कल्याण (सुनिल इंगळे) : डाॅ चंद्रशेखर भारती लिखित 'बोध भारती' या पुस्तकाचे प्रकाशन रविवार दि. २१/०९/२०२५ रोजी कल्याणला झाले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक श्री निरंजन पाटील, साहित्यिक डी.एल. कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या डाॅ सुषमा बसवंत, कथाकार यशवंत बैसाणे, ॲड शंकर रामटेके, उमेश गोटे उपस्थित होते.
सहकार क्षेत्रातील आणि शिक्षक चळवळीतील कार्यकर्ते डाॅ विशाल कडणे यांच्या कार्यास हे पुस्तक अर्पण केले आहे.
याप्रसंगी साहित्यिक निरंजन पाटील म्हणाले, "सध्या जिकडे - तिकडे सोशल मिडियामधून आरक्षण आणि जाती जातीत तेढ निर्माण करण्याचे काम सुरु आहे. निगेटिव्ह वातावरण निर्माण केले जात आहे.अशावेळेस 'बोध भारती' पुस्तक हे सकारात्मक जगण्यावर भर देते. सर्वच भारतीयांबद्दल प्रेम, आदर ,बंधुभाव, ऐक्यभावना यांची प्रेरणा देते. प्रत्येक पान वाचल्यावर आपणास विचार करण्यास प्रवृत्त करते."
डी एल कांबळे म्हणाले, "हे पुस्तक प्रेरणा देते. जो कोणी नैराश्यात असेल त्याच्यासाठी जीवन जगण्याची नवसंजीवनी देते. लेखक डाॅ चंद्रशेखर भारती यांनी पानापानावर सकारात्मक विचार मांडले आहेत." डाॅ सुषमा बसवंत म्हणाल्या, मी वाचनप्रेमी आहे. मी विविध विषयांवरील पुस्तके वाचते. हे पुस्तक हातात पडताच अधाशासारखे वाचून काढले. वाचताना कंटाळा येत नाही. प्रत्येक पान जगण्याचा नवीन दृष्टिकोन देते. वैचारिक पुस्तकातील सर्वाधिक आवडलेले पुस्तक म्हणजे 'बोध भारती' होय."
कथाकार यशवंत बैसाणे म्हणाले, " लेखकाने 'बोध भारती' या वैचारिक पुस्तकातून नवनवीन बोध दिला आहे. हा बोध जगण्याचा वेगळा दृष्टीकोन मांडतो. जीवनाकडे पहाण्याचा नवीन दृष्टीकोन देतो." कवी शाम भालेराव यांनी पुस्तकावर भाष्य करताना म्हटले," पुस्तक वाचनीय झाले आहे.यामागे लेखकाने चांगली मेहनत घेतली आहे.
ॲड शंकर रामटेके यांनी प्रास्ताविक केले.तर कवी उमेश गोटे यांनी खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले. पुस्तकाचे लेखक भारती यांनी आभार मानले. याप्रसंगी लेखक डाॅ चंद्रशेखर भारती यांचा प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी तर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा