अंबरनाथ : ( सुनील इंगळे )२८जून २०२६ रविवार रोजी प्रा. किसन वराडे लिखित "देणे प्रतिभेचे" या गझलसंग्रहाचे अंबरनाथ जि. ठाणे येथे प्रकाशन झाले. बाजीगर प्रकाशनाने प्रकाशित केलेला प्रा. किसन वराडे लिखित देणे प्रतिभेचे गझलसंग्रह सर्वांनी वाचावा असाच आहे. या गझलसंग्रहाला प्रस्तावना डॉ. अविनाश सांगोलेकर यांची लाभलेली असून गझलसंग्रहाची पाठराखण विजय जोशी (विजो) सरांची आहे.
अतिशय सुंदर असा हा गझलसंग्रह रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात तिळमात्र शंका नाही. सामाजिक विषय, वास्तविकता, जे आपण जगलो ते सर्व चित्रण या गझलसंग्रहातून अनुभवता येते. मग ते वेदनेचे असो की सुखाचे असो.. गझल संग्रहात ऐंशी गझला आहेत आणि त्या सर्वांमध्ये गझलकार दिसून येतात. त्यांच भावविश्व जणू त्यांनी त्यातून साकारलेलं आहे.
या सुंदर अशा पुस्तकाचे मुखपृष्ठ कु.अक्षरा पाटील हिने तयार केले.. पुस्तकाचे मुखपृष्ठ मनाचा ठाव घेते इतके बोलके तिने ते साकारले आहे.
आज या सुंदर अशा प्रकाशन सोहळ्याला सत्र १ मध्ये अध्यक्ष म्हणून प्रा.डाॅ अविनाश सांगोलेकर ( आद्य मराठी गझल संशोधक, गझलकार ), उद्घाटक मा. गुणवंत भंगाळे ( शिक्षण संस्थेचा चालक,शिक्षण तज्ञ ), विशेष अतिथी सुप्रसिद्ध कवी अरूण म्हात्रे, प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर, प्रा.संध्या महाजन ( भाषा अभ्यासक, साहित्यिका ), सुप्रसिद्ध कवी गझलकार विजय जोशी, ज्येष्ठ गजलकार प्रकाशक सिराज शिकलगार होते. कार्यक्रमात सुरवातीला मनिषा कोल्हे यांनी 'माही माय सरसोती' ही बहिणाबाईंची कविता सादर केली. तर स्वागतगीतावर कु.प्रचिती वराडे हिने नृत्य सादर केले. प्रास्ताविक विवेक वराडे यांनी केले. प्रकाशन सोहळ्याचे आभार प्रदर्शन डॉ.जयेश वराडे यांनी केले.
जळगाव,विदर्भ ,नाशिक ,मुंबई , पुणे, ठाणे, पालघर, वापी आदी ठिकाणांहून येऊन साहित्यरसिकांनी आपली हजेरी या सोहळ्यास लावली होती. या सुंदर अशा पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन तुषार वाघुळदे, दिपाली कात्रे यांनी केले.
सत्र १ संपल्यानंतर सर्वांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला. सत्र २ मध्ये कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या सत्रामध्ये कविसंमेलन अध्यक्ष कवयित्री राजश्री बोहरा होत्या, तर प्रमुख पाहुणे डॉ. मिलिंद पाटील हे होते. कविसंमेलनात कवींनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या. कवींना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या सत्राचे सूत्रसंचालन कवी प्रल्हाद कोलते , कवयित्री शितल पाटील यांनी केले, नंतर जयेश वराडे यांनी आभारप्रदर्शन केले. गझलकार किसन वराडे यांनी त्यांची पत्नी प्रतिभा वराडे यांना हा गझलसंग्रह अर्पण केलेला आहे . कार्यक्रमाध्यक्ष श्री.अविनाश सांगोलेकर यांनी हा गझलसंग्रह आवर्जून वाचावा,अनुभववावा असे उपस्थितांना आवाहन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा