मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीतील रस्त्यांवरील खड्डयांमुळे या पावसाळ्यामधे पाच जणांचा मृत्यू झाला म्हणून राजू ठक्कर या वकिलाने उच्च न्यायालयामधे अवमान याचीका दाखल केली होती. मागच्याच आठवड्यात या याचिकेवर सुनावणी झाली, त्यामधे न्यायमूर्ती रेवती मोहिते - डेरे व न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने महापालिका व अन्य प्राधिकरणांवर कठोर शब्दात ताशेरे ओढले व जाब विचारला. खड्डयांवरुन अक्षरश: खरडपट्टी काढली.
वर्षानुवर्ष सुस्थीतीमधे राहिलेल्या रस्त्यांची गेल्या काही वर्षांपासून एकाच पावसात चाळणी कशी होते ? खड्डे कसे पडतात ? त्या रस्त्यांवर मृत्यू झालेल्यांची जबाबदारी कोण घेणार ? कुटूंबांतील एखाद्याचा मृत्यू झाला तर संपूर्ण कुटुंबाच्या उपजीविकेवर त्याचा परीणाम होतो. खड्डयांमुळे कमावती व्यक्ती गमावली जाते. अशांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यास महापालिकेने तयार राहावे. असे खडसावले व पुढच्या तारखेला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न्यायालयामधे हजर राहून उत्तर द्यावे असे फर्मान काढले.
मृत्यू मुंबईमधे झाले म्हणून त्या मृत्यूंची तातडीने दखल घेतली गेली. भिवंडी - वाडा - मनोर या महामार्गावर झालेल्या शेकडो मृत्यूची दखल कोण घेणार ? बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना भरपाई कोण देणार ? बळी गेलेल्यांची कुटूंब अक्षरश: उघड्यावर पडलीत. घरातील कमावती व्यक्ती मृत्यू पावल्याने वा कायमची जायबंदी झाल्याने त्या कुटूंबीयांवर काय वेळ येते ? याचा विचार कोण करणार ? या महामार्गावर शासनाला अद्याप किती बळी हवे आहेत ? हा रस्ता सुस्थीतीत कधी होणार ? असे प्रश्न सामान्य नागरीक विचारत आहेत. रोज संताप व्यक्त करत आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी तोंड फोडून शिव्या देतो. त्यांचा आत्मा तळमळतोय तरीही शासनाला जाग येत नाही, हे विशेष.
बुधवार दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी अवघ्या १९ वर्षाच्या स्मित हेमंत पाटील ( रा. पिक, ता. वाडा ) या तरुणाचा याच रस्त्यावर खुपरी गावाजवळ अपघात झाला. या अपघातामधे त्याचा जागीच मृत्यू झाला. घरातील एकुलता एक मुलगा. त्याचा अवघ्या १९ व्या वर्षी मृत्यू होणे हे कुटुंबीयांवर कोसळलेले खूप मोठे संकट आहे. मात्र त्या संकटाशी भ्रष्ट अधिकाऱ्यांना व लुटारू ठेकेदारांना काहीही देणं - घेणं नाही. त्यांचा संबंध फक्त बोगस बिलांशी. हे अधिकच संतापजनक आहे. प्रेतांच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखं आहे. म्हणूनच आत्ता उठाव करण्याची वेळ आली आहे. हा महामार्ग जो पर्यंत सुस्थीतीमधे येत नाही, तोपर्यंत आणि या रस्त्यावर ज्यांनी - ज्यांनी बोगस बिलं काढलीत त्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत, आंदोलन सुरू ठेवायला हवे. तरच निष्क्रिय शासनाला जाग येईल. नाहीतर आपल्याला फक्त मृत्यूंची संख्याच मोजत बसावी लागेल.
•शरद यशवंत पाटील
पत्रकार, वाडा,
जि. पालघर
(M) 8600001111
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा