मुंबई ( प्रतिनिधी ): एमपीएस अभ्युदय नगर हिंदी शाळेचे प्रशिक्षित शिक्षक श्री. उमेश लहानु भोयर हे सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात गेल्या 17 वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते अत्यंत अभ्यासू, शांत व संयमी स्वभावाचे असून त्यांच्या शिकविण्याच्या कौशल्याने ते विद्यार्थ्यांत अत्यंत प्रिय आहेत. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शाळेत सतत वेगवेगळे व नाविण्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. शिष्यवृत्ती व ऑलिम्पियाड परीक्षा तज्ञ मार्गदर्शक म्हणून शिक्षण विभागात त्यांची विशेष ओळख आहे.   त्यांच्या मार्गदर्शनाखाली मागील शैक्षणिक वर्षात ऑलिम्पियाड स्पर्धेत तब्बल 52 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक मिळाले तसेच 9 विद्यार्थ्यांची झोन स्तरावर निवड झाली होती. 9 फेब्रुवारी 25 ला झालेल्या विक्रोळी मिनी मॅरेथॉन स्पर्धेत 86 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. लोकसहभागातून शाळेसाठी मदत मिळवित असतात. एमपीएस काणेनगर सीबीएसई शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून त्यांनी कार्य केले आहे. आज त्यांचे माजी विद्यार्थी यशस्वीपणे आपली कारकीर्द गाजवित आहेत. त्यांची एक माजी विद्यार्थीनी कु. अमरावती यादव सध्या रशिया येथे एमबीबीएस चे शिक्षण घेत आहे. 
      सोबतच ते सजग नागरिक मंच विक्रोळी चे मुख्य समन्वयक आहेत. जीवाची मुंबई अभियान, नशामुक्ती अभियान, यात त्यांचा सहभाग असतो. तसेच वेगवेगळ्या सामाजिक संघटनांसोबत विविध सामाजिक विषयांवर काम करीत असतात. यासाठी संपूर्ण देशभर त्यांचा संचार असतो. 
      त्यांच्या याच अतुलनीय कार्याची दखल घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने अत्यंत प्रतिष्ठेचा व मानाचा असा 'आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार ' 2024-25 देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. बुधवार दि. 17 सप्टेंबर रोजी वीर जिजाबाई भोसले उद्यान येथे संपन्न झालेल्या आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार वितरण सोहळ्यात मा. अतिरिक्त मनपा आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते सुवर्ण पदक, ट्रॉफी, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला मा. उप-आयुक्त ( शिक्षण ) डॉ. प्राची जांभेकर, मा. शिक्षणाधिकारी श्रीमती सुजाता खरे, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा