प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील पेण खारेपाट हा तलावां मधील मत्स्यशेतीसाठी ओळखला जाणारा भाग असून येथे मोठ्या प्रमाणावर मत्स्योत्पादन केले जाते, मात्र या उत्पादनाच्या खर्चात सर्वात मोठा वाटा असणाऱ्या मत्स्यखाद्याच्या वाढत्या किंमतीमुळे स्थानिक मत्स्यशेतकऱ्यांवर आर्थिक ताण निर्माण होत होता, या पार्श्वभूमीवर पेण खारेपाटातील तरुण मत्स्यशेतकरी सूर्यकांत नारायण पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत दिवसाला दीड ते दोन टन क्षमतेचे तरंगणारे मत्स्यखाद्य तयार करणारे मशीन उभारून स्थानिक स्तरावर मत्स्यखाद्य निर्मितीचा अभिनव उद्योग सुरू केला आहे.या उपक्रमामुळे मत्स्यशेती क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा मार्ग खुला होण्याची शक्यता निर्माण झाली असून बाहेरून महागडे कंपनी खाद्य खरेदी करण्याची गरज कमी होईल, तसेच स्थानिक स्तरावरच दर्जेदार व किफायतशीर खाद्य उपलब्ध झाल्यास उत्पादन खर्चात मोठी बचत होऊन मत्स्यशेती अधिक नफ्याची ठरणार आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण खारेपाटातील मत्स्यशेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.
ग्रामीण भागात उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेले धैर्य, नियोजन आणि तांत्रिक दृष्टी या सर्वांचा उत्तम संगम या प्रकल्पातून दिसून येत आहे, आणि यामुळे कृषी पूरक व्यवसायांना चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर, सहायक कृषी अधिकारी सतिष गायकवाड, कृषी सहायक अनंत पाटील, माजी सरपंच श्रीकांत पाटील, जि.प. बांधकाम विभागाचे अधिकारी प्रमोद पाटील, माजी पंचायत सदस्य नंदकुमार पाटील तसेच मोठ्या संख्येने मत्स्यशेतकरी उपस्थित होते, कार्यक्रमा दरम्यान उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत स्थानिक पातळीवर अशा उद्योगांची गरज अधोरेखित केली, तसेच मत्स्यशेती क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्या बरोबरच खर्च कमी करण्यासाठी अशा प्रकारचे प्रयोग अत्यंत उपयुक्त ठरतात असे मत व्यक्त केले, या छोटे खानी पण महत्त्वपूर्ण उद्योगाचे उद्घाटन तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले तर माजी सरपंच श्रीकांत पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला, कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष मशीनची पाहणी करून त्याच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली, तसेच भविष्यात या प्रकारच्या उद्योगातून स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला, ग्रामीण भागातील युवकांनी शेती पूरक उद्योगांकडे वळल्यास आर्थिक स्वावलंबन साध्य होऊ शकते याचे हे जिवंत उदाहरण असल्याचे मत अनेकांनी मांडले.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेअंतर्गत चंद्रकांत नारायण पाटील यांनी “जगदंबा फिश फिड” या नावाने हा उद्योग सुरू केला असून या मागील मुख्य उद्देश म्हणजे स्थानिक मत्स्यशेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे व शक्य तितक्या कमी दरात मत्स्यखाद्य उपलब्ध करून देणे हा आहे, या संदर्भात त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेतून शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव आणि त्यावर उपाय शोधण्याची प्रामाणिक इच्छा स्पष्टपणे दिसून आली, तालुका कृषी अधिकाऱ्यांनीही या उपक्रमाला वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन व सहकार्य देण्याचे आश्वासन दिले असून शासनाच्या विविध योजनांचा योग्य वापर करून ग्रामीण भागात अशा उद्योगांना चालना देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले, या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर मत्स्यखाद्य उत्पादन साखळी उभी राहण्यास मदत होईल तसेच खारेपाटातील मत्स्यशेतीला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, एकीकडे वाढत्या उत्पादन खर्चामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम दिलासा दायक ठरत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात उद्योग धंद्यांची नवी दारे उघडण्याचे कामही होतांना दिसत आहेत, त्यामुळे पेण खारेपाटातील हा प्रयोग आगामी काळात इतर भागांसाठीही आदर्श ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसून येत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा