आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४

बदलापूर मध्ये दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी तर्फे उरण मध्ये जन आक्रोश आंदोलन

उरण दि २१(विठ्ठल ममताबादे )देशात व महाराष्ट्र राज्यात महिलांवर सतत अन्याय अत्याचार होत आहेत. कुठे विनयभंग, कुठे बलात्कार तर कुठे अश्लील चाळे तर कुठे अनैतिक संबंध, प्रेम प्रकरण, वेगवेगळे आमिष प्रलोभनातून महिलांच्या हत्या असे विविध घटना देशात व महाराष्ट्रात होत असल्यामुळे जनतेत या घटना विरोधात तीव्र संताप निर्माण झाले आहे. देशात व महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिला कुठेही सुरक्षित नाहीत त्यामुळे महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचारच्या निषेधार्थ व बदलापूर घटनेचा निषेध करण्यासाठी व आरोपीना कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी महाविकास आघाडी तर्फे उरण शहरातील बाझारपेठ येथील गांधी चौकात दुपारी १२ वाजता जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.
   बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूरमध्ये तीव्र संताप उसळला. जनतेचा उद्रेक हाताबाहेर गेला. घटना घडून आठवडा उलटूनही नराधम कर्मचाऱ्यावर कारवाई न होणं आणि पोलिसांनी तक्रार न घेता बालिकेच्या गरोदर आईला ११ तास पोलीस ठाण्यात बसवल्याने संताप्न बदलापूरकर आक्रमक झाले. यात पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या तरुणांना वेचून वेचून ताब्यात घेत आंदोलनाची भडास त्यांच्यावर काढल्याने महाराष्ट्राभर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.पीडित बालिका शाळेत जायला घाबरत असल्याने तिच्या आजोबांनी शाळेत न जाण्याचे कारण जाणून घेतलं असता या बालिकेसह आणखी एका बालिकेवर अत्याचार झाल्याचं उघड झालं. आठवडाभरापूर्वी घडलेल्या घटनेची दखल ना शाळेच्या मुख्याध्यापिकेने घेतली ना बदलापूरच्या पोलिसांनी. शाळा सत्ताधारी पक्षाच्या आमदाराशी संबंधित असल्याने आणि सबंधित नराधम या शाळेच्या संचालकाचा नातलग असल्याने मुख्याध्यापिकेने प्रकरणाची तक्रार धुडकावून लावली. शाळेत न्याय न मिळाल्याने चिमुकलीची आई बदलापूरच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेली.तर या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक असलेल्या शुभदा शितोळे यांनी गरोदर मातेला चक्क ११ तास ठाण्यात बसून ठेवलं. या घटनेची माहिती आणि शाळा व्यवस्थापन तसंच पोलिसांच्या निष्काळजीची जाणीव बदलापूरकरांना झाली आणि उद्रेकाने वाट करून दिली. पश्चिम बंगालमधील कोलकोता इथं डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आल्यामुळे देशात संतापाची लाट आहे. त्यातच मुंबई जवळ असलेल्या बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेतील चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे संतप्त पालकांनी बदलापूर बंदची हाक दिली. बदलापूर परिसरात जनता रस्त्यावर उतरल्यानं आंदोलन चिघळलं. त्यामुळे आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन झाले.बदलापूर आंदोलकांकडून नराधमांना फाशीच्या शिक्षेची मागणी केली जात आहे.या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतर्फे उरण मध्ये गांधी चौक येथे जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.
    घटनास्थळी निषेध करताना जेष्ठ साहित्यिक एल बी पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामाची मागणी केली. हे सरकार अत्याचार करणारे, अत्याचार करणाऱ्याला संरक्षण देणारे सरकार आहे. त्यामुळे तुम्ही राजीनामे द्या,आम्ही सरकार चालवितो. असे शब्दात निषेध केला. उपस्थित शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी बदलापूर येथील घटनेचा निषेध नोंदविला. व नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आज महिला सुरक्षित नाहीत त्यांना अगोदर सुरक्षा दया. महिलांना संरक्षण दया अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर यांनी हातात फाशीची प्रतिकात्मक दोर हातात धरून नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. केवळ बदलापूर नव्हे तर सर्वच बलात्कारी आरोपीना लगेच फाशी दया. आरोपीना संरक्षण देऊ नका. आम्हाला १५०० रुपये नको तर आम्हाला महिलांना संरक्षण देणारे, महिलांचे संरक्षण करणारे सरकार हवे आहे. घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो अशा शब्दात निषेध व्यक्त केला. शेतकरी कामगार पक्षाच्या उरण महिला तालुका अध्यक्ष सीमाताई घरत यांनीही महिलांवर सतत अन्याय होत आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजे.यासाठी कठोर कायदा झाला पाहिजे.एका दिवसात लॉक डाउन होतो,एका दिवसात नोट बंदी होते,एका दिवसात सत्ता बदलते.मग एका दिवसात आरोपीला फाशी का दिली जात नाही असा सवाल उपस्थित करत केंद्र व राज्य शासनाच्या भूमिकेवर संशय उपस्थित केला.यावेळी राज्य शासना देखील सीमा घरत यांनी निषेध व्यक्त केला.काँग्रेस उरण तालुका महिला अध्यक्ष रेखा घरत यांनीही विद्यमान महाराष्ट्र शासनाचा निषेध केला.यावेळी हे सरकार महिलांना सरक्षण देण्यात अपयशी ठरले आहे.अर्ध वेळ असलेल्या गृह मंत्र्यांनी त्वरित राजीनामा दया.देशाला सक्षम व चांगल्या नेतृत्वाची गरज आहे.आम्ही महिलांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाही या कडक शब्दात शासनाचा निषेध केला.यावेळी प्रमुख उपस्थिती लाभली ती शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते प्रीतम म्हात्रे यांची. यावेळी प्रीतम म्हात्रे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले.बदलापूर येथील झालेला घटनाचा आम्ही सर्व प्रथम महाविकास आघाडीच्या वतीने व विविध संस्था संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो.दोन दिवसापूर्वीच रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला. बहिणीने भावांना राख्या बांधल्या आहेत. या राख्यांचा अर्थ या सरकारला कळत नसेल किंवा त्या नराधमांना कळत नसेल त्यांना आमच्याकडून तीव्र इशारा आहे की एकदा रस्त्यावर उतरलो की कायदा हातात घ्यायला आम्ही कमी पडणार नाही. सरकारला, पोलिसांना आम्ही नेहमी वारंवार सांगत आलो आहे की तुम्ही निर्णय लवकर देत जा.लवकर निर्णय घ्या. उरण मधील यशश्री शिंदे निर्घृण हत्या प्रकरणात नराधमाला दोन दिवसात अटक झाली.मात्र पुढे काय झाले याची काहीच माहिती नाही. लवकर निर्णय न घेतल्याने असे वारंवार घटना घडत आहेत.उरण मधील घटना ताजी असतानाच लगेच बदलापूर मध्ये घटना घडली. या राज्यात चालले तरी काय. राख्या कशाला पाहिजेत. राखी चा अर्थ तुम्हाला कळत नसेल तर असल्या सरकारचे व असे व्यवस्थापनाचे काहीच काम नाही. मग महिलांना सामाजिक संस्थांना रस्त्यावर उतरावे लागेल. व्यवस्थापकांना ताब्यात घ्यावे लागेल.आता आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आता आम्ही थांबणार नाहीत आम्हाला निर्णय हवेत.आमच्या मुली, आमच्या राख्या सुरक्षित नाही आहेत.आज महिला कुठेही सुरक्षित नाही. फळ विक्रेते, भाजी विक्रेते, छोटे छोटे व्यावसायिक महिला, शाळेत जाणारे लहान मुली, नोकरदार वर्ग कोणीच सुरक्षित नाही.आजच्या चिमुकल्या मुलींना भीती पोटी बाहेर कुठेही सायकल चालवता येत नाही.छोटया चिमुकल्या मुलीच्या सुरक्षेसाठी त्या लहान मुली बरोबर आईलाही घराबाहेर पडावे लागत आहे. पण त्या मुलीच्या आई देखील सुरक्षित नाही आहेत. मग त्या चिमुकल्या मुलीला घेउन घरात बसायची वेळ आज आईला आली आहे. ही वेळ आम्हाला नको. त्यासाठी आम्ही हा जन आक्रोश आंदोलन काढला आहे.हा मोर्चा साधेपणाने काढला आहे.मात्र हे असेच चालू राहिले तर पुढे जाऊन चक्काजाम,रस्ता जाम आंदोलन करावे लागेल. असा आक्रमक शब्दात प्रितम म्हात्रे यांनी शासनाला इशारा दिला. बदलापूर येथे घडलेल्या घटनेचा व शासनाचा प्रीतम म्हात्रे यांनी खरपूस समाचार घेतला.





महाविकास आघाडीचे माजी आमदार, महाविकास आघाडीचे नेते यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या जन आक्रोश आंदोलनात उरण मधील गांधी चौक येथे शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते काका पाटील,जेष्ठ नेते महादेव बंडा,जेष्ठ नेते सीताराम नाखवा,उरण शहराध्यक्ष नयना पाटील, माजी पंचायत समिती सदस्य माया पाटील,उरण तालुकाध्यक्ष सीमा घरत,शहर उपाध्यक्ष रंजना पाटील, रमाकांत म्हात्रे,माजी नगराध्यक्ष नाहिदा ठाकूर,जेष्ठ साहित्यिक एल. बी. पाटील,शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट )रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर,उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर,तालुका प्रमुख संतोष ठाकूर, उपजिल्हा संघटिका ममता पाटील,दिपक भोईर,शहर संघटक महेश वर्तक, गणेश घरत,रंजना तांडेल,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, तालुका अध्यक्ष मनोज भगत,तालुकाध्यक्ष हेमांगी पाटील,युवक अध्यक्ष समाधान म्हात्रे, मंगेश कांबळे, आम आदमी पार्टीचे उरण तालुकाध्यक्ष संतोष भगत,काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य चिटणीस मिलिंद पाडगावकर, रायगड जिल्हा सरचिटणीस रामनाथ पंडित,कामगार नेते किरीट पाटील,रायगड उपाध्यक्ष दत्तात्रेय म्हात्रे, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे,उरण तालुका अध्यक्ष रेखा घरत, तालुका उपाध्यक्ष निर्मला पाटील,भेंडखळ ग्रामपंचायत सदस्य दिपक ठाकूर,देविदास थळी, कॉम्रेड संजय ठाकूर आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह उरण विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक, शाखा प्रमुख,चिटणीस, सरपंच, सदस्य, युवक संघटना, महिला आघाडी, युवा सेना, विद्यार्थी संघटना, तसेच महाविकास आघाडीच्या अंगीकृत संघटनाचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

देव फाउंडेशनचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या अडवली भूतावली शाळेत विद्यार्थी सहाय्य उपक्रम संपन्न

नवी मुंबई(वैभव पाटील)  मुंबईच्या देव फाउंडेशन यांच्या वतीने नवी मुंबईतील अडवली भूतावली येथील महागरपालिकेच्या शाळा क्...