पारंपरिक व्यवसाय बंद करायचा का? आज अनेक पिढ्यापासून मुंबईचे भुमिपुत्र आगरी कोळी समाज व्यवसाय करीत आहे...आत्ताच का त्रास होत आहे?
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर हे आगरीकोळी, भुमिपुत्र बांधवांनी समृद्ध केलंय. एका बेटावर बसलेली मुंबई जगातील मोठं आर्थिक केंद्र बनलं असून मायानगरी अशी ओळख मुंबईची आहे. मात्र, कधी काळी गावठाणे,कोळीवाडे आणि गिरणी कामगारांची मुंबई म्हणून हे शहर ओळखलं जायचं. मात्र, आता याच मुंबईतून गिरणी कामगार आणि कोळी बांधवांना आपल्यासाठी न्याय मागत भटकावं लागतं. मुंबईतील काही कोळी महिलांना बेस्ट बसमध्ये (BEST) चढू दिलं जात नसल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे. यापुढे आम्हाला बसमध्ये चढू दिली नाही किंवा बस थांबवली नाही तर आम्ही हातात कोयता घेऊन रस्त्यावर उभे राहणार असल्याची भूमिका कोळीन महिलांनी बोलून दाखवली.
दररोज क्रॉफोर्ड मार्केटला जावे लागते, खार दांड्या येथून तिथे जाण्यासाठी एकच बस आहे, तीदेखील वेळेवर येत नाही. मालाडवरुन मच्छी घेऊन आले की रिक्षामध्येही घेत नाहीत. मालाडमधून मच्छी आणताना त्यात बर्फ घालत नाही. मच्छी का बास आता है... असे बोलून आमच्यासाठी नाक मुरडली जात आहेत. बेस्टचे ड्रायव्हरसुद्धा बास्केट बघितली की बस थांबवत नाहीत. मच्छी घेऊन ट्रेनमध्येही आम्हाला चढू दिलं जात नाही. मालडबा रेल्वेचा आहे, त्यातही परप्रांतीय लोक आहेत. आमच्या म्हताऱ्या कोळिनी आहेत, त्या धावत्या बसमध्ये कसे चढणार? असा सवाल कोळीन महिलांनी उपस्थित केला.
कुलाबावरुन वांद्रेला 800 रुपये टॅक्सी घेते, बसने 30-35 रुपये तिकीट आहे, त्यात 15 रुपये मालाचे घेतात 50 रुपयात येता येते पण बस थांबवली नाही की 600 रुपये द्यावे लागतात. आम्हाला एकच बस आहे. त्यामुळे, बेस्टच्या कंडक्टर, ड्रायव्हरने यापुढे आम्हाला बसमध्ये चढू दिले नाही किंवा बस थांबवली नाही तर आम्ही रस्त्यावर उभे राहणार आहोत. आम्ही सगळ्या कोळीन बायका कोयता हातात घेऊ आणि बघतो मग कशी बस नाही थांबवत, अशा शब्दात कोळीन महिलांनी बेस्टविरोधात संताप व्यक्त केला आहे.
महिलांना घेऊन मोर्चा काढणार - निवाटे
दरम्यान, कोळी बांधवांच्या प्रश्नावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक चिंतामणी निवाटे यांनी आपली भूमिका मांडली. बेस्टने भूमिका नाही बदलली तर मी माझ्या कोळी महिलांना घेऊन बेस्टवर मोर्चा काढेल. रितूताई आमच्या कोळी भगिनीवर जो अन्याय होत आहे, त्याला न्याय द्या, असे चिंतामणी निवाटे यांनी म्हटलं. आमच्या महिला सकाळी 4 वाजता धक्क्यावर जातात, जाताना ठीक पण माल घेतल्यावर त्यांना मार्केटमध्ये जायला त्रास होतो. बसेसची फ्रिक्युएन्सी कमी आहे, मच्छी विक्री झाली की घरी येताना बसमध्ये कंडक्टर आणि ड्रायव्हर अडवणूक करत आहे. इतर प्रवाशांना काही त्रास नाही, मग महिला एकत्र येऊन टॅक्सी करून येतात. आता परप्रांतीय दारोदारी जाऊन विक्री करत आहे, मच्छी मार्केटमध्ये विकली जात नाही, त्यात हे सगळे आहेत, असेही निवाटे यांनी म्हटले आहे.पारंपरिक मासळी व्यवसाय बंद केला तर भुमिपुत्र मच्छीमार समाजाला सरकारने पगार द्यावा, किंवा यावर तोडगा काढून द्यावा असा इशारा देण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा