मुंबई(रवींद्र मालुसरे ):जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते. मराठी या मुख्य भाषेशी नाते कायम ठेवलेली, तिची बोलीभाषा दर १२ कोसांगणिक उच्चारांत, शब्दसंग्रहांत, व वाक्प्रचारांत बदलत रहाते. मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती एक संस्कृती आहे. तिच्या मातीत असंख्य उपभाषांचे, बोलींचे रोप बहरलेले आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यांत बोलीभाषांचे वैविध्य आढळते. बोली भाषेतील विविधतेमुळे मराठी भाषेची ताकद वाढली असून तिचे सौंदर्य अधिक खुलले आहे. या बोलीभाषांमधील साहित्य, लोकसंस्कृती, गाणी, नाटकं, प्रवचनं यांनी मराठीला अधिक व्यापक आणि जिवंत बनवले आहे. मराठी भाषा ही समुद्र आहे तर तिच्यात मिसळणाऱ्या बोलीभाषा या विविध नद्यांप्रमाणे आपले भाषिक सौंदर्य तिच्यामध्ये कायम मिसळत राहते. हा ओघ असाच कायम असणे खूप गरजेचे आहे. शब्दांचे वैशिष्ट्य, शब्दांचा गोडवा, शब्दांचे अर्थ, त्याची आशयघनता, काळाच्या गतीमध्ये लुप्त होऊ नये.मराठी भाषेच्या अनेक बोलीभाषा आहेत, ज्या भौगोलिक प्रदेशानुसार बदलतात, जसे की विदर्भात वऱ्हाडी, नागपुरी; कोकणात मालवणी, कोकणी, आगरी; पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुरी, पुणेरी; आणि खानदेशात अहिराणी, खानदेशी यांसारख्या बोलीभाषांचा समावेश होतो, ज्या शब्दसंग्रह आणि उच्चारात वेगळेपण दर्शवतात पण लेखनात प्रमाण मराठीचा वापर होतो. आजही मराठी भाषेच्या जडणघडणीत या बोलीभाषांचा मोलाचा वाटा आहे. बोलीभाषांचे संवर्धन आणि त्यांचे लेखन-साहित्यिक योगदान पुढे नेणे, हे मराठी भाषेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे.
मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत कामगारनेते वसंतराव होशिंग स्मृती राज्यस्तरीय लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचा विषय "माझ्या बोलीभाषेची महानता आणि मराठी भाषेतील योगदान" हा विषय असून शब्दसंख्या १५०० आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी स्व-बोलीभाषेचा अधिकाधिक वापर करून मराठी साहित्य आणि चित्रपट-नाट्यकलाकृतील योगदानाचा सविस्तर आढावा घेऊन हा लेख लिहून पाठवावा. लेख सुवाच्च अक्षरात लिहून किंवा देवनागरी फॉन्टमध्ये टाईप करून ९१६७३६४८७० यावर दिनांक ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पाठवावा, पारितोषिक वितरण समारंभ कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा दिवस साजरा करण्यात येणार त्या कार्यक्रमात होणार आहे असे आवाहन स्पर्धा प्रमुख सुनील कुवरे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा