वसई (प्रतिनिधी) आगरी ग्रंथालय चळवळ आयोजीत दुसरे आगरी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात प.पू. बालयोगी सदानंद महाराज स्थित तुंगारेश्वर गडावर पार पडले
यावेळी आगरी साहित्याशी निगडीत आगरी साहित्य व अध्यात्म या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले या चर्चा सत्रात सुप्रसिध्द कवी सर्वेश तरे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार मोरेश्वर पाटील, सुप्रसिद्ध कवी सुनिल पाटील सर, सुप्रसिध्द सिने अभिनेते मयुरेश कोटकर, आगरी पिटी उषा सुप्रसिध्द धावपटू डॉ. शोभा पाटील आदींनी सहभाग नोंदवला तसेच आगरी भाषेत कीर्तन, धवला गिते, डाकी गीते, प. पू. सदानंद महाराज लिखित "चोखा नामियाचा" या नाटकाचे काही प्रवेश सादर करण्यात आले . या संमेलनात खास आकर्षण ठरले ते "लोकशाहीर स्व. कवी अनंत पाटील कट्टा" महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली गीतं म्हणजे "ही ऐका सत्यनारायणाची कथा", "चल ग सखे चल ग सखे पंढरीला", "जगी जीवनाचे सार", "गेला हरी कुण्या गावा", "तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता", अशी अजरामर गीतं देणारे स्व. कवी अनंत पाटील हे कायम प्रसिद्धीच्या आड राहीले. जादुई आवाजाचे गायक स्व. प्रल्हाद शिंदे ज्या गीतांमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले त्यात त्यांच्या जादुई आवाजाचा वाटा आहेच किंबहुना त्या पेक्षा थोडा जास्त वाटा स्व. अनंत पाटील यांच्या गीतांचा आहे हे नाकारता येणार नाही असे स्व. अनंत पाटील कट्ट्याचे प्रमूख आणि संवादक सुप्रसिध्द कवी संदेश भोईर यांनी बोलताना सांगीतले
या सत्रात सुप्रसिद्ध गायक रसिकाच्या लग्नात फेम जगदीश पाटील हे या कट्ट्याच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी त्यांनी स्वर्गीय अनंत पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांनी लिहिलेले "साईबाबा मना शिर्डीला नेशील कवा" हे सुपरहिट गीत सादर केले सदर सत्रात सुप्रसिद्ध गायक बिग बॉस फेम संतोस चौधरी उर्फ दादुस यांनी "तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता" हे गीत सादर करून आपल्या वेगळ्या स्टाईलने वातावरण निर्मिती केली, सुप्रसिद्ध गायक "दिस सोन्याचा उंगवला" फेम केतन पाटील" यांनी भक्ती गीते सादर केली, सुप्रसिद्ध गायक किसन फुलोरे यांनी चंद्रभागेच्या तिरी गीत गाऊन उपस्थितताना विठ्ठलाच्या भक्तीत रममाण केले तर आगरी धवला क्वीन चंद्रकला दासरी यांनी स्व.अनंत पाटील यांनी लिहिली एकविरा आईची गिते सादर केली या सत्राच्या शेवटी नॉन स्टॉप स्वर्गीय अनंत पाटील यांची कोळीगीते सादर झाली त्यावेळी संपूर्ण सभा मंडपातील प्रेक्षकांनी कोळीगीतांवर ठेका धरून उस्फूर्त नाच केला
दरम्यान या संमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांनी तर स्वागत अध्यक्ष पद भूमिपुत्र सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी भूषवले. या कार्यक्रमाचे आयोजन स्वागतअध्यक्ष सुशांत पाटील यांनी नेटके केले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुशांत पाटील आणि मित्रपरिवार, बालयोगी सदानंद महाराज ट्रस्ट कमिटी, बालयोगी सदानंद महाराज भंडारा व्यवस्था मंडळ, कवी सर्वेश तरे, कवी दया नाईक यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा