आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ९ सप्टेंबर, २०२४

ऋषिपंचमी व्रतः खिडकाळी गावात ठाकुर कुटुंबात ५० वर्षापासूनची कौटुंबिक परंपरा

खिडकाळी गावात ठाकुर कुटुंबात गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी कवी नवनाथ ठाकुर यांच्या घरी ऋषि पंचमीचे व्रत करण्याची कौटुंबिक परंपरा आहे. आज रविवार दि. ०८/०९/२०२४ रोजी कवी नवनाथ ठाकुर-खिडकाळी यांच्या घरी २५-३० महिलांनी एकत्रित येऊन ऋषि पंचमी व्रत यशस्वीपणे संपन्न केले.
    ५० वर्षापासूनची ऋषिपंचमी व्रत परंपराः 
कवी नवनाथ ठाकुर यांच्या आजी कै.श्रीमती नामीबाई शिवा ठाकुर तसेच कै.श्रीमती आणीबाई शंकर पवार, कै.श्रीमती नागूबाई राघो पवार यांनी ऋषि पंचमी व्रताची परंपरा सुरू केली. त्यानंतर श्रीमती मैनाबाई जानू ठाकुर, श्रीमती अणूबाई बळीराम ठाकुर, श्रीमती देवकुबाई एकनाथ ठाकुर या तीन जावांनी ही परंपरा टिकून ठेवली. आजतागायत ही परंपरा सुरू आहे. ऋषि पंचमी व्रताचे सुत्र आता यांच्या सूना, नणंद व लेकी यांच्या हाती सोपाविले आहे. ऋषिपंचमी व्रत हे श्रध्देने केले जाणारे व्रत आहे.
        ऋषिपंचमी व्रताचे महत्त्वः
ऋषिपंचमी भाद्रपद शुक्ल पंचमीला येते.हे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आहे. हे व्रत स्त्रीयांनी अवश्य करावे तसेच पुरूषांनीही करावे.कारण ऋषि हे मानवी जीवनाचे शिल्पकार आहेत. सुखी व आनंदी मानवी जीवनासाठी ऋषिंनी हजारो वर्ष तप केले. ते द्रष्टे होते. त्यांची संसाराच्या पलिकडे बघण्याची दृष्टी होती.
ऋषति गच्छति संसारपारं दर्शयति इति ऋषिः।
     हे व्रत केल्याने स्त्रीया रूपसौंदर्याने युक्त होतील, पुत्रपौत्रादि संतति संपन्न होऊन सर्व सुखाचा उपभोग घेतील,असे ईश्वरी वचन आहे.
 भगवान श्रीकृष्ण म्हणतात-'जी स्त्री हे व्रत आचरण करते. तिला सर्व सुखे प्राप्त होतात.उत्तम रूप तसेच लावण्यहि तिला मिळते.मुलगे,नातू,पणतू इत्यादीकांनी तिचे घर भरून जाते.पुरूषांनाही संपत्ति व किर्ती प्राप्त होते.त्यांच्या सर्व इच्छा प्राप्त होतात.शिवाय ही कथा पठण श्वण करणाऱ्यांचे सर्व प्रकारचे कल्याण होते.'
     हे व्रत अशाप्रकारे केले जाते.
मध्यान्ही नदीवर किंवा विहिरीवर जाऊन प्रथम आघाडा वनस्पतीच्या सात काड्या चावून दांत घांसावे. नंतर देहशुध्दिसाठी गाईचे शेण किंवा गोमय माती, आवळकाठी,तीळ,अंगाला लाऊन स्नान करावे.धूतवस्त्र नेसून घरी यावे.
   पूजेचे ठिकाण स्वच्छ करावे. एक पाट ठेऊन सभोवती रांगोळी काढावी.पाटावर ओळीने आठ तांदुळाच्या चौकोणाकृती तयार करून कृश्यप,अत्रि,भरद्वाज,विश्वामित्र,गौतम,जमदग्नि,वसिष्ठ आणि साध्वी अरूंधती यांच्या नावाने त्या तांदळावर एक एक सुपारी ठेवावी.
     बाजूला तांदूळ घेऊन त्यावर एक सुपारी गणपती म्हणून ठेवावी.घरच्या देवाला,कुलस्वामीनीला नमस्कार करून पूजेला बसावे. पंचगव्य घेऊन संकल्प करावा.नंतर गणपती पूजन,कलश पूजन अशाप्रकारे मंत्र बोलून षोडशोपचार पूजन करावे. ऋषिपंचमी व्रतकथा वाचन व श्रवण करावी. नंतर बैलाच्या कष्टाशिवाय तयार झालेल्या वनस्पती,पालेभाज्या,कंद,मुळे यांनी मिश्रित भोजन नैवेद्य दाखवून ग्रहण करावे.
     स्त्रीयांनी सात वर्ष हे व्रत करावे.त्यानंतर व्रत समाप्तीप्रीत्यर्थ उद्यापन करावे.या व्रताने ऋध्दिसिध्दी प्रसन्न होतील,धनधान्याची वृध्दी होईल.सुखसमृध्दी मिळेल आणि अंती सद्गती लाभेल.म्हणून हे व्रत श्रध्देने केले जाते.
      विविध प्रकारच्या रान-पालेभाज्या,कंदमुळे मिश्रित शाकान्न आहार, तांदळाची खीर व लाल रात्याच्या तांदळाच्या (पटणी) लाल भाकरी अशा चवदार भोजनाचा आस्वाद घेऊनच स्त्रीया उपवास सोडतात. विशेष म्हणजे आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या भाज्या बैलाच्या कष्टाशिवायच्या असतात.तसेच भोजन हे मिठाशिवाय बनविलेले असते. तरीही ते भोजन प्रसाद म्हणून चविष्ट लागते. ५० वर्षापासून ऋषिपंचमी या व्रताची पोथी उपवास करणारी महिलाच वाचन करते. त्यामुळे कौटुबिक ऋषि पंचमी व्रत हे पुरोहिताशिवाय केले जाते. कवी नवनाथ ठाकुर हे स्वतःच काही वर्ष पोथी वाचन करायचे. अशी माहिती त्यांची बहिण श्रीमती सविता नंदू गायकवाड यांनी दिली.
       कौटुंबिक ऋषि पंचमी व्रतासाठी पिंपळास, भोरडी, कोरावले, सोनारपाडा, हेदुटणे, संदप, नेवाळी, वाकळण, खारघर अशा विविध गावांमधून स्त्रीया येत असतात.
     वरीलप्रमाणे हे व्रत ५० वर्षापासून कौटुबिक परंपरा म्हणून ठाकुर कुटुंबात आजतागायत यशस्वीपणे संपन्न होते. अशी माहिती कवी नवनाथ ठाकुर-खिडकाळी यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नेरे गावचा सुपुत्र गायक रवींद्र जाधव साई इंटरटेनमेंटच्या 'स्टार महाराष्ट्राचा' पुरस्काराने सन्मानित

गडब (अवंतिका म्हात्रे)एमसीयम टीव्ही आणि साईसागर आयोजित स्टार महाराष्ट्रचा पर्व १० वे पनवेल येथील २१ सप्टेंबर रोजी, आद्यक्रांतीवर वासुदेव बळ...