मुंबई (शांताराम गुडेकर ): शिवसेना चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार दिलीप (मामा) लांडे यांनी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील मौजे तांभाड येथे भेट देत दुष्काळी परिस्थिती तसेच पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी सुरू असलेल्या पिक नुकसान पंचनाम्याची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी सुनील जाधव, तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी, निवासी नायब तहसीलदार अरुण कदम, मंडळ अधिकारी मनोज ढवळे, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच सहायक कृषी अधिकारी उपस्थित होते.
पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत आमदार लांडे यांनी पंचनाम्याची प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
तांभाड परिसरातील शेतीची पाहणी करताना त्यांनी पिकांची स्थिती, नुकसानीचे प्रमाण आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची माहिती घेतली. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.यावेळी तांभाड गावातील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार लांडे यांच्या भेटीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा