शहापूर : (विशेष प्रतिनिधी)-मध्य रेल्वे माटुंगा वर्कशॉपमधील आगरी, कोळी, कुणबी आणि भंडारी समाजातील कामगारांच्या 'भूमिपुत्र प्रतिष्ठान' समूहाच्या वतीने नुकताच शहापूर तालुक्यातील दोऱ्याचा पाडा येथील जिल्हा परिषद शाळेत 'दिवाळी... नवीन नात्यांसोबत' हा सामाजिक उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे हे सहावे वर्ष होते.
या उपक्रमांतर्गत शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थीच्या १६४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले, तर परिसरातील २०० माता-भगिनींना भाऊबीज म्हणून साड्या, दिवाळी फराळ व उटणे भेट देण्यात आली. शाळेत पोहोचल्यावर विद्यार्थ्यांनी लेझिमच्या तालावर आणि स्वतः बनवलेल्या आकर्षक पुष्पगुच्छ व ग्रीटिंग कार्ड्स देऊन उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका सौ. शिल्पा तारमळे यांनी स्वागत व मार्गदर्शन केले. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना भूमिपुत्र प्रतिष्ठानचे सदस्य नवनाथ ठाकुर यांनी समूहाच्या विविध सामाजिक कार्याची थोडक्यात माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना एक आदर्श नागरिक बनण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच, प्रतिष्ठानचे दुसरे सदस्य किरण पाटील यांनी आपल्या मनोगतात भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या कार्याचा मूळ हेतू अत्यंत मार्मिक शब्दांत विशद केला.
सौ. भाग्यश्री मडके यांनी कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले, तर सौ. प्राची तावडे यांनी आभार मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ५५ भूमिपुत्र रेल्वे कामगार, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिल्पा तारमळे, सहशिक्षिका सौ. विशाखा नाईक, सौ. रेश्मा घोडे तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि माता-भगिनींचे आशीर्वाद यांमुळे हा सामाजिक बांधिलकीचा सोहळा संस्मरणीय ठरला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा