दिवाळी सण साजरा करत असतांना, फराळाचा आनंद घेत असतांना वाचकप्रेमींसाठी दिवाळी अंक ही देखील मेजवानीच ठरते. दिवाळी अंक हे दिवाळी सणाची शान ठरते म्हणून दरवर्षी अनेक नवनवीन दिवाळी अंक वाचकांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करतात. गेल्या दहा बारा वर्षांपासून मुंबईतील 'जाॅय आँफ गिव्हिंग' या सामाजिक संस्थे मार्फत राज्यभर अनेक सामाजिक ऊपक्रम राबविले जातात. जाँय आँफ गिव्हिंग चे अध्यक्ष गणेश हिरवे यांच्या संकल्पनेतून या वर्षी 'जाॅय आँफ गिव्हिंग' २०२५ हा दिवाळी अंक वाचनप्रेमींसाठी ऊपलब्ध झाला आहे. नवी मुंबईतील लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते वैभव पाटील हे या दिवाळी अंकाचे संपादक असुन, गणेश हिरवे कार्यकारी संपादक आहेत. समाजातील सर्व वाचकवर्गाची आवडनिवड लक्षात घेऊन या दिवाळी अंकात विविध विषयांवरील लेख, कथा, कविता, प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक आरोग्याचे महत्व, समाजातील व्यसनाधीनता, ब्रम्ह विद्या आरोग्य आणि यशाची गुरुकिल्ली हे आरोग्य विषयक लेख, स्त्री एक भावनिक व्यवस्थापक हा संसार विषयावरील लेख, हमेशा तुमको चहा हा चहा विषयावरील लेख तसेच प्रदीप पाटील यांच्या कविता आणि शेती विषयक लेख, त्याच बरोबर वास्तुशास्त्र हा लेख, या मुलांना या कळ्यांना, विद्यार्थ्यांमधे वाचन वाढीसाठी हे शिक्षण विषयक लेख त्याच बरोबर पर्यटन विषयावरील माझा अमेरिका प्रवास, अमेरिका आँस्ट्रेलिया भारत, तिर्थाटन पर्यटनाची देवभुमी - ऊत्तराखंड हे लेख, अर्थ व्यवस्थापन या विषयावरील वैयक्तिक अर्थ नियोजन कसे करावे, त्याच बरोबर पर्यावरण, अध्यात्म, निसर्ग, पाऊस, पाणी अशा अनेक विषयांवरील लेख या दिवाळी अंकात आहेत.सांग कसे होऊ ऊतराई हा लेख वाचनीय आहे. नावातच' देण्यात आनंद' हे सार्थ नाव असलेला 'जाॅय आँफ गिव्हिंग-२०२५' हा दिवाळी अंक वाचकांच्या पसंतीस नक्कीच ऊतरणार आणि वाचकांचा ऊस्फुर्त प्रतिसाद या दिवाळी अंकाला नक्कीच मिळेल.
अनंत बोरसे
स्तंभ लेखक, पत्रकार
शहापूर जिल्हा ठाणे
९१५८४९५०३७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा