आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १९ एप्रिल, २०२६

मैत्रीचा सुवर्ण महोत्सव !! ५० वर्ष आयुष्य घडवणारी मैत्री..

     आज अक्षय्य तृतीया. स्वयंसिद्ध मुहूर्त मानल्या गेलेल्या या दिवसाचे महत्त्व मानवी जीवनाच्या प्रवासात खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असेही म्हणतात. आणि या दिवशी दोन व्यक्तींमध्ये मैत्री जोडली गेली तर तीही अक्षय्य राहते, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे माझी व श्री. बलवबीर अधिकारी यांच्याशी झालेली मैत्री. आज गेली पन्नास वर्षे ती अक्षय्य आहे.
      खरे तर! आज ते ८७ वर्षांचे होत आहेत; तर मी ७२ वर्षे पूर्ण करत आहे. तब्बल १५ वर्षांचा वयात फरक. पण आजही तेच प्रेम, भावना, तीच एकमेकां विषयी ओढ, आपुलकी, श्रद्धा अशा सर्व स्तरावर मैत्री टिकून आहे. खरे तर, माझे पालक व गुरु या नात्याने त्यांनी माझ्या जीवनात फार महत्त्वाची आणि मोठी भूमिका बजावली. आणि माझा व्यक्तिमत्व विकास सर्व अंगाने घडवून आणला. कधी आपुलकीच्या प्रेमाने तर कधी रागावून, पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन मला त्यांनी घडवले हे मात्र अगदी खरे.
     असं मानलं जातं की जीवनात अशी काही नाती जुळून येतात जी रक्ताच्या नात्या पेक्षा अधिक घट्ट, अधिक अर्थपूर्ण आणि अधिक टिकाऊ ठरतात. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड या उपक्रमात काम करताना माझ्या आयुष्यात बालबीर अधिकारी यांच्याशी जुळून आलेले नाते म्हणजे माझ्या दृष्टीने अपूर्व गोष्ट ठरली. श्री. बलबीर अधिकारी यांच्याशी जोडली गेलेली मैत्री माझ्या जीवनाचा आधारस्तंभ ठरली.
     मी ग्रामीण भागातून मुंबईत आरसीएफ लि. मध्ये नोकरीच्या निमित्ताने आलो, तेव्हा माझ्यासाठी सर्व काही नवीन, अनोळखी आणि आव्हानात्मक होते. अशावेळी श्री. बलबीर अधिकारी यांच्या सहवासात मी आलो ते केवळ त्यांच्या विचार बांधिलकीमुळे. ते एक व्यक्ती नव्हते तर एक विचार होते. संस्कारक्षम युवा पिढी घडविण्याचा त्यांचा संकल्प होता.. सेवाभावाचा, समाजासाठी झिजण्याचा आणि माणूस घडविण्याचा.. बुद्धिवान व्यक्ती तयार करण्याऐवजी चांगला नागरिक बनविण्याचा.
     श्री. बलबीर अधिकारी हे आरसीएफ मधील युथ कौन्सिल या सेवाभावी संस्थेच्या संस्थापकांपैकी एक होते. ग्रामीण भागातून कंपनीत नोकरीच्या निमित्ताने आलेल्या युवकांना नोकरी सांभाळून विधायक कार्यात त्यांना सामावून घेणे हे संस्थेचे ध्येय होते. युथ कौन्सिलच्या माध्यमातून विविध स्तरावर त्यांनी समाजहितासाठी जे जे उपक्रम राबविले होते, राबवत होते त्याचा प्रभाव माझ्यावरही खोलवर झाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी केवळ काम शिकलो नाही तर मला जीवन जगण्याची दिशा मिळाली. व्यक्तिमत्व विकास, श्रमदान, शिस्त, कष्ट, पडेल ते काम करण्याची तयारी आणि समाजाप्रती बांधिलकी या सगळ्या मूल्यांची जाणीव त्यांनी माझ्या मनात रुजवली. वर सांगितल्याप्रमाणे आज मी ७२ वर्षांचा आहे आणि ते ८६ वर्षांचे आहेत. पण आमच्या मैत्रीतील उब तेवढीच ताजी आहे. अगदी कौटुंबिक स्तरावरही ती आबादीत आहे. आयुष्यातील प्रत्येक सुखदुःखात आम्ही एकमेकांसोबत उभे राहिलो. काळ बदलला, परिस्थिती बदलली, वास्तव्याची जागा बदलली, सेवानिवृत्त झालो पण आमच्या मैत्रीची नाळ कधीच तुटली नाही. पन्नास वर्षे ही केवळ एक संख्या नाही... ती एक प्रवास आहे.. आठवणींचा, संघर्षाचा, शिकण्याचा आणि एकमेकांना समजून घेण्याचा. माझ्या जीवनात अनेक कटू प्रसंगही आले. खूप संघर्ष आला पण या जीवनाच्या प्रवासात, कठीण प्रसंगी श्री. अधिकारी माझ्या मागे पहाडासारखे उभे राहिले. त्यांनी मला उभे केले आणि जीवनाचा खरा अर्थ समजावून दिला.
     आज या सुवर्णक्षणी मनात एकच भावना दाटून येते... कृतज्ञतेची. मुंबई सारख्या मोहमयी महानगरीत आल्यावर अशा मित्राची साथ लाभणे हे माझे भाग्यच आहे. नोकरीत असताना आणि आत्ताही त्यांच्या सहवासात घालवलेले व घालवले जात असलेले क्षण माझ्यासाठी अमूल्य आहेत. म्हणूनच गेली पन्नास वर्षे सर्वार्थाने, एवढ्या आपुलकीने टिकलेली मैत्री दुर्मिळच... असं म्हटलं तर वावगं ठरु नये. आरसीएफ परिवार माझा आहे आणि मी आरसीएफ परिवाराचा एक भाग आहे. माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत या परिवाराचाही वाटा आहे. म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने हे आपल्याशी शेअर करावसं वाटलं...
धन्यवाद.

सुभाष हांडे देशमुख
एक सेवानिवृत्त कर्मचारी आरसीएफ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मैत्रीचा सुवर्ण महोत्सव !! ५० वर्ष आयुष्य घडवणारी मैत्री..

     आज अक्षय्य तृतीया. स्वयंसिद्ध मुहूर्त मानल्या गेलेल्या या दिवसाचे महत्त्व मानवी जीवनाच्या प्रवासात खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. धार्म...