आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २४ जून, २०२२

देशी वृक्षांची लागवड करा

     मागील काही वर्षात शहरात सिमेंटच्या जंगलाने गर्दी केली आहे. मोठमोठ्या इमारती व टॉवर्स उभे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली आहे. जितक्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली तितक्या प्रमाणात वृक्ष लागवड झालेली नाही. परिणामी पर्यावरणाचे संतुलन बिघडले. त्याचा परिणाम तापमान वाढीवर झाला. तसेच बेसुमार वृक्षतोडीमुळे अनियमित पाऊस, उष्णता अशा संकटांना तोंड द्यावे लागले. यावर मात करण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्र शासनाने वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली आहे. दरवर्षी या मोहिमेअंतर्गत लाखो वृक्षांची लागवड केली जाते. या मोहिमेत शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यलये, विविध सामाजिक व सेवाभावी संस्था, संघटना यांनी हिरीरीने भाग घेतला. नागरिकांनीही आपल्या घराजवळ, बागेत, शेतात, मोकळ्या जागेत, माळरानावर वृक्षारोपण केले. यावर्षीही ही मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येणार आहे. या वृक्षारोपण मोहिमेत परदेशी वृक्ष मोठ्या प्रमाणावर लावण्यात येतात. जास्तीत जास्त देशी वृक्षांची लागवड करणे आवश्यक असताना ज्या परदेशी वृक्षांची आपल्याला आवश्यकता नाही ; त्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. परदेशी वृक्षांमुळे जैव विविधता मोठ्या प्रमाणावर नष्ट होत चालली आहे. त्याचप्रमाणे वाढते तापमान,  वातावरणातील बदल दूर करण्यातही परदेशी वृक्ष अपयशी ठरत आहे. देशी वृक्षांमुळे पावसाचे पाणी भूगर्भात टिकून राहते. विदेशी वृक्षांमुळे जमिनीची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता नाहीशी होते. दुष्काळामागे हे ही एक महत्वाचे कारण आहे.

         
विदेशी झाडांच्या आम्लयुक्त पानांमुळे जमिनी नापीक होत आहेत. विदेशी झाडांच्या फुलांत परागकण नसतात त्यामुळे त्यावर फुलपाखरे किंवा भुंगे यासारखे कीटक येत नाहीत. विदेशी झाडांच्या पानांनी आणि सावलीने जमीन निकृष्ट होत आहे. या वृक्षांच्या फांद्यांचा आणि बुंदयाच्या काही उपयोग होत नाही. विदेशी वृक्षांमुळे रातकिडे, वटवाघूळ, घारी, गिधाडे, चिमणी, कावळे, घुबड, कबुतर, पोपट यासारखे सर्रास दिसणारे पक्षी आता दिसेनासे झाले आहेत.  एकंदरीत अशा विदेशी वृक्षांमुळे होणाऱ्या परागकण प्रक्रियेला आणि पक्षांद्वारे होणाऱ्या बीजप्रसाराच्या  कामाला खीळ बसत असून कीटक, किडे, पक्षी जोडणारी निसर्गाची अन्नसाखळी कमकुवत होत आहे. देशी वृक्ष आपल्या जंगलात किंवा परिसरात पर्यावरणाचा समतोल साधत असतात. त्यांच्या आस्तित्वाशी जुळवून घेतलेली, त्यावर जोपासली जाणारी सजीव व्यवस्था असते.  या  सजीव व्यवस्थेत मनुष्य, पशु - पक्षी, कीटक सामावले असतात. पक्षांना, कीटकांना, किड्यांनाही अन्न आणि निवारा मिळतो. विघटन झालेल्या पालापाचोळ्याच्या खतातून निर्माण होणारी पोषक द्रव्ये पुन्हा वृक्षाकडे पाठवण्याचे काम वृक्षांची दूरवर पसरणारी मुळे करत असतानाच खोलवर जाऊन ती जमिनीवरच्या मातीला धरून ठेवतात. विविध कीटकांना, किड्यांना आणि  सरपटणाऱ्या जीवांना अशी जमीन उपयुक्त ठरते आणि एक परिपूर्ण पर्यावरण निर्माण होते. विदेशी वृक्ष पुरेसा ऑक्सिजनही देत नाहीत. देशी वृक्ष जितका ऑक्सिजन देतात तितका ऑक्सिजन विदेशी वृक्ष देत नाहीत. काही देशी वृक्ष तर चोवीस तास ऑक्सिजन देतात.  वातावरणातील ऑक्सिजन कमी होऊ द्यायचा नसेल तर देशी वृक्षांचीच लागवड करावी लागेल. वड, पिंपळ, कडुनिंब, आवळा, चिंच, फणस, आंबा, बेल, कदंब, पळस या वृक्षांची जास्तीत जास्त लागवड करण्यात यावी. देशी वृक्ष औषधी असतात शिवाय हे वृक्ष मोठे झाल्यास त्याची दाट व थंडगार सावलीही मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त देशी वृक्षांची लागवड करायला हवी.

-श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पवईतील आंबेडकरी चळवळीतील युवा तडफदार धाडसी नेतृत्व हरपले

पवई (प्रतिक कांबळे): पवईतील आय.आय‌‌.टी संकुलात कामास असलेले आंबेडकरी विचारधारेचे युवा तडफदार धाडसी नेतृत्व सदैव समाजकार्य करण्यासाठी तत्पर अ...