आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २ नोव्हेंबर, २०२६

शांतीवन येथील कुष्ठ रुग्णांना मदतीचा हात : युथ कौन्सिल नेरुळचा अभिनव उपक्रम

नवी मुंबई : नेरुळ येथील युथ कौन्सिल नेरुळ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून श्री गजानन महाराज भक्त मंडळ वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल तालुक्यातील नेरे स्थित शांतीवन येथील कुष्ठरुग्णांना दिवाळी सणा निमित्तानं दिवाळीचे गोड फराळ, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, औषधे, जखमांवर बांधण्यासाठी लागणारे ग्वाज कापड शांतीवन येथे दिनांक १.११.२०२६ रोजी स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष जाऊन वाटप करण्यात आले. शांतिवन येथील ‘कुष्ठरोग निवारण समिती'च्या न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी सभागृहात सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठल धोंडीराम बने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर कुष्ठरोग निवारण समिती'चे चेअरमन ॲड. प्रमोद ठाकूर, आर सी एफ विपणन विभागाचे कार्यपालक संचालक एम. रमेश, रामकृष्ण नेत्रालयचे विभागीय विक्री व्यवस्थापक अनुपम दुलगजा तसेच प्रभाकर गुमास्ते, शिवाजी शिंदे, दीपक साळवणकर हेही उपस्थित होते. प्रसंगी पत्रकार राजेंद्र घरत यांच्या ब्रेल लिपीतील पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.
      याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना विठ्ठल बने म्हणाले की, ‘अंध असोत, दिव्यांग असोत, विविध आजारांगी ग्रस्त असोत अशा सगळ्या प्रकारच्या वंचितांना मदत करण्यात अनोखे सुख असते. साधूत्वाचा अंश आपल्यातही असल्याने आपण ते करत असतो व सामाजिक संस्था, मंदिरे ही शक्तीकेंद्रे असल्याने त्यांच्याकडूनही अशा प्रकारचे होणारे काम समाजाला आधारभूत ठरते' म्हणूनच युथ कौन्सिल नेरुळ या संस्थेचे हे सेवाभावी काम आदर्शवत ठरते.
       यावेळी विठ्ठल बने यांच्या हस्ते लेखक पत्रकार राजेंद्र घरत यांच्या हे विरुध्द ते आणि जीवनसे भरी तेरी आँखे या ब्रेल लिपीतील दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. ब्रेल लिपीमुळे अंधांना ज्ञानप्राप्ती शक्य झाल्याचे सांगून याहीपूर्वी आपल्या समाजात अनेक नेत्रहीन व्यक्ती विद्वान होत्या, त्यांनी श्रवणाने ज्ञान मिळवल्याचे बने यांनी सांगितले. या प्रसंगी बने यांचा दोन्ही संस्थांच्या वतीने त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक करिकीर्दीचा शाल, श्रीफल, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
       लेखक राजेंद्र घरत यांनी आपल्या ८० टक्के जाणीवा या डोळ्यांशी संबंधित असल्याचे सांगतानाच ‘युथ कौन्सिल नेरुळ' व 'श्री गजानन महाराज भक्त मंडळा'चे सदस्य आता ज्येष्ठ होत गेल्याने नव्या पिढीच्या शिलेदारांनी समाजसेवेच्या क्षेत्राकडे वळले पाहिजे असे नमूद केले.
       'ज्येष्ठ नागरिक संघा'च्या रणजित दिक्षित यांच्या पुढाकाराने 'रामकृष्ण नेत्रालया'कडून पर्यावरणपूरक अशा ज्यूटच्या १०० पिशव्यांचे वाटप यावेळी उपस्थितांना करण्यात आले. या कार्यक्रमानंतर पार पडलेल्या ‘युथ कौन्सिल नेरुळ' यांच्या ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२६ - २०२९ करिता नव्या कार्यकारिणीत जी. आर. पाटील हे अध्यक्ष, सुभाष हांडे देशमुख मुख्य सचिव व अशोक महाजन यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष हांडेदेशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दत्ताराम आंब्रे, रणजित दिक्षित, रवींद्र कांबळे, अंकुश शिंदे, दिलीप चिंचोळे, अशोक महाजन, रमेश सुर्वे, यशवंत गोणेवाड, जी. आर. पाटील, गोपाळ शिंदे, पी. डी. पाटील, सूर्यकांत गावडे यांनी परिश्रम घेतले.
---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मुंबईत अभिजीत राणे यांच्या शुभहस्ते ‘वर्तुळ’ दिवाळी अंकाचे दिमाखदार प्रकाशन

मुंबई( प्रतिनिधी)- साहित्य, संस्कृती आणि सामाजिक जाणीवांचा सुंदर संगम असलेल्या ‘वर्तुळ दिवाळी अंक २०२६’ चे प्रकाशन रविवार, दिनां...