रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी मुंबईपासून अवघ्या शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या खर्डी गावापासून दहा किलोमीटर अंतरावर तलवाडा आणि शिसवली ही जंगलाच्या मधोमध वसलेली गावे आहेत. तलवाडा येथे प्राथमिक इयत्ता पाचवी पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे. हा भाग अत्यंत दुर्गम असून या ठिकाणी जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही. साडेचार किलोमीटर अगोदर असलेले दहिगाव इथपर्यंत रस्ता आहे. तिथून पुढे फार मोठी कसरत करत तलवाडा या गावी पोहोचता येते. त्या ठिकाणी अत्यंत कुशल असणारे ड्रायव्हर कमांडर जीप आणि टेम्पोच्या माध्यमातून प्रवासाचा थरार अनुभवत ते पर्यंत पोहोचलो.
स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरही भारतामधील असंख्य गावे मुख्य प्रवाहापासून खूप लांब आहेत हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय विश्वास बसत नाही.या ठिकाणी विद्युत पुरवठा रस्ता आणि पाण्याची कुठल्याही प्रकारची सोय नाही. दोन वर्षांपूर्वी मुंबईतील चौधरी मॅडम यांच्या सहयोगातून तलवाडा शाळेच्या ठिकाणी सोलार द्वारे विद्युत पुरवठा केला गेला आणि त्याच ठिकाणी बोरवेल करून शाळेला आणि गावाला काही प्रमाणात पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. तत्पूर्वी लाईट काय असते हे त्या परिसराला माहितही नव्हते. आणि पाणी नदी-ओढ्यांचेच पिले जायचे. आजही साडेचार किलोमीटर चा रस्ता थरारक प्रवास करत आणि जीव मुठीत घेऊन चालत, मोटरसायकल किंवा कमांडर जीप द्वारे या ठिकाणी पोहोचता येते. तलवाडा या ठिकाणाची माहिती मिळाल्यानंतर भांडुप मेडिकोज कम्युनिटी सोसायटीने निर्णय घेतला की आपण त्या ठिकाणी जाऊन वैद्यकीय सेवा दिली पाहिजे. त्याचबरोबर काही समाजसेवी संस्थांद्वारे त्या शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाच्या साहित्याचे जसे बॅट, बॉल, बॅडमिंटन, टेनिस आधी साहित्याचे वाटप तसेच लॅपटॉप-कम्प्युटर, पेन, पेन्सिल्स, वह्या आणि दोन मोठे ग्रीन बोर्ड आणि इतर साहित्य शाळेसाठी उपलब्ध करून देण्यात आले. त्यासाठी भांडुप वरून टेम्पोद्वारे सामान नेण्यात आले. त्याचबरोबर वैद्यकीय शिबिराचे पहिल्यांदाच त्या गावात आयोजन करण्यात आले आत्तापर्यंत कोणीही डॉक्टर त्या गावापर्यंत पोहोचलेला नाही अशी माहिती तेथील शिक्षकांकडून आणि गावकऱ्यांकडून मिळाली. या परिसरामध्ये असंख्य त्वचारोगी आढळले, त्याचबरोबर पाच कुष्ठ रोगांचे निदानही करण्यात आले. आणि अनेकांना मधुमेह आणि रक्तदाब असल्याचे आढळून आले त्याद्वारे औषधोपचार आणि मार्गदर्शनही करण्यात आले. सर्व 83 विद्यार्थ्यांना त्यांचा रक्तगट तपासून भांडुप मेडिकोज कम्युनिटी वेल्फेअर सोसायटी च्या वतीने त्याचे कार्ड बनवून, तेही शिक्षकांकडे देण्यात आले. अशा प्रकारच्या दुर्गम भागात जाऊन काम करण्याचा वेगळाच अनुभव आम्हा सर्व डॉक्टरांना मिळाला. या समयी डॉ. राम शिंदे, संस्थेचे चेअरमन डॉ. ओमप्रकाश दुबे संस्थेचे डायरेक्टर डॉ. सदानंद जाधव, त्वचारोग तज्ञ डॉ. मंजुषा कुरवा मॅडम, तसेच संस्थेचे डॉ. प्रेम सिंग, डॉ. चंदन शहा, डॉ. रवींद्र बिर्ला, डॉ. जयप्रकाश पोळ, डॉ. अमित त्रिपाठी डॉ.जितेंद्र राजमाने, संपदा जाधव मॅडम, लॅब टेक्निशन समिधा शाळेचे शिक्षक पाखरे सर आणि त्यांचे सहकारी, परब साहेब, कोचरेकर, आशा वर्कर्स यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून या सत्कार्यास महत्त्वपूर्ण मोलाची मदत केली. तसेच लायन्स क्लब सेवाभावी संस्था यांनी मदतीचा हात देऊन मोलाचे सहकार्य केले.
तलवाडा गावामध्ये जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते पाचवी असे प्राथमिक शिक्षण दिले जाते. कुठल्याही सुख सुविधा विनाच हे सर्व चाललेले आहे, आणि या ठिकाणी फक्त दोन शिक्षकांच सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करत असतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा