आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६

नेरुळ येथे ज्येष्ठांनी उत्साहात साजरा केला भारताचा स्वातंत्र्य दिन!

सुभाष हांडे देशमुख : नवी मुंबईतील नेरुळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील, उद्यान परिवाराने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नेरुळ येथील अहिल्याबाई होळकर समाज मंदिराच्या प्रांगणात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करुन प्रार्थना, स्वातंत्र्य गीते गाऊन मोठ्या उत्साहात ७९ वा स्वातंत्र्य दिन आनंदात साजरा केला. आणि भारतमाते बरोबरच स्वतंत्र भारताला, तिरंग्याला मनस्वी मानवंदना दिली. श्री. शेखावत, श्री. सोमेन सरकार आदी वय वर्षे ८० पार केलेल्या ज्येष्ठांनी या सोहळ्यात उस्फूर्तपणे सहभाग घेतला. प्रसंगी उद्यान परिवारातील ज्येष्ठ महिला, ज्येष्ठ नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका श्रीमती मीराताई पाटील यांनी सोहळ्यास उपस्थित राहून आणि ज्येष्ठांशी संवाद साधून कार्यक्रम अधिक अधोरेखित केला.
     डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील, उद्यान परिवारात सर्व धर्माचे, जातीचे, पंथाचे ज्येष्ठ नागरिक दररोज उद्यानात फिरावयास येतात. सर्वजण एकजुटीने एकमेकांची काळजी घेत एकत्रितपणे सर्वांचे विविध सण, वाढदिवस याबरोबरच भारतीय स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन अशा प्रकारचे राष्ट्रीय सणही मोठ्या उत्साहाने एकत्र येऊन वेळोवेळी साजरे करतात. आणि सर्व धर्मसमभाव सांभाळतात. जोपासतात. हे या उद्यान परिवाराचे वैशिष्ट्य असून ते मोठे यशही आहे. कुठल्याही प्रकारचा भेदभाव न मानता संघटितपणे एकत्र येतात. ही खरोखरच कौतुकाची बाब तर आहेच त्याबरोबरच नेरुळ वसाहतीसह इतरांपुढे हा एक आदर्श आहे.
      म्हणूनच या कार्यक्रमात उद्यान परिवारातील सर्वांचेच कौतुक करत ज्येष्ठांची संवाद साधताना श्रीमती मीराताई पाटील म्हणाल्या की, या उद्यान परिवाराच्या प्रत्येक कार्यक्रमास मी जाणिवपूर्वक आवर्जून उपस्थित राहते, कारण आपल्या या परिवारात सांभाळण्यात येणारा सर्वधर्म समभाव, संघटीतपणे एकत्र येऊन विविध प्रकारचे प्रत्येक उपक्रम निरपेक्षपणे सातत्याने साजरे केले जातात. हा नेरुळ वसाहतीतील इतर संस्था, सोसायटी यांच्यासमोर एक आदर्श आहे असे सांगून त्या म्हणाल्या की स्वातंत्र्य म्हणजे फक्त अधिकार नाही तर ती एक जबाबदारी आहे. म्हणूनच आपले कर्तव्य आहे की देशाच्या सर्वांगीण विकासात आपले योगदान देणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, पर्यावरण संरक्षण यासह स्वच्छ सुंदर नवी मुंबई करण्याचा आपण प्रयत्न करुयात. खरे तर हाच आजचा संकल्प असायला हवा. आणि तीच आज आपल्या देशास खरी मानवंदना ठरेल.
      या कार्यक्रमात श्री. सुभाष हांडे देशमुख यांनी सुरुवातीस कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत सर्वांचे स्वागत केले. तसेच परिवारातील जेष्ठ सदस्य श्री. रमेश पै यांचा अमेरिकेहून आलेला शुभेच्छा संदेश विषद केला. ज्येष्ठ महिला श्रीमती सुमन दगडे यांनी खणखणीतपणे भारताच्या स्वातंत्र्यावर भाषण केले तर श्रीमती सारिका वानखेडे, श्रीमती सुनिता थोरवे, श्रीमती स्मिता शिंदे, श्रीमती हृदया कांबळे, श्री. तान्हाजी जाधव, श्री. नारायण लखमानी, श्री. सोमेन सरकार यांनी देशभक्तीपर गीते गाऊन हा सोहळा अधिक प्रमाणित केला.
      श्री. शशी जोशी आणि श्री. जयेश भावसार यांनी योग्य प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करुन सुरेखपणे सूत्रसंचालन केले तर सर्वश्री विजयराव निंबाळकर, किरण तामसे, प्रभाकरराव मिठबावकर, रवि शंकर, संतोष सैद, प्रकाश जांभळे, दत्तात्रय नवले, जयवंत शेलार आदींनी हा स्वातंत्र्य सोहळा कार्यक्रम खूप चांगल्या तऱ्हेने मेहनत घेऊन यशस्वी केला. राष्ट्रगीताने सुरू झालेला हा कार्यक्रम गोड अल्पोपहाराने संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आगरी समाज मंडळ, ठाणे परिसर या संस्थेतर्फे गुणगौरव समारंभाचे आयोजन

ठाणे (प्रतिनिधी ): आगरी समाज मंडळ, ठाणे परिसर या संस्थेतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही "गुणगौरव समारंभ" कार्यक्रम रविवार दि. १६ ऑगस...