दापोली- जिल्हा परिषद रत्नागिरी आणि पंचायत समिती दापोली शिक्षण विभाग आयोजित दापोली तालुकास्तरीय वार्षिक हिवाळी क्रीडा स्पर्धा नुकत्याच दापोली येथील डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुसज्ज मैदानात मोठ्या उत्साहात पार पडल्या.दोन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन दापोलीचे गट विकास अधिकारी गणेश मंडलीक, गट शिक्षण अधिकारी रामचंद्र सांगडे,कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचिव संतोष सावर्डेकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती दापोली शिक्षण विस्तार अधिकारी बळीराम राठोड,मेघा पवार,सुधाकर गायकवाड,नझीर वलेले तसेच सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते.
पंचायत समिती दापोली आयोजित तालुकास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा गिम्हवणेच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत संचलन केले तर जालगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीमनृत्य तसेच लेझीमनृत्याच्या मनोरंजक कसरती सादर केल्या.याशिवाय तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कर्देच्या विद्यार्थ्यांनी चित्तथरारक लाठीकाठीची प्रात्यक्षिके सादर केली.क्रीडास्पर्धेच्या पहिल्या दिवशी मुलगे सांघिक तर मुली वैयक्तिक तसेच लंगडी सांघिक क्रीडा प्रकार पार पडले तर दुसर्या दिवशी मुली सांघिक व मुलगे वैयक्तिक क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा झाल्या.सांघिक क्रीडा प्रकारांत कबड्डी,खो-खो, लंगडी, क्रिकेट तर वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये धावणे,गोळाफेक, थाळीफेक,लांब उडी,उंच उडी आदी क्रीडा प्रकारांचा समावेश होता.दापोली तालुकास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक क्रीडा प्रकारांतील प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावलेले खेळाडू रत्नागिरी जिल्हास्तरीय वार्षिक हिवाळी क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले असून दापोली तालुक्यातील सर्व शिक्षण प्रभांगांतून उल्लेखनीय नैपुण्य दाखविलेल्या निवडक खेळाडूंचे कबड्डी,खो-खो,लंगडी तसेच क्रिकेट संघ जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सर्व विजेते व उपविजेते संघ तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारांमधील विजेत्या खेळाडूंचा गट शिक्षण अधिकारी रामचंद्र सांगडे,सर्व शिक्षण विस्तार अधिकारी,सर्व केंद्रप्रमुख,शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ट्राॅफी,मेडल, प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गट शिक्षण अधिकारी रामचंद्र सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या दापोली तालुकास्तरीय वार्षिक हिवाळी क्रीडा स्पर्धांचे नियोजन व आयोजन करण्यात आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा