स्वार्थ व वैयक्तिक हितासाठी झगडणाऱ्या आजच्या दुनियेत सामाजिक बांधिलकी व माणुसकी लोप पावत चालली आहे. प्रत्येक जण फक्त स्वतः व कुटुंबापुरताच विचार करण्यात मग्न आहे. यामुळे गरीब श्रीमंत दरी समाजात वाढत चालली आहे. ही दरी कमी करायची असेल समाजातील गरीब, दुर्बल व वंचित घटकांचा विचार कुणीतरी करायला हवा. त्यांच्या अपेक्षा फार नसल्या तरी जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची मदत त्यांना मिळायला हवी. यासाठी समाजातील धनाढ्य, उद्योगपती, मोठमोठ्या सामाजिक संस्था यांचेमार्फत जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक आहेच पण समाजभान जपणाऱ्या संवेदनशील नागरिकांचा सहभागदेखील मोठा बदल घडवू शकतो. कोरोनाने आपल्याला बरेच काही शिकवले आहे. पैसा, संपत्ती, मालमत्ता या बाबी क्षणभंकूर असुन या सर्वांपेक्षा व्यक्तीचे आरोग्य व इतरांना केलेली मदत आयुष्यात सर्वात उपयोगी पडते. याच जाणीवेतुन अनेक मोठमोठया संस्था, कंपन्या, उदयोग, धनाढयांनी कोरोना काळात लोकांच्या मदतीला धावून जात मोठी मदत उभी केली व त्यातून सामाजिक बांधिलकीचे एक अनोखे रुप पाहायला मिळाले. अशाच प्रकारे सामाजिक बांधीलकीतून एकत्र आलेला "जॉय ऑफ गिव्हिंग" हा आमचा सोशल ग्रुप सातत्याने गरीब, गरजू लोकांसाठी विविध उपक्रम राबवत समाजभान जोपासण्याचे काम करत आहे. आधुनिक तंत्रज्ञान व एशोआरामाच्या दुनियेत हरवत चाललेल्या आजच्या तरुण पिढीला सामाजिक व्यवस्था व बांधिलकीचे फार भानच राहिलेले नाही. पैसा, पैसा व केवळ पैसा करत आपल्या आयुष्यातील महत्वाची वर्षे कोणत्याही सामाजिक जबाबदारीविणा घालवत असलेली आजची तरुण पिढी भविष्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. मात्र तरीदेखील समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो व समाजातील गरीब, गरजू, दुर्लक्षित घटकांसाठी आपल्या कमाईतील काही भाग किंवा काही वेळ देता यावा अनेक जण अक्षरशः धडपडत असतात. त्यातीलच एक हरहुन्नरी व्यक्ती म्हणजे जोगेश्वरीचे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त श्री गणेश हिरवे सर. पेशाने शिक्षक असलेल्या गणेश हिरवे यांना समाजकार्याची भारी हौस नव्हे तर व्यसनच लागले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र या समाजसेवेला आपले सोबती व समाजातील सधन व्यक्तींची साथ लाभावी या हेतूने त्यांनी सुरुवातीला 'गणेश हिरवे सोशल ग्रुप' स्थापन केला व त्याद्वारे विविध लोकोपयोगी कामांना सुरवात केली. त्यांचेबरोबर सामाजिक उपक्रमांची आवड असलेले त्यांचे अनेक सहकारी जोडले गेले आहेत. दुसऱ्याला देण्यात जो आनंद मिळतो तो इतर कशातही नाही या भावनेतून या सोशल ग्रुपचे नामकरण "जॉय ऑफ गिव्हिंग" असे करण्यात आले आहे. मुंबई व उपनगरांमधील अनेक भागांत या ग्रुपचे सभासद आज पसरले असून यातील प्रत्येकजण उदार व उदात्त हेतूने प्रेरित आहे. प्रत्येकाच्या कार्याबहुल्यात अधिक वेळ त्यासाठी देता येत नसल्याने व्हाट्सअपच्या माध्यमातून या ग्रुपचे सर्व सदस्य जोडले गेले आहेत. जे या ग्रुपद्वारे दररोज एकमेकांच्या संपर्कात असतात. सर्वाना सोयीचा दिवस साधून या ग्रुपचे सदस्य सातत्याने विविध ग्रामीण व आदिवासी भागात दौरे करतात व तेथील गरजू लोकांना, वृद्धांना, अनाथांना, विद्यार्थ्यांना विविध गरजेच्या वस्तूंची पदरमोड करत स्वखर्चाने मदत करतात. आजवर या ग्रुपने अनेक लोकोपयोगी उपक्रम विविध भागांत राबवलेले आहेत. फेब्रुवारी २०१६ मध्ये डोंबिवली पूर्वेच्या शीळफाटा येथील साईधाम वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत व्हॅलेन्टाईन डे साजरा करत संपूर्ण दिवस या वृद्धांसोबत घालवला व त्यांना एकूण पंचवीस हजार रुपये किंमतीच्या जीवनावश्यक वस्तूंचे व अन्नधान्याचे वाटप केले. त्याच वर्षी ऑक्टोबर महिनयात पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील डॉ ढवळे मेडिकल ट्रस्ट व आदिवासी विकास संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या आश्रमशाळेतील मुलांसाठी १०० किलो तांदूळ, ५०० किलो गहू, २५ किलो तूरडाळ, शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. २६ ऑक्टोबर २०१६ रोजी जोगेश्वरी पूर्व येथील आरे कॉलनी येथील समर्थ विद्यालयात आदिवासी भागातून शिकावयास येणाऱ्या ३५० विद्यार्थ्यांसाठी दिवाळी निमित्त प्रत्येकी २ किलो तांदूळ, एक वही व पेन यांचे (मागील ५ वर्षपासून सुरू आहे ) वाटप करण्यात आले. ऑक्टोबर २०१७ मध्ये अंधेरीच्या होम फॉर द एज आणि शेषायर होम्स इंडिया येथील ७० वृद्ध व अपंगांना नवीन बेडशीट, साबण, टॉवेल, बिस्किट इत्यादि साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्डिनल ग्रेसीअस होम फॉर डायींग डेस्टिट्यूट या सांताक्रूझ येथील संस्थेतील ७० वृद्ध महिलांना नवीन टॉवेल, साबण, बिस्किट यांचे वाटप नोव्हेंबर २०१७ मध्ये दिपावलीचे निमित्त साधून करण्यात आले. जोगेश्वरी येथील विकी पवार (वय २२ वर्षे) हा तरुण देवी विसर्जन पाहायला गेले असता शॉक लागून मृत पावला. केवळ रिक्षा चालवून उदरनिर्वाह चालवणाऱ्या व एकुलता एक मुलगा गमावलेल्या त्यांच्या कुटुंबाला 'जॉय ऑफ गिविंग' ग्रुपने आर्थिक (रु अकरा हजार) मदत व दोन महिने पुरेल इतके अन्नधान्य देऊन मदत केली. सन २०१८ मध्ये जॉय ऑफ गिविंगने २० जानेवारी रोजी पालघरच्या अंबिस्ते येथील आदिवासी आश्रम शाळेस भेट देऊन ४८० विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पोहोचवली. जुलै २०१८ मध्ये आरे आदिवासी पाड्यावरील २०० लोकांना कपडे व शैक्षणिक मदत दिली. १३ ऑक्टोबर २०१८ रोजी नवी मुंबईतील महापे अडवली भुतावली या महानगरपालिकेच्या आदिवासी भागातील शाळेत ५५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक व जीवनावश्यक वस्तूंच्या मदत पोहोचवली. यावेळी जॉय ऑफ गिव्हिंगच्या नवी मुंबई शाळेची स्थापनादेखील करण्यात आली. जुलै २०१८ मध्ये जोगेश्वरी येथील रस्त्यावरील जवळपास २०१८ लोकांना कपडे व खाऊ वाटप जॉयच्या बिंबिसार शाखेच्या वतीने करण्यात आले. नोव्हेंबर २०१८ मध्ये दिवाळी निमित्त डॉ निरंजन वाघ वृद्धाश्रम ३० वृद्धांना नवीन कपडे व खाऊ वाटप करण्यात आले. २३ डिसेंबर २०१८ रोजी आरे वानीचा आदिवासी पाड्यावरील २०० जणांना कपडे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. २ फेब्रुवारी २०१९ रोजी नॅशनल पार्क बोरिवली येथील १०० आदिवासी बांधवांना किराणा किट,ब्लॅंकेट व खाऊ वाटप,सांगली-कोल्हापूर येथे पूरग्रस्तांना २०० ब्लॅंकेट वाटप करण्यात आले, सप्टेंबर २०२० आशासदन अनाथालय मुंबई जवळपास १४० अनाथ मुलांसाठी यांना रु ५१००/- आर्थिक मदत व जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. समर्थ विदयालय, जोगेश्वरी येथे नोव्हेंबर २०२२ च्या दिवाळी सणामध्ये १४० विदयार्थ्यांना किराणा किट, फराळ व टॉवेल वाटप करण्यात आले. १२ फेब्रुवारी २०२२ रोजी पालघर जिल्ह्यातील काटी या दुर्गम खेडेगावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप तसेच शाळेला रंगकाम करण्यासाठीदेखील आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. याच दिवशी या परिसरातील राजपूत वृद्धाश्रमातील ८० वृद्धांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटपदेखील संस्थेच्या वतीने करण्यात आले. देवघर व काटी येथील शाळांना लायन्स क्लबच्या सहकार्याने संगणक व प्रिंटर भेट देण्यात आले. या वर्षी २४ जून २०२३ रोजी जव्हार या आदिवासी भागातील निलेश मुर्डेश्वर कर्णबधीर विदयालयतील ६६ कर्णबधीर विदयार्थ्यांना स्कुल बॅग्ज, शैक्षणिक साहित्य व वस्तीगृहासाठी किराणा सामानाचे वाटप करण्यात आली.
दिवाळी २०२३ मध्ये जोगेश्वरी पूर्व येथील श्री समर्थ विद्यालयातील २७० विद्यार्थ्याना स्कूल बॅग आणि मिठाई वाटून त्यांची दिवाळी गोड झाली.मगील ७ वर्षपासून येथील विद्यार्थ्याना हमखस काही ना काही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न जॉय चे माध्यमातून होत आहे हे विशेष.
कोणताही स्वार्थ व प्रसिद्धीची अपेक्षा न बाळगता सोशल माध्यमावरील हया ग्रुपचे सदस्य सढळ हस्ते आर्थिक व वस्तूरुपी योगदान देऊन संस्थेचा प्रत्येक उपक्रम यशस्वी करत असतात. सधन व दानशूर व्यक्तींनी दुर्बल घटकांना मदत केली तरच सामाजिक संतूलन राखले जाईल या उदात्त भावनेने जॉयचे सभासद एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. सोशल माध्यमांचा वापर चांगल्या व समाजोपयोगी कामासाठी कशा प्रकारे करता येतो याचा उत्तम आदर्श जॉय ऑफ गिव्हिंगने समाजासमोर उभा केलेला आहे.
संस्थेच्या कार्याविषयी अधिक माहिती घ्यायची असेल तर श्री गणेश हिरवे (९९२०५८१८७८), वैभव पाटील (९८१९११२८८५), सौ अंसुता डिसोझा (९८२०५४१०५१) यांचेशी संपर्क साधता येईल.
-वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा