26 पेक्षा जास्त अॅप्सद्वारे नागरिकांची फसवणूक
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, AM999 ऑनलाइन गेम्स, मधुर मटका, BETVIBE, LUCKY SPINS, Casinodays, Bluechip, VAVADA, PARIMATCH, 1XBET, Teenpatti, Forex अशा तब्बल 26 हून अधिक अॅप्सच्या माध्यमातून आरोपींनी लोकांना आकर्षित केले. या अॅप्समधून पैसे लावण्याचा मोह पाडून मोठ्या प्रमाणावर व्यवहार करण्यात आले. त्यानंतर नागरिकांकडून उकळलेली रक्कम विविध 'म्युल अकाउंट्स' मार्फत परदेशी कंपन्यांच्या खात्यांत वळवण्यात आली.
322 म्युल अकाउंट्सचा वापर
या गैरव्यवहारात एकूण 322 म्युल अकाउंट्सचा वापर झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. केवळ PARIMATCH अॅपशी संबंधित 500 म्युल अकाउंट्सपैकी 3000 कोटींचा व्यवहार झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. यामुळे या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय स्वरुप अधोरेखित झाले आहे
*मुख्य आरोपी व साथीदारांचा शोध*
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हनुमान मीना (राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील रहिवासी) असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. त्याच्यासह इतर चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पथक कार्यरत आहे. आरोपींच्या बँक खात्यांतून दररोज तब्बल एक लाख रूपयांहून अधिक रकमेचा गोरखधंदा सुरु असल्याचेही पोलिस तपासात उघड झाले.
*आरोपींच्या बँक खात्यांवर लक्ष*
सायबर सेलने उघडकीस आणलेल्या व्यवहारांमध्ये APEXIO Ltd, Payque Solutions, LA PITURA अशा विविध कंपन्यांशी संबंधित खाती आढळून आली आहेत. या खात्यांवर बारकाईने लक्ष ठेवून पुढील चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
*नागरिकांना सायबर सेलचा इशारा*
या संपूर्ण प्रकरणातून ऑनलाइन जुगार व गेमिंगच्या माध्यमातून होणारा फसवणुकीचा धोका स्पष्ट झाला आहे. सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा अॅप्समध्ये सहभागी होऊन पैसे लावणे टाळावे. यामुळे केवळ आर्थिक फसवणूकच नव्हे, तर गुन्हेगारी कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते. कोणालाही संशयास्पद व्यवहार किंवा माहिती आढळल्यास तात्काळ सायबर सेल, रायगड येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा