या शिबिरामध्ये डॉ. रविंद्र गोसावी जनरल फिजिशियन संचालक – सिद्धिविनायक केअर सेंटर, नवी मुंबई यांनी विद्यार्थ्यांना तंबाखू, गुटखा, सिगारेट व इतर नशायुक्त पदार्थांच्या सेवनामुळे शरीरावर होणारे गंभीर दुष्परिणाम सविस्तर समजावून सांगितले.
गुटखा व तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कर्करोग, जबडा न उघडणे (Oral Submucous Fibrosis), दातांचे विकार, दात पिवळे पडणे, तोंडाला दुर्गंधी येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. सिगारेटमुळे फुफ्फुसांचे विकार, हृदयरोग, स्ट्रोक, नपुंसकत्व तसेच विविध प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
तसेच सतत एनर्जी ड्रिंकचे सेवन, फास्ट फूड व जंक फूड यांमुळे लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब वाढणे अशा समस्या निर्माण होतात. मुलींमध्ये PCOD व मासिक पाळीतील अनियमितता यांसारख्या समस्या वाढण्याची शक्यता असल्याचेही मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी एका सुरात “मी कोणत्याही प्रकारची नशा करणार नाही आणि इतरांनाही नशेपासून दूर राहण्यास प्रवृत्त करेन” अशी सामूहिक शपथ घेतली. “माणसाचे मन व शरीर आपल्या सवयींचे गुलाम असते. त्यामुळे चुकीच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका. आजची सवय उद्याचा आजार ठरू शकते,” असा प्रेरणादायी संदेश डॉ गोसावी सरांनी विद्यार्थ्यांसाठी दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक जागरूकता निर्माण झाली असून शाळा प्रशासनाने या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले.
डॉक्टर रवींद्र गोसावी यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरासाठी नवजीवन हिंदी विद्यालयाचे मुख्य अजीम सर, मनोज सर अश्फाक सर, विभाग प्रमुख चंद्रकांत भोसले साहेब, गजानन इंगळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा