मुंबई: (प्रतिनिधी) लोकशाहीर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची कर्मभूमी असलेल्या घाटकोपर येथील चिराग नगर परिसराला नुकतीच राज्य गुणवंत कामगार असोसिएशन चे मुंबई जिल्हाध्यक्ष व गुणवंत कामगार डॉ. प्रभाकर तुकाराम कांबळेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली. या भेटीदरम्यान अण्णाभाऊंच्या ऐतिहासिक निवासस्थानाची पाहणी करण्यात आली आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
याप्रसंगी टिळक नगर येथील सर्वोदय बुद्ध विहार व सर्व समाज सेवा संघाचे अध्यक्ष भंतेजी धम्मराज आणि ज्येष्ठ समाजसेवक व अण्णाभाऊ साठे यांचे जवळचे स्नेही शहाजीराव थोरात प्रामुख्याने उपस्थित होते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी चिराग नगरच्या मातीत राहून आपल्या अजरामर साहित्याची निर्मिती केली. त्यांच्या घराची पाहणी करताना त्या काळातील संघर्षाच्या आठवणींना गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे यांनी उजाळा दिला . असून भंतेजी धम्मराज यांनी अण्णाभाऊंच्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या समतावादी विचारांची आजच्या काळात गरज असल्याचे सांगितले.
ज्येष्ठ समाजसेवक शहाजीराव थोरात यांनी अण्णाभाऊंच्या कर्मभूमीचे जतन करून हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.या भेटीमुळे चिराग नगर परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अण्णाभाऊंच्या घराची दुरावस्था झालेली असून राज्य सरकारने लवकरात लवकर राष्ट्रीय स्मारक उभे करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत , अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा