आज २ ऑक्टोबर. जगाने ज्यांचा आदर्श ठेवलाय अशा दोन हरिश्चंद्र महान व्यक्ती.. महात्मा गांधी आणि श्री. लाल बहादुर शास्त्री यांचा जन्मदिन....
तेव्हा जगाचा इतिहास हा मानवी स्वार्थाने रक्तरंजीत झालेला होता. सतत युद्धच.. पाशवी बळामुळे दुसऱ्याला अंकीत ठेवताना लाखो निरपराध बळी जायचे. या शस्त्र अस्त्र स्पर्धेला.. अत्याचाराला अंतच नव्हता. हे दुष्टचक्र थांबवणार तरी कोण? आणि केव्हा? हे पण समजत नव्हते.
भारतीय स्वातंत्र्यासाठी राक्षसी ब्रिटिशांच्या जुलूमापूढे लढताना जगात प्रथमच एक तत्वज्ञान पूढे आले ते म्हणजे अहिंसेचे. हो.. कारण बदलाभावना आणि हिंसेचा अंतच नाही. हिंसा हे पाप आणि हिंसेला हिंसेने उत्तर देणे हेही पापच..!
तेंव्हा भारत असो वा जगातील कुठलाही देश यामध्ये गरीबी, शिक्षणाचा अभाव, जातीय, धर्मीय, वर्णीय भेदभाव होता. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात स्वातंत्र्यासाठी रणशिंग फुंकले होते. टिळकानंतर स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व मोहनदास करमचंद गांधींकडे आले.
प्रत्येक जीवाचा आत्मा हा पवित्रच. मग मनुष्याच्या अंतरात्म्याला साद घालून मनपरिवर्तनावर गांधीजींचा ठाम विश्वास होता. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी अध्यात्मवादी नवनवे प्रयोग केले. अहिंसेवर एवढा विश्वास की शाब्दिकही हिंसा त्यांना अमान्य होती.
गांधीजींनी सामान्यजनाला निर्भय केले.. विवेक जागृत केला. महिलांना मुख्य प्रवाहात आणले. सकारात्मक स्वावलंबन शिकवले. ग्राम स्वच्छतेचा.. स्वदेशीचा आग्रह धरला. जातीभेद निर्मुलनार्थ कार्य केले. घरीच सुतकताई करुन स्वतः कपडे शिवून लोक स्वदेशी कपडे वापरु लागले. सुतकताईमागे लोकांच्या मनाची एकाग्रता वाढविणे हाही उद्देश होता.
स्वातंत्र्य चळवळीत असहकार.. सत्याग्रह.. उपोषण असे नवे अहिंसक मार्ग दिले. प्रसारमाध्यमांच्या अभावातही गांधीजींच्या शब्दाचा जगभर प्रभाव होता. लाखो लोक मार खात तुरुंगात हालअपेष्टा सहन करायचे. हे जगाने प्रथमच अनुभवले होते. निशस्त्र अहिंसावादी गांधीजींचा प्रभाव एवढा की इंग्रज त्यांना "वन मॅन आर्मी" म्हणत.
गांधीजी आत्म्याला साद घालायचे म्हणून रविंद्रनाथ टागोर त्यांना महान आत्मा अर्थात "महात्मा" म्हणत. वडिलधारे म्हणून ते लोकांचे "बापू" ठरले.तर नेताजी त्यांना राष्ट्रपिता म्हणायचे.
अनेक देशांत स्वातंत्र्य चळवळीत हाच गांधी तत्वज्ञानाचा अहिंसेचा मार्ग अनुसरला गेला. मार्टिन ल्युथर किंग असो वा नेल्सन मंडेला यांनीही हाच मार्ग अनुसरला. शस्त्र अस्त्र स्पर्धेने जगाचे प्रश्न सुटत नाही पण मानवी जीवन संकटात सापडते.. हे जगालाही पटलेय.
प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार असल्याने गांधीजींच्या अहिंसा तत्त्वज्ञानाचे गारुड जगावर आहे. शांतातामय जगासाठी गांधी तत्त्वज्ञान हाच आदर्श रहावा म्हणूनच जगभर त्यांचे पुतळे आहेत.
परंतु हिंदूसाठी गांधी मुसलमानांचा कैवारी, आणि मुसलमानांसाठी सनातन हिंदू.. ब्रिटिशांसाठीही अडचण तर बौद्ध नवबौद्धासाठी हिंदू मुसलमान.., शिखांचा ...? कोणी तुला फाळणीचा अपराधी ठरविणार .. तुझ्यामुळे ५५ करोड वगैरे गेलेत म्हणून फुसाड्या सोडणार .. गोळी घालणार .. तू आहेस तरी कोण ? होतास तरी कोणाचा ?? सरकारी भिंतींचा ?? असो काहीही..
ज्यांनी कायम तुझ्याबद्दल द्वेष पेरला त्यांनाही आज तुला मजबुरीने प्रात: वंदन करावे लागते.. जगातल्या प्रत्येक देशांत तुझे पुतळे उभे आहेत हे तेवढ्याच मजबुरीने घाऱ्या डोळ्यांनी बघावं लागतं.. कधी अज्ञानापोटी आम्हीही तुझी निर्भत्सना केली कारण इतिहासाचा मास्तर तेच सांगत होता.. पण पुढे तुला अधाश्यासारखा वाचत गेलो आणि वाचलो !
हे महात्मा तुला अखंड अनंत अभिवादन !!
लालबहादूर शास्त्री.. भारताचे दुसरे पंतप्रधान हे गांधीचेच अनुयायी. गांधीजींसारखेच साधे राहणीमान. प्रामाणिकता निडरता.. निस्पृहता आणि त्यागी वृत्तीही. शास्त्रीजींच्या नेतृत्वाखाली पाकविरुद्धचे युद्ध जिंकून भारताने इतिहास रचला.
अन्नटंचाईच्या काळात शास्त्रीजींनी आठवड्यात एका सांजेला उपवास करा असे आवाहन देशाला केले. तेव्हा लाखो लोक उपवास करू लागले. एवढा मोठा प्रभाव असणारे आदर्श असे हे शास्त्रीजींचे नेतृत्व. त्यांच्या "जय जवान जय किसान " या नाऱ्याने देशात क्रांती घडली.
जगाला दिशा देणाऱ्या भारत भूमिच्या ह्या महापुरुषांना.. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना विनम्र अभिवादन.
-------------------------------------
✍️नवनाथ ठाकुर-खिडकाळी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा