आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

कोमसाप, वसई शाखेचा "वाचू आनंदें" कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांसोबत संपन्न!

वसई: १५ ऑक्टोबर हा प्रख्यात वैज्ञानिक, माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषद, वसई शाखेतर्फे पहिला युवा कट्टा - "वाचू आनंदें" हा कार्यक्रम गुरुवार दि.१६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता न्यू इंग्लिश स्कूलमधील वाचनालय सभागृहात संपन्न झाला.  
      भारुड,लोकगीत,कथा वाचन,कविता वाचन, प्रश्नोत्तरे, आणि खूप खूप बक्षीसे असे कार्यक्रमाचे स्वरूप होते.न्यू इंग्लिश स्कूल जुनिअर कॉलेजच्या प्राचार्या शोभना वाझ यांनी कोमसाप अध्यक्ष व उपस्थित सदस्यांचे स्वागत केले.
कोमसाप वसई शाखेच्या कार्यवाह शिल्पा परुळेकर-पै यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून सदस्या सुषमा राऊत यांच्यासोबत वाचन संस्कृती वर आधारित, पुस्तकांचे व वाचनाचे महत्व अधोरेखित करणारे भारूड सादर केले. त्यानंतर कोमसाप वसई शाखेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी मुलांशी हसत खेळत वाचन संस्कृती कशी जपली पाहिजे, पुस्तकांना कसे आपले मित्र केले पाहिजे याबाबतीत, वाचनसंस्कृतीचे संवर्धन करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. तसेच त्यांनी लिहिलेले व सांगितबद्द केलेले "चल येतेस का फिरावला, तू वसई बंदराला" हे कोळीगीत विद्यार्थ्यांसमोर सादर केले. विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या तालावर गाण्याला साथ दिली. 
     त्यानंतर कवयित्री विशाखा गाळवणकर यांनी विद्यार्थ्यांना विजया वाड यांची प्रेरणादायी कथा ऐकवून मुलांना उत्तम प्रेरणा दिली. सदस्य वीरेंद्र पाटील यांनी त्या कथेवर, तसेच त्यांच्याकडील प्रश्मंजुषा यादीतील प्रश्न विचारून, मुलांशी संवाद साधत कार्यक्रमात अधिक रंगत आणली. अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांचाअतिशय उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. आधी बावरलेली मुलं, संवाद सुरु होताच पाण्यात साखर मिसळावी, तशी कार्यक्रमाशी एकरूप झाली. कार्यक्रम संपल्यावरही मुलं येऊन, भेटून कार्यक्रमाविषयी बोलत होती. कार्यक्रम यशस्वी झाला याची ही पोचपावतीच होती. 
    सदर कार्यक्रमात कोमसापचे खजिनदार सिडनी मोरायस, तसेच श्री.विजय पाटील, सौ.वीणा चाफेकर, श्री.पंकज वर्तक आवर्जून उपस्थित होते. अशाप्रकारे कोमसाप वसई शाखेच्या नवीन कार्यकारिणीचा तिसरा कार्यक्रम संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

स्वागत दिवाळी अंकाचे

स्वागत दिवाळी अंकाचे छायांकित दिवाळी अंक २०२५ (पोस्टमन) मराठी साहित्य क्षेत्रात प्रथमच "पोस्टमन" या विशेष व्यक्तिमत्त्...