतो, हा विषय या पुस्तकात मांडल्याचे लेखक राजेंद्र घरत यांनी आपल्या मनोगतात सांगितले. अंधत्व, व्याधी, कुरूपता कुणालाही नको असते, पण खरी मदतीची, सहकार्याची गरज अशा व्यक्तींना असते असेही घरत पुढे म्हणाले. प्रमुख पाहुणे निलेश हांडे यांनी आपल्या आजोबांनी पेण शहरात नेत्र तपासणी, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया तसेच धार्मिक कार्यात पुढाकार घेतल्याचा दाखला दिला व असे कार्य करायला आपल्यालाही आवडत असल्याचे नमूद करून या अंधशाळेतील विद्यार्थ्यांना पुढेही मदत करू असे आश्वासन दिले. घरत यांच्या ब्रेल लिपीतील पन्नासाव्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासही आपण येथे उपस्थित राहू असेही हांडे म्हणाले. गायक शरद ननावरे यांनी एप्रिल महिन्यात कल्याण येथे सादर केलेल्या मेरी आवाजही पहचान है या कार्यक्रमाच्या उत्पन्नातील ५१ हजार रुपये या प्रसंगी शाळेस मदत म्हणून सेनगुप्ता यांच्याकडे सुपूर्द करतानाच येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही केले. यावेळी मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाने पाठवलेल्या साड्यांचे वितरणही करण्यात आले. मिनल कर्णिक, निलेश हांडे यांनीही विविध भेटवस्तू शाळेच्या मुलांना देऊ केल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा