नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख) : नेरुळ जेष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालयाने गतवर्षाप्रमाणे यावर्षीही दिवाळी अंक आणि पुस्तक प्रदर्शन, ज्येष्ठ नागरिक भवन मध्ये दिनांक २१ आणि २२ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित केले . ज्येष्ठ नागरिक संघ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दि. ना. चापके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रदर्शनाचे उद्घाटन प्रशांत पाटील, जिल्हा उपसंचालक , ग्रंथसंचालनालय यांच्या हस्ते दिनांक २१ डिसेंबर रोजी उत्साही वातावरणात करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलानाने व सरस्वती वंदनाने झाली.
उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तगुच्छ अर्थात पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.
प्रशांत पाटील यांनी ग्रंथालयास दिलेले दिवाळी अंक प्रदर्शनात ठेवले होते. उपस्थित सर्वच वाचकांनी उत्सुकतेने पुस्तके चाळली आणि आवडीने खरेदी केली.
ग्रंथालयाचे अध्यक्ष विकास साठे यांनी आपल्या प्रास्ताविकात उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले की, मानसशास्त्रज्ञ फ्रॉईड यांच्या सिद्धांताप्रमाणे वाचन करीत असताना आपल्या सुप्त मनावर अप्रत्यक्ष संस्कार घडत असतात . सूप्त मन अविरत कार्यरत असते आणि त्याची ताकदही अफाट असते. चांगल्या, सकस , दर्जेदार वाचनामुळे सुप्त मनाची सकारात्मक ताकद वाढून त्याचा जागृत मनावर होणाऱ्या परिणामाने सुजाण नागरिक आणि सुसंकृत मानव समाज निर्मिती होते, वाचनाने सुजाण , संस्कारक्षम नागरिक घडू शकतो. त्यामुळे समाज घडविण्यात व राष्ट्र घडविण्यात ग्रंथालयाची भूमिका ही अहम आहे. पुस्तक हे मानव समाज घडवण्याचे एक उत्क्रृष्ट माध्यम असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. माणसाचे डोळे हे वाचत नसून त्याचे मन वाचत असते.असे सांगताना त्यांनी जरी माणूस प्रत्येक विषयातील अनुभव घेऊ शकत नसला तरी निरनिराळ्या लेखकांनी लिहिलेला पुस्तकाच्या माध्यमातून तो हे अनुभव आत्मसात करु शकतो व आपले अनुभव विश्व समृद्ध करू शकतो याकडे लक्ष वेधले. नेरुळ जेष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालय हि वाचनसंस्कृती जपण्यासाठी सतत कार्यरीत राहील याची त्यांनी ग्वाहीही त्यांनी प्रसंगी दिली.
कार्यक्रमाचे उद्घाटक प्रशांत पाटील यांनी नेरुळ जेष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालयाच्या कामांची प्रशंसा करत त्यासाठी जिल्हा ग्रंथालय त्यांच्या मार्गदर्शनासाठी सतत उपलब्ध असेल असे सुचित केले आणि ग्रंथालयास पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर यांनी ग्रंथालयाच्या विविध उपक्रमांची प्रशंसा करताना ग्रंथालयाच्या संपूर्ण कार्यकारणीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. लेखक सुधाकर पाटील यांनी आजच्या मान्यवरांना देण्यासाठी त्यांच्या दहा पुस्तकाचा संच ग्रंथालयास भेट दिला . आजच्या काळातील वाचनाची गरज अधोरेखित करत नेरूळ जेष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालयाच्या कामाची त्यांनी स्तुती केली. संस्थेचे मार्गदर्शक श्री प्रकाश लखापते यांनी क्षणोक्षणी जगात होणाऱ्या बदलातील कृत्रिम बुद्धिमत्तेकडे लक्ष वेधत त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता हे दुधारी शस्त्र असल्याचे सांगितले. तसेच या विषयावरची पुस्तके वाचकांनी वाचावी असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर त्यांनी ज्येष्ठ भवनात तळमजल्यावर वाचनालय किंवा अभ्यासिका करता येईल का याबाबत चाचपणी करण्यासही सुचविले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दि.ना. चापके यांनी विकास साठे यांच्या भाषणाचा धागा पकडत सुप्त मनाच्या ताकदी बाबतचा त्यांचा अनुभव विषद केला. कै. किंजवडेकर यांनी भवनात सुरु केलेल्या अनेक उपक्रमापैकी ग्रंथालय ह्या उपक्रमाची मुहूर्तमेढ सुद्धा त्यांनीच रोवली हे देखील त्यांनी नमूद केले. आताच्या कार्यकारणीने याच्या ग्रंथालयाच्या वाढीसाठी खूप चांगले नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत असल्याचे सांगून कार्यकारणीचे कौतुक केले.
त्याचबरोबर वाचनालय, अभ्यासिका ज्या पूर्वी सुरु करण्यात आल्या होत्या आणि काही कारणात्सव बंद झाल्या त्याकडे लक्ष वेधत हे उपक्रम भवनात लवकर कसे सुरु होतील याकडे लक्ष देण्याचे सूचित केले. प्रसंगी लेखक गजआनन म्हात्रे, कवियत्री लेखिका सौ. माला मेश्राम, मनोहर परब यांनी आपण लिहिलेली पुस्तके ग्रंथालयास भेट म्हणून दिली. याबद्दल ग्रंथालयाने त्यांचे विशेष आभार मानले.
या कार्यक्रमात सर्वश्री ललित पाठक, सुभाष हांडे देशमुख, व्ही. के. शेट्ये, वसंत राव , रमेश साळुंखे, देशपांडे, अंकुश हाडवळे, अजय माढेकर, दत्तात्रय म्हात्रे , दत्ताराम आंब्रे , विजय सावंत , सीमा आगवणे , सुचित्रा कुंचमवार, रणजीत दीक्षित , नंदलाल बॅनर्जी , गुप्ता झाशीकर , घनश्याम परकाळे, रमेश गायकवाड इत्यादी मान्यवरांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालयाचे सचिव सुनील आचरेकर यांनी अत्यंत सूत्रबद्धरित्या व चपखलपणे केले. संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती सीमा आगवणे यांनी आपल्या खुमासदार शैलीत सर्वांचे आभार मानले. कार्यकारणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली . हे प्रदर्शन २१ व २२ डिसेंबर २०२३ पर्यंत सर्वांसाठी खुले आहे.
शेवटी रमेश गायकवाड यांनी गायलेल्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
-----------------------------------
आदर्श वार्ताहर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा